घन तमी शुक्र बघ राज्य करी .....

Submitted by सामो on 3 July, 2020 - 04:34

https://www.aathavanitli-gani.com/Images/Photo/Lyrics/Bha_Ra_Tambe.jpg
.
'घन तमी शुक्र बघ राज्य करी' आज पुन्हा हे गाणं ऐकलं. भा रा तांबे यांचे, हे गाणं ऐकायला घेतलं की आपोआप ते गाणंच सदा वाजत रहातं. तदुपरांत, अन्य कोणत्याच गाण्यावरती मन जात नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी चढ उतार असलेली विलक्षण चाल या गाण्याला लावलेली आहे. गाणं ऐकताना, हृदयात, काहीतरी लकलक हलत रहातं. सरीअल वाटत रहातं. कोणत्या मनोवस्थेत हृदयनाथांना ही चाल सुचली असेल! अतोनात, गोड, दैवी सूरात हे गाणे लतादीदींनी गायलेले आहे.
................'घन तमी शुक्र बघ राज्य करी,'...........
गाणं सुरु झालं की चमचमणारा शुक्र तारा डोळ्यासमोर येतो. घनदाट काळोखात चमकणारा, काळोखावरती अधिराज्य गाजवणारा, शुक्र डोळ्यासमोर येतो. अन्य गाण्यांमध्ये असे चित्र चटकन डोळ्यांसमोर येत नाही. मला वाटतं ही चित्रमयता तांबे यांच्या कवितांची खासियत असावी का? कारण 'तीन्ही सांजा सखे मिळाल्या' मध्येदेखील अशीच दुपार पश्चात संध्याकाळ अशी संक्रमणाची, सांजवेळ हमखास डोळ्यासमोर येते. १४-१५ वर्षांची मी बालकनीत उभी असते, केशरी, गूढ संधीप्रकाश आणि समोर तांबड्या ज्वाळांत पेटलेला गुलमोहर हेच दृष्य दरवेळी दिसतं मला. असे म्हणतात, आयुष्याच्या अंतिम समयी, तुमच्या आयुष्यातील घटनांचा चलतपट झरझर डोळ्यांसमोरुन सरकत जातो. मला अन्य कोणती दृष्ये दिसतील, न दिसतील परंतु त्या आडनिड्या वयातली, त्या दिवशीची, ती संधीप्रकाशाचा वेळ नक्की दिसणार, खात्री आहे.
.........'रे खिन्न मना बघ जरा तरी' ............
या बघ जरा तरी आलापात कमालीचं आर्जव आहे. उदास मनाला, समजविण्याची शक्ती आहे.
गाणं जसं पुढेपुढे जात रहातं, काहीतरी आठवत रहातं. काय आठवतं ते चिमटीत पकडता येत नाही. एक अनामिक हुरहूर लागते. पण आभाळ दाटुन आलेली व्याकुळ हुरहूर नसते ती. अंहं! ती असते कोणत्या तरी ओळखीच्या पण आता विस्मृतीत गेलेल्या प्रसंगांची चाहूल. 'gossamer' हाच शब्द बरोबर आहे. स्मृतीच्या कप्प्यात, एक झिरझिरीत फुलपाखराच्या पंखासारखा, चंद्रवर्खी gossamer, पडदा, हलत रहातो आणि हलता हलता त्या पडद्याआडचं दिसतं न दिसतं - दिसतं, न दिसतं. मला वाटतं पूर्वजन्माशी निगडीत स्मृती चाळवल्या जातात. दर्शन घडते न घडते तोच त्या आठवणी झिरझिरीत पडद्याआड लोपतात. हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती येते मला. काही अमूर्त स्मृती , मूर्त मनात प्रकट होताहोता रहातात. गाणे वरचेवर ऐकायला हवे. न जाणो कधीतरी सबक्कॉन्शसमध्ये फार खोलवर दडलेली पुरातन शिंपल्याची डबी उघडेल व माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागेल.
------------------------------------------------------ पूर्ण कविता-----------------------------------------------------

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

- हा लेख फेसबुकवर टाकणार होते परंतु नाही टाकणार. काही वडीलधारी काका, मामा लगेच 'काळजी घ्या' वगैरे उपदेश सुरु करतात. The point gets totally lost on them. असो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिले आहे.
मलापण हे गाणं खूप आवडतं आणि हे गाणं ऐकायला घेतलं की आपोआप ते गाणंच सदा वाजत रहातं. तदुपरांत, अन्य कोणत्याच गाण्यावरती मन जात नाही. हे अगदी खरं.
या बघ जरा तरी आलापात कमालीचं आर्जव आहे. उदास मनाला, समजविण्याची शक्ती आहे. अगदीच!

आकाशात शुक्र पाहिला की हे गाणं आठवतंच आठवतं. आणि एरवीही एकदा मनात आलं की मनात वाजतच राहतं.

छान लिहिलंय. इतकी सुरेख आशयपूर्ण कविता आहे. तिला न्याय देणारी चाल आणि लता मंगेशकर यांचा आवाज. अजून काय हवं!

यप!!! व्यत्यय कमेंट वाचून फिस्सकन हसूच आले.
______________
परवा, विनोदी शेर फेसबुकवरती टाकलेला,
'जिस में लाखों बरस की हूरें हों. ऐसी जन्नत को क्या करे कोई.'

