"अहो बाबा! उठा!"
माझी कन्या मला गदगदा हलवून जागे करत होती.
"काय शिंची कटकट आहे? सुखाने झोपू पण देत नाही." त्रासिकपणे उद्गारत मी धडपडून उठलो.
"काय झाले? कशाला ऊठवलेस? चांगली मस्त झोप लागली होती."
"अहो, पण झोपेत ते सारखं ’बाबुल मोरा,बाबुल मोरा’ काय चाललं होतं तुमचं? मधेच जोरजोरात गात काय होता. काय प्रकार काय आहे?"...कन्यारत्न उद्गारले.
"सांगतो. जरा आठवू दे. हं! तर काय छान स्वप्न पाहात होतो मी.....
बरेच दिवस एक कीडा मनात वळवळत होता.उठता बसता तो स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी एकदाचा निर्णय घेतला आणि मी
भीमसेन अण्णांना फोन केला, "अण्णा मी मोद बोलतोय. आत्ता येतोय तुमच्याकडे. आल्यावर बोलू".
तसाच सैगलसाहेबांना फोन केला, " सैगलसाहब मैं मोद बोल रहा हूं! आपके घर आ रहा हूं. आनेके बाद बात करेंगे"!
फोन ठेवला. गाडी काढली आणि तडक कलाश्री गाठले. अण्णा माझीच वाट पाहात होते.
" काय मोद’बुवा’? इतक्या घाईत काय काम काढलंत?"(अण्णा मला गमतीने मोद’बुवा’म्हणतात आणि अहो-जाहो करतात.फिरकी घेण्याची सवय आहे त्यांना!)
"अण्णा! एक मस्त कल्पना आहे. तुम्ही आधी हो म्हणा मग सांगतो".
"अहो पण कल्पना काय ती तर सांगा."
"नाही अण्णा. आपल्याला लगेच निघायचे आहे. इथून आपल्याला मुंबईला जायचेय.मी तुम्हाला गाडीत सांगतो. तुम्ही कपडे बदलून या लवकर".
अण्णा बघतच राहिले पण माझ्या विनंतीला मान देऊन दोन मिनिटात कपडे बदलून हजर झाले.आम्ही गाडीत बसलो. मी प्रथम टेपरेकॉर्डर सुरु केला. सैगलसाहेबांचे ’बाबुल मोरा’ सुरु झाले आणि ते स्वर कानावर पडताच अण्णा प्रश्न विचारायचे विसरले. गाण्यात रंगून गेले.
"काय आवाज आहे ह्या माणसाचा? खर्ज असावा तर असा"! अण्णा मनापासून दाद देत होते.
"मोद’बुवा’तुमची आवड देखिल भारी आहे हो. अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण अगदी खरे आहे!सांगतो ऐका. माझ्या उमेदवारीच्या काळात मी देखिल सैगल साहेबांची नक्कल करायचा प्रयत्न केलाय. ह्या माणसाने गायलेली सगळीच गाणी गाजलेली आहेत. पण फक्त हे एकच गाणे जरी ते गायले असते ना तरीही ते अवघ्या संगीत विश्वात अजरामर ठरले असतेच ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.दैवी वरदहस्त बरं का! आपण नशीबवान, म्हणून असे स्वर्गीय गायन आपल्याला ह्याच जन्मी ऐकायला मिळतंय."
"अण्णा! तुम्ही देखिल ही भैरवी गायलेय. माझ्याकडे आहे त्याची ध्वनीफित.तुम्ही देखिल बहार उडवलेत त्यात.आता तुम्हाला माझी कल्पना सांगतो."
अण्णा सरसावून बसले. तेव्हढ्यात आमची गाडी सैगल साहेबांच्या बंगल्यात पोचली देखिल.
"अहो,हे काय ’बुवा’? आपण कुठे आलोय? हे कुणाचे घर आहे?"
"अण्णा,जरा धीर धरा. काही क्षणातच तुम्हाला ते कळेल."
