विदर्भातील केशरफुलं - पळस

Submitted by मंगलाताई on 3 July, 2020 - 08:36

STS_001_Butea_monosperma.jpg

देशी फुलझाडांच्या मालीकेतील पाचवे फूलं पळस.

शिशिराची थंडी ओसरायला लागली की, सृष्टी लपेटून घेतलेली पानांची हिरवी शाल हळूहळू बाजूला सारून ठेवते. त्या काळात भरपूर पानगळ होते .उघडी पडतात वृक्षराने. नव्या पोपटी पालवीचे लेणे अंगावर मिरवत वसंत आपल्या आगमनाची सूचना देतो. वसंत म्हणजे सृष्टीच्या रसिकतेचा सूचक. वसंताच्या येण्याने पुन्हा एकदा सृष्टी नटते, बहरते, फुलते, सावरते. अनेक रंगांची उधळण करीत रंगोत्सव सुरू होतो. कुठे पिवळा बहावा, कुठे तांबडा गुलमोहर, पांढरा चाफा, पांढरा पांगारा, केशरी पांगारा, लाल चुटुक काटेसावर, मंद पिवळा हादगा. या सर्वांची येण्याची घाई गडबड सुरू होते. हळूहळू एकेक झाड पाऊल टाकते आणि होळीच्या सुमारास सारेच अगदी मुक्त रूपात बहरून येतात .यातच एक देशी जुने तपस्वी दिसतील त्यांचे नाव आहे पळस . हो पळसाला तपस्वीच म्हणावे लागेल कारण भारतातील रुक्ष डोंगराळ भागात उष्ण प्रदेशात शतकानुशतके उभा आहे तपस्या प्रमाणे .कुठे त्रागा नाही, कुठे चिडचिड नाही. होळीच्या थोडे आधी येतो हा पळस .उघड्या बोडक्या झालेल्या शेताला रानाला केसरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला सर्वत्र आढळतो.
जर तुम्ही या काळात प्रवास केला तर राने आणि शेते पळसामुळे लाल तांबडी दिसतात .विस्तवाच्या गोळ्यासारखे भासतात म्हणूनच तर पळसाला ' फ्लेम ऑफ द फॉरेस्ट ' असे संबोधतात . पळसाचे नाव ढाक, टेसू , ब्रह्मपुष्प असेही आहे. पळस उत्तर प्रदेशाचे ' 'राज्यफुल 'आहे. भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पळसाच्या फुलांचे पोस्टाचे तिकीट छापले होते . कालिदासांनी तर पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे .असे वाचले की पळस हा चंद्र या उपग्रहासाठी आहे आणि तो दक्षिण पूर्व ( आग्नेय )दिशेला लावावा . पळस पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लावावा आणि पळसाला पर्याय बेल आहे.पळस लावता येत नसेल तर बेल लावावा. पण माझ्या पाहण्यात तर वनविभागाने सोडून इतर कुठेही पळस लावल्याचे ऐकिवात नाही. तो आपसूकच उगवलेला पाहिलाय . पळसाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी वारंवार तो तयार होत असतो . त्याची नाळ जुळलीय शेतात, जंगलात , वनात , डोगरटेकडीवर .त्याला शहरातील जगमगाट नको .ईमारतींच्या जंगलाची नावड आहे तर खेड्यातल्या कौलारु घरांचा ,झोपड्यांचा सहवास हवा असतो पळसाला.पळसाची गंमत अशी आहे की याला भरपूर पाने असतात तेव्हा फुले नसतात आणि फुले आली की निष्पर्ण असतो पळस . त्यामुळे लाल तांबड्या फुलांचे घुमारे फुलतात सर्वत्र पळसाला. संस्कृतमध्ये पळसाला ' पलाश 'असे म्हणतात पलाश चा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा आहे. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवीच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात . लाल केशरी भगवा आणि पिवळा असे रंग असतात पळसाचे. विदर्भात नारिंगी रंगाचे बिनवासाची फुले आढळतात . फांद्यांच्या टोकास किंवा बगलेत लांब मांजरीवर फुले फुलतात .थोड्या जाडसर, वक्राकार पण पोपटाच्या चोची प्रमाणे बाकदार अर्धचंद्राकृती पाकळ्या असतात, त्यातून बाहेर डोकावणारे परागकण असतात आणि पाकळी बंदिस्त करण्यासाठी काळ्या रंगाचे छोटेसे आवरण असते . ही रंगसंगती अगदी सुंदर दिसते .हे फुल जर उलटे ठेवले तर माकडाचे तोंड असल्यासारखे दिसते. फुलाचा रंग भडक असल्यामुळे पक्षी आकर्षित होतात विशेषतः पोपट . त्यामुळे नारंगी फुलांच्या ताटव्यावर हिरवे पोपट खूपच दृष्ट लागन्या सारखा दिसतो हा सोहळा. पक्षी फुलातील मध लुटतात आणि झाडावर गर्दी करतात त्यामुळे एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर परागकण नेण्यास सहाय्य होते .

