काल आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा झाली. मंडळी आता हळुहळु ऑनलाईन सभांना सरावु लागली आहेत त्यामुळे उपस्थितीही चांगली होती. डॉ. अमित करकरे यांना वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. डॉक्टरसाहेब दहा मिनिटे आधी येणार असे शोभनाताईंनी आधीच कळवल्याने मी पंधरा मिनिटे आधी सर्व तांत्रिक तयारी करून तयार राहिलो होतो. वक्ते दहा मिनिटे आधी आले. सदस्य मंडळी येऊ लागली होती. थोडा वेळ हाताशी होता तेव्हा आलेल्या मंडळींशी डॉक्टरसाहेबांनी मंडळाशी असलेले आपले जुने संबंध आणि त्याबद्दलच्या आपल्या आठवणींबद्दल बोलण्यास सुरुवात केली. आपल्याला येथे बोलायला येणे खुप आवडते हे सांगतानाच त्याचे कारणही त्यांनी सांगून टाकले. पार्किन्सन्सच्या शुभार्थींनी, शुभंकरांनी या आजाराच्या बाबतीत दाखवलेला "एक्सेप्टन्स" हा त्यांनी नुसताच महत्त्वाचा वाटला नाही तर अनुकरणीयही वाटला. मंडळात येऊन बोलायला आवडतं याचं आणखी एक कारण म्हणजे येथे असलेली सकारात्मकता हे त्यांना आपल्या बोलण्यात आवर्जून नमुद केलं. डॉक्टरसाहेबांचा हा सुरुवातीला गप्पा मारण्याचा जो टोन होता तो शेवटपर्यंत त्यांनी तसाच ठेवला होता त्यामुळे त्यांचे बोलणे हे शुष्क व्याख्यान न राहता शुभंकर, शुभार्थींच्या मनात शिरून त्यांच्याशी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने केलेल्या हितगुजाप्रमाणे झाले. एव्हाना सर्व मंडळी आली होती. शोभनाताईंनी डॉक्टरांची ओळख करून दिली आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.
डॉक्टरसाहेबांचा विषय "शुभंकराविषयी सर्वकाही" असा होता. अगदी सुरुवातीलाच त्यांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला. आपल्याकडे कुणी गंभीर आजारी असेल तर सर्वजण चौकशीला येतात ते आजारी माणसाच्याच. हे एका दृष्टीने जरी बरोबर असले तरी जो त्या आजारी माणसाची रात्रंदिवस काळजी घेत असतो त्याला जणू सर्वांनी गृहीत धरलेले असते. त्याचे कष्ट, त्याचा त्याग, त्याला होत असणारा त्रास, त्याची स्वतःची दुखणी खुपणी, त्याने काळजीवाहकाची भूमिका घेताना आपल्या आयुष्याबरोबर केलेली तडजोड याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. त्यामुळे जी माणसे आजार्याची काळजी घेत असतात त्यांना आपण बाजुला फेकले गेले आहोत असे वाटण्याची शक्यता असते. त्यातून आजार पार्किन्सन्ससारखा असेल तर त्याला सध्यातरी सोबती म्हणूनच स्विकारावे लागते. अशावेळी आयुष्याच्या दुसर्या टप्प्यात जेव्हा दीर्घकाळ कष्ट करून स्थैर्य मिळवलेले असते आणि आता आयुष्य उपभोगण्याचे दिवस आले असताना, मनाजोगे काहीतरी करावेसे वाटत असताना, स्वतःला वेळ द्यावासा वाटत असताना अचानक हा आजार आपल्या आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा सर्व गणिते चुकल्यासारखी वाटतात. अशावेळी ज्याला आजार आहे त्याचीच नव्हे तर जो आजार्याची काळजी घेत असतो त्या शुभंकराने स्वतःकडेही लक्ष देणे अत्यावश्यक आहे हे डॉक्टरसाहेबांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केले. हे सांगत असतानाच त्यांनी आपला समाज, आपली सांस्कृतिक मूल्ये आपल्याकडे जपली जाणारी नैतिक मूल्ये आणि आपल्यावर केले जाणारे संस्कार यांचाही उहापोह केला.
