दि. २० जानेवारी २०२०. दिवसभराचे काम संपवून दुबई मधून घरी अजमानला निघालो होतो. वेळ रात्रीची १०.३० वाजता. कार मधील रेडिओवर जुनी गाणी ऐकत शारजहा आणि अजमानच्या हद्दीत केव्हा शिरलो समजलेच नाही. शारजहाची हद्द सोडली आणि पुढे रांगेत गाड्या उभ्या होत्या. अपघात झाला असावा असे वाटले. कारण ईतक्या रात्री अजमान सारख्या शांत गावात वाहतुकीची कोंडी होणे शक्य नव्हते. थोडे पुढे गेल्यानंतर पोलीस उभे राहिलेले दिसले. गाड्यांची तपासणी होत होती. सन २०१३ मध्ये वाहन परवाना मिळाल्यानंतर माझी दुसऱ्यांदाच अशी तपासणी होत होती. माझ्या समोरील गाडी पोलीसांनी कागदपत्रे तपासून सोडून दिली. पोलीस माझ्याकडे आले. मी रिडिओचा आवाज कमी केला. वाहन चालविण्याचा परवाना आणि गाडीचा मूलकिया (गाडीची संपूर्ण माहिती असणारे कार्ड) मी पोलिसाच्या हाती दिले. कागदपत्रे बरोबर होती. मी सुटकेचा निःश्वास टाकला. तोपर्यंत दुसरा पोलीस जवळ आला व त्याने यूएई ओळ्खपत्राची मागणी केली. तेथेच दुर्दैव आडवे आले. ओळखपत्राची मुदत संपली होती. माझी गाडी रस्त्याच्या बाजूला लावायला सांगून पोलीस पाठीमागील गाडी तपासण्यासाठी गेले. बाजूलाच पोलिसांची मोठी गाडी उभी होती. त्यात अगोदरच ४ व्यक्ती बसल्या होत्या. मलाही तिकडे बसण्याचा ईशारा करण्यात आला. लाल, निळ्या रंगाचे प्रकाशझोत आणि सायरन वाजवत पोलीसांची गाडी अजमान पोलीस स्थानकाच्या आवारात शिरली.
आम्ही ४ जण अनोळखी व्यक्ती होतो. ईतक्या कमी वेळात ओळख होणे देखील शक्य नव्हते. पोलिसांच्या गाडीत फक्त आम्ही जसे एकमेकांना पहात होतो तसेच आम्ही आतमध्ये सुद्धा शेजारी शेजारी बसलो होतो. तेवढ्यात ओळखपत्र घेऊन पोलीस आला व किश किश ओरडू लागला. माझेच नाव असावे असे समजून मीच किशोर असे म्हणालो. त्याने मला ओळखपत्र दाखविले. माझेच आहे असे मी सांगितले. मान डोलावून त्याने हाताने ईशारा केला व ताल ताल म्हणू लागला. मी ताल ताल चा अरबी अर्थ समजून त्याच्या मागोमाग चालू लागलो. ईतर ३ जण तेथेच बसून होते. त्यांचा काहीतरी वेगळाच अपराध असावा. मला तो पोलीस वरिष्ठांच्या दालनात घेऊन गेला. ओळ्खपत्राची पुढची मागची बाजू पाहून तो अधिकारी तुम हिंदी असे म्हणाला. मी होकारार्थी मान हलविली. तोपर्यंत समोरील संगणकात त्याने माझा ओळखपत्र क्रमांक टाकून माझा सगळा सात बारा काढला. प्रिंटर जवळ जाऊन कागद माझ्यासमोर ठेवला. संपूर्ण अरबी भाषेतील मजकूर मला वाचता येईना. फक्त तारीख इंग्रजी मध्ये होती. तारखेवरून मी अंदाज घेतला. माझा व्यवसाय परवाना नूतनीकरण काही आर्थिक कारणांमुळे करण्यात आले नव्हते.
एव्हाना रात्रीचा १ वाजला होता. मला बाजूला बसायला सांगितले. व्यवसाय परवाना नुतनीकरण केले नाही म्हणून दंड ठोठावण्यात आला होता. मला रक्कम भरण्यास सांगण्यास आले. माझ्याकडे तितकी रक्कम नव्हती. मी नाही असे सांगितले. तेवढ्यात दुसरा एक पोलीस अधिकारी तेथे आला. दोघे अरबी भाषेत बोलत होते. मला काही समजत नव्हते. फक्त त्यांच्या संभाषणात कोर्ट हा इंग्रजी शब्द आला तेवढाच मला समजला. मी समजून गेलो की कोर्ट केस झाली आहे. मी पोलीसाला काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. नकारार्थी मान हलवून तो त्याच्या कामाला निघून गेला. रात्रभर ईकडेच बसून रहावे लागणार व सकाळी कोर्टात नेणार असे समजून मी आता पुढे काय होणार याचा विचार करू लागलो. काही सुचत नव्हते. चेहरा रडवेला झाला होता. थोडे लवकर किंवा उशिरा त्या मार्गाने आलो असतो तर कदाचित ही वेळ आली नसती असे जर तर चे विचार मनात येऊ लागले. नकळत श्री स्वामी समर्थ जप मनात सुरू झाला. भारतात पत्नीला व्हाटसएप संदेश पाठवून कल्पना दिली. बाहेर काहीतरी गडबड सुरू होती. ईतक्या रात्री एक मुस्लिम कुटुंब आणि त्यांच्याकडे काम करणारी महिला आपआपसात भांडत होते. चोरीचे प्रकरण होते. महिला पोलीस आली आणि त्या दोघींना ताल ताल करत चौकशीसाठी स्वतंत्र खोलीत घेऊन गेली. माझ्या सोबत आले होते त्यापैकी दोघे माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनीच विषय काढला तुम्हारा केस क्या है? हम DD (ड्रिंक अँड ड्राईव्ह). मद्य पिऊन गाडी चालवत होते म्हणून त्यांना पकडले होते. आता बाहेर थोडी शांतता पसरली होती. पोलीसांनी आमच्याकडील सगळे सामान काढून घेतले. वेगवेगळ्या प्लास्टिक पिशवीत भरले. प्रत्येकाच्या हातात एक कागद दिला. मजकूर अरबी मध्ये होता त्यामुळे मला समजण्यास काही मार्ग नव्हता. शेजारच्याला मी खूणेनेच विचारले. अपना जो सामान बॅग मे है वह ईसमे लिखा है.