विदर्भाच्या पडीक जागेवर शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेने अगदी टेकडीवरही पळस सर्वत्र आढळतो .कधी तर टेकडीवर एकटाच जाऊन बसतो .पळस हा विदर्भाला वरदान स्वरूपात लाभला आहे , कारण डोंगराळ भागातही हा फुलतो आणि विदर्भातील रखरखीत भूमीवर पळस हिरवाई आणतो. त्याची उंची जास्त नसते पानगळी वृक्ष आहे पळस .खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात , तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते . पाने आकाराने मोठी असतात आणि गोलाकार असतात. तीन पाने असतात प्रत्येक देठावर म्हणूनच ' पळसाला पाने तीन 'असे आपण म्हणतो . ही केवळ एक उक्ती नसून त्यात गहन अर्थ दडलेला आहे . असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी उक्ती आहे ती. कितीही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता , उपयोगी लावू शकता ,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात .याची पाने त्रिदली असल्यामुळे याचे संस्कृत नाव ' त्रिपत्रक 'आहे .पाने लांब देठाची असून दले मोठी कठीण चिवट वरून काहीशी चकचकीत आणि खालून पांढरट लवदार असतात . थंडीत पाने गळतात आणि नवी पालवी एप्रिलमध्ये किंवा एप्रिलअखेर मध्ये येते . या पानांपासून पंगतिला जेवायला पत्रावळी व द्रोण तयार करतात .पावसाळा आला की खेड्यात घरावर शाकारण्यासाठी पळसाच्या फांद्या वापरतात . त्यामुळे घरे पावसाळ्यात जास्त गळत नाही .नागपूरला पोळा या सणाशी या पळसाचा विशेष संबंध आहे. बैलपोळ्याच्या दिवशी प्रत्येक घरी पळसाची छोटी डहाळी दाराच्या दोन्ही बाजूला एक एक ठेवतात , त्याला एक विशेष नाव आहे ' मेढे ', दुसऱ्या दिवशी त्या मेढ्यांना एकत्र करून गोळा करून त्याला गावाबाहेर नेऊन जाळतात .त्यामागे वाईट व्रुती जाळून नष्ट करणे असा भाव आहे.
download.jpg
खेड्यात 'परसाकडे जातो' हा शब्दप्रयोग करतात , त्याचा अर्थ एका पुस्तकात मी असा वाचला की, गावात प्रत्येकाची परसबाग असते तेथे लोक शौचाला जातात म्हणून परसाकडे असा आहे. पण एका ठिकाणी मी पळस असलेल्या दाट झाडीत शौचास जातो म्हणजे पळसाकडे जातो असा वाचला . त्याचा अपभ्रंश होऊन ' परसाकडे जातो ' असा शब्दप्रयोग झाला आहे . गाव बोलीतील बदल या अर्थाने असा बदल केला असे वाचनात आले होते.
लाल पळसाला ' ब्युटीया मोनोस्पर्मा ' म्हणतात .पांढऱ्या पळसाचे फक्त एक झाड आता उरले आहे .ते आहे मध्यप्रदेशातील मंडला शहरातील पन्नास किलोमीटर अंतरावरील सकरी या गावात . असं म्हणतात की हा वृक्ष दोनशे पन्नास वर्षे जुना आहे. पांढरा पळस हा नामशेष होण्याच्या मार्गावर लागला आहे . पांढरा पळसाला ' ब्युटीया पार्वाफ्लोरा ' असे शास्त्रीय नाव आहे . यज्ञ पात्रात वापरण्यासाठी पळसाची समिधा तयार करण्याची विधी आहे . गृह्य सूत्रानुसार उपनयन संस्काराचे वेळी ब्राह्मणकुमारांना या पळसाचा दंड हातात धरण्याची विधी दिलेली आहे .
पळसाच्या फुलांचा उपयोग अबीर व गुलाल बनवण्यासाठी करतात .तुरटी ,चुना किंवा क्षार मिसळून पक्का नारंगी रंग तयार करतात . पळसाची फुले भिजत घालून नैसर्गिक रंग मिळवतात , हा रंग धुळवडीला वापरतात . पळसाची फुले उष्णता शामक आहे म्हणून होळीच्या वेळी ती आपल्या कडे उगवतात . फुले वाळवून सरबत तयार करता येते . ते सरबत उष्णताशामक आहे. फुलांचा रंग खाद्यपदार्थात रंग म्हणून वापरता येतो , जर आपल्याला केशर ऐवजी खाद्यरंग वापरायचा असेल तर आपण पळसाच्या फुलांचा रंग वापरू शकतो . म्हणूनच त्याला विदर्भातले केशर असेही म्हणतात . घरच्या घरी ही फुले सावलीत वाळवून रंग तयार करतात . शिरा , मिठाई आणि सरबत करायचे असेल तर हा रंग वापरता येतो . जिलेबीचा रंग वापरण्याऐवजी पळसाचा रंग वापरता येतो . पळसाच्या मुळापासून दोऱ्या तयार करतात . सतरंजी आणि कागद तयार करण्यासाठी पळसाच्या खोडातील तंतूंचा उपयोग करतात . पळसाच्या पातळ फांद्यांपासून तयार केलेला काथ पश्चिम बंगालमध्ये खातात . पळसाच्या जाड फांद्या जाळून कोळसा तयार करतात .पळसा पासून गोंद मिळतो. पळस हे वैद्यराजही आहेत . उष्णतारोधक , वातवर्धक ,मलरोधक , पित्तशामक रुधिरविकार व कुष्ठनाशक आहे . राजस्थान आणि बंगाल या राज्यात तंबाखू भरून विड्या तयार करण्यासाठी पळसाची पाने वापरतात . सालीचा उपयोग म्हणजे तंतु जहाजातील सपाट भाग असलेल्या भेगा बुजवून आज येणारे पाणी थांबवण्यासाठी करतात. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात काही उगवत नसेल तरी त्याच्या सोबतीला पळस उभा राहतो . पळस आणि कडुलिंब त्याचा दोस्त होतो . हे दोन्ही जिवलग दोस्त शेतकऱ्याची काळजी घेतात . अधिक पाऊस आला तर पळसाची पाने तोडून त्यापासूनच बचाव करण्यासाठी शेतकरी त्या पळसाच्या पानांच्या टोप्या तयार करतो .
सृष्टी कर्त्याने काही संकेत दिलेले आहेत . हे संकेत निसर्गाचे व्यवस्थित निरीक्षण केले तर सहज लक्षात येतात . जिथे पळस असतो तिथे पाण्याची कमतरता असते .अशा ठिकाणी दुसरे कोणतेही झाड टिकत नाही तिथे पळस टिकतो, वाढतो , बहरतो आणि मानवावर अनंत उपकार करतो . आहे की नाही पळस एक तपस्वी.पळस तसा दुर्लक्षित आहे पण परोपकार करण्याचे काम तो तत्परतेने, निरंतर आणि निरपेक्षपणे करतो आहे .

