( एक प्रयोग म्हणून इंग्रजी कवाफी वापरून लिहिलेली गझल. )
कशी लिहावी शुध्द मराठी जाणत नाही ही जनरेशन
व्याकरणाचे फक्त पुस्तकी होते केंव्हा केंव्हा मेन्शन
शुभंकरोती कुठे हरवले? हंप्टी डंप्टी रोज म्हणावे
भगवद् गीता, संध्या करणे बुरसटलेले जुने क्रिएशन
गल्लीमधला वाणी आता जुना वाटतो माल घ्यावया
वॉलमार्ट अन् बड्या मॉलशी जुळले आहे मस्त कनेक्शन
नाती बोटावर मोजावी इतकी ठाउक पाश्चात्यांना
बाकी सारे इन-लॉ इन-लॉ ओलाव्याविन कसे रिलेशन?
राजा राणी कुटुंब छोटे मजेत राही परदेशी पण
इन-लॉ येता भेटायाला डॉटर-इन-लॉ घेई टेन्शन
पोट भराया अन्न मिळेना चार घास खाण्यास परंतू
अमाप साठा, करावयाला कडधन्न्याचे फरमंटेशन
नाक घासतो, मुजरा करतो नकोच मर्जी खफा बॉसची
प्रमोशन हवे हाव एवढी टेन्शनला मिळते ना पेन्शन
उजाड खेडी, बकाल शहरे, माणुसकीची सदा वानवा
देश उद्याचा असेल कैसा अवघड करणे इमॅजिनेशन
"निशिकांता" जर जगायचे तर डोळेझाक करावी अथवा
बाय करूनी जगास, स्वर्गी शोध तुझ्यासाठी लोकेशन
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३