Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:18
मिठासारखे पाण्यामध्ये मिसळून जाणे कधीच जमले नाही
वादळ होतो तसाच जगलो शमून जाणे कधीच जमले नाही
उधाणलेल्या लाटा जेव्हा धडकत होत्या नावेच्या पायाशी
दीपस्तंभ बनलो मी जागा सोडून जाणे कधीच जमले नाही
पुतळ्यांच्या दर्शनास जेव्हा लांबलचकशी रांग लागली होती
भाव भक्तीच्या आशेपायी झुकून जाणे कधीच जमले नाही
रस्ता नाही, प्रकाश नाही, कोणी सोबत नव्हते माझ्या जेव्हा
डोळस होतो वाटेवर अडखळून जाणे कधीच जमले नाही
अश्रूंना मी द्यूतामध्ये जिंकून गेलो, दास बनवले त्यांना
व्यथा जरी जहरी झाल्या पण, रडून जाणे कधीच जमले नाही
फसवा पाऊस, फसवे पाणी, तरीही गगनाशी स्पर्धा केलेली
बळकट फांद्या, तृष्णेपायी झडून जाणे कधीच जमले नाही
जीवन होते कुरुक्षेत्र, नात्यांशी रोज लढाई लढलो होतो
सोबत भगवद्गीता होती, पळून जाणे कधीच जमले नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा