आला वसंत

Submitted by kiranshrikant on 22 May, 2020 - 04:56

आला वसंत

आला वसंत©️

आपल्याकडेया सहा ऋतुंच्या भल्या मोठ्ठ्या कुटूंबामधे दादागीरी करणारे खरेतर तिघेच. ऊन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा, म्हणजेच ग्रीष्म, शिशीर आणि वर्षा. बिच्चारे शरद, हेमंत आणि वसंत ऋतू!!कायमच धाकल्यांची भुमीका जगतात.पण तसे ते बिच्चारे पण नाहीत .अगदी थेट या दादामंडळींच्या वेढ्यात घुसून आपला खास झेंडा ते फडकवतातच.अर्थातच शरद हेमंतचा आणि वसंत ऋतुंचे डेरे जरा लहानखुरेच. म्हणजे समजा उन्हाळा, पावसाळा , हिवाळा हे तीनही ऋतू जर ऋतुदरबारातील खास लाखांचे मानकरी असतील तर आपल्याकडे आणि खाली दक्षीणेकडे शरद, हेमंत आणि वसंत म्हणजे पाचहजारीचे मानकरी.जसजसे उत्तरेकडे आपण जातो तसे हे तिनही पाच हजारांचे मानकरी मात्र लाखाचेच मानकरी ठरतात.सर्वच ऋतू अधिकाधीकच सम्रुद्ध आणि ठसठशीत होतात.