मी दारावरची घंटी वाजवली. नोकराने येऊन दार उघडले. आत गेलो आणि समोर पाहिले.दिवाणखान्यात सोफ्यावर साक्षात सैगल साहेब माझी वाट पाहात बसले होते.अण्णांची आणि त्यांची दृष्टभेट झाली मात्र!क्षणभर दोघेही विस्फारलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात राहिले.जन्मजन्मांतरीची ओळख पटली आणि दोघांचेही डोळे झरू लागले. अण्णा चटकन खाली वाकले सैगल साहेबांना नमस्कार करायला.सैगलसाहेबांनी त्यांना ऊठवून आलिंगन दिले.त्या दोन तानसेनांची भेट पाहताना मी आणि तो नोकर आम्ही दोघेही गहिवरून गेलो होतो.
"अहो ’बुवा’,किती सुखद धक्का दिलात ? नाही हो सहन होत आता ह्या वयात!आधी नाही का सांगायचंत?"
"बेटे,भीमसेनजी कहां मिले तुझे? अच्छा किया जो इन्हे अपने साथ लाया.इनका स्वर्गीय गाना तो मैं अक्सर सुनता रहता हूं! मगर ये कंबख्त बुढापा, कही जाने नही देता.कबसे इनको मिलनेके लिये जी तरस रहा था.जूग जूग जियो बेटे.तूने मेरा बहोत बडा काम किया हैं जो इनसे मिलाया.आज मैं तुझपर खुश हूं, तू जो कहेगा मैं करूंगा."
"मोद’बुवा’,मी देखिल आज तु्मच्यावर खुश आहे बरं का. माझे देखिल ह्या तानसेनाला साक्षात भेटण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणलेत त्याबद्दल तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. बोला. काय करु?"
"अण्णा, ते मी सांगणारच आहे पण आधी आपण ह्या चहाचा आस्वाद घेऊ या आणि मग बोलू निवांतपणे."
नोकराने आणलेला चहाचा ट्रे घेत मी म्हटले. माझ्या ह्या बोलण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि मग आमचे चहापान सुरु झाले.
"सैगल साहब! आपने इतने सारे गाने जो गाये है और उसमेसे बहूत सारे लोकप्रिय भी हुये है! क्या आप बता सकते है की इनमेसे कौनसा गाना सबसे ज्यादा, आपको पसंद है?"
माझा प्रश्न ऐकताच सैसा हसले आणि कोणताही कलाकार जे उत्तर देईल तेच, म्हणजे "जैसे माँ को तो सभी बच्चे प्यारे होते है वैसे ही मुझे मेरे गाये हुये सभी गाने उतनेही प्यारे है. उसमे कोई ज्यादा,कोई कम नही हो सकता!" असे म्हणाले.
"लेकीन मुझे तो आपने गाया हुआ 'बाबुल मोरा नैहर छुटोही जाय' यही गाना सबसे ज्यादा प्रिय है! मैं तो गये कितने सालोंसे उसके पीछे पागल हुआ हूँ.आपकी क्या राय हैं इस बारेमे?".... मी.
काही क्षण सैसांनी डोळे मिटले आणि त्या गाण्याचा पूर्व-इतिहास आठवण्यात दंग झाले. मग एकदम दचकून जागे झाल्यासारखे करत म्हणाले, " अरे वो गाना तो मेरे कलेजेका टुकडा है रे! 'आर सी बोराल' साहबने क्या धुन बनाई है! जितनी भी बार वो गाना गाता हूँ तो बाकी सबकुछ भूल जाता हूँ! सच कहूँ तो लब्जोमें बयाँ करना मुश्किल है!" आणि सैगल साहेब पुन्हा जुन्या आठवणीत हरवले.
"मोद'बुवा'! अहो तुम्ही काय ती तुमची कल्पना सांगणार होता ना? केव्हांपासून मी वाट पाहतोय, तुम्ही त्याबद्दल काही बोलतच नाहीये. आता काय ते चटकन सांगा बघू." अण्णा कृतक कोपाने म्हणाले.
"अण्णा! मी ह्या गाण्याबद्दलच म्हणत होतो की....
