नफरत की दुनिया को छोडकर

Submitted by तुषार विष्णू खांबल on 4 June, 2020 - 04:17

नफरत की दुनिया को छोडकर
शब्दरचना : तुषार खांबल

रात्रीचे दोन वाजले होते. डॉक्टर भालू अस्वले यांना कोणीतरी दरवाजा ठोठावत असल्याचा आवाज आला. त्यांनी लाईट लावून दरवाजा उघडला. बाहेर पाहतात तर रक्तबंबाळ अवस्थेत पिंकी हत्तीण उभी होती. सोंडेकडील काही भाग हा फाटलेला दिसत होता. संपूर्ण रक्त तिच्या पायांवर पसरले होते. डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. नजरेत वेदना दिसत होत्या. तिला अश्या अवस्थेत पाहून डॉक्टर गोंधळून गेले. त्यांनी तिला आत येण्यास सांगितले आणि त्यांनी आपली प्रथमोपचार पेटी बाहेर काढली. पिंकी आत आली. डॉक्टरांनी तिला घडलेल्या घटनेबद्दल विचारले. त्याबरोबर तिला रडू अनावर झाले. ती घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगू लागली.

"डॉक्टर, या कोरोनामुळे भारत सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यापासून खूप त्रास सहन करावा लागत आहे. घरातील सर्व अन्नधान्य संपले होते. दोन दिवस काहीही खाल्ले नव्हते. काही खायला मिळेल म्हणून घराबाहेर पडले. सर्व दुकाने बंद होती. पुढे जात जात शहरी भागात पोहचले. तिकडे काही मुले फळे खात होती. काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्यांच्याकडे वळले. एक प्राणिदया दया म्हणून त्यांनी मला एक फळ खायला दिले खरे... पण त्यात त्यांचा काही वाईट उद्देश असेल असेच मुळीच वाटले नव्हते.... त्यांदी दिलेल्या फळाचा स्वीकार करून त्यांना आशीर्वाद देऊन मी परत जंगलाकडे येण्यास वळले. काही अंतर चालून आल्यानंतर तोंडात एक भारांकार स्फोट झाला आणि हि अवस्था झाली. त्यांनी दिलेल्या फळात स्फोटके भरली होती डॉक्टर."

डॉक्टरांनी तिला धीर देत प्रथोमपचार करण्यास सुरुवात केली. सोंडेजवळची जखम खोल असल्याने तिला खूप त्रास होत होता. नीट बोलताही येत नव्हते. डॉक्टरांनी जखम साफ केली. तिला काहीसे हायसे वाटले. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती. डॉक्टरांनी थांबून तिला पुन्हा काही त्रास होत आहे का विचारले. त्यावर ती गर्भवती असल्याचे तिने सांगितले जे ऐकून डॉक्टरांचे मन सुन्न झाले. डॉक्टरांनी तिची तपासणी करण्यास सुरवात केली. फटाक्यांचे विष संपूर्ण शरीरात भिनत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून दिली. पुढील उपचारासाठी तिला बाजूच्या जंगलातील मोठ्या इस्पितळात जावे लागणार होते.

सर्व प्रकार समजताच ती ताडकन उठली आणि तशीच धावत पुढच्या प्रवासाला निघाली. ती सुखरूप रहावी म्हणून डॉक्टरांनी देवाकडे प्रार्थना केली. जंगलातील नदी पार केली की मोठे जंगल लागत असे. तिकडच्या इस्पितळात सर्व सुविधा होत्या. लवकरात लवकर पोचावे म्हणून ती झपाझप पावले उचलत होती. काही वेळातच ती नदीजवळ पोहचली.

काही दिवसांनी येणाऱ्या “निसर्ग” वादळामुळे तेथील वातावरणात काहीसा बदल झाला होता. नदीचे पाणी वेगाने वाहत होते. पोटात अन्न नाही आणि त्यातून झालेला रक्तस्त्राव, शरीरात भिनत असलेले विष यामुळे पिंकी संपूर्णतः थकून गेली होती. पुढे जाण्याचे त्राण तिच्या अंगात आता उरले न्हवते. परंतु पोटात असलेल्या बाळासाठी तिला हे धाडस करावेच लागणार होते.

तिने मागचा पुढचा विचार न करता स्वतःला नदीच्या पात्रात झोकून दिले. हळू हळू पाय मारत ती पुढे सरकू लागली. काही वेळाने तिचा वेग मंदावला. शरीर साथ देत नव्हते. ती मनोमन देवाकडे प्रार्थना करीत होती. एके ठिकाणी तिचा पाय रुतला. तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. मृत्यू समोर दिसत होता. जोरजोराने चित्कारत ती तिच्या दुर्दैवी नशिबाला दोष देत होती.

अखेर तिचा श्वास मंदावत चालला होता. तिने भावनाविवश होऊन पोटातल्या बाळाची माफी मागितली. नजरेसमोर यमाच्या स्वरूपात त्या निष्ठुर माणसांचे चेहरे तिला दिसत होते. त्यांना श्राप देत तिने तिचे डोळे मिटले. कायमचे........

नदीच्या पात्रात एक हत्तीण मृतावस्थेत असल्याची बातमी एव्हाना वनविभागाला समजली होती. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने पिंकीचे शव बाहेर काढण्यात आले आणि एका ट्रक मध्ये भरून ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

ट्रक ड्रायव्हरने ट्रक सुरु केला. रस्ता लांबचा होता म्हणून त्याने गाणी ऐकण्यासाठी रेडिओ सुरु केला. FM वर गाण्याच्या फर्माईश सुरु होत्या. सूत्रसंचालकाने सुरुवात केली "इस गीत की फर्माईश की है केरलासे ABC , XYZ , और EFG इन्होने. आईए सुनीते है ये एक दर्दभरा नगमा...." गाणे वाजू लागले

"नफरत की दुनिया को छोड कर
प्यार की दुनिया मे
खुश रेहाना मेरे यार"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults