अनुत्तरीत फासे..

Submitted by aksharivalay 02 on 22 June, 2020 - 06:34

14 जूनला सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. त्याची आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग पाहता पाहता दिवसभर मीडिया, सोशल मीडिया या माध्यमांवर सुशांत सिंग विषयीच्या बातम्यांचा महापूर आला. मीडिया मध्ये स्पेशल रिपोर्ट च्या नावाखाली नको नको त्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या. त्याच्या आत्महत्येच्या कारणांचे नको नको ते तर्क काढले जाऊ लागले. मीडियावाले प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणत मी या बातम्यांकडे दुर्लक्ष केलं पण 15 जूनला सकाळी दहा वाजता माझा फोन वाजला आणि मला कळालं की माझ्या मामे भावाने गळफास लावून आत्महत्या केली. मी हादरून गेलो 19 वर्ष्याच्या माझ्या भावाच आत्महत्येचं कारण तरी काय असेल इतक्या कसल्या मोठ्या संकटात तो सापडला असेल की त्याला त्यातून बाहेर निघण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे असे वाटलं. डोकं सुन्न झालं नक्की काय झालं असेल याची कल्पनाच येईना. आजवर बातम्यात पाहिलेली घटना आता माझ्या कुटूंबात घडली होती. तो तुळजापूरला त्याच्या मामा कडे राहत होता.
अशा विचारातच मी पुणे ते तुळजापूर असा प्रवास केला.
तिथे गेल्यावर मला समजलं की सुशांत गेल्याची बातमी आली तसा तो बातम्या पाहत होता नंतर सतत दिवसभर त्याच्या हातात मोबाईल होता. त्याने सुशांतच्या मृत्यूची बातमी कळाल्या नंतर आपल्या वाट्सॅप स्टेटसला पण दिवसभर वायरल होत असलेल्या सुशांतच्या बातमीशी संलग्न असा एक फोटो ठेवला होता. नेमकं काय झालं असेल कळायला मार्ग नव्हता पण अर्ध्या रात्री त्याने असं पाऊल उचललं.
हे सगळं लिहिण्या मागे इतकाच हेतू आहे की मीडिया आणि सोशल मीडिया द्वारे एखाद्या घटनेचा जो अतिरेक होतोय दिवसभर एखादी बातमी वाटेल तशी दाखवली जाते. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. या घटनांचा कोणावर कसा परिणाम होईल सांगता येत नाही. आपल्या स्वार्थासाठी आपण समाजाचं किती मोठं नुकसान करत आहोत याची जाणीव या लोकांना व्हायला हवी.
माझ्या भावाच्या आत्महत्येला फक्त मीडिया आणि दिवसभर पसरत असलेल्या बातम्या जबाबदार आहेत असं मी नाही म्हणतय पण कुठे ना कुठे या फेक बातम्या, पेड बातम्या, अतिरंजित बातम्या यांचा वाईट परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यावर नकळत का असेना पण होतोय. मी असं काही लिहिलं तर मीडिया किंवा सोशल मीडिया यावर असा अतिरेक थांबेल या आशेनेही मी हे लिहीत नाहीये. पण किमान आपली मुलं काय पाहतायेत किंवा आपण त्यांच्या समोर काय पाहतोय याची काळजी आपण घ्यायला हवी आणि आपण सोशल मीडिया या माध्यमाचा वापर कसा करतोय त्यावरून काय शेर करतोय याचीही काळजी घ्यायला हवी इतकंच सांगायचं आहे. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही दुर्देवी घटना तुम्हाला सांगण्यामागे हाच प्रामाणिक हेतू आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बापरे. .. सतत एकाच प्रकारच्या बातम्या ऐकून ऐकून पण आधीच upset असणाऱ्या व्यक्तींना असा परीणाम होऊ शकतो.

फार वाईट घटना Sad
वारंवार दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित बातम्या दुर्दैवी घटनांना प्रेरित करू शकतात. खरं आहे तुमचे कथन.