पुन्हा पोलिसाने ताल ताल चा आवाज दिला. सगळे त्याच्या मागोमाग चालू लागलो. चावीने एक लोखंडी दरवाजा उघडला गेला. थोडे पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा उघडला गेला. आतमध्ये एका छोट्या जागेत काहीजण झोपले होते. दिवस थंडीचे होते. सगळे जण अगदी तोंडावर पांघरूण ओढुनच झोपले होते. एका कोपऱ्यात काही गाद्या आणि उबदार ब्लॅंकेट पडली होती. पोलिसाने त्याकडे बोट दाखवले. आम्ही समजून गेलो. कमी जागेत कसेबसे गाद्या पसरवून बसलो. मध्यरात्र झाली होती. दिवसभराचा शीण आणि हे पुढे ठाकलेले संकट. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला समजले नाही. साधारण दोन तासानंतर दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. कोठडीमधील आरोपी संख्या मोजून सकाळच्या न्याहारीची पाकिटे दरवाज्यातून आत ढकलली गेली. काही वेळातच बाजूच्या मशिदीमधून पहाटेच्या नमाजची बांग ऐकू आली. काही जण उठून बसले. कोठडीच्या एका कोपऱ्यात अतिशय गलिच्छ स्वच्छतागृह होते. उठलेले आरोपी लगबगीने आत जाऊन तोंड हातपाय धुऊन नमाज बोलण्यासाठी सज्ज झाले. गाद्या आणि पांघरूणे एका कोपऱ्यात सरकवून नमाजसाठी जागा करण्यात आली होती. काही आरोपी वयाने जेष्ठ होते तर काही जण अगदीच तरुण होते. मोजकेच आरोपी उठले होते. एक स्वतंत्र कार्पेट कोपऱ्यात उभे होते ते जमिनीवर पसरवून त्यावर नमाज ऊठबस करण्यात आली. साधारणपणे १५ मिनिटे झाली असावीत. झोपलेले काही जण जागे झाले होते. त्यांनी देखील हातपाय धुऊन नमाज वाचले. हे कदाचित रात्री लवकर पकडले गेले असावेत किंवा अगोदर पासून एकमेकांना ओळखत असावेत. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. प्रत्येकाने नाष्टा घेतला. आम्ही पहाटे आलो होतो. त्यांच्यासाठी नवीनच होतो. त्यातील एका चाचाने आमची विचारपूस करायला सुरुवात केली व नाष्टा घ्या असे सांगितले. मी अद्याप गादीवरच बसलो होतो. आंघोळी शिवाय नाष्टा करणे शक्य नव्हते. न्हाणीघर नसल्यामुळे तेथे आंघोळ करणे शक्यच नव्हते. आतमध्ये तशी काही सोय देखील नव्हती. पाणी सुद्धा थंडच होते. मी कसेबसे तोंड हातपाय धुऊन पुन्हा गादीवर येऊन स्थानापन्न झालो. किती वाजले काही समजत नव्हते. खिडकी होती परंतु प्रकाश सुद्धा आत येत नव्हता.
आता जवळजवळ सगळेच उठले होते परंतु अंथरुणातच लोळत होते. पुढे काय? मला प्रश्न पडला होता. काहीतरी बोलावे म्हणून मी तूम कहा रहते हो? असे शेजारच्याला विचारले. शांतता भंग पावली होती. बांगलादेशी खूपच बोलका होता. न विचारताच सगळे सांगू लागला. ईतर आजूबाजूचे सुद्धा ऐकू लागले. काही जण मध्येच त्याला प्रतिप्रश्न विचारत होते. बाहेर काही तरी गडबड ऐकायला आली. पोलीस दरवाजा उघडत होते. त्यांच्या हातात वेगवेगळे आरोप असलेली आरोपींची यादी होती. प्रथम काही जुन्या आरोपींची नावे पुकारली गेली. ते एकामोगा माग बाहेर जाऊन उभे राहिले. बाहेरील पोलीस त्यांना हातकड्या घालून बाहेरील मोठ्या गाडीत जाऊन बसायला सांगत होता. थोड्याच वेळात माझेही नाव पुकारले गेले. मीही गाडीत जाऊन बसलो. शेजारील आरोपी पाकिस्तानी पठाण होता. इंडिया के हो? मी हा म्हटले. अभी हमे कोर्ट मे लेके जाएंगे. मी अच्छा असे म्हटले. एव्हाना गाडी जवळजवळ भरत आली होती. पोलीसाने गाडीच्या मुख्य दरवाज्याच्या आत असलेले लोखंडी दार बंद केले व त्याला कुलूप लावले. बाहेरूनच त्याने आरोपी मोजले आणि आतील आरोपींची यादी गाडी चालकाकडे दिली. आमची गाडी अजमानच्या मुख्य रस्त्यावरून धावत होती. सायरन वाजत असल्यामुळे आजूबाजूच्या गाड्या पटापट बाजूला होत होत्या. गाडीला बाहेरून व आतून लोखंडी जाळ्या होत्या त्यामुळे बाहेरचे जास्त काही दिसत नव्हते. आम्ही गाडी चालकाच्या मागील आसनावरच बसल्यामुळे समोरील काचेतून थोडे दिसत होते. समोरच्या काचेला सुद्धा जाळी होतीच. कोर्टाच्या आवारात गाडी कधी आली समजलेच नाही. कोर्टाच्या पाठीमागील दरवाज्या मधून गाडीने आत प्रवेश केला होता. पुढे दोन पोलीस बसले होते. फोनवरून गाडी आल्याची कल्पना त्यांनी आतमध्ये दिली. बराच वेळ आम्ही गाडीतच बसून होतो. शायद आज कोर्ट मे भीड है. पाठीमागून कोणीतरी पुटपुटले. काही वेळातच आतून दोन पोलीस आले व यादी पडताळून सगळ्यांना एका हॉल मध्ये घेऊन गेले.
