मै दिया हु .......गुलजार
अंधाराची शाल पांघरून आकाश निद्रिस्त होत होते. ढगांचा पाठशिवणीचा खेळ आणि विजांचा कडकडाट चालूच होता. आजूबाजूला पसलेल्या डोंगराच्या उंचच उंच भिंती आणि त्यामागून लागलेली पावसाची हलकेशी चाहूल मन अस्वस्थ करत होती.उर्मटपणे वाहणारा सोसाट्याचा वारा वातावरण अधिकच गंभीर करत होता. आणि दूरवर मात्र प्रकाशाचा एक ठिपका तेवत होता. अंधाराच्या साम्राज्यात त्याचे अस्तित्व अधिकच उठून दिसत होते. कोण असावा हा प्रकाशाचा ठिपका ? सोसाट्याचा वारा घोंगावत असताना सुद्धा हा कसा तेवत आहे? त्याला कसलीच भीती नाही ? आणि त्याचवेळी दूरवरून एक आवाज आला
मै दिया हु !
मेरी दुष्मनी तो अंधेरे से है !
हवा तो खामखा मेरे खिलाफ है.
गुलजारजींच्या अनेक उत्तम शेरापैकी मनाला भिडणारा हा अप्रतिम शेर. समाजात बदल घडवून आणणाऱ्या, इतिहास घडवणाऱ्या किंवा इतिहास घडवू इच्छिणाऱ्या थोर व्यक्तींचं, त्यांच्या सामर्थ्याचं प्रतिक म्हणजे दिवा. या दिव्याची लढाई अंधाराशी आहे. अंधार दारिद्र्याचा, अंधार सामाजिक विषमतेचा आणि त्यायोगे निर्माण झालेल्या दु:खाचा हा अंधार आहे. दिव्याला या अंधाराचा नाश करायचा आहे आणि त्यासाठी तो तेवत आहे. शांत.... निवांत ..... एका सातत्याने. दिव्याने हाती घेतलेले हे तपस्वी कार्य आहे.
पण जेव्हा जेव्हा समाजात अशा पद्धतीने बदल घडवण्याच्या आकांक्षेने भगीरथ प्रयत्न झाले तेव्हा त्या प्रयत्नांना विकृत आत्म्यांच्या बाजूनि, विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण केले. पण प्रवाहाविरुद्ध पोहून क्रांती करू इच्छिणारे हे समाजपुरुष या अडथळ्याना भिऊन अडखळले नाहीत. दिव्याच अस्तित्वच नाहीस करणाऱ्या विरोधकांच, विनाशी लोकाचे प्रतिक म्हणजे हवा. वाऱ्याचा झोतात कदाचित तो दिवा विझालाही असेल पण न डगमगता तो पुन्हा पुन्हा तेवत राहिला हे त्या दिव्याच यश.!
दिव्याला किंबहुना सामर्थ्याला नाहीस करण्याचा प्रयत्न आणि दिव्याची अंधाराशी चालणारी अखंड लढाई. ही लढाई पाहत असताना सुरेश भटांच्या एक कवितेची आठवण येते “ वीझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही”
नाश न पावणार सामर्थ्य अजुनी अस्तित्वात आहे म्हणूनच अंधार नाहीसा झाला आहे .. अंधार नाहीसा होत आहे.......
सतीश कुलकर्णी
wsatish2807@yahoo.com