तर एक काका चिडले होते. नक्की का चिडले ते त्यांच्या अगाध इंग्रजीमुळे काही कळलेच नाही.

ऐकलंय.. गाणं आणि कविता दोन्ही सुंदर आहेत.. Happy

काही वडीलधारी काका, मामा लगेच 'काळजी घ्या' वगैरे उपदेश सुरु करतात..>> Lol

गाणं आणि कविता दोन्ही सुंदर आहेत...माहिती होतेच.
व्यत्यय Lol
लिखाण आवडले.
ह्रदयनाथ मंगेशकर यांनी काही काही इतक्या सुंदर गाण्यांना चाल लावली आहे की ते फार अंडररेटेड वाटताना मला. तिन्ही सांजा ही त्यातलंच...."दैवी".

हायवे आठवला, आता लेख वाचतो.. छान लिहिलंय! काही गाणी एखाद्या अश्या वेळी, मूड मध्ये ऐकली जातात, कि पुन्हा तो मूड किंवा आठवण आल्यावर गाणं सुद्धा आठवतं आणि vice versa..

हायवे काय आहे?
_______
@अस्मिता, तुमच्याकडे (मावशी) भा रा तांबे जेवायला आलेले होते? किती उत्तम योग आहे ग हा.
दैवी प्रतिभा.

ह्रदयनाथ आले होते. Sorry नीट लिहायला हवं होतं.

कुणी भा. रा. तांबे म्हणाले की मला 'जन पळभर म्हणतील हाय हाय ' हेच आधी आठवते. माझ्या आईचे आवडते कवी होते तिच्यामुळे पुष्कळच कविता कळल्या.

मधु मागशी माझ्या सख्या देखील त्यांचेच आहे बहुतेक.
जन पळभर होती आम्हाला शाळेत.
अस्मिता तुझे आणि वैराग्य या संकल्पनेचे काहीतरी नाते आहे Happy तुला गाणही बघ 'जन पळभर' आठवलं. Happy

>>>>>>>काही गाणी एखाद्या अश्या वेळी, मूड मध्ये ऐकली जातात, कि पुन्हा तो मूड किंवा आठवण आल्यावर गाणं सुद्धा आठवतं आणि vice versa.. >>>>>>> बरोब्बर!!! तंतोतंत.

माझं आवडतं गाणं. शब्दयोजना, वाद्यमेळ, स्वरसाज सगळं जमून आलेलं गीत. खिन्नतेला दूर सारून मनाला उभारी देण्याची वेगळीच शक्ती आहे या गाण्यात.

भा .रा.तांबे देवास ला राजदरबारी कवी होते. खूप गहन अर्थाच्या पण परमेश्वर प्राप्ती च्या मार्गाने जाणार्या गुढ कविता लिहील्या.

खूपच चांगला लेख आहे. आईशप्पथ मी हा रिप्लाय लिहीताना दुसर्‍या विंडो मध्ये लता मंगेशकरांनी गाईलेलं हे गाण लावलय. लेख वाचताना वाटलं मिळेल का नाही नेट वर पण लगेच मिळालं. मी पहिल्यांदा ऐकतोय. खूप खूप धन्यवाद सामो ताई! नवीन काही तरी... तुमच्यामार्फत!

लता मंगेशकरांबद्दल जेव्हा काही वाईट साईट ऐकते तेव्हा हे सांगावेसे वाटते
, त्यांनी खानोलकर, तांबे, भट यांची गाणी खरोखर अजरामर केलित. हिंदी सिनेमातील गाणे (योगदान) सोडुन फक्त यासाठीच त्या अजरामर झाल्या असत्या.
आम्हाला पार्ले टिळक मध्य्रे तांबेंची " नववधु प्रिया मी बावरते" तेंव्हाचे मुख्याध्यापक नीर सहस्त्रबुद्धे यांनी शिकवली होती.
त्यावेळी त्यांनी राजकवी तांबे यांच्या कवितांबद्दल बरेच काही सांगितले. "तरुणांचे कवी" म्हणुन प्रसिद्ध असलेल्या तांब्यांच्या नंतरच्या काळातील (त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा अपघात झाल्यानंतर्च्या काळातील) कविता बर्याच हृदयस्पर्षी आहेत.
"घन तमी" आणि "मधु मागशी" या त्यापैकीच.
हे रसग्रहण वाचले आणि सरांची आठवण झाली.
मला वाटतं ही चित्रमयता तांबे यांच्या कवितांची खासियत असावी का?
आम्हाला सरांनी सांगितलेले की त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्युनंतर त्यांच्या कवितेत हा बदल झाला.
वयाच्या शेवटी एकटेप्णामुळे मृत्युचे भय आणि स्वतःलाच दिलेले आश्वासन कवितेत दिसते.
इथे ते स्वतःला सांगता हेत की शेवटचे क्ष्ण शुक्रा प्र्माणे तेजस्वी जग. याच शेवटच्या क्ष्णी
त्यांची स्थिती "नववधु" प्रमाणे आहे. येणार्या मुक्तीचे आकर्षण आणि मरणाची भिती हे तांबेंच्या कवितेचे गमक आहे.