हातात हातकड्या तशाच होत्या. हॉल बऱ्यापैकी मोठा होता. बहुतेक देशांचे आरोपी तेथे होते. पाकिस्तान, भारत, बांगलादेश, आफ्रिका, स्थानिक अरब. कोर्ट चालू व्हायला अद्याप अवकाश होता. हॉलमध्ये गोंगाट वाढला होता. सगळेजण आपआपसात बोलत होते. काही जण मोठयाने तर काहीजण दबक्या आवाजात. एका कोपऱ्यात सकाळी पोलीस स्थानकात जो नाष्टा दिला होता तशीच नाष्ट्याची पाकिटे पडली होती. काही पाकिटे अर्धवट उघडून तेथेच फेकून दिली होती. बाजूलाच पिण्याच्या पाण्याची मोठी बाटली ठेवली होती. त्यावर एकमेव प्लास्टिकचा ग्लास. बहुतेक जण त्याच एकमेव ग्लासने अधूनमधून पाणी पीत होते. भूक लागली होती परंतु ते दृश्य पाहून आणि पुढच्या चिंतेने काही खावे असे वाटत नव्हते. कोर्ट मध्ये काय सांगतात याकडे सगळे लक्ष लागले होते. घरी गेल्यावर आंघोळ केव्हा करतोय असे झाले होते. थोड्याच वेळात ४-५ पोलीस आले. सगळीकडे शांतता पसरली. केलेल्या गुन्ह्यानुसार आरोपींचे वर्गीकरण करण्यात आले. माझ्या गटात सूट, बूट घातलेला पाकिस्तानात निघालेला परंतु शारजहा विमानतळावर पकडला गेलेला तीशीतील व्यावसायिक होता. त्याने सुद्धा व्यवसाय परवाना नूतनीकरण केले नव्हता. आणखी ३-४ जण होते त्यांच्या नावावर बँक क्रेडिट कार्ड संदसर्भात गुन्हे दाखल होते. आमच्या गटाला पुन्हा एका वेगळ्या कोठडीत ठेवले गेले. तिकडे आम्ही मोजकेच आरोपी होतो व सगळे आर्थिक गुन्हेगार होतो. यूएई मधील एकदंर बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे व्यवसाय व्यवस्थित चालत नव्हते तर काही जण कर्जाचे हफ्ते वेळेवर न दिल्यामुळे या संकटात अडकले होते. पोलीस आम्हाला न्यायालयात घेऊन गेले. तिकडे प्रत्येकाला दंडाची रक्कम भरणार का? तुमच्या कुटुंबाला, मित्रांना संपर्क करून विचारा असे सांगण्यात आले. परंतु कोणीच रक्कम उभी करण्यास समर्थ नव्हते. त्यामुळेच सगळे अडकले होते आणि आरोपी बनले होते. अर्ध्या तासानंतर पुन्हा पोलीस आले व शेवटची संधी आहे असे सांगून गेले. मी मित्राला अजमान पोलिसांनी पकडले आहे अशी कल्पना दिली. आम्ही आपाआपसात चर्चा करू लागलो. पुढे काय होणार कोणालाच माहीत नव्हते.
दुपारच्या नमाजची वेळ झाली होती. कोर्ट २.०० बजे बंद हो जायेगा एक जण म्हणाला. दरम्यान माझ्या बाजूच्या आरोपी सोबत मी बोलत होतो. त्याला अबुधाबी तुरुंगातून रात्री अजमानच्या पोलीस कोठडीत आणले होते. त्याने सांगितले शायद अभी हमको अजमान सेंट्रल जेल मे लेके जाएंगे. मी स्वामी समर्थ जप सुरू केला होता. डोके सुन्न झाले होते. काही वेळातच पुन्हा पोलीस आले मला आणि आणखी एका आरोपीला बाहेर घेऊन गेले. आमची दोघांची अजमान फ्री झोनमध्ये केस दाखल झाली होती. पोलिसांच्या कार मध्ये आम्ही दोघे बसलो. दोघांनाही माहीत नव्हते कोठे नेणार. मला साधारण अजमानची माहिती होती त्यानुसार अजमान मध्यवर्ती कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आमची कार धावत होती. काही वेळातच गाडी कारागृहाच्या आवारात शिरली. गाडीतील घड्याळ १.३० वाजल्याचे दाखवत होते. बाहेरील जगाशी संबंध तुटला होता. अंगावरील कपड्यांशिवाय आमच्याकडे काहीच नव्हते.
पोलिसाने एक कागद दिला तो देखील अरबी भाषेतच होता. घडी करून खिशात ठेवला. पोलिसाने हातातील हातकड्या काढल्या व तपासणी सुरू केली. सामान तर अगोदरच काढून घेतले होते. पायातील बूट, कमरेचा पट्टा बाजूला ठेवायला सांगितला. लोखंडी दरवाजा उघडून आत जाण्यास सांगितले. आत प्रवेश केल्यावर पोलिसाने बटण दाबून बेल वाजविली. समोरील मजबूत दरवाज्याला जेमतेम हात जाईल ईतकीच एक लहान सरकती खिडकी होती. आतील व्यक्तीचे आणि पोलीसाचे संभाषण झाले. बाहेरून पोलीसाने अजस्त्र दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो. समोर एका खुर्चीत मजबूत देहयष्टी असलेला ईसम बसला होता. त्याच्या आजूबाजूला काहीजण उभे होते. प्रत्येकजण आम्हाला न्याहाळत होता. काहीजण हसत होते. खर्चीतील व्यक्ती सुद्धा हसली व दुसऱ्याच क्षणी सगळ्यांना मागे जाण्यास सांगितले. कागज दे दो. मी नाही असे सांगितले. मला समजले नव्हते कोणता आणि कसला कागद. माझ्या शर्टच्या खिशात हात घालून त्याने स्वतःच कागद काढला व वाचू लागला. पुढच्याच ठेच मागचा शहाणा त्याप्रमाणे माझ्या सोबत आलेल्या आरोपीने स्वतःहून कागद त्याच्या हातात दिला. दोनो अंदर जाओ असे सांगून तो त्याच्याकडील वहीत नोंदणी करू लागला. एकाने आम्हाला त्याच्या पाठोपाठ येण्यास सांगितले. आत मध्ये प्रशस्त हॉलमध्ये ओळीने गाद्या पसरल्या होत्या. आमच्या सोबत सकाळी गाडीत असलेले काही जण आमच्या अगोदरच येथे आले होते. ते एका कोपऱ्यात उभे होते. दुपार झाली होती. नित्यनियमाचे विधी देखील नीट झाले नव्हते. रात्रभर झोप सुद्धा नीटशी झाली नव्हती. पोटात कावळे ओरडत होते.
बाबाब आतील विचित्र वातावरण पाहून तर डोकेही दुखायला लागले होते. हताशपणे भिंतीला टेकून कसाबसा उभा होतो. हॉलमधून बाहेर जायला अगदी अरूंद दरवाजा होता. त्या दरवाजा मधून एकजण डोक्यावरील केस कापून आत आला. सगळे येथे का थांबले आहेत त्याचे उत्तर मिळाले. मला हुंदका आवरेना. जवळची नात्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यावरच डोक्यावरील संपूर्ण केस काढायची आपला रीतीरिवाज. नकळत कोणाला दिसू नये अशा पद्धतीने खांद्याने अश्रू पुसले. आता गत्यंतर नव्हते. कोणाला विनंती करायची देखील सोय नव्हती. बाहेर एक कठडा होता त्यावर डोळे मिटून खाली मान घालून बसलो. समोरील व्यक्तीने शून्य सेटिंग करून भराभर मशीन चालविली. तिकडेच बाजुला सार्वजनिक स्वछतागृह होते. आत गेलो आणि कसेबसे अर्धवट स्नान करून बाहेर आलो. हॉलच्या एका कोपऱ्यात भारत, दुसऱ्या कोपऱ्यात पाकिस्तान, तिसऱ्या कोपऱ्यात बांगलादेश आणि चौथ्या कोपऱ्यात साऊथ आफ्रिका अश्या प्रकारे आरोपींची व्यवस्था करण्यात आली होती. मी भारतीय आरोपींच्या जवळ गेलो. बहुतेक जण केरळ प्रातांतील होते. उधर खाना रखा है असे एकाने सांगितले. समोरच एका खांबाजवळ भात असलेले पातेलं होते. दुसऱ्यात चिकनचा रस्सा होता. पुन्हा संकट आडवे आले. मी शाकाहारी. कोरडा भात खाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. बाजूला पडलेल्या थाळीत मी थोडासा भात घेऊन कसाबसा संपविला. थोडं बरं वाटत होते.
ईतक्यातच दुपारच्या नमाजची वेळ झाली. भिंतीवर मस्जिदचे चित्र काढले होते त्यासमोर मोठी चटई अंथरली गेली. ती नमाजाची दिशा असावी. काही भारतीय, संपूर्ण पाकिस्तानी आणि बांगलादेशी आरोपी तसेच बाजूच्या बंद खोलीमधून काही स्थानिक अरबी आरोपी असे सगळेजण नमाजसाठी जमा झाले होते. मला एक स्वतंत्र गादी आणि ऊबदार पांघरूण देण्यात आले होते. नमाज नंतर सगळे जण आपाआपल्या जागेवर स्थानापन्न झाले. माझ्या बाजूला हैद्राबादचा हुसेन होता. त्याने प्रथम माझे नाव विचारून पुढील चौकशी सुरू केली. आजूबाजूला असणारे आणखी काही भारतीय आरोपी आमच्या आजूबाजूला येऊन बसले. कसा पकडलो गेलो, काय गुन्हा आहे, भारतात कोठे राहतो, अजमान मध्ये कोठे राहतो, शैक्षणिक पात्रता, कंपनी कोणती, यूएई मध्ये किती वर्षे आहे, कुटूंबात कोण कोण आहे ई ई बऱ्याच प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून त्यांनी काढून घेतली. साधारण असेच वातावरण वेगवेगळ्या देशांच्या गटात सुरू होते. आज नवीन आलेल्या आरोपींची मुलाखत सुरू होती. दुपारचा मजबूत देहाच्या ईसमाने आज दाखल झालेल्या आरोपींची नावे पुकारली व प्रत्येकाच्या हातात दुपारी त्याने घेतलेला कागद परत दिला. संभालके रखो असे सांगून गेला. आम्ही एकूण आठ जण होतो. काहीजण सकाळी भेटलेले होते. हुसेनने सांगितले तो फोरमन आहे. माझ्या हातातील कागद हुसेनने घेतला. वाचून त्यात काय काय लिहिले आहे ते सांगितले. तारीख, आरोपी क्रमांक, गुह्याचा प्रकार ई. माहिती तसेच पोलिसांच्या ताब्यात रोख रक्कम किती आहे व ईतर सामान जसे मोबाईल, घड्याळ या वस्तू आहेत असे त्यात नमूद केले होते. जब छोडेंगे तब यह सब वापस मिलेगा असे सांगितले. आणखी काही जणांकडे तो कागद फिरला व शेवटी एकाने माझ्याकडे आणून दिला. मुंबई के हो क्या? मै भी मुंबई मे थोडा दिन था. असे सांगून निघून गेला. बाहेर अंधार पडायला सुरू झाला होता. संध्याकाळ होत आली होती. पुन्हा नमाजची वेळ झाली होती. नवीन आलेल्या आरोपी मध्ये कोण कोठून आहे हे एव्हाना सगळ्या जुन्या आरोपींना समजले होते. एक तरुण स्वतःहुन माझ्याकडे आला. तुम्हारा नाम किशोर है? कागदा द्वारे मी न सांगताच माझे नाव त्याला समजले होते. मै राजस्थान से हू मुंबई मे २ साल काम किया. ईतकी माहिती देऊन घाईघाईने नमाजासाठी रांगेत उभा राहिला.
दुपारपेक्षा नमाजसाठी आता जास्त गर्दी होती. हॉलच्या बाजूला दोन स्वतंत्र खोल्या होत्या त्यात सुद्धा आरोपी होते. कदाचित त्यातील बहुतेक जण असावेत. नमाज संपताच प्रत्येकजण हातात थाळी घेऊन रांगेत उभे राहिले. वयस्कर आरोपी पुढे होते. एकाने मला सांगितले थाली लो और लाईन मे खडे रहो. मी बऱ्यापैकी असणारी थाळी घेऊन शेवटी उभा राहिलो. आता खायला काय मिळणार या विचारात होतो. पाठीमागे एक बंगाली आरोपी उभा होता. क्या खाना मिलेगा? मी कुतूहल म्हणून विचारले. नया है क्या? ते ऐकून त्याच्या मागील एक जण म्हणाला अबे ईसलीये तो तुझे पुछ रहा है नहीं तो तुमको कौन पुछता है? आजूबाजूचे सगळे हसायला लागले. त्याच्या विनोदाने मलाही थोडं हसायला आले. माझ्या समोरच्याने सांगितले आज मंगल है आज डाल रहेगी. एक खपूस (अरेबिक रोटी) और डाल मिलेगी. मी त्याला अच्छा म्हटले. थोड्याच वेळात मागे बरीच मोठी रांग लागली होती. समोर एक मोठा पुठ्याचा कागदी खोका होता आणि शेजारी मोठं पातेलं. कागदी खोक्याच्या बाहेर बेकरीचे नाव लिहिले होते. त्यातच खपूस असणार हे मी ओळखले. बराच वेळ झाला. सगळे फोरमनची वाट पहात होते. प्रतीक्षा संपली.
फोरमन खुर्ची घेऊन आला. रांगेतील दोघांना पुढे बोलावले. एकाने डाळ द्यायची दुसऱ्याने रोटी द्यायचे असे फर्मान सोडले. आज तुम खाना सबको खाना दे दो. एक डबा भरून डाळ व एक खपूस वाटप होत होते. बाजूला बसून लक्ष ठेवायचे त्याचे काम सुरू होते. अमजद कल सुबह तुम्हारा कोर्ट है अमजद ने थाळी सांभाळत मान डोलावली. त्याच्या मागे असलेल्या आरोपीला तुम आज आये हो? तुम्हारा नाम क्या? ईकबाल. जेवण वाटप चालू होते. थोड्याच वेळात माझा नंबर आला. मला पाहून कोई तकलिब रहेगी तो मुझे बताओ असे म्हणाला. मी हा म्हणत बाजूला जाऊन थाळी हातात घेऊन उभा होतो. वेगवेगळे गट करून खाणे सुरू होते. मी सुद्धा भारताच्या गटात सामील झालो. सवयीप्रमाणे थाळी समोर डोळे मिटून मंत्र म्हणत होतो. बाजूचे कुतूहलाने पहात होते. नमस्कार करून पहिला घास तोंडात घातला. डाळ गरमागरम होती. थोडी अळणी होती परंतु चविष्ठ होती. एक रोटी खाऊन माझे पोट थोडं रिकामेच आहे असा भास होत होता. परंतु प्रत्येकाला फक्त एकच रोटी दिली जात होती. शिल्लक राहिलेली डाळ पिऊन मी थाळी स्वच्छ केली. ये थाली तुम्हारे पास रखो असे एकाने सांगितले. अब सुबह नाश्ता आयेगा. दुसऱ्यांचे पाहून मी सुद्धा थाळी माझ्या गादीखाली ठेवली. पोटात बऱ्यापैकी अन्न गेल्यामुळे थोडं बरं वाटत होते. काहीणांचे जेवण अजूनही सुरू होते. पोट भरण्यासाठी दुपारचा भात काहीजणांनी राखीव ठेवला होता. आरामात त्यांचे जेवण सुरू होते.
