"आता अजून एक गोष्ट ऐका.” आज्जी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आज्जीने गोष्टीला सुरुवात केली-
ही गोष्ट आहे साताऱ्यात राहणाऱ्या बबन म्हात्रेची. बबन लहानपणापासूनच फार धाडसी होता. मिलिटरीत जाऊन देशसेवा करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याची उंची बेताचीच होती त्यामुळे त्याला मिलीटरीत प्रवेश मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून वाचूनच तो मोठा झाला होता. त्याला शिक्षणात फारसा रस नव्हताच. मैदानी खेळात मात्र तो पटाईत होता. खोखो, कबड्डी आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ होते. शाळेत असताना तो ज्या कोणत्या टीमकडून खेळायचा त्या टीमचा विजय निश्चित असायचा. मग खेळ कोणताही असो.
पाहता पाहता बबनचं शालेय शिक्षण संपलं. कॉलेजातही त्याने कसंबसं पास होत बारावी पूर्ण केली. बारावी पास होताच मात्र त्याने शिक्षणाला राम राम ठोकला. बबनचा स्वभाव पाहता हा काय कुठे नोकरी करणार नाही हे त्याच्या घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे लायसेन्स मिळताच वडिलांनी बबनला रिक्षा घेऊन दिली. बबनला फिरायचीही खूप आवड होती. आज या गडावर तर उद्या त्या गडावर अशी त्याची भटकंती सुरूच असायची.
त्याच्यासारख्या मुसाफिरांसाठी तर साताऱ्यासारखं डोंगर दऱ्यांनी वेढलेलं निसर्गाच्या कलाकुसरीने नटलेलं ठिकाण म्हणजे पर्वणीच होती. बबन कुठेही गेला तरी त्याच्या लाडक्या रिक्षानेच जात असे. रिक्षा कामासाठी कमी आणि फिरायसाठीच जास्त वापरतो म्हणून बबनचे वडील त्याला रागवायचे. पण त्यांच्या रागवण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. त्याची भटकंती सुरूच होती.
बबनने आता वयाची पंचविशी ओलांडली होती. त्याच्या वागण्यात मात्र अजूनही काहीच बदल नव्हता. तशी घरची गडगंज शेती होती त्यामुळे कमाईची फारशी चिंता नव्हती. पण आता लग्नच वय झालं होतं. या अशा अल्लड मुलाला मुलगी कोण देणार हीच चिंता बबनच्या घरच्यांना वाटत होती.
सध्या बबनला एक वेगळाच नाद लागला होता. तेच तेच गडकिल्ले चढून उतरून तो आता कंटाळला होता. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी लोकांना भुताटकीचे अनुभव आले होते तिथे तो एकटा जाऊन रात्री मुक्काम ठोकायचा. बबनला भीती वाटत नव्हती असही नव्हतं. पण त्या भीतीवर मात केल्याचा एक वेगळाच आनंद त्याला व्हायचा. तसही आतापर्यंत अशा कितीतरी जागांवर तो राहून आला होता. पण एकदोन जागा सोडल्या तर त्याला भीतीदायक अनुभव आला नव्हता. ज्या जागांवर त्याला तसा अनुभव आला होता तिथेही मनातील भीतीमुळे आपल्याला भास झाला असेल असा त्याचा समज झाला होता.
अशाच एका ठिकाणी आज बबन निघाला होता. जवळच्याच एका गावातल्या विहिरीतल्या हडळीबद्दल त्याने ऐकलं होतं. त्या हडळीबद्दल एक आख्यायिका गावात प्रचलित होती. फार वर्षांपूर्वी त्या गावात एक वेडी बाई रहात होती. गावातील उनाड मुलं त्या बाईला फार त्रास द्यायची. कधी तिला वेडी वेडी म्ह्णून चिडवायची तर कधी झाडाआड लपून तिच्या अंगावर दगड मारायची. या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्या वेड्या बाईने एका रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. अमावस्येच्या रात्री जर कोण विहिरीजवळ गेलं तर ती विहिरीतून वर येऊन त्याला विहीरीत ओढून नेते अशी गावातील लोकांची समजूत होती. तसेच इतक्या वर्षात गावातील पाच मुलांचा विहिरीत पडून मृत्य झाला होता तो ही अमावस्येच्या रात्री. त्यातील दोघे तर पट्टीचे पोहोणारे होते.