डॉक्टरसाहेब स्वतः होमियोपथीचे डॉक्टर असल्याने त्यांनी आपल्या रुग्णाची उदाहरणे या संदर्भात दिली. ते म्हणाले आम्ही कुठल्याही आजारांवर औषध देण्याआगोदर रुग्णाच्या स्वभावाविषयी चौकशी करतो. अशावेळी आपल्याकडे अनेकजण आम्हाला राग येतो पण आम्ही तो व्यक्त करीत नाही असे सांगतात. कारण आपल्याकडे मूळात राग येणे हे गैर समजले जाते आणि राग आल्यास तो व्यक्त न करणे हे सहनशीलतेचे आणि संयमाचे लक्षण समजले जाते. यामुळे होते काय की ही सर्व खदखद मनात साठून राहते आणि त्याचा त्या माणसालाच त्रास होऊ लागतो. नेमके हे शुभंकरांच्या बाबतीतही होऊ शकते.आपल्याला अनेकदा ज्या माणसाची आपण काळजी घेत असतो त्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत. काही गोष्टी आवडतही नाहीत. पण अशावेळी आपल्याला वादही घालता येत नाही. आपल्या भावना आतल्या आत दाबून ठेवाव्या लागतात. काहीवेळा आपल्याला मनातल्या मनात आजारीमाणसाची प्रचंड चीडही येते आणि मग आपल्यालाच लाज वाटते की आपल्या मनात आपल्या प्रेमाच्या माणसाबद्दल अशा भावना आल्याच कशा? डॉक्टरसाहेब म्हणाले की हे सारे नैसर्गिक आहे. राग सर्वांना येतो. जेव्हा असे घडते तेव्हा काय करता येईल याबद्दल बोलत असताना त्यांनी पुष्पौषधी, आरईबीटी या दोन उपायांची प्रामुख्याने चर्चा केली. पुष्पौषधींबद्दल डॉक्टरसाहेब प्रत्यक्ष लोकांशी बोलून त्यांना मार्गदर्शन करणार होते. अनेक तर्हेच्या चिंता, नैराश्य, इंपल्सिव वर्तणूक, अशा समस्यांवर पुष्पौषधी उपयुक्त ठरतील असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच कसे वागावे याबाबत त्यांनी घरगुती उदाहरणे देऊन अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या सार्यांमध्ये आजाराचा आणि आजारी व्यक्तीचा सकारात्मक स्विकार हे सूत्र त्यांनी सगळीकडे गुंफले होते.
ते म्हणाले शुभार्थीची काळजी घेताना शुभंकराला स्वतःचा विसर पडता कामा नये. त्याची प्रकृती नीट राहिली तरच शुभार्थीची काळजी नीट घेतली जाईल. याबद्दल सविस्तर सांगताना डॉक्टरसाहेबांनी "सकारात्मक स्वार्थ" या संकल्पनेविषयी उहापोह केला. आपल्यासमाजात अनेकदा आपण रुग्णाची काळजी घेताना स्वतःला विसरूनच जातो. त्यामुळे वेळेवर न जेवणे, अपुरे जेवण करणे, स्वतःच्या मनःस्वास्थ्याची काळजी न घेणे, स्वतःच्या आवडी निवडींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे असे प्रकार शुभंकर करतात आणि त्यांचे स्वतःचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य हळुहळु खालावत जाते. आपल्या समाजात अशा तर्हेचा त्याग हा नैसर्गिक मानला जातो पण त्यामुळे होणारे नुकसान कुणी फारसे पाहत नाही. डॉक्टरसाहेबांनी यावर उपाय सुचवताना एक उदाहरण दिले. समजा आपल्याकडे कुणी केयर टेकर येत असेल तर अशा वेळी शुभार्थीला एक तासभर त्या केयरटेकरच्या स्वाधीन करून तो संपूर्ण तास स्वतःवर खर्च करावा. त्यावेळात आपल्या आवडीचा छंद जोपासावा, आवडीचे वाचन करावे किंवा आपल्याला जे आवडेल ते करावे. यात काहीही गैर नाही करण अशाने एक प्रकारे तुम्ही ताजेतवाने, टवटवीत होता आणि उत्साहाने पुन्हा शुभार्थीची जबाबदारी घेण्यास सज्ज होता. पार्किन्सन्ससारख्या आजाराशी सतत झूंज घेत राहण्यात अर्थ नसतो. त्यापेक्षा त्या आजाराचा स्विकार करून. त्या आजारामुळे येणार्या समस्या लक्षात घेऊन जर त्यांना तोंड देण्यास तयार राहिले तर त्रास कमी होतो असे डॉक्टरसाहेबांनी सांगितले. याचे उदाहरण देताना त्यांनी पार्किन्सन्सच्या आजारात जो भास होण्याचा त्रास अनेकांना होतो त्याचा उल्लेख केला.