उद्या काय होणार याची असे मी हुसेनला विचारले. उद्या सकाळी हाताचे ठसे आणि चेहऱ्याची छायाचित्रे काढण्यासाठी घेऊन जाणार त्यानंतर ओळखपत्र बनविणार असे हुसेनने सांगितले. त्याने त्याचे ओळखपत्र मला दाखविले. निवांतपणे आमच्या गप्पा चालू होत्या ईतक्यात पुन्हा नमाजची बांग ऐकायला आली. दिनकी आखरी नमाज हुसेन म्हणाला. हळूहळू सगळे जमा व्हायला लागले. चटई अंथरल्या गेल्या. अल्ला हू अकबर .... साधारण १५-२० मिनिटात नमाज संपले. ______________________________________________ ________________________________
(पुढील ३ महिने तुरुंगातच काढावे लागले. या कालावधीत अजमान मध्यवर्ती कारागृहात राहून एकंदरीत यूएई मधील गुन्हेगारी विश्वाची झालेली वेगळी ओळख येथे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तेथील वातावरण, जेवण, दिनक्रम, आरोपींचे स्वभाव, मनोरंजन साधने, कारागृह नियम, पोलिसांची वागणूक, बाहेरील जगाशी संपर्क व्यवस्था, न्यायालय निकाल ई. ई. युनायटेड अरब ईमिरेट्स, यूएई मधील ७ ईमिरेट्स (राज्य) पैकी अजमान हे एक छोटे राज्य. अबुधाबी राजधानी. जगात सुप्रसिद्ध असलेले दुबई, शारजहा, रास अल खईम (RAK), उमल अल कुईन (UAQ) आणि फुजीराह ईतर ईमिरेट्स. प्रत्येक राज्याचा वेगळा राजा. स्वतंत्र कारभार, नियम आणि कायदे. प्रत्येक राज्यात स्वतंत्र पोलीस यंत्रणा आणि स्वतंत्र कारागृह.) ------ किशोर रामचंद्र मुंढे. अजमान, यूएई. _____________________________________________________________________________________________________________________
बाजूच्या खोलीमधून टीव्हीचा आवाज ऐकू येत होता. अरबी भाषेतील बातम्या सुरू होत्या. खोलीतील काही जण आत बाहेर जात होते. त्या थोड्या वेळातच दरवाजा उघडला की टीव्ही दिसत होता. मी टीव्हीवर वेळ समजेल म्हणून दरवाजाच्या बाहेर उभा होतो. पाठीमागून एकाने खांद्यावर हात ठेवला. अंदर मत जाओ. अरबी आरोपींसाठी ती स्वतंत्र खोली होती. मी पुन्हा गादीवर येऊन बसून राहिलो. सकाळी माझ्यासोबत आलेला पाकिस्तानी युवक मोहसीन माझ्याकडे आला. प्रथम मी ओळखले नाही. केस कापलेले, कोट काढलेला फक्त शर्टवर असलेल्या मोहसीनला ओळखायला मला जरासा वेळच लागला. त्याने मला पाकिस्तान आरोपींच्या गटात नेले. तिकडे आणखी एकजण अजमान फ्री झोनमध्ये व्यवसाय परवाना असणारा आरोपी होता. त्याचे नाव शाहिद. तो पंधरा दिवसांपूर्वी आला होता. मी, शाहिद, मोहसीन आम्ही तिघेजण तेथेच बाजूला बसलो. मी माझी ओळख करून दिली. शाहिद आणि मोहसीनने आपआपली ओळख करून दिली.
आणखी दोन जण आहेत शाहिदने माहिती दिली. ते हॉलच्या बाहेर असलेल्या छोट्या मस्जिद मध्ये कुराण वाचत बसले आहेत. त्यांना सुद्धा पोलिसांनी पकडून महिना झाला होता. थोडेफार समान आरोप असलेले आम्ही ५ आरोपी होतो. आम्ही तिघे मस्जिद जवळ गेलो. मस्जिद मध्ये घड्याळ होते. रात्रीचे ०९.१५ वाजले होते. शाहिद आणि मोहसीन आत गेले. मस्जिदच्या बाहेरच काही ईराणी आरोपी घोळका करून गप्पा मारत होते. एकच सिगरेट प्रत्येकाकडे फिरत होती. मी बाजूलाच मोहसीन आणि शाहिदची तसेच ईतर दोघे बाहेर येण्याची वाट पहात उभा होतो. घोळक्यातील एकाने माझ्याकडे पाहिले व सिगरेट माझ्यासमोर धरली. हसून मी त्याला नहीं, शुक्रिया असे म्हटले. त्याने पुढच्याच्या हातात अर्धी झालेली सिगरेट सोपविली. ईतक्यातच मोहसीन, शाहिद दोघांना बाहेर घेऊन आले. एकाचे नाव अदनान दुसऱ्याचे नाव आसीम. शाहीदने ओळख करून दिली. मी सुद्धा त्यांना माझी ओळख करून दिली. मोहसीनला त्यांची ओळख अगोदरच झाली असावी. अदनानला पाहता क्षणीच मला हुरूप आला. काही व्यक्ती पहिल्या भेटीतच छाप पाडतात. साधारण ३५ वर्ष वयाचा अदनान भारीच अनुभवी वाटत होता. चौघांच्या पाकिस्तान पंजाबी भाषेत गप्पा सुरू झाल्या. बाहेर बोचरी थंडी होती मी हाताची घडी घालून त्यांचे संभाषण ऐकत होतो. बरेचसे शब्द हिंदी, उर्दू होते. मला थोडेफार समजत होते. त्यांचे हास्यविनोद सुरू होते. अधून मधून माहितीची देवाणघेवाण सुद्धा सुरू होती. पाकिस्तानात असल्या सारखेच वाटत होते.