WhatsApp Image 2020-07-03 at 5.17.42 PM.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लेख मंगलाताई ... लहानपणी रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी आम्ही भावंड पळसाची फुले वाटून बाटली मध्ये भरून ठेवायचो.शेतातील बांधावर असणाऱ्या पळसाच्या फुलांचे एक अनामिक आकर्षण लहानपणी वाटायचे. बालपणीच्या गोड आठवणी जाग्या झाल्या तुमच्या लेखाने.

खेड्यात 'परसाकडे जातो' हा शब्दप्रयोग करतात , त्याचा अर्थ एका पुस्तकात मी असा वाचला की, गावात प्रत्येकाची परसबाग असते तेथे लोक शौचाला जातात म्हणून परसाकडे असा आहे.
राम नगरकर ह्यांच्या ' रामनगरी ' ह्या आत्मचरित्रात लग्नानंतर जोडीने ' परसाकडे ' जाण्याच्या विधीचे वर्णन आहे. अर्थ वरीलप्रमाणे आहे,फक्त विधी प्रतीकात्मक असतो.

अहाहा !

पळसाला संस्कृतमधे ‘किंशुक’ असेही एक नाव आहे.

विदर्भाप्रमाणे तेलंगाणात भरपूर दिसतो. विकाराबाद- हैदराबाद रस्त्यावर मी हजारेक तरी झाडे बहरलेली बघितली आहेत - तिथल्या तप्त वैशाखात.

लेख संग्रहणीय आहे मंगलाताई, अनेक आभार !

नान्देड च्या पुढे उमरखेड पासुन मोठ्या प्रमाणात पळस दिसायचा , ह्या वेळी १ मार्च असुनही पळस फार कमी दिसला ,
रस्ता रुन्दीकरणात पळस आणी सागवानाची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली आहे .

खूप छान.
पळसाची झाडे लावून वाढवायला हवीत