डॉक्टरांच्या मित्राच्या वडिलांना हा भास होण्याचा त्रास होतो. त्यांना वाटते आपली खोली म्हणजे हॉस्पिटलचा वॉर्ड आहे, त्यात अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आल्यागेलेल्याशी ते या रुग्णांबद्दल बोलत बसतात. अशावेळी त्यांच्या बोलण्याला विरोध करून हे सारे भास आहेत हे वारंवार पटवून देण्यापेक्षा त्यांच्याशी त्यांच्या बोलण्याचा धागा पकडूनच सुसंवाद साधावा असे डॉक्टरसाहेब म्हणाले. म्हणजे ते मित्राच्या वडिलांसोबत त्यांच्या काल्पनिक रुग्णांबद्दल बोलत आणि संभाषणाची गाडी हळुहळु आपल्याला हव्या विषयाकडे नेत. ऐशी टक्केवेळा ही युक्ती यशस्वी होत असे. "मनापासून केलेला स्विकार" हे डॉक्टरसाहेबांच्या उपायांमधील समान सूत्र होतं. या आजारात भास होणार, पडणे झडणे होणार याचा एकदा स्विकार केला की त्यावर उपाय करणे तुलनेने सोपे जाते. त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक श्रीं शेंडे यांचे उदाहरण दिले. पार्किन्सन्सचा आजार असलेले शेंडेसाहेब अनेकदा पडले, त्यांना जखमाही झाल्या. पण त्यांनी या सार्या गोष्टींचा शांतपणे स्विकार केला होता. त्यामुळे ते कधीही विचलीत झाले नाहीत. दुर्घटना घडली की ते त्यावर उपचार करीत आणि पुन्हा त्यांची गाडी सर्वसामान्यपणे मार्गावर येत असे. हे झाले अशा समस्यांबद्दल ज्यावर उपाय करता येतात. अनेकदा अशा गोष्टी उद्भवतात ज्यावर शुभंकराकडे काही उपायच नसतो. अशावेळी हा आजाराचच एक भाग म्हणून त्या समस्यांचा स्विकार करावा. त्यांचा त्रास करून घेऊ नये.