ईतक्यात एक भारतीय तरुण आरोपी तिकडे आला. त्याने आसिमला विचारले कल कॅन्टीन जाना है? आसिम उत्तरला नहीं. अच्छा है आराम से सो जायेगा. त्याचे नाव आकाश होते. आसिमने आकाशला माझी ओळख करून दिली. मला थोडे विचित्रच वाटले. एक पाकिस्तानी दोघा भारतीयांची भेट घडवून देत होता. आकाश अमृतसरचा वीस बावीस वर्षांचा तरुण होता. सुबह मिलेंगे असे त्यांना म्हणत मी आणि आकाश आतील हॉलमध्ये भारतीय गटाजवळ जायला निघालो. सिज्जू नामका आदमी इंडिया का फोरमन है वाटेत जाताजाता आकाशने माहिती दिली. भारतीय गटात पत्ते खेळण्याचा कार्यक्रम सुरु होता. ६ जणांमध्ये रम्मीचा डाव रंगला होता. त्यांच्या आजूबाजूला आणखी काहीजण खेळाचा आनंद घेत होते. सिज्जू नावाच्या केरळी व्यक्ती समोर आम्ही आलो. माझे नाव त्याला अगोदरच माहित असावे. त्याने ईतरांना ईसका नाम किशोर है असे एकदाच मोठ्याने सांगितले. काही जणांनी वर माझ्याकडे पाहिले, काही जण खेळात दंग झाले होते. ३-४ जणांनी स्वतःचे नाव घेतले आणि ओळख समारंभ आटोपला. सिज्जू भारतीय गटात वरिष्ठ होता. मला प्रचंड झोप येत होती. मी माझ्या बिछान्यावर गेलो.
हॉलमध्ये बऱ्यापैकी गजबजाट होता. बारा वाजता लाईट बंद करणार असे हुसेनने सांगितले. मुख्य फोरमन हॉलच्या दरवाज्यासमोर आला आणि ओरडला नये आदमी बाहर आओ. आम्ही आठ जण दुपारी आतमध्ये आलो होतो त्या महाकाय दरवाज्याजवळ आलो. बाहेरून पोलिसांने बेल वाजविली व दरवाजा उघडला. सर्वसाधारणपणे घंटी वाजविल्यावर आतून दरवाजा उघडतात परंतु येथे तसे नव्हते. स्वतः पोलिसच बाहेरून दरवाजा उघडत होता. बाहेर पोलीस आल्याची सूचना ते फोरमन ला देत होते. आठ पैकी सहा जणांना पोलीस बाहेर घेऊन गेला. मी आणि आणखी एक वयस्कर बांगलादेशी आरोपीला पोलिसाने परत आतमध्ये पाठविले. बंगाली आरोपी म्हणाला संपूर्ण कारागृहाचा कचरा जमा करण्यासाठी त्यांना घेऊन गेले आहेत. त्याला अगोदरच त्याच्या बांगलादेशी सहकारी आरोपींनी कल्पना दिली होती. शायद हमारी बारी कल आयेगी. त्याने माझी चौकशी करायला सुरू केली. मी माहिती दिली. चलो कल सुबह मिलेंगे म्हणत तो बांगलादेशी गटात सामील झाला. थंडी होती त्यामुळे तहान अशी नव्हती परंतु झोपण्यापूर्वी पाणी प्यावे म्हणून मी बाहेरील मस्जिदजवळ पाणी पिण्यासाठी नळ होता तिकडे गेलो.
आजूबाजूला पाणी पिण्यासाठी ग्लास दिसला नाही. ओंजळीनेच दोन चार घोट पाणी पिऊन गादीवर आलो. पाकिस्तान गटात एकजण गाणी म्हणत होता. आजूबाजूचे त्याला वाह वाह म्हणत होते. अंतर थोडे जास्त होते त्यामुळे अस्पष्ट शब्द कानावर येत होते. डोळे मिटून बसलो होतो. अस्पष्ट गाणी ऐकता ऐकताच झोप लागली. पहाटे जाग आली. हॉलमधील दिवे बंद होते. संपूर्ण अंधार होता. थोडा वेळ तसाच बसून राहिलो. काही वेळाने अंधुक अंधुक दिसायला लागले. आजूबाजूचे सगळेच पांघरून घेऊन गाढ झोपले होते. एखादा अपघात झाल्यावर जसे शव ओळीने ठेवतात तसे सारे शांत झोपले होते. काही ठिकाणांहुन घोरण्याचा आवाज येत होता. हॉलच्या मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता त्यातून थोडासा प्रकाश आत पसरला होता. बाहेरील सार्वजनिक स्वछतागृहा मधील दिवे चालु होते. सार्वजनिक स्वछतागृहात विधी उरकले आणि किती वाजले ते पाहण्यासाठी मस्जिदच्या दरवाज्या समोर गेलो. रात्रीचे ३.०० वाजले होते.
थोडी झोप झाल्यामुळे बरं वाटतं होते. बाहेर पहाटेची बोचरी थंडी जाणवत होती. आत येऊन पुन्हा झोपी गेलो. मस्जिद मधून सकाळच्या नमाजची बांग दिली गेली. हॉलमधील दिवे लावले गेले. हळूहळू एक एक जण उठत होते, बाजूच्याला देखील उठवत होते. काही जण तसेच हां हां करून पुन्हा झोपत होते. नमाज पूर्वी हात पाय धुण्यासाठी स्वतंत्र जागा होती. गर्दीमुळे काहीजण स्वछतागृहातच हात पाय धुवून नमाज साठी सज्ज झाले. ख्रिश्चन साऊथ आफ्रिकन आणि काही भारतीय वगळता सगळेच नमाज अदा करीत होते. मी अंथरूणातच होतो. समोरून आकाश हातात टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन जाताना दिसला. मी सुद्धा त्याच्या पाठोपाठ गेलो. हातच्या बोटावर टूथपेस्ट घेऊन दंतपंक्ती साफसफाई केली. तोंड हात पाय धुतले. नमाज नंतर नाश्ता दिला जाईल असे आकाश म्हणाला. रात्री जशी रांग लागली होती तशीच रांग लागली होती. परंतु संख्या खूपच कमी होती. बहुतेक जण नमाज वाचून पुन्हा झोपी गेले होते काही जण उठलेच नव्हते. अरेबिक रोटी आणि छोट्या प्लास्टिक डबीत फळांचा जाम असा नाश्ता होता. बाहेर पिण्याच्या पाण्याजवळ चहाची किटली ठेवली होती. तेथे जाऊन चहा घ्यायचा अशी व्यवस्था होती.