बलदंड हिवाळा आणि संतप्त उन्हाळ्याच्या चिमटीत हा वसंत ऋतू सापडलेला. पण तरीही वसंत येतो. सुगंधी फुलांनी,कोवळ्या लालपोपटी पानांनी सजवलेला आपला डेरा उभारतो, याच्या अंगावर तोच तो रंगिबेरंगी पानाफुलांनी लदबदलेला सुखी डगला कायमचाच अडकवलेला. स्वारी येते तीच मुळी कोकीळेच्या आवाजात तार- स्वरांत शीट्ट्या वाजवत.या सहाऋतू सोहळ्यात जर कुटुंबप्रमुख उन्हाळा आहे आणि कुटूंबस्वामीनी वर्षा ऋतू आहे असे समजले तर यांचा धाकला,लाडोबा, छाकटा, गुलछबू पुत्र म्हणजे वसंत ऋतू. तरीही ऋतूराज म्हणून गौरवलेला.
तो असा रसिक आहे म्हणूनच तो बिनदिक्कत पांगा-याची लालेलाल फुले मुगूटात खोचतो.सोनचाफा,जुई, मधुमालतीचे भरघोस गजरे मनगटावर बांधतो.एवढे करुन स्वारीला धीर कुठे आहे थांबायला? समस्त प्रेमी जगताला आपल्या जादुई मदन बाणांनी घायाळ करायचे कामही करायला हा तय्यार.
वसंताची स्वारी येते त्याआधी शिशीराने धुमाकुळ घातला असतो, गुलबट रंगात सजली धजलेली हवीहवीशी वाटणारी ही गुलाबी थंडी कधी राखाडी करडी होते आणि आपले थंडगार, खरबरीत हात चराचरावरुन फिरवू लागते हे मुळी कळतच नाही. सर्वत्र नुसते झाडांचे खराटे!पेटवलेली शेकोटीही आता ऊब देईनाशी होते. गरमागरम सूपही बेचव लागायला लागते. जागोजागी प़डलेल्या वाळलेल्या पानांचा ढिग काढताकाढता कंबरडे मेडू लागते आणि मग कुठूनशी जादूई फुंकर कुणीतरी घालतो. कोणीतरी लाल पोपटी मूठ झाडांवर मारते .मग वयोवृद्ध पिंपळही सुस्कारासोडतो मनात तो नक्कीच म्हणत असेल चला संपली एकदाची थंडी. मग पिंपळ मरगळ झटकतो त्याची फांदी नी फांदी सलज्ज तांबूस पोपटी पालवीने फुलून येते.आजूबाजूंच्या झाडांवरही हाच हासरा नजारा. कधी कधी मला असे वाटते की एखादी फांदी हळूच दुस-या झाडांच्या पालवीकडे बघून म्हणत असावी “त्याची पाने माझ्या पानांपेक्षा अधिक राजवर्खी कां बर”??खरतर झाडांना अंगोपांगी फुलवण्याचे काम वर्षा ऋतुचे पण कोणाचेही ऐकेल तो कसला’‘वसंत’.? हा तर स्वच्छंद प्रेममौला. वर्षा ऋतूची मक्तेदारी हा सहजच मोडीत काढतो.मग’‘वसंत’ त्याला लाभलेल्या अल्पायुष्याला अधिकाधीक सप्तरंगी बनवितो.
गंमत म्हणजे प्रत्येक ऋतूचे स्वत:चे खास गारुड आहे, उन्हाळा कितीही तप्त डोक्याचा, भांडकूदळ असला तरी त्याच्यातही एक हिरवा नाजूक कोपरा आहेच.उन्हाळा येतो तेच घमघम मोग-याबरोबर. लालेलाल कलिंगडे आणि राजाधिराज आंबे यांचे ढिग जीभेला कृतकृत्य करतात. केवढा मोठ्ठा दिलासा असतो तो. पावसाळा -वर्षा ऋतू येतो तोच मुळी जाईजुईचा गजरा आणि केवडा माळून, पारिजातकाचा सडा शिंपडत हिरवाकंच लफ्फेदार शालू नेसून!. शरदहेमंत या जोडगोळीचा झेंडा गोलमटोल केशरी-पिवळ्या ,गुबगुबीत देखण्या झेंडूच्या फुलांनी सजला असतो .कोजागिरीचा नितांत सुंदर पोर्णिमा याच ऋतूतील. नंतर येणा-या शिशिर- थंडीचेही गुलाबी थंडी म्हणून मनसोक्त कौतूक होते. हुरडा, धुंधूरमास,उत्साहाने काठोकाठ भरलेले आणि भारलेले वातावरण. हळूहळू थंडीचा गुलाबी प्रसाधन होत गायब आणि मग तिचे बोचरे , रखरखते रुप समोर येते.
थंडीचे बोट धरून अलेला ‘वसंत’ सर्वांचेलक्ष वेधून घेतो. पिवळ्या रंगात वसंतपंचमी नाचत येते. आपल्याकडे नसली तरी उत्तरेकडे मात्र पिवळ्या रंगातली नटलेली वसंतपंचमी हळदमाखल्या नवरी सारखी साजिरी गोजीरी दिसते.पांढ-या पिवळ्या शेवंतीचा मंद वास आता जुई , चाफा यांच्या समवेत अत्तराचा शिडकावा करतात.थंडीमधे झडलेल्या पानांच्या थोट्या भुईचाफ्याकडे बघवत नाही पण वसंत येताच“तेरा जादू चल गया”----अशी अवस्था होते. डोक्यावर मदमस्त मुकुट घालून चाफा वसंताला ऋतुराज ही पदवी बहाल करतो. ईकडे रानांत पांगाराही लाजेने लालेलाल होऊन वसंताचे स्वागत करायला एकदम तय्यार असतो.बेभान राधेसारखी सर्वांचीच आवस्था. या सर्वांच्यात भाव खाऊन जाते पिंपळ वृक्ष. इतका राजस आणि लावण्यवान दिसतो न तो!. खाली पडलेल्या पिवळ्या धम्म पानांचा सडा., त्यातच काही जाळीदार पाने,फांदीवर चमचमणारी बालपालवी आणि टाळ्या वाजवणारी जुनी हिरवट पाने. आयुष्य ओवाळून टाकावे असे देखणेपण!.
नुसता निसर्गच याच्या येण्याने सुखावत नाही तर गुढीपाडव्याला गोडमिट्ट साखरेच्या गाठींचा हार गळ्यात घालून तो लहानग्यांना भुलवीतो.होळी येते वसंताचे बोट हळूच सेडून स्वत अग्निप्रवेश करते जाताना ऊरली- सुरली थंडीही अग्नी स्वहा करतो. ऊन तापू लागते त्यातच रामनवमीचा सुंठवडा जीभेला चटका देतो. दक्षीणेकडे जरी ‘वसंताचे’ डोके तापायला लागले असले तरी उत्तरेकडे ‘वसंता’ आजुनही शांतच असतो. त्यामुळे शरयू नदीवरुन येणा-या शीतल लहरी श्रीराम जन्म अधिकच मनोहर करतात. श्रीराम जन्मापाठोपाठ अंजनीसुत हनुमानाचा जन्म.तेव्हा दिसणारा चंद्र खास असतो. नेहमीसारखा गुबगुबीत चांदोबा टवटवीत दिसत नाही तर फिकुटलेला, कोमेजलेला वाटते. बहुधा बालहनुमानाने सूर्याला ग्रासण्या ऐवजी चंद्र ग्रास केला तर काय ही काळजी त्याला सतावत असावी.
वासंतीक समारंभही गारेगार पन्हे, कैरीची डाळ या पदार्थांनी अधीकच चमचमीत होतात. थंडीची करांगुली धरून आलेल्या वसंताला आता ओढ लागते ग्रीष्माची. या ऋतुराजांचा राग आता अनावर ङोऊ लागला असतो. मनाविरुद्ध काहीही झाले तर “आता माझी सटकली” हा संवादही तो म्हणत असावा. वसंताला जाणवते आता वेळ आली आहे निरोप घ्यायची. वसंत आपला बाडबीस्तरा आवरु लागतो, दूरवरुन ग्रीष्म वेगाने जवळ येत आसतो.उंच, काटकुळा, घारोळा आणि पांढराफट्ट उन्हाळा लांब ढांगा टाकत येतो. रसरसलेली पाने कोमेजू लागतात,फुले माना टाकतात, कोकीळही कावराबावरा होतो आणि पानांमधे आळीमिळी गुपचिळी करुन लपून बसतो. भक्क उजेड, गरम हवा, घामेजलेले, कासावीस प्राणीजगत, क्षीण नद्या, या सर्वांवर ग्रीष्माचा अंमल केव्हाच सुरु झालेला असतो. त्याच्या सारखाच मोठाच्या मोठा मरगळलेला दिवस सुरु होतो.
वसंताने आता पूर्णपणे माघार घेतलेली असते. आपल्या डोळ्यासमोर तो आपले अद्भूत, सुवासिक, सप्तरंगी साम्राज्य जळून जाताना पहातो. कधीकधी वळीवाच्या पावसाच्या नीमित्ताने दोन अश्रुबिंदूही ढाळतो.
वसंत जातो ग्रीष्म येतो आणि ऋतूचक्राचे चाक थोडेसे पुढे जाते.अव्यहतपणे हे चक्र चालू आहे. चालू रहाणार आहे.

https://drkiranshrikant.pasaara.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users