काहीवेळा असे होते की शुभार्थींना लगेच काही हवे असते, उठायचे असते, फिरायचे असते. त्यांची काहीन काही मागणी असते. सर्वसाधारणपणे पार्किन्सन्सचा आजार उतार वयात होतो. शुभंकराचेही वय झालेले असण्याची शक्यता असते. त्यांनाही त्यांची दुखणी खुपणी असतात. अशावेळी शुभार्थींनी मागितलेले पटकन आटापिटा करून देण्यापेक्षा केयरटेकरची वाट पाहावी असा सल्ला डॉक्टरसाहेबांनी दिला. अशा प्रसंगी काही गोष्टी मागितल्याक्षणी आणणे, नेणे, देणे या आता आपल्या क्षमतेबाहेरच्या आहेत असे शुभार्थीला प्रामाणिकपणे सांगावे. त्याला पर्याय द्यावेत. लगेच काहीतरी हवे असेल आणि देता येत नसेल तर त्याच्याशी काहीवेळ गप्पा माराव्या. त्यावेळी जे सहज शक्य असेल ते करावे पण अशक्य अशी धडपड करून स्वतःचे शारिरीक आणि मानसिक नुकसान करून घेऊ नये. पुढे प्रश्नोत्तरांच्या डॉक्टरांनी हेच सूत्र धरून मार्गदर्शन केले. शुभार्थी आणि आमची नात यांच्यात नेहेमी भांडणे होतात असे एका शुभंकर बाईंनी सांगितले. या समस्येवर ते म्हणाले की त्या दोघांचा पेपर त्यांना सोडवू द्या. तुम्ही त्यात पडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. अनेकदा आपण आपल्या क्षमतेपलिकडल्या गोष्टी आपल्या हातात घेऊन त्यावर उपाय शोधत असतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो. प्रत्येक माणसाचे दुसर्याशी असलेले नाते हे अगदी वेगळे असते. आजारामध्ये नात्यांचे हे वेगळेपण लक्षात घ्यायचे असते आणि त्यानूसार वागायचे असते. प्रत्येक वेळी स्वतः मध्ये पडण्यात अर्थ नसतो. डॉक्टरसाहेब बोलताना देत असलेली उदाहरणे रोजच्या आयुष्यातील सर्वसामान्यांची होती. ते स्वतःचेही अनुभव सांगत होते. ही चर्चा, हे बोलणे संपुच नये असे वाटत होते. दोनवेळा चाळीसपेक्षा जास्त मिनिटे झाल्याने झूम डिस्कनेक्ट झाले तरीही सदस्य मंडळी पुन्हा लगेच हजर झाली. पुढे डॉक्टरसाहेबांनी रोजच्या जगण्यातलीच उदाहरणे देऊन सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांचे समाधान केले. शेवटी मंडळाच्या अध्यक्षा श्री. श्यामलाताई शेंडे यांनी डॉक्टरांचे आभार मानून या चर्चेची सांगता केली आणि हे अतिशय प्रभावी झालेले असे डॉक्टरसाहेबांचे हितगुज संपले. त्यांनी साधलेला संवाद हा मला फार वेगळ्या तर्हेचा वाटला.
अभ्यासानिमित्त अनेक सेमिनार्स आणि व्याख्याने ऐकावी लागली आहेत. अनेक विद्वान माणसांना ऐकले आहे पण भारतीय समाजातील समजूती, संस्कार, समज, गैरसमज, नीतिमूल्ये यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन एखाद्या विकारावर उपाययोजना सुचवणारे डॉक्टरसाहेबांसारखे विद्वान फार क्वचित पाहिले. ते आरईबीटीबद्दल बोलतानादेखिल भारतीय समाजाचा संदर्भ घेऊनच बोलत होते त्यामुळे त्यांचे बोलणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय हे अस्सल या मातीतलेच वाटले. आईबीटीचा वापर उपाय म्हणून करतानाही त्यांनी सर्वसामान्यांना करता येण्याजोग्या युक्त्या सांगितल्या. काहीतरी उगाचच "सेन्सेशनल", "नावीन्यपूर्ण" (आणि करण्यास अवघड)असे सांगण्याचे टाळले. पुढे स्वतःच्या गाण्याच्या आवडीनिवडीबद्दल सांगताना तर ते रंगूनच गेले होते. आपण आपली ही आवड जोपासताना कसा वेळ काढतो हे सांगत शुभंकरांनीही तो वेळ कसा काढायला हवा हा सांधा त्यांनी जोडून दिला. पुढे तर त्यांनी भारतीय अध्यात्माची स्वतःची आवड सांगताना आम्हा सर्वांना आपल्या माजघरातच प्रवेश दिला. भारतीय तत्त्वज्ञानाचा आयुष्यात आलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला कसा उपयोग होतो हे त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितले. कर्मयोगाचा एक पाठच त्यानिमित्ताने आम्हाला मिळाला. त्यांच्या बोलण्यातील मला वाटलेला हा एक आणखी विलोभनीय भाग. एकंदरीतच एका परिपूर्ण व्याख्यानाचा अनुभव काल मिळाला.