तेव्हढ्यात सैसा त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले आणि नकळतपणे गुणगुणायला लागले. मी पटकन त्या नोकराला खुणेने पेटी आण म्हणून सांगितले आणि त्यानेही अतिशय तत्परतेने पेटी आणून सैसांच्या पुढ्यात ठेवली. सैसांनी पेटी उघडली आणि सहजतेने त्यावर बोटे फिरवत हलकेच भैरवीची स्वरधून छेडली आणि पाठोपाठ गळ्यातून तो ओळखीचा खर्ज उमटला.
आहाहाहा!सगळे अंग रोमांचित झाले.
"बाबुल मोराऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ नैहऽऽऽर छुटोऽऽही जाय." सैसा मुक्तपणे गाऊ लागले.
मी अण्णांकडे पाहिले. त्यांचीही भावसमाधी लागली होती. सैसा गातच होते आणि आम्ही सगळे त्यात रंगून गेलो होतो. मधेच थांबून सैसा म्हणाले, "भीमसेनजी! आपभी सुरमे सुर मिलाईये ना!"
अण्णा मनातल्या मनात सैसांबरोबर गातच होते. अशा तर्हेचे आवाहन ते वाया कसे जाऊ देतील. त्यांनीही आपला आवाज लावला आणि मग त्या दोन 'तानसेनांची' ती अवर्णनीय जुगलबंदी सुरु झाली.एकमेकांवर कुरघोडी करणारी जुगलबंदी नव्हती ती! ती तर एकमेकांसाठी पुरक अशीच होती. अण्णांच्या गळ्यातुन येणार्या त्या भैरवीच्या करूण सुरांनी सगळे वातावरणच भारुन गेले. अण्णांच्या सुरांची जादूच अशी होती की सैसांनी मग फक्त धृवपद गाण्यापुरताच आपला सहभाग ठेवला.
"चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें" ह्यातल्या "डोलिया" वर पोचलेला अण्णांचा आर्त 'तार षड्ज' काळजाचे पाणी पाणी करत होता. सैसांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु झरायला लागले. "क्या बात है!", "जियो!" अशी वाहवा त्यांच्या मुखातून निघू लागली. सैसांसारख्या तानसेनाची दाद मिळाल्यामुळे अण्णांना नव्या नव्या जागा दिसायला लागल्या आणि त्या त्यांच्या गळ्यातून निघताना त्यांच्या चेहर्यावरची ती तृप्ती खूप काही सांगून जात होती. मी तर त्या स्वरसागरात आकंठ बुडालो होतो. मधेच अण्णांनी मला खूण केली आणि माझ्या नकळत मीही गाऊ लागलो. अण्णा(माझे मानसगुरु) आणि सैसा ह्यांच्या गाण्याचा आणि सहवासाचा परिणाम म्हणा किंवा जे काही असेल त्याने माझाही आवाज मस्त लागला होता आणि कधी अण्णांची तर कधी सैसांची नक्कल करत मीही उन्मुक्तपणे गाऊ लागलो. त्यांची दादही घेऊ लागलो. मधेच सैसा देखिल एखादी छोटी नजाकतदार तान घेऊन अण्णांना प्रोत्साहन देत होते आणि अण्णा मला. कधीच संपू नये असे वाटणारा तो क्षण होता.
दुसर्या कडव्यातील "जे बाबुल घर आपनो मैं चली पिया के देश" मधल्या "पियाऽऽऽ" वर सैसांनी केलेला किंचित ठेहराव पुन्हा काळजाला हात घालून गेला. अण्णांनी तर ह्या ठिकाणी नतमस्तक होत सैसांना वंदन केले. धृवपद गाऊन सैसांनी भैरवीची समाप्ती केली आणि आनंदाच्या भरात अण्णांना कडकडून मिठी मारली. ते दृष्य पाहात असताना माझ्या डोळ्यांचेही पारणे फिटले.मघाशी कान तृप्त झाले आता डोळेही तृप्त झाले.ज्या साठी हा सगळा बनाव मी घडवून आणला होता तो त्या दोघांच्या नकळत त्यांनीच सहजसाध्य केलेला पाहून मी कृतकृत्य झालो. इथे मला तुकाराम महाराजांच्या त्या वचनाची प्रकर्षाने जाणीव झाली, "ह्याच साठी केला होता अट्टहास,शेवटचा दिस गोड व्हावा!"