अरेबिक रोटीवर फळांचा जाम पसरवून गुंडाळी करून सगळे खात होते. मी सुद्धा त्यांचे अनुकरण केले. आकाश बाहेर जाऊन चहा घेऊन आला. थंडीत गरमागरम चहा. चहाचा एक घोट पिऊन त्याने मला ईशारा केला ले लो. एकाच ग्लासात दोघांनी चहा पिणे मला पटेना. त्याचा मान राखावा म्हणून मी त्याला म्हटलं मी नंतर घेतो. त्याला समजले असावे, पटापट ग्लास रिकामा करून त्याने मला माझ्यासाठी ग्लास रिकामा करून दिला. ग्लास स्वच्छ करून आरामात मी चहाचा आस्वाद घेत होतो. ईतक्यात हॉलमधील दिवे बंद केले गेले. सकाळची नमाजची वेळ वगळता रात्री बारा ते दुपारी बारा दिवे बंद करण्याचा नियम होता. सकाळचे ६.०० वाजले होते. बाजूच्या हुसेनने मला सांगितले ९.०० वाजता पोलीस येतील आणि कार्ड बनविण्यासाठी घेऊन जातील. मला पुन्हा झोप येईना. बाहेर मस्जिदच्या आत काही जण पुस्तक वाचत होते. काही वयस्कर बाहेर अर्धवट कोमट चहाचा आस्वाद घेत गप्पा मारण्यात गुंग होते. मी त्यांच्या गप्पा ऐकत उभा होतो. त्यातील एकाने मला त्याच्या बाजूला बसायला जागा करून दिली. एकंदरीत यूएई मधील ढासळत्या परिस्थितीवर त्यांचे संभाषण सुरू होते. पंधरा वीस वर्षांपूर्वीची यूएई आणि आताची यूएई परिस्थिती कथन केली जात होती.
समोरील व्यक्तीने मला चाय ले लो असे म्हणत ग्लास समोर धरला. मी नको म्हणालो. तुमको नही मुझे ग्लास भरके दे दो. मी निमुटपणे बाजूच्या चहाच्या किटलीतून चहा भरून ग्लास त्याच्या हातात सोपविला. इंडिया के हो? त्याच्या प्रश्नाचे हो उत्तर दिले. ही जागा तुरुंगातील पहिल्या क्रमांकाची खोली आहे. पकडलेले आरोपी प्रथम येथे ठेवले जातात. नंतर जसा गुन्हा असेल त्यानुसार पुढील कोठडीत पाठवितात. आम्ही सुद्धा १-२ दिवसात ईकडून पुढे जाणार असे त्याने सांगितले. दुसऱ्याने मला माझ्याबद्दल विचारले त्याला मध्येच थांबवत तिसरा म्हणाला मोहसीन और ईसका सेम केस है. मी काही न सांगताच त्यांच्यातच पुन्हा चर्चा सुरू झाली. अजमान कोर्टच्या धीम्या कारभाराचा उल्लेख झाला. मला रात्री भेटलेले शाहिद, अदनान, असीम यांच्या नावाचा पुनरुच्चार झाला. मालूम नहीं ईनका क्या होगा? आंघोळ करण्यासाठी एक एक जण उठून जात होता. उरलेल्या एकाकडे मी आंघोळीसाठी साबणाची चौकशी केली. त्यांनी आतमध्ये त्याच्या जागेवर जाऊन स्वतःसाठी शाम्पू बाटली आणली आणि हॉटेल मध्ये छोट्या साबणाची गोल वडी असते तसा साबण माझ्या हातात सोपविला. मी त्यांना नाव विचारले. अहमद, मै बांगलादेश ढाका से हू. लगबगीने पहिल्या स्वछतागृहात शिरला.
लहानपण ते तरुणपणात अनुभवलेल्या सार्वजनिक शौचालयाची आठवण झाली. पूर्वानुभव असल्यामुळे जास्त वाईट वाटले नाही. परंतु एखाद्या जुन्या आठवणीने डोळे पाणावतात तसे काहीसे क्षणभर झाले. भारतीय पध्दतीचे शौचालय आणि पुढे आंघोळ करण्यासाठी थोडी मोकळी जागा, डोक्यावर शॉवरची जाळी नसलेला पाईप अशी रचना ओळीत चार स्वछतागृहांची होती. थंडी असूनही गरम पाण्याची सोय नव्हती. कशीबशी थंड पाण्यानेच आंघोळ करून पटकन बाहेर आलो. बाहेरच दोरीवर कपडे सुकायला टाकून आतमध्ये बिछान्यात येऊन बसलो गरम ब्लॅंकेट घेतल्यावर थोडी थंडी गेली. नित्यनियमानुसार दररोजच्या श्री स्वामी समर्थ ११ माळी जप आणि ३ अध्याय वाचनाची आठवण झाली. अध्याय वाचणे शक्यच नव्हते. जप करण्यासाठी माळही नव्हती. डोळे मिटून अगदी कमी आवाजात हातच्या ४ बोटांची प्रत्येकी ३ पेर याप्रमाणे ९ वेळा स्वामी समर्थ नावाचा जप करून एक एक माळ संपवली. मनातल्या मनात स्वामी तारक मंत्राचे गीतगायन केले.
आतमध्ये आता थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दिवे बंदच होते. परंतु बाहेरील उजेडामुळे प्रकाश पसरला होता. काही जण अंथरुणाला खिळूनच होते. तेथेच बसून अगदी कमी आवाजात एकमेकांशी हितगुज करीत होते. काही जण आंघोळी करून सकाळी घेतलेला नाश्ता करण्यात दंग झाले होते. सारे काही आवाज न करता सुरू होते. काही जण कुंभकर्ण असल्यासारखे झोपले होते. ईतक्यात बेलचा आवाज आला. मुख्य फोरमन आत आला आणि त्याने दिवे पेटविले. पाच जणांची नावे पुकारली. तैयार रहो तुमको कोर्ट जाना है. दिवे बंद करून बाहेर खुर्चीत जाऊन बसला. ज्यांची नावे पुकारली त्यातील एकजण झोपला होता. बाजूच्याने त्याला जागे केले. डोळे चोळतच तो उठला. जाओ फोरमनने बुलाया है. बाहेर जाऊन तोंड धुऊन तो सरळ मुख्य दरवाज्याकडे रवाना झाला. ५ जण मुख्य दरवाजाच्या बाजूला उभे होते आणि त्यांना पाहण्यासाठी दूरवर १५-२० जणांचा घोळका. .......... किशोर रामचंद्र मुंढे. अजमान, यूएई. क्रमशः
बापरे! एका वेगळ्याच विश्वाची
बापरे! एका वेगळ्याच विश्वाची सफर घडली तुम्हाला. तुमचे अनुभव वाचायला उत्सुक आहे. तीन महिने म्हणजे खूप काळ काढावा लागला की. दंडाची रक्कम खूप जास्त होती का? हा अजामीनपात्र गुन्हा आहे का?
बापरे ! तुरुंगवास घडला .
बापरे ! तुरुंगवास घडला .
खरतर आवडलं अस म्हणवत नाही . पुढचे भाग नक्की लिहा हे एक वेगळं जग वाचायची उत्सुकता नक्कीच आहे
बापरे खूप कठीण प्रसंग आला
बापरे खूप कठीण प्रसंग आला होता तुमच्यावर. ३ महीने हा बराच मोठा कालावधी आहे. ज्या कंपनीत कामाला होता तिने मदत केली का तुम्हाला? तुमच्या घरच्यानची काय अवस्था झाली असेल भारतात.
