©संततधार! - भाग ६

Submitted by अज्ञातवासी on 9 June, 2020 - 11:17

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

पुढील भाग येत्या शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

भाग ५ - https://www.maayboli.com/node/74977

"मनू, च्यायला, बरच पुढे गेलंय प्रकरण. आणि मी काय बोलाव तेच कळत नाही."
"अण्णा, तुम्ही काहीही बोलावं अशी माझी इच्छा नव्हती, आणि नाहीये. बस रिता झालो, एवढंच."
"मनू, लक्ष्मी आणि माझं लग्नानंतर आयुष्य २५ वर्षे. पण त्याआधी पाच वर्ष तर आम्ही प्रेमच केलं रे. खूप कमी वयात. कधी इतका विचारच केला नाही आम्ही. पण ना मी तिच्यासाठी स्वतःला बदललं, ना तिने माझ्यासाठी.
प्रेम होतं, केलं जातं, ते बनवलं जात नाही. ते जिंकल जात नाही. पर्वणी तुझी अचिवमेंट आहे. तुझ्याशी तिचं लग्न होणं, हा तुझा विजय वाटला तुला. पण लग्न होणं, तुझं बदलणं हे दोघामध्ये प्रेम असण्याचं द्योतक आहे?
मनू, एकदा तपासून घे रे, आणि अक्षरश: उलटतपासणी घे. परुसाठी तू आता काय आहेस. कधीकधी काळ ना, माणसाला इतकं बदलवतो, की नावडणाऱ्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. हीच तर माणसाची जिवंतपणाची खूण आहे."
मनू फक्त हसला.
"अण्णा, सगळं सुरू संपत आलंय, आणि या शक्यता आजमावून बघायला सांगता आहात तुम्ही?"
"कारण या शक्यता फक्त नातं वाचवणार नाहीत, तर नातं अजून बळकट बनवतील."
"अण्णा, हा शेवट मलाही नकोय. निदान असातरी नकोय. माझी परु मला हविये परत."
"येईल नक्की. पण आता माझं डोकं वेगळाच विचात करतंय." अण्णा म्हणाले.
"काय अण्णा."
"विचाराव लागेल, लक्ष्मीला, बाई तू खुश आहेस ना? कायम तुला गृहीतच धरत आलोय... माझा संसार केलास. मला सांभाळलं, पण आता काय हवं असेल ते कर."
"अण्णा, कोडी असतात ही, न सुटणारी."
"हं. पण मनू, आता माझा मलाच कंटाळा आलाय. असं वाटत, भरपूर आनंद घेतला. आता सरळ नर्मदा परिक्रमेला निघून जावं. आणि तू तर विषयही काढत नाहीस. काय राव."
"अण्णा, थोडे दिवस वाट बघा, नक्की जाऊ सोबत."
"नाही रे मनू, खूप मोठा हो, खूप आनंद घे आयुष्याचा. आतातर आयुष्य सुरू झालंय... "
"हम्म्म," मनू विचारात गढला.
मावळतीचा सूर्य त्याचा सौम्य प्रकाश हळूहळू कमी करत होता, आणि एका क्षणी त्याची जागा चंद्राने घेतली. संध्याकाळ संपून रात्रीकडे वाटचाल सुरू झाली होती.
"अण्णा, आता बोलेवॉर्डमध्ये गाडी घेऊयात. आज तुम्ही मनसोक्त प्या. मी थांबवणार नाही."
"...आणि गाडी घरी घेशील प्लिज, कारण आता मला दुपारच्या गिलक्याच्या भाजीशिवाय दुसरं काही खावं असं वाटणार नाही."
मनू चमकला, मग त्याच्या चेहऱ्यावर रुंद हसू पसरलं.
अनुराधा काम आवरून आणि रात्रीचा पर्वणीचा स्वयंपाक करून निघून गेली होती. पर्वणी शांतपणे सोफ्यावर बसली होती.
डोक्यातलं विचारचक्र थांबण्याचं नाव घेत नव्हतं.
तेवढ्यात लांबवर गाडी थांबण्याचा आवाज आला, आणि त्याबरोबर गेट उघडण्याचा.
"मनू?"
गाडी आतवर आली, आणि पार्किंगमध्ये येऊन थांबली.
थोड्याच वेळात बेलचा आवाज आला.
पर्वणी अक्षरशः दाराकडे धावत सुटली. तिने दार उघडलं.
दारात मनू उभा होता.
पर्वणीला आता त्याला घट्ट मिठी माराविशी वाटत होती, मात्र त्याचा चेहरा तसाच होता. निर्विकार. अतिशय थंड डोळे तिच्यावर खिळले होते.
"मिस पर्वणी, मे आय कम इन?"
...आणि तो हसला...
त्याच्या हसण्याने पर्वणीच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात रिकामा झाला, आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली...
कितीतरी वेळ ती त्याला मिठी मारून उभी होती, तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता.
