ती ओरडत असते,
तिच्या आत्मेच्या देठापासून,
तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला,
दाहिदिशी पसरलेल्या दमट अंधारात,
कुणा तारकाचे लक्ष वेधायला.
तो अंधार काही ह्या जगातला नाही,
रात्र संपल्यावर पळणारा,
सूर्य अस्तित्वात नसलेला अंधार तो,
कालही तितकाच अनंत,
उद्याही तितकाच असणारा.
पण मला ऐकू येतंय ना,
फक्त मलाच.
साडीतच आली ती ह्या जगात,
भरजरी, मोररंगी प्रेतवस्त्रात,
त्याच्या चिवट विळख्यात तिला जन्मताच डांबले,
हात-पाय मारून श्वास आणखी तिचेच खोळंबले,
साडी म्हणजे सौंदर्य, संस्कार, संस्कृती,
एका सालस स्त्रीची आकृती,
पण तिच्या मानेला तो फास,
समाजपुरुषाने लावलेला,
तिच्या क्रांतिवादी मनाने आवळलेला,
फक्त जगण्यापुरतं लागावा तितकाच तिला श्वास.
त्या गुदमरण्यात आयुष्य तिचे,
आता ओरडणं हि कमी केलं तिने,
स्वीकार केलं असावं,
कि हेच तिचे जगणे.
अधून-मधून फार नाही,
फक्त थोडं पाणी मागते,
घस्याची कोरड गेली कि
भेसूर भयकारी किंचाळते,
ओरबाडून मनाच्या चिंध्या-चिंध्या करते माझ्या,
फक्त माझ्याच.
व्यथा ही स्त्री जन्माची फार
व्यथा ही स्त्री जन्माची फार छान रेखाटली!
पुलेशू!
धन्यवाद सुहास. ह्या मंचावराची
धन्यवाद सुहास. ह्या मंचावराची ही माझी पहिलीच कविता होती. मला वाटलं की व्यर्थ लिहिली ही. किंवा कळली नाही की काय, असा संदेह झाला.
पण तुमचा संदेश वाचून आनंद झाला. धन्यवाद