सुखरूप बाहेर आहात ही चांगली गोष्ट आहे.
बापरे. खतरनाक अनुभव गाठीशी
बापरे. खतरनाक अनुभव गाठीशी जमा झाला की. जेल म्हणजे काय!
रुनी पॉटर, किती वर्षांनी
रुनी पॉटर, किती वर्षांनी दिसलीस.
वाचतो आहे. पुभाप्र
वाचतो आहे.
पुभाप्र
बापरे!
बापरे!
एका वेगळ्याच विश्वाची सफर घडली तुम्हाला. अनुभव वाचायला उत्सुक आहे.
खतरनाक
खतरनाक
डेंजर अनुभव.
डेंजर अनुभव.
तुम्ही free visa वर होता का? कंपनी स्पाॅन्सर्ड व्हिसा मधे ईतक्या थराला प्रकरण गेलं नसतं कदाचित. कंपनी पी. आर येऊन सोडवतात.
किशोर सर, .. तुमच्या लिखाणाची
किशोर सर, .. तुमच्या लिखाणाची स्तुती करू की, तुम्हाला जो अनुभव आला त्याबद्दल हळहळ व्यक्त करू.. काहीच कळत नाहीये.. पण इतकंच सांगेन स्वामी होते आणि आहेत पाठीशी तुमच्या..
पुढे काय घडलं हे वाचायला नक्की आवडेल...
अरे बापरे!! तुरुंगात तीन
अरे बापरे!! तुरुंगात तीन महिने म्हणजे बरेच झाले की. आता सगळं व्यवस्थित आहे ना?
तीन महिने खूप झाले की!!!
तीन महिने खूप झाले की!!!
असा प्रसंग येऊ नये कुणावर.
असा प्रसंग येऊ नये कुणावर.
नविन विश्वाची ओळख. कल्पनेच्या पलिकडचे अनुभव व्यवस्थित मांडताय. छान कसे म्हणू. पण लिहा.
मी कॉलेज मधे असताना बस मधे एक पन्नाशीचा माणूस शेजारी बसला. त्याने जंगली महाराज रोड नविन झालाय का विचारले. मी म्हण,, नाही. तुम्ही पुण्यात नविन आहात का?. तो म्हणला , "नाही, आत्ताच वीस वर्षानी येरवड्यामधून सुटलोय". माझ्या अंगावर आलेला शहारा मला अजूनही आठवतोय. माझ्या डोळ्यातसुद्धा त्याने वाचला असावा. पण थोडा वेळ त्याने गप्पा मारल्या. काय ते आता आठवत नाही. पण तुमच्या मुळे या प्रसंगाची आठवण आली. असो.
बापरे! केवढा कठीण प्रसंग!
बापरे! केवढा कठीण प्रसंग!
खुप कठीण प्रसंग तुमच्यावर आला
खुप कठीण प्रसंग तुमच्यावर आला आहे.
काही देशात ईमिग्रेशन चे कायदे खुप कडक असतात. सिंगापुर सारख्या देशात जर योग्य विसा हातात नसल्यास किंवा तो विसा expire झाल्यावर जर काम /व्यवसाय केला तर जेल बरोबर चाबक्यानी फटकवायचा कायदा आहे. त्यामुळे बाहेरच्या देशात जरा जपुन राहिले पाहिजे.
डेंजर! आता सुंखरुप आहात ना ?
डेंजर! आता सुंखरुप आहात ना ?
पुढचा भाग लवकर येऊ द्या.
पुढचा भाग लवकर येऊ द्या. वाचून उत्सुकता वाढली.
परिच्छेद पाडत, सुटसुटीत लिहा म्हणजे वाचायला सोपे जाईल.
अरे बाप रे.
अरे बाप रे.
फार डेंजर.
फार डेंजर.
आता ठीक आहात ना?हे एकदम लॉकड डाऊन अब्रॉड च्या एपिसोड सारखे झाले.
बापरे, पुढच्या भागाच्या
बापरे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
नवीन जगाची ओळख,येऊ द्या!
नवीन जगाची ओळख,येऊ द्या!
नवीन जगाची ओळख,येऊ द्या!
नवीन जगाची ओळख,येऊ द्या!
डेंजर! पुढील भाग लवकर लिहा..
डेंजर!
पुढील भाग लवकर लिहा..
बापरे! पुभाप्र.
बापरे!
पुभाप्र.
@जिज्ञासा - दंडाची रक्कम
@जिज्ञासा - दंडाची रक्कम जास्त नव्हती परंतु वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. आर्थिक गुन्ह्याला जामीन मिळत नाही. दंड भरा आणि मुक्ती मिळवा. @जाई - होय. वेगळेच विश्व अनुभवायला मिळाले. पुढील अनुभव लवकरच लिहितो. @रुनी - स्वतःचा व्यवसाय आहे. मालक मीच आहे. भारतात कुटुंब काळजीत होते परंतु युएई मधील मित्रमंडळी संपर्कात होते त्यामुळे काळजी नव्हती. @मामी - अनुभव खतरनाकच होता. परंतु नियतीच्या मनात असते तेच घडते. @इच्चूकाटा - पुढील अनुभव लवकरच लिहितो. @हर्पेन - वेगळेच विश्व अनुभवायला मिळाले. @निलुदा - खतरनाक विश्वाची ओळख झाली. @अतरंगी - व्हिझा माझा स्वतःचाच आहे त्यामुळे माझे मलाच निस्तरायचे होते. @अजय - श्री स्वामी समर्थ @वावे - कोविड-१९ मुळे मुक्काम वाढला. आता सुखरूप आहे. @सायो - त्याच काळात युएई मध्ये सुद्धा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे कालावधी वाढला. @ विक्रमसिंह @स्वाती२ @साहिल @मंजूताई @सोनाली @टवणे सर @मी_अनू @मी_अस्मिता @पाटीलबाबा @अजिंक्यराव - समस्त वाचकांचे हार्दिक आभार.
बापरे. आता ठीक आहात ना?
बापरे. आता ठीक आहात ना?
पुढील भाग लिहा लवकर.
छन लिहलं आहे. पुढील भागाची
छन लिहलं आहे. पुढील भागाची प्रतिक्षा आहे.
शेवटी कुणीही कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो कुठलाही देव अशा वेळेस धाऊन येत नाही.. फार फार तर झालेली शिक्षा भोगण्यासाठी मानसिक बल देतो असं उगाच वाटुन गेलं
हायला
हायला
बाप रे! भयंकर अनुभव. ३ महिने
बाप रे! भयंकर अनुभव. ३ महिने म्हणजे खूप झाले. त्यात अनिश्चितता, म्हणजे फॉरेव्हर वाटले असतील.
बापरे! खूप वाईट प्रसंगाला
बापरे! खूप वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले तुम्हाला. वाईट वाटलं हे सारं वाचून.
Pages