"इट्स ओके, इट्स ओके. एव्हरीथिंग इज फाईन! चल माझ्यासाठी काहीतरी बनव, भूक लागलीये खूप."
"राहू दे ना थोड्यावेळ असच..."
मनूने तिला तसच उचलून घेतलं, आणि किचनमध्ये घेऊन गेला.
"मी भाजी चिरून देतो, तू पटकन फोडणी कर. कणिक उरली असेलच." आणि त्याने भाजी चिरायला घेतली.
"तू किती तिखट भाजी बनवायचीस पूर्वी. एकदा कॉलेजला तुझ्या हातचा डबा खाल्ला होता, जिवघेणं..."
"तरीही लालेलाल चेहरा झालेला असताना तू खाल्ला होतास."
"काय करणार, तुला इम्प्रेस करायचं होतं."
"मग झाले ना मी इम्प्रेस... बघ तिखट खाल्ल्याने मुली इम्प्रेस होतात."
मनू फक्त हसला.
थोड्याच वेळाने दोघेही जेवायला बसले. अनुराधाने आधीच पर्वणीचा स्वयंपाक करून ठेवला होता.
"परु, काय मस्त भाजी बनलीये. अप्रतिम." मनू जेवता जेवता म्हणाला.
"अजून वाढू?"
नको, ती संपूर्ण कढईच माझ्याजवळ आणून ठेव.
"मनू...,
बोल ना.
"खूप बरं वाटतय रे. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं."
मनूचं जेवण संपत आलं.
"बघ तुझी भाजी संपली."
"गुड बॉय."
पर्वणी शांतपणे जेवत होती. तिच्यासाठी मनूच हे रूप अतिशय सुखावणारं होतं, पण धक्कादायकही.
जेवण झाल्यावर दोघांनी भांडी आवरून बेसिनमध्ये ठेवली.
"परु, मी थोड्यावेळ स्विमिंग पूलमध्ये असेन. विल यु जॉईन मी?" मनूने विचारले.
"मी कधी येते का? मला नाही आवडत."
"बरं, थोड्यावेळ पाण्यात पाय टाकून तर बसशील?"
"जशी तुझी इच्छा." पर्वणी हसली.
मनूने हात धुतले, आणि वर जाऊन त्याने कपडे चेंज केले.
बंगल्याच्या मागच्या बाजूला एक भलामोठा स्विमिंग पूल होता. किंबहुना या घरातली ती एकमेव अशी गोष्ट होती, जी त्याने हौसेने बनवून घेतली होती.
त्याने मोबाईल काठावर ठेवला, पाण्यात उडी घेतली.
थंडगार पाण्याने त्याला एकदम ताजतवानं वाटलं. दिवसभराचा शिणवटा कुठल्याकुठे निघून गेला.
'बिंते दिल, मिसरिया में!'
मोबाईलवर गाणं लागलं, आणि मनू हसला. त्याने सावकाशपणे डोळे मिटले, व मान मागे केली.
कितीतरी वेळ गाणं रिपीट मोडवर वाजत होतं. आणि अचानक त्याच्या केसांमध्ये हात फिरवल्याचा त्याला भास झाला.
त्याने डोळे उघडले. पर्वणी त्याच्या मागेच बसलेली होती.
"थँक्स परु." मनू निवांतपणे म्हणाला.
थोडावेळ कुणीही काही बोललं नाही.
"सो, दोन आठवड्यापूर्वी काय झालं सांगशील?"
परु या वाक्याने कोसळलीच... हे वाक्य अनपेक्षित नव्हत. किंबहुना तिने याची तयारी केली होती, पण हे वाक्य इतक्या सहजरित्या येईल याचा तिने विचारच केला नव्हता.
मनू आता वळला, व त्याने पर्वणीच्या गुडघ्यावर आपलं डोकं टेकवलं.
"तुझा नवरा म्हणून नाही, तर नऊ वर्षापासून एक तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करणारा मित्र म्हणून विचारतोय. जर यात तुला काहीही सुख मिळत असेल ना पर्वणी, तर बिलीव मी, मी... मी निघून जाईल."
मनूचा स्वर कातर झाला होता. मोठ्या मुश्किलीने तो स्वतःवर ताबा ठेवत होता.
"मनू, नाही... असं नाहीये... प्लिज, असा विचार स्वप्नांतही आणू नकोस. मनू, तू हवा आहेस मला, कायम. पण, आयुष्यात मी अनेक चुका केल्यात रे आणि माझी एक चूक कुणाचंतरी आयुष्य उद्धवस्त करेल, असं कधीही वाटलं नव्हत रे!"
पर्वणी अचानक शांत झाली. तिने स्वत:ला सावरलं.
"मनू, आपलं नातं तुटलं, आणि मी पुण्यात जॉबला आले. फ्रँकली, मी तुझा तेव्हा नवरा म्हणून विचारच केला नव्हता. उलट मनू, मला नवरा हवा होता, तुझ्याविरुद्ध स्वभाव असणारा, शांत, समजूतदार, चाणाक्ष आणि कलेची आवड असणारा, माझी स्वप्ने खूप मोठी होती मनू!
