डबडबल्या डोळ्यांमधल्या अवकाळी गारा

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 July, 2020 - 13:18

वादळात छप्पर कौलारू उडे भरारा
पावसास कोसळत्या मागू कसा निवारा?

सक्रियतेची लाट पूर्ण ओसरली आहे
निष्क्रियतेचा सुटला आहे भणाण वारा

तुडवत आले निरिच्छतेची वाट निसरडी
जागोजागी प्रलोभनांचा खडा पहारा

कोरडवाहू ओठांना हमखास झोडती
डबडबल्या डोळ्यांमधल्या अवकाळी गारा

निष्प्रभ ठरते परिस्थितीची जहरी नागिण
आठवणींच्या डंखांवर द्या कुणी उतारा !

ओळ उलाची अपसुक सुचली आयुष्याला
सानी गुंफाया बसले....केला पोबारा

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users