ती…

Submitted by Swati Karve on 3 June, 2020 - 22:43

ती…

ती भेटली ना कि ...कि… शब्दात सांगूच शकत नाही नक्की काय वाटते …
स्वतःला स्वतःच्या असण्यची एक वेगळीच जाणीव होते…

अवचितच कधी तरी भेटते, पण अगदी सुखावून टाकते ..
मन, चित्त उत्साहाने भरून टाकते ...
आहे ती माझ्यासाठी नेहमीच, यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो, आणि एकटेपणाची बोच जराशी का होईना कमी होते…

ती असली कि मन आत्मविश्वासाने ओसंडून वाहायला लागता…
आयुष्याचा हात अगदी घट्ट धरून, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, साजरा करावा असं वाटतं…
ती कधी मनाच्या तळाशी साचलेला गाळ स्वच्छ करते…
कधी ओठांवर अगदी निरागस, स्वच्छ, निखळ हसू आणते...
कधी दवाहुनहि तरल अस्फुट भावनांना वाट करून देते…
तर कधी तिच्यापाशी मनावरच्या नव्या जुन्या जखमांच्या वेदना, मन्सोक्त रडून, प्रांजळपणे व्यक्त करून रिते हि होता येते…

तीच माणस, आपली आणि परकीही …
फक्त तिच्या येण्याने, त्याच माणसांकडे पाहण्याची दृष्टी बदलते..
तिच्या मुळे जाणिवेच्या कक्षा रुंदावतात आणि अनेक गोष्टींचे,खोलवरचे अर्थ हाती लागतात…

ती म्हणजे माझ्यातली मी ...आश्चर्य वाटलं ?
हो, माझ्यात मी नेहमी असतेच असे नाही …
मी कधी आई असते, कधी बायको असते,
कधी मुलगी, कधी गृहिणी असते, कधी अजून कोणी…
पडेल ते काम आणि त्या क्षणी आवश्यक असलेली भूमिका मी जगत असते…
माझ्यातल्या मला विसरून, दुधात साखर विरघळावी तशी त्या त्या भूमिकेशी अगदी एकरूप झालेली असते…
आणि माझ्यातली मी मात्र, लांब उभाराहून त्रयस्थापणे, एखाद्या चोखंदळ प्रेक्षकासारखी माझ्या साऱ्या भूमिका पाहत असते…

या साऱ्या भूमिका निभावताना मी नाखूष असते असे नाही....
पण कधी कधी स्वतःलाच स्वतःची खूप ओढ लागते,
मन कशातही रमत नाही ,
माझ्या साऱ्या भूमिका हे एक प्रकारचे मुखवटेच आहेत, हे प्रकर्षाने जाणवते आणि स्वतःचा शोध घेण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही …

माझं अस्तित्व, माझं स्वत्व, माझ्यातली मी प्रत्येकवेळी नव्याने सापडणं आणि माझ्यातल्या "मी" ची प्रत्येकवेळी नव्याने जाणीव होणं या सारखा दुसरा आनंद नाही.

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
लिखाणातील चूका नाक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन.