लहानपणीच्या काही आठवणी

Submitted by सामो on 7 June, 2020 - 10:03

लहानपणीच्या काही आठवणी -

शांता शेळके यांची 'पिंपळ' नावाची कविता वाचता वाचता आठवलेले काही -

त्याच माझिया सखयांमध्ये पिंपळही हा एक
बालमनावर केला ज्याने मधुभावांचा सेक
अवचित त्याची स्मृती जागली आज माझिया चित्ती
हृदयी भरल्या अश्रुसागरा येई अचानक भरती!
- शांता शेळके

जेमतेम ५-६ वर्षांची होते. मॉन्टेसरीत होते. म्हणजे खरं तर ३-४ वर्षांचीच असेन. नक्कीच. घराजवळ अरण्येश्वर मंदीर होते. लहानपणी कोणाचा ना कोणाचा हात धरुन विशेषतः सोमवारी अरण्येश्वरास जाणे होई. लहानपणी कोणीतरी भीती घातलेली होती की त्या देवळात एक भिकारी बसतो ज्याच्या पायात किडे पडलेले आहेत आणि जर खोटे बोलले तर आपल्याही पायात किडे पडतात. त्या भीतीमुळे की काय नकळे,पण अद्यापही खोटे बोलता येत नाही.

देवळापाशीच जुना पुराणा, ऊंच, भारदस्त पिंपळवृक्ष होता. ज्यावरती पोपट, कावळे, साळुंक्यांची सतत लगबग चाले. बाजूलाच आवळा, बोगनवेल, तगर, आंबा, जांभुळ आदि झाडाझुडपांची दाटी असे. या झाडांवरती संध्याकाळच्यासुमारास, चिमण्यांचा अविरत चिवचिवाट चाले. तसा प्रचंड चिवचिवाट नंतर कधी फारसा अनुभवला नाही. पिंपळाचा काळसर, जाड, पुरातन बुंधा, संधीप्रकाशात अधिकच जुनाट व भारदस्त वाटत असे. जणू एखादा पुराणपुरुष असावा तसा. हे अरण्येश्वराचे देऊळ फार आठवते. उत्कटतेने, गूढ रंगात आठवते. संध्याकाळी कोणा मोठ्या व्यक्तीचा हात धरुन निघालेली मी. अत्यंत बालपणी प्रत्येक अनुभव, सुगंध हा नवा असल्याने मेंदूतील पेशी अत्यंत उत्तेजित करणारा, ठसा उमटविणारा असतो. अजुनही ते देऊळ आठवले की वाटते पूर्वजन्मात गेले आहे. अतिशय गूढ वाटते. असेच गूढ मंतरलेले एकदा वाटलेले होते ते कोणाच्यातरी कानातील माणकाची कुडी पहाताना. सूर्यकिरण असे परावर्तित झालेले की कुडीतील माणिक डाळींबी रंगात इतकं सुंदर उजळून निघाले होते. मंत्रमुग्ध करणारा रंग. तसा डाळींबी रंग परत पहाण्यात आला नाही.
वाचताना असे वाटणे सहजशक्य आहे की यात काय एवढे. पण लेखिकेकरता,दोन्ही अनुभव गूढ्-उत्कट्-शिव आहेत, शब्दातीत आहेत!! तुम्हा कोणाला असं होतं का? काही आठवणी कालातीत बनून जातात (transcend time)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सामो, आरण्येश्र्वर मंदिरातील पिंपळा विषयी माझ्याही खूप आठवणी आहेत. लहानपणी आई बाबांबरोबर अनेकदा जाणे होत असे. बाबा मला ठराविक आकडा सांगून तेवढी पाने गोळा करायला सांगायचे आणि त्यातील एखाद दुसरे पान लपवून तू कमी आणलीस परत मोज बरं - असे सांगत. आमचा हा खेळ खेळायला मला खूप आवडायचे. बाबांनी लपवले हे माहीत असूनही मी मला काहीच समजले नाही असे दाखवायचे. अशाच रीतीने मी बेरजा वजाबाकी शिकले.
तुझ्या लेखाने खूप जुनी आठवण जागी झाली Thanks

