©संततधार! - भाग ४

Submitted by अज्ञातवासी on 3 June, 2020 - 11:28

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग -३ https://www.maayboli.com/node/74894

पुढचा मोठा भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी ६ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

"उशीर झाला आज. नवऱ्याला कळलं की काय ?"
बोळक्या तोंडाने तो हसला.
ती काहीही न बोलता हळूहळू पसारा आवरू लागली.
"ऐक ना, तू थोडा टाईम बदल ना यायचा. यावेळी फार फिलिंग येत असतात ग तुझ्याविषयी. मग कन्ट्रोल होत नाही."
"गोळ्या घेतल्या?"
"बंद केल्यात. लवकर मरायला हवं, तुझी सुटका होईल मग."
"मला तू बरा व्हायला हवा आहेस."
"या टप्प्यावर कुणीही जगू शकणार नाही. जगण्यासाठी कारण तर हवं? तू राहिली असतीस तर कारण मिळालं असतं..."
तो भावविवश झाला. पण दुसऱ्याच क्षणी त्याची जागा तिरस्काराने घेतली.
"तुला भोगणं हीच माझी शेवटची इच्छा आहे पर्वणी, आणि तू ती पूर्ण करशीलच. नाही केलीस तर मी बळजबरीने ती पूर्ण करून घेईन. मी श्वापद आहे. मला आता भावना उरलेल्या नाहीत. आहे ती फक्त भूक, तुला भोगण्याची."
त्याचे डोळे लालेलाल झाले होते. संतापाने त्याची छाती वरखाली होत होती, जोरात श्वासोच्छ्वास होत होता.
पर्वणी जागच्या जागीच थिजली. त्याचं हे रूप तिला नविन नव्हतं, पण आज हे रूप वेगळंच होतं.
"सगळं नीट आवरून ठेवलंय. जेवण करून घे, डबा आल्यावर. अन्न लाथाडू नये."
"तुझे उपकार नकोत मला. मला फक्त तू हवी आहेस. पुन्हा इकडे आली नाहीस तरी चालेल. कारण मी देवाकडे एकच प्रार्थना करतोय, एक दिवस तरी तुझ्यावर बळजबरी करण्याइतकी ताकद मला दे."
पर्वणीने पर्स उचलली.
"मी उद्या पुन्हा येईन. काळजी घे." ती दाराकडे जात म्हणाली.
"नक्की ये. आणि आजसारखीच फॉर्मल लुकमध्ये ये. हॉट दिसतेस."
ती दरवाजा उघडून बाहेर निघून गेली.
आज गल्लीतल्या वखवखत्या नजऱ्या अजून जिभल्या चाटत होत्या. कितीतरी नजरेचे बाण आरपार जात होते.
तिला या गोष्टींची सवय झाली होती, पण ती सरावली नव्हती.
तेवढ्यात एक माणूस तिला खेटून पुढे गेला.
"सॉरी मॅडम," मात्र हे म्हणताना त्याने तिला आपादमस्तक न्याहाळले, हे तिच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.
ती पटापट गाडीजवळ आली. तिला बघून शांतारामलाही हायसं वाटलं.
गाडी भरधाव वेगाने बंगल्याजवळ आली. गाडीचा आवाज ऐकूनच अनुराधा दाराजवळ आली. तिने दार उघडले.
"अनुराधा, मनूने जेवण केलं ना." तिने तिला दारातूनच प्रश्न केला.
"नाही. ते घरी आले होते, मला सांगितलं आज रात्रीही मी बाहेरच जेवेन आणि कपडे बदलून सरळ निघाले."
पर्वणीला हा एक धक्काच होता.
आपलं नातं संपलं??
ती सुन्न होऊन घरात आली. डोक्यात विचारांचं थैमान माजलं.
दोन आठवड्यापूर्वी हेमल तिच्या गाडीसमोर आला, आणि सगळंच बदललं....
तिने मनूला फोन लावला.
"मनू, अरे आहे कुठे. दुपारी जेवणही केलं नाहीस.."
"डोन्ट वरी. अण्णांकडे आलोय. कधीचं त्यांना भेटलो नव्हतो, आज म्हटलं जाऊन यावं. चल नंतर बोलू?"
तिच्या जीवात जीव आला.
"प्लिज, लवकर घरी ये जमलं तर!" ती म्हणाली.
"प्रयत्न करतो." आणि त्याने फोन कट केला.
मुसळधार पावसात उभं राहावं, आणि तो पाऊस थांबूच नये, सगळीकडून तडाखे बसावेत, अशी तिची अवस्था झाली होती...
...आणि ही संततधार थांबण्याची चिन्हे नव्हती.
★★★★★
"तिची तब्येत बरी नाहीये का?"
मिटिंग संपली होती. मनू कॉफी मशीनजवळ असताना स्नेहलचा मागून आवाज आला.
"मला विचारावं लागेल तिला." मनू म्हणाला, आणि त्याने मगमध्ये कॉफी भरायला सुरुवात केली.
"आज मिटिंगमध्येही तिचं लक्ष नव्हतं."
"मलाही जाणवलं ते. बट आफ्टर ऑल. शी इज MD आणि आपण सगळे एम्प्लॉयी. सो जास्त विचारू शकत नाही." मनू हसला आणि त्याने स्नेहलच्या पुढ्यात मग धरला.
"नो थँक्स." मला कडक ब्लॅक कॉफी लागते.
मनूचा हात अजूनही पुढेच होता.
तिने मग हातात घेतला. मगमध्ये ब्लॅक कॉफी बघून ती सुखावली.
"अनुभव स्नेहल, अनुभव. एन्जॉय द कॉफी. आणि प्रमोशनच्या शुभेच्छा."
"नो थँक्स. हे मला कधीच मिळायला हवं होतं."