अतुल ठाकुर
छान वाटलं वाचून. अगदी योग्य
छान वाटलं वाचून. अगदी योग्य आहे. ऑक्सिजनची कमतरता असेल तर आपला ऑक्सिजन मास्क आधी घातला पाहिजे.
शुभार्थी आणि शुभंकर हे शब्द अशा प्रकारे वापरले जातात (रुग्ण आणि केअरगिव्हर) हे माहिती नव्हते. हे शब्द पार्किन्सन्ससाठीच फक्त वापरतात की कुठल्याही दीर्घ आजाराने आजारी असलेल्या माणसांसाठीही वापरतात?
शब्द पार्किन्सन्ससाठीच फक्त
शब्द पार्किन्सन्ससाठीच फक्त वापरतात की कुठल्याही दीर्घ आजाराने आजारी असलेल्या माणसांसाठीही वापरतात?
धन्यवाद वावे. हे शब्द कुठल्याही आजारासाठी वापरले जातात असं मला वाटतं.
खुपच छान माहिती, बरं वाटलं
खुपच छान माहिती, बरं वाटलं वाचून.
शुभार्थी आणि शुभंकर हे शब्द अशा प्रकारे वापरले जातात (रुग्ण आणि केअरगिव्हर) हे माहिती नव्हते. >>>> मलाही नव्यानेच कळतय.
डॉ आनंद नाडकर्णी यांच्या
डॉ आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानातून आणि लेखनातून शुभंकर किंवा साधारण असाच शब्द अनेकवेळा वापरलेला दिसतो. मनोरुग्ण हा शब्द ते बहुधा वापरीत नाहीत.
डॉ आनंद नाडकर्णी यांच्या
डॉ आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानातून आणि लेखनातून शुभंकर किंवा साधारण असाच शब्द अनेकवेळा वापरलेला दिसतो. मनोरुग्ण हा शब्द ते बहुधा वापरीत नाहीत.
होय आणि मला वाटतं मनोविकार ऐवजी आता त्यांनी मनोविकास हा शब्द वापरायला सुरुवात केली आहे.
बाकी एक आवर्जून सांगावंसं
बाकी एक आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा दीर्घकाल टिकणार्या, अद्याप उपाय न सापडलेल्या आणि कदाचित वाढत जाणार्या आजारांसाठी जे सपोर्ट ग्रूप्स चालतात तेथे सकारात्मक वातावरण असणं आणि ते टिकवून ठेवणं अत्यावश्यक असतं. शुभंकर, शुभार्थी अशा शब्दांमुळे एक प्रकारची उभारी मिळते.
नक्कीच. अनिल अवचटही 'मित्र'
नक्कीच. अनिल अवचटही 'मित्र' असा शब्द वापरतात ना व्यसनग्रस्तांसाठी.
मुक्तांगणमित्र
मुक्तांगणमित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सकारात्मक लेख.
खूप सकारात्मक लेख. लिखाणाबदद्ल खूप धन्यवाद अतुल जी.
छान लेख ...धन्यवाद !!
छान लेख ...धन्यवाद !!
अशा दीर्घकाल टिकणार्या, अद्याप उपाय न सापडलेल्या आणि कदाचित वाढत जाणार्या आजारांसाठी जे सपोर्ट ग्रूप्स चालतात तेथे सकारात्मक वातावरण असणं आणि ते टिकवून ठेवणं अत्यावश्यक असतं. खूप आव्हानात्मक आहे हे.
मी स्वतः शुभंकर आहे हे मला कळले.....वेगळ्या आजाराच्या रुग्नाची !!
धनवन्ती , आभार
धनवन्ती , आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी_अस्मिता , तुम्हाला शुभंकराची भूमिका बजावताना खुप बळ लाभो हीच प्रार्थना!