झळाळणारा डाळिंबी रंग...
हो. होतो असा साक्षात्कार कधी कधी. एखादं आठ दहा महिन्यांचं लहान मूल, हिमटी काढून बसलेलं, खालचा ओठ थोडा पुढे येऊन थरथरतोय,डोळ्यातला थेंब कसोशीने आवरलेला पण आत्ता ओघळेल, कसलं तरी भारी दु:ख आतल्या आत गिळण्याचा , जगापासून लपवण्याचा निर्व्याज प्रयत्न आणि त्या इवल्या डोळ्यांत चमकलेला मानीपणा. अनेक वर्षं राहिलाय हा क्षण लक्षात. असे अनेक. कुणाच्या शुभ्र दंतपंक्तीतून पाझरलेलं आनंदी, आश्वासक स्मित, भोवतालच्या स्तब्धतेचा भंग करीत आणि आपली तंद्री मोडत एखाद्या पक्ष्याने अचानक आपल्यासमोरून आकाशात घेतलेली भरारी, एखादीच्या साडीचा fluorescent पण मावळत्या उन्हात सौम्य चमकणारा निळा रंग ...
आवडले छोटे छोटे अनुभव कण आणि क्षण .

,या लेखावरून सहज एक जुनी आठवण मनात आली. एखाद्याला डोळ्यातील पापणी ( पापणीचा केस) सापडला तर मोठी माणसे गंमत म्हणून "कोपऱ्यात जा व तुला काय हवंय ते देवाकडे माग व पापणी फुंकून टाक" आसे सांगायचे . मला एकदा खरोखच पापणी सापडली. वर सांगितल्या प्रमाणे मी कोपऱ्यात जाऊन फुंकली देखील व मनात देवा कडे वर मागितला. सगळ्यांनी विचारले काय वर मागितला तर मी म्हणालो"रंगीत खडू" जे माझ्या बाईंच्या हातात असायचे लहानपण हे फारच निरागस असतं. मोठा असतो तर मागण्या भलत्याच वेगळ्या असत्या.

वाह!!! काय मस्त प्रतिसाद आहे तुमचा, हीरा. एका पावसाळी दिवशी, बाल्कनीत विसाव्याला आलेल्या, फुलपाखराच्या पंखावरचे निळेभोर आणि चक्क मखमली डोळे असाच साक्षात्कार होता त्या दिवशी.
________________
>>>>>>>मी म्हणालो"रंगीत खडू" जे माझ्या बाईंच्या हातात असायचे लहानपण हे फारच निरागस असतं. मोठा असतो तर मागण्या भलत्याच वेगळ्या असत्या.>>>>> हाहाहा!! किती खरे.
________________
रुपाली धन्यवाद.
________________
पिन्टी, सहकारनगर जवळचे मंदीर?
>>>>अशाच रीतीने मी बेरजा वजाबाकी शिकले.>>> वाह!!

लहानपणींचे छोटे-मोठे प्रसंग मनावर किती अलवार कोरले जातात., तेही आयुष्यभरासाठी..
अशीच एक आठवण!

दर शनिवारी संध्याकाळी देवघरात दिवा लावुन शुभंकरोती म्हटल्यावर, आजी मला सोबत घेऊन मारुतीच्या देवळात यायची.
देऊळ खूप मोठ अस नाही. एक फुटी काळ्या पाषाणातली ती मारुतीची ओबडधोबड मुर्ती. दिवसभरात तेलामिठाने माखलेली. भल्या थोरल्या पिंपळाखाली ते इवलंस केशरी ऑईलपेंटने रंगवलेल मंदीर! भीमरुपी महारुद्रा मारुतीस्त्रोत म्हणत म्हणत आजीच्या सोबत मारुतीला अकरा? फेऱ्या मारायचे. माझा या फेऱ्या मोजताना कायम गोंधळ व्हायचा. (आजही होतोच म्हणा!) पण ह्या फेऱ्या मारता मारताच आजीसोबतच माझ नात कधी घट्ट होत गेल.. हे समजल नाही.
श्रावणातल्या आठवणींही तशाच. आघाडा-दुर्वा गोळा करायला आम्ही आजीनाती मेंढीफार्मात जायचो. तेव्हा हट्टाने गोळा केलेली गोकर्ण आणि गुलबाक्षीची नाजुक फुल. घरी आल्यावर त्याच्या केलेल्या माळा. सार काही अगदी कालच घडल्यासारख स्पष्ट आठवत. आज माझा मुर्तीपुजेवर विश्वास नाही. पण माझ मन अशा आठवणींत जेव्हा रमत. तेव्हा देवाच अस्तित्व मनाला हळुवार स्पर्श करुन जात...

माझं गाव, मी लहान असताना जसं होतं तसंच आजही आहे. जिल्ह्याचं ठिकाण, पण धड कोणत्याही सुविधा नाहीत कि रस्ते नाहीत. तर ते एक वेगळंच प्रकरण. सांगण्याचा मुद्दा असा कि निमशहरी म्हणावं अश्या भागात आम्ही राहायचो. घरापासून ३,४ किमी दूर गेलं कि एक छोटी टेकडी आणि त्या पलीकडे शेतं होती. ती टेकडी म्हणजे निर्मनुष्य, तिथं वाळलेल्या गवंताशिवाय आणि एका जुन्या, वठलेल्या चिंचेच्या झाडाशिवाय फक्त एक विहीर होती. त्या विहिरीपर्यंत जाणारा रस्ता म्हणजे फक्त मऊशार धुळीचा पट्टा.. बैलगाड्या जाऊन कदाचित ती माती तशी झाली असावी. त्या कोरड्या मातीत पाय पोटरी पर्यंत सहज जायचा. का कुणास ठाऊक पण त्या परिसराची मला भूरळ पडली होती. एक काळ असा होता कि मी तिथे रोज जायचो. साधारण ३ आठवडे तरी. तो धुळीचा रस्ता तुडवून चिंचेला मागे टाकलं कि ती विहीर होती. जवळपास १५ फूट व्यासाची संपूर्ण दगडी बांधकाम, रेखीव कठडा असलेली आत डोकावलं तर फक्त अंधार, आणि त्या अंधारात चकाकणारा पाण्यावर पडलेला उजेडाचा थोडासा कवडसा. विहिरीत डोकावून बघायचा चाळा लागला होता मला. सलग १० -१५ मिनिट मी त्या विहिरीच्या कठड्यावरून वाकून बघत राहायचो. एकटाच. विचित्रच होतं ते.. तिथे अनामिक भीतीही होती आणि ओढही. मला बालपण म्हटल्यावर अनेक गोष्टी संदर्भ असतील तर आठवतात, पण ती विहीर, रस्ता, ते झाड कोणत्याही संदर्भाशिवाय आठवतं. तर असो.

आमच्या लहानपणी चित्ररूपी मासिके प्रकाशित होत असत व ती आम्ही मनापासून आवडीने वाचत असू . या मासिकातील जे कथा नायक असायचे, त्यांच्या जिवाभावाचा मित्र म्हणजे एक कुत्रा असायचा आणि हा कुत्रा ह्या नायकांना नेहमीच संकट काळी मदतीला धावून येत असे . या सारखा एखादा इमानदार वाघ्या , आपला देखील जिवाभावाचा मित्र असावा व तो आपल्या देखील संकट काळी मदतीला धावून यावा ,असे मला फार वाटायचे . मात्र कुत्रा पाळण्यास आमच्या घरातील मोठ्या माणसांचा फारच विरोध असे ." त्याची उसाभर कोण करणार व त्याने केलेली घाण कोण काढणार ? " या सारखे प्रश्र्न उपस्थित करून , आम्हा मुलांना गप्प बसवले जायचे. पण कुणाच्या घरी लहान कुत्र्याचे पिल्लू मिळाले कि आम्ही मुले घरातल्यांच्या नकळत, त्याला गुपचूप घेऊन येत असूं .सर्व मित्र मिळून घराच्या बाहेर त्याच्या साठी खास छोटेसे विटांचे घर बांधत असू . त्याला थंडी वाजू नये म्हणून बारदानाचे उबदार अंथरूण तयार केले जाई. त्याच्या समोर पाण्या साठी एक व दुधासाठी वेगळी प्लेट ठेवली जात असे . त्याचे बारसे देखील केले जायचे .त्याच्या नावाने हाक मारली, की मोठ्या आंनदाने तो आमच्या मागून दुड दुड पळत येत असे व आपली स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे, याचा आंनद ही वाटे . अशा कुत्र्यांचा आम्हाला फारच लळा लागायचा . घरातल्याची नजर चुकवून ,घरातील दूध ,बिस्किटे,चपाती हळूच आणून त्या कुत्र्याला घालण्याचा आमचा नित्य उपक्रम चालूच असायचा .मात्र आमचे हे कारनामे फार काळ लपून राहत नसत .कधी कधी रात्री, हा मूर्ख कुत्रा ओरडून इतका दंगा घालत असे कि आमचे हे "गुपचुप कारनामे" बाहेर येत असत. दुसऱ्याच दिवशी कुणाला तरी बोलवून ह्या कुत्र्याला बाहेर सोडण्याचे फर्मान निघालेले असायचे . सकाळी तो माणूस या कुत्र्याला जबरदस्तीने पकडून बास्केट मध्ये घालताना ते पिल्लू जीवाचा इतका आकांत करायचे कि शेवटी जड अंतःकरणांनी " जा मित्रा जा ! तुझ्या कडून आम्ही मैत्रीची अपेक्षा केली ,मात्र आमच्या मैत्रीचा शब्द आम्ही पाळू शकलो नाही. आम्ही आज तुला आमच्या मैत्रीच्या बंधनातून मुक्त केले आहे" असा त्याला निरोप ध्यावा लागे, अशी कुत्री पाळण्याचे अनेक प्रसंग माझ्या जीवनात येऊन गेले .

मन्या, पाटील, वाशीकर - खूप छान आठवणी. शेअर केल्याब्बद्दल, धन्यवाद.
सेक चा अर्थ माहीतच नव्हता हीरा. पखरण माहीती आहे.

छान लेख... प्रतिसादही खूप छान!
लहानपणी आपला मेंदू काही उत्कट आठवणी जतन करतो म्हणजे नंतरच्या आयुष्यात आपण एकटे , उदास किंवा खिन्न असू त्या access करता येतील आणि मळभ दूर होऊन प्रसन्नता व शांतता लाभेल..आणि sense of belonging साठी सुद्धा उपयोग होईल. पण काय उत्कट आहे आणि काय जतनयोग्य आहे हे आपले मन व इंद्रिये ठरवत असतील. म्हणून मगं गंध, रंग , निरनिराळ्या चवी , भीती, अत्यानंद काही तरी मिळून मिसळून केलेल्या गमतीजमती , तीव्र दु:ख , वियोग अशाशी संबंधित आठवणी असतात !! माझ्या गंधाच्या खूप आठवणी आहेत.

छान लेख आणि सर्वांचे प्रतिसाद पण मस्त..
ऐकीव गोष्टींवर सहज विश्वास ठेवावा असं ते वय असतं ना!

जमिनीत,काडेपेटित पैसा(किडा) ठेवला की दुसऱ्या दिवशी रुपयाचं नाणं होतं..

फुलपाखरू, नाकतोडा वगैरेंच्या पायांना दोरीला चिट्ठी बांधून सोडली की देवापर्यंत पोहोचते..

वाटीतून पाणी प्यायलं की आईच्या पोटात दुखतं..

काय एकेक समजुती..!

लेख वाचल्यावर लहाणपणीच्या इतक्या आठवणींची गर्दी झाली की कोणती लिहावी तेच कळेना! काही खूप जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या.