"उफफ! एन्जॉय करायला शिक स्नेहल. चलो बाय. सी या."
"हाफ डे?"
"येप्प."
"एन्जॉय द लिव."
मनू हसला, व बाहेर निघाला.
त्याने पार्किंगमधून गाडी काढली, व रस्त्यावर घेतली. अजूनही रस्त्यावर वर्दळ होतीच.
गाडी चालवता चालवताच त्याने स्पीकर सिस्टमला कनेक्ट केला, व कॉल लावला.
"कोण?" तिकडून आवाज आला.
"अण्णा, जेवण झालं का?"
"मनू मी तुला ओळखत नाही."
"सिंगकडे बिर्याणी खायला येणार का?" मनू हसत म्हणाला.
"थांबा." तिकडून आवाज आला. "लक्ष्मी, आज तुझी गिलक्याची भाजी कॅन्सल. मी बाहेर जेवायला निघालोय, किती वेळात पोहोचतोस?"
"मी बिल्डिंगच्या खाली १५ मिनिटात असेन."
"मी १० मिनिटात असेन. पाच मिनिटं लेट आला म्हणून तुला शिव्या तरी घालायला मिळतील."
"बरं." मनू हसला, आणि त्याने फोन ठेवला.
१५ मिनिटात अण्णांना घेऊन मनू सिंगकडे निघाला.
"महिना झाला, फोन नाही मेसेज नाही. आणि आज अचानक उगवलास."
"वेळ नव्हता अण्णा."
"हँ, मग आम्ही रिकामटेकडे. तू ना मनू, तुझं खरंच काही खरं नाही."
"अण्णा काहीतरी नवीन सांगा."
"नवीन. काही नाही..."
"ओके..."
सिंगच्या छोट्याशा हॉटेलाजवळ गाडी थांबली. बाहेर फक्त पार्सल घेणाऱ्यांची गर्दी होती. किंबहुना सिंगने हा फक्त पार्सल पॉईंटच ठेवला होता.
सिंग गल्ल्यावर पैसे मोजत होता. मनूची गाडी बघताच त्याला आनंद झाला. पण तो मुद्दाम बाहेर येत म्हणाला.
"इथे गाडी लावायची नाही. दिसत नाही दुकान आहे?"
"दुकान नाही दिसत, हॉटेल दिसतेय." मनू उतरत म्हणाला.
"अण्णा, कितीवेळा सांगू, हा अन्ग्रेज सोबत आणत नको जाऊ."
"आज या अन्ग्रेजनेच मला इथे आणलंय." अण्णा गाडीतून उतरत म्हणाले.
तिघेही आत गेले.
आत एकच जुनाट लाकडी टेबल होतं व त्यावर पॉलिथिन अंथरलेलं होतं. आजूबाजूला दोन तीन तांदळाची पोती, काही मसाल्याचे डबे व भाजीपाला पडलेला होता. कोपऱ्यात चार पाच प्लास्टिक खुर्च्या होत्या.
मनूने तीन खुर्च्या घेतल्या व टेबलभोवती मांडल्या.
"बिर्याणी खतम!" सिंग आत येत म्हणाला.
"दोन चिकन टिक्का बिर्याणी, आणि रायता थोडा जास्त. थोडासा रस्सा आणला तरी चालेल."
"बस बिर्याणी मिळेल. रायता आणि रस्सा नाही."
"चालवून घेऊ."
"आणि टिक्काही नाही, राईस मिळेल."
"चालवून घेऊ." मनू त्याच सुरात म्हणाला.
दहा मिनिटात बिर्याणी, दोन मोठ्या प्लेट, एका मोठ्या वाटीत रायता आणि तश्याच वाटीत रस्सा मनूसमोर आला.
"सिंगसाब, तुम्ही केव्हा जेवणार."
"आमचा टाईम तीन वाजेचा."
"बरं. बसा तर खरं आमच्या सोबत." अण्णा म्हणाले.
"अण्णा, कशी वाटली बिर्याणी?"
"चांगली आहे. जावित्रीचा थोडा जास्त फ्लेवर आहे. त्यामुळे चव जातेय." मनू म्हणाला.
"अण्णा बघ हे, म्हणूनच मी हा अन्ग्रेज बरोबर आणायला सांगत नाही."
"सिंगसाब, जेव्हा मी मरेल ना, तेव्हा माझ्याकडे लोक आदराने बघतील. सिंगसाहेबांच्या जगात बेस्ट बिर्याणीमध्ये हा खुसपट काढायचा." मनू एक घास घेत म्हणाला.
सिंग हसला. "बघ अण्णा, प्रॉपर बिजनेसमॅन. तुम्ही जेवा, मी थोडा गल्ला बघून येतो."
"अण्णा, रस्सा घ्या ना थोडा."
"मी बिर्याणीला अपवित्र करणार नाही."
"बरं नका घेऊ."
"पण आज तुला माझी आठवण कशी आली."
"सहज, अगदी सहज. म्हटलं विचारावं, घरी काय चाललंय?"
"मला काय होणार आहे? पन्नाशीला पोहोचलोय मी."
"शेहेचाळीस."
"हो, मग जे चालायचं ते चालणारच."
"ठीक आहे."
"तुझं कसं चाललय."
"ठीक."
"ठीक? हे मलातरी सांगू नकोस."
"प्रगती आहे."
"एका छोट्याश्या फ्लॅटमधून पुण्यात बंगला बांधलास, ही ऑडी घेतलीस, वरून म्हणतो प्रगती आहे. राजा ही बुलेट ट्रेन आहे रे प्रगतीची."
"अण्णा बंगला आला, गाडी आली, पण त्यात एकाकी राहण्याची वेळ नको यायला." मनू अनपेक्षितपणे म्हणाला.
"म्हणजे????" अण्णा चपापले.
"मी पर्वणीसोबत फारकत घ्यायचा विचार करतोय अण्णा. म्हणून आज तुम्हाला भेटायला आलोय."
अण्णांच्या हातातला घास खालीच गळून पडला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा, वातावरण निर्मीतीत गुढ वाढत चाललंय. लगे रहो!!!
शेवट ही तेवढा सशक्त होईल याची काळजी घेशीलच. शुभेच्छा आणि पुभाप्र

@रुपाली - धन्यवाद!
@मन्या - धन्यवाद!
@आसा - धन्यवाद!
@अजय - धन्यवाद!
@उनाडटप्पू - धन्यवाद!
@स्नेहा - धन्यवाद!
@च्रप्स -धन्यवाद!
@नौटंकी - धन्यवाद! अजूनही झालेली नाहीये. Happy
@पाफा - धन्यवाद!
@सुनिधी - तुम्ही नक्की प्रश्न मांडू शकता, या कथेच्या प्लॉटमध्ये काहीही बदल होणार नाही. धन्यवाद!
@उर्मिला - धन्यवाद!
@Cuty - धन्यवाद!

@nisha - मी तुमचा राग समजू शकतो, पण अजूनही स्नेहल आणि मनूमध्ये काय नातं आहे, हे समोर आलेलच नाही. हे फक्त पर्वणीचे विचार आहेत.
मात्र यानंतर स्नेहल आणि मनूमध्ये काही नातं निर्माण होणारच नाही, नसेलच किंवा होईलच याची शक्यता मी नाकारत नाही. Lol
कथा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत अनेक शक्यता असतात. पण शेवट जो होईल, तोच खरा... Lol
इतक्या जेन्यून प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!!!! Happy

निशा - तुम्हाला पर्वणी चा राग नाही आला? आपल्या प्रियकराकडे दोन तास जातेय रोज त्याच्या रूम वर.
इतके सोडून तुम्हाला मनू चा राग . इतका बायस्ड प्रतिसाद?