बबन रात्री गावात पोहोचला. त्याचा एक मित्र त्या गावात रहात होता. रात्री बबन मित्राकडेच जेवला. मित्राने व त्याच्या घरच्यांनी बबनला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण बबन मागे हटणार नव्हता. रात्री बारा वाजता बबन एकटाच विहिरीकडे गेला. त्याने एकवार आकाशातल्या चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिले व तो विहिरीच्या कठड्यापाशी गेला. विहिरीच्या कठड्यावर बसून त्याने डोकावून पाहिले. विहिरीतलं हिरवंगार पाणी चांदण्यांच्या उजेडात चमकत होतं. बबनने एक मोठा दगड उचलला व विहिरीत फेकला. दगड विहिरीतल्या पाण्यात पडताच पाणी उंच उडालं व पाण्यावर उठलेले तरंग रुंद होत पाणी पुन्हा स्थिर झालं. बबन बराच वेळ तिथे बसून होता. इतका वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही हे पाहून तो आता कंटाळला होता. शेवटी कंटाळून त्याने एका मित्राला फोन लावला व त्यांच्या गप्पा चालू झाल्या. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरु होत्या. “लय बोर होतंय रे. या येळेस बी फुसका बार निघाला.” असं बबन त्याच्या मित्राला सांगत होता तेवढ्यात, “डुबुकsssss” असा आवाज झाला व त्या आवाजाने बबन दचकून थोडा मागे सरकला. मित्राचा फोन तसाच चालू होता. बबनचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. त्याच्या हृदयाची धडधड अजूनही कमी झाली नव्हती. थोडया वेळाने अंगातलं सारं धाडस एकवटून बबन पुन्हा विहिरीच्या कठड्याजवळ गेला व त्याने हळूच वाकून पाहिलं. विहिरीत कसलीच हालचाल नव्हती. पाणी स्थिर होतं. बबनने आवंढा गिळला. आपल्याला भास झाला असावा अशी स्वतःची समजून काढुन तो विहिरीत डोकावून पाहात बसला. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नाही हे पाहून बबनचं धाडस अजून वाढलं. तो विहिरीत डोकावून पाहात बोलला, “ए वेडे तुला भेटाया आलोय. तोंड तर दाखिव तुझं. हिम्मत असल तर या मर्दाला ओढून ने तुझ्या विहिरीत.” समोरून काहीच प्रतिसाद आला नाही तसा बबनने अजून एक दगड उचलून विहिरीत टाकला. अजूनही सगळं शांत होतं. शेवटी बबन वैतागून तिथेच झोपला.
कोंबडा अरवला तशी बबनला जाग आली. निराश मनानेच त्याने मित्राचा निरोप घेलता व घरी परतला. रात्री नेहमीप्रमाणे बबन कट्ट्यावर गेला. तिथे गल्लीतली रिकामटेकडी पोरं चकाट्यापिटत बसली होती. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, “मला तर आता असं वाटाया लागलय की भूत बीत सगळं खोटाय.” हे ऐकून एक मित्र म्हणाला, “तुझ्यात जर खरंच हिम्मत असेल तर कासच्या डाक बंगल्यावर एकटा रात्री राहून दाखव. माझा एक मित्र तिथे रात्री गेला होता तो परत कधी दिसलाच नाही.” “त्यात काय येवड. आपनच कितीतरी वेळा गेलोय की तिकडं. आता तू म्हनतोय तर येकटा जाऊन दाखवतो तेही अमावसेच्या रातीला.” बबन बेफिकिरपणे म्हणाला. हे ऐकून सगळेच शहारले. एकदोन मित्रांनीतर त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला. पण आता तोंडून शब्द गेला होता. आता बबन माघार घेऊ शकत नव्हता आणि तो घेणारही नव्हता.
पुढच्याच अमावस्येला रात्री बबन रिक्षा घेऊन कास तलावाच्या दिशेने निघाला. रात्री दहाच्या सुमारास बबन डाक बंगल्यावर पोहोचला. हा बंगला चांगलाच बदनाम होता. अनेक लोकांनी या बंगल्यात आत्महत्या केली होती. तसेच इथे खुनही पडले होते. एरवी हा बंगला दारुड्यांचा अड्डा असायचा पण अमावस्येच्या रात्री मात्र इथे कोण फिरकत नसे. एकट्याने यायचा तर कोणी विचारदेखील केला नसता. अशा ठिकाणी बबन मुक्काम ठोकणार होता.
बंगल्यात पोहोचताच बबनने पिशवीतून डबा काढला व जेवण आटोपलं. जेवण झाल्यावर त्याने पूर्ण बंगल्यात एक फेरी मारली. बंगल्यात एकूण चार खोल्या होत्या. सगळ्या खोल्यात धुळीचं साम्राज्य होतं. तसेच सगळीकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. बबन शेवटच्या खोलीत आला. त्याने खिडकीतून पाहिले. समोर तलाव दिसत होता. बबन डाक बंगल्यातून बाहेर आला व चालतच तलावपाशी गेला. आजूबाजूला गर्द झाडी होती. रातकिड्यांचा ओरडणं कानावर येत होतं. या वेळी पाऊस चांगला झाल्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी वाढली होती. बबनने तलावाच्या पाण्यातच पाय धुतले व तो पुन्हा बंगल्यात आला. त्याने शेवटच्या खोलीत सतरंजी अंथरली व त्यावर आडवा झाला. बराच वेळ तो