उत्सव करावा वेदनांचा

Submitted by निशिकांत on 2 June, 2020 - 11:32

साजरा उत्सव करावा वेदनांचा
मार्ग चालावा खुशीने कंटकांचा

दूर जाणे आपुल्यांचे पचवले मी
कीस पाडावा उगा का कारणांचा?

दु:ख वठल्याचे कधी झाडास नव्हते
खिन्न गेल्याने थवा तो पाखरांचा

स्वप्न जो बघतो तयाला ध्येय दिसते
का करावा रोज पिच्छा मृगजळांचा?

चांगले क्षण कोंदले ह्रदयात माझ्या
वाचतो केंव्हा न पाढा वंचनांचा

भेदरावे का तिने गर्दीत दिवसा?
त्रास आहे माणसातिल श्वापदांचा

जो बळी तो कान पिळतो, न्याय इथला
रान पेटेना, जमाना भेकडांचा

देह केला दान मी का? काय सांगू?
खर्च कोणा परवडेना लाकडांचा

गुंतणे "निशिकांत"ला जमले न केंव्हा
प्रेमही व्यवहार येथे बेरजांचा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे.
>>>>दु:ख वठल्याचे कधी झाडास नव्हते
खिन्न गेल्याने थवा तो पाखरांचा>>>> खूप वाईट वाटले या ओळी वाचून.