बराच वेळ दिवाणखान्यात एक प्रसन्न शांतता नांदली. त्या शांततेचा भंग करत अण्णा म्हणाले, "काय मोद'बुवा'! आता तरी सांगणार काय तुमची कल्पना?"
"अण्णा! मी सांगायच्या आधीच तुम्ही दोघांनी ती काही प्रमाणात मूर्त स्वरुपात आणलीत."
"म्हणजे? मी नाही समजलो!"
"सांगतो ऐका! त्याचं काय आहे अण्णा! माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक कल्पना आहे. सैगल साहब आप भी सुनिये!.............
"आणि तू मला तेव्हढ्यात उठवलेस. काय मस्त बैठक जमली होती."
"कमालच आहे बाबा तुमची. अहो सैसा जाऊन कितीतरी वर्षे झाली आणि भीमसेन आजोबाही आता खूप थकलेत. तरीही तुमच्या बरोबर ते गात होते? तुम्ही काही म्हणा पण तुमची स्वप्नं देखील अफलातून असतात बाकी!"
"अगं! देहरुपाने सैसा आता नसले तरी ह्या 'बाबुल मोरा' च्या रुपात ते सदैव माझ्यासोबत असतात आणि अण्णा जरी शरीराने थकले असले तरी त्यांचे गाणे माझ्या हृदयात आजही तरूण आहे. ही कलावंत मंडळी म्हातारी होवोत अथवा ह्या जगाचा निरोप घेवोत पण त्यांची कला 'चिरतरूण' आहे हे विसरु नकोस. तिला कधीही मरण नाही."
"हे मात्र पटलं बाबा !"
दूर कुठे तरी रेडिओ गात होता, "बाबुल मोरा नैहर छुटोही जाय!"
समाप्त.
थोडीशी पूर्वपिठिका:
बरेच दिवस माझ्या डोक्यात स्वर्गीय कुंदनलाल सैगल ह्यांनी गायलेलं आणि अजरामर झालेलं 'बाबुल मोरा' ठाण मांडून बसलंय.सैगलसाहेबांची तशी सगळीच गाणी मला आवडतात; पण हे गाणं त्यातले शिरोमणी म्हणावं असे आहे. माझेच काय मोठमोठ्या गवयांना देखिल 'बाबुल मोरा' ने भूल घातलेय. ठुमरीच्या अंगाने जाणारे भैरवी रागातले हे गीत असल्यामुळे बर्याचदा शास्त्रीय मैफिलींचा शेवट देखिल ह्याच भैरवीने करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाहीये. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी देखिल ही भैरवी गायलेली आहे.त्याची ध्वनीफितही माझ्याकडे आहे. तसेच गिरिजा देवींकडूनही हीच भैरवी ठुमरी एकदा कधीतरी ऐकल्याची स्मृती अजूनही ताजी आहे.
रोज न्हाणीघरात स्नानाच्या वेळी मी ह्याच गाण्यावर निरनिराळे प्रयोग करत असतो. तेव्हा मनात एक कीडा आला की आपण ह्या गीताचे 'फ्युजन' की काय म्हणतात ते का करू नये? सैसा,भीमसेन आणि गिरिजादेवी ह्या तिघांनी मिळून हे गीत गावे असे मला वाटते. मात्र प्रत्येक वेळी धृवपद सैगलसाहेबच गातील. त्यामुळे गाण्याला एक वेगळाच उठाव येईल असे माझे मत आहे.सगळ्यांचे गाऊन झाल्यावर मग त्याचे संपादन करून जे काही बनेल ते नक्कीच अफलातून असेल.अर्थात ही निव्वळ कविकल्पना आहे हे मला ठाऊक आहे. पण कशी वाटली कल्पना? आवडली का तुम्हाला?
अवांतर: मला संगीतातले तसे काही कळत नाही. पुलंच्या 'रावसाहेबां' इतकेच माझे संगीत विषयक ज्ञान आहे ह्याची कृपया संगीतज्ञांनी नोंद घ्यावी.
प्रमोद देव
बहोत खुब
मोद भावु ,
मस्तच लिहिलय. वन ओफ फेवरेट. त्याची अणखी गाणी आठवली. दिया जलाव, दो नैना मतवारे तिहारे, जब दिल ही टुट गया, चाह बरबाद करेगी तुम्हे. वा खुप छान आठवण करुन दिलीत.
- अनिलभाई
बाबूल मोरा
मला वाटतं, हि भैरवी बहादूर शहा जफरची आहे. अंगना भये परदेस मोरा और देहरी भयी बिदेस, या ओळी पण यातल्याच.
भाई, रोज सकाळी साडेसात वाजता विविध भारतीवर सैगलचे गाणे लावतात.
चाह बरबाद करेगी, हमे मालूम न था.
दो नैना तिहारे,
रूमझूम रूमझूम चाल तिहारी
सप्त सूरन तीन क्राम, गाओ सब मुनीजन
सगळी लावतात.
चांगल आहेच! लिहित रहा
प्रमोद छान लिहलय्...ं नेहमि लिहित रहा..
खुप छान कथा
प्रमोद कथा आवडली. दोन मोठ्या संगितदिग्गजांचि जुगलबंदि प्रत्यक्षात पाहिल्याचा भास झाला. लेखन हि अतिशय सुरेख केलेस.
मस्त!
फार छान आहे ही फँटसी प्रमोदजी.. सत्यात उतरली असती तर!!!
भारीच !
प्रमोदजी, जर तर च्या भाषा आहेत हो या ! जर प्रत्यक्षात असे घडते ना ????? पण मुळातच 'बाबुल मोरा ' अप्रतिम गाणे त्यात अशी मैफल कल्पनाच भारी आहे. चला निदान तुम्हाला स्वप्नात तरी जमवता आली.
तानसेन आणि कानसेन
प्रमोद, मस्तच जमलिये फँटसी! २ तानसेन + १ कानसेन!!
पूर्वी सिलोन ह्या रेडीओ स्टेशनवर सैगलांची नेहमी गाणी लागायची. माझे बाबा सकाळी सकाळी ती गाणी लावायचे. त्यावेळेला झोपेतून उठवणारा सैगल मस्त वाटायचा!
व्वा!
प्रमोद काका, छानच.
बाबुल मोरा... मी आधी पंडितजींची ऐकलीये..... निव्वळ जादू. (माझ्या सोबत सवाईला आलेल्या, खड्डूस म्हणून प्रसिद्ध एका नातेवाईकाच्या डोळ्यातून खळ्ळकन आसवं धावलेली बघितली.)
सैगलचं बाबुल मोरा ऐकलं ते इतक्या वाईट qualityचं recording होतं की... त्यातलं गाणं कळलच नाही तेव्हा.
पुढे कधीतरी digitally enhance केलेलं त्यांचं बाबुलमोरा ऐकलं आणि जाणवलं... ही मूळची जादू!
धन्यवाद..:)
प्रमोदराव.. बाबुल मोरा ही भैरवी मधली माझी सगळ्यात आवडती चीज..:)
यात प्रत्येक वेळेस मुखड्यामधला ठहराव अवर्णनीय आहे..
बाबुल मोरा नहर छुटो.. छुटो ही जाय..
मी ही सर्वात पहिले ही चीज अण्णांच्याच तोंडी ऐकली.. अर्थात सवाईमध्येच..
त्यादिवशी आमचा मास्टर्सचा शेवटचा पेपर होता.. तेंव्हा मी आणि माझा मित्र नाईट मारून सकाळी अण्णाना ऐकायला गेलो होतो.. सार्थकी लागलं आमचं जाणं.
wow कल्पनाच
wow कल्पनाच भन्नाट आहे.
प्रमोदराव,
प्रमोदराव, आपल्याला संगीतातलं एवढं कळत नाही पण जे काही तुम्हाला जमलयं ते भन्नाटचं.........
योगेश
======
वा! मजा आली वाचायला. तुम्ही
वा! मजा आली वाचायला.
तुम्ही हल्ली लिहित नाही. लिहायला हवे आहे तुम्ही...