बोल ना !!

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 July, 2020 - 12:29

तू सांग ना बोलू कुणाशी...बोल ना
संवादते गझले तुझ्याशी, बोल ना

आभाळ कोसळते धरेला बिलगले
मृदगंध दरवळला उराशी, बोल ना

गोठ्यात गायी, पाखरे घरटयांमधे
मकरंदही आला फुलाशी, बोल ना

हे बोलणे मौनातले, स्पर्शातले
मी बोलते आहे तुझ्याशी, बोल ना

गाळात रुतले पूर्ण, धडपड थांबली
पोहोचण्यापूर्वी तळाशी, बोल ना

तू बोलल्या वाचून का समजेल ते
जे साठले आहे मनाशी, बोल ना

तू पोचला आहेस तेथे यायचे
घेणे न देणे ह्या जगाशी, बोल ना

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users