याचवेळी माझी हेमलशी भेट झाली, आणि मी त्याच्या प्रेमात पडले. खूप खूप प्रेम होतं माझं त्याच्यावर. त्याचं बोलणं, वागणं, यात खूप नजाकत होती. तसा तो स्ट्रगलरच होता, कायम तंगी असायची, पण माझं प्रेम कमी पडलं नाही.
पण मनू, मी त्याला कधीही प्रेमात माझ्या शरीराशी लगट करू दिली नाही, पण न जाणे का, तो कायम वखवखलेला वाटायचा. मनू, मला वेडी म्हण, किंवा काहीही म्हण, पण कायम असं वाटायचं, की हे जे आहे, ते फक्त सुख ओरबाडण्याचं काम करतोय तो, आणि मी देतेय त्याला, कारण त्यातच मला सुख मिळत होतं. त्याग करतेय मी, कधीतरी त्याला माझा चांगुलपणा, प्रेम कळेल या आशेवर.
हळूहळू, तो वखवखलेपणा वाढला. मी मग त्याला टाळू लागले. मात्र एके दिवशी हद्द झाली. तो माझ्या रूमवर दारू पिऊन आला, आणि सगळ्या रूममेटसमोर माझे कपडे अक्षरशः फाडू लागला. हे रूप मला नवीन होतं. त्याने अक्षरशः माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला."
पर्वणीने आवंढा गिळला.
"त्याक्षणी मी तुटले मनू, मी तुटले. त्याला बाकीच्यांनी कसंतरी बाहेर हाकलून लावलं. मी त्याच अवतारात पोलीस स्टेशनला गेले, आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
मनू, त्यादिवशी ना, मला तुझी सगळ्यात जास्त आठवण आली... त्याचदिवशी. एके क्षणी वाटलं, परु, तो मनू इतकं प्रेम करतोय तुझ्यावर, आणि तू फक्त स्वतःच बघतेय.
मनू, तब्बल दोन वर्षानी मी तुला त्यादिवशी कॉल केला, आणि खूप रडले, पण मी काय घडलं हे सांगितलं नाही.
त्यानंतर मात्र तू जेव्हा पुण्याला आलास ना, पूर्णपणे बदलून आलास. मनू तू मला ओळखूच आला नाहीस. आणि त्याक्षणी मनू, मी तुझी झाले."
"थँक्स परु." मनूच्या आवाजातला थंडपणा परत आला होता.
"दोन-तीन आठवड्यापूर्वी सिग्नल ओलांडत असताना तो माझ्या गाडीसमोर आला. भणंग अवस्थेत. त्याची अवस्था बघवत नव्हती रे मनू... त्याच क्षणी मन भूतकाळात गेलं.
मनू, मी गाडीतून उतरले. आणि त्याने पहिलं वाक्य उच्चारलं.
'तू मला बरबाद केलंस, परु...'
मनू, तू विचार करू शकणार नाही रे. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केल होतं, त्याची ही अवस्था बघून जीव आधीच तुटला होता. त्यात हे वाक्य ऐकून तर मी पूर्ण तुटले.
मनू, जेलमध्ये त्याला कुठलातरी असाध्य रोग झाला. त्यानंतर कामे गेली. बदनामी झाली रेपिस्ट म्हणून... फक्त माझ्यामुळे रे... फक्त माझ्यामुळे.
कितीतरी वेळ त्याने मला शिव्या घातल्या. शेवटी विषण्ण हसून तो निघून गेला.
मनू, तो जास्त दिवस जगणार नाही. तुझी पर्वणी काहीही चूक नाहीये करत, फक्त त्याचं आयुष्य थोडतरी नीट व्हावं म्हणून प्रयत्न करतेय. ते करता करता स्वतःची चूक सुधरणवण्याचा प्रयत्न करतेय. म्हणजे मेले तरी, हा गिल्ट राहणार नाही.
...आणि मनू, कितीही झालं तरी माणूस जुनं प्रेम नाही विसरत. मग आतातरी असं वाटतंय, की जे चुकलं ते चुकलं, कमीत कमी त्याचा शेवट तरी नीट व्हावा."
पर्वणी बोलायची थांबली. एक भयाण शांतता वातावरणात पसरली.
पर्वणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनू बाहेर आला, आणि कितीतरी वेळ तिला थोपटत राहिला.
"...सगळं ठीक आहे परु, मी तुला जज करणार नाहीये. कारण आजपर्यंत फक्त तुला सुखी करत आलोय. यापुढेही करेन. पण एक नवरा जाऊदे, पण एक बिजनेस पार्टनर म्हणून मला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील."
मनू शांत झाला, आणि त्यानंतर कणखर आवाजात तो म्हणाला.
"पर्वणी, तुला MD पद सोडावं लागेल..."
पर्वणी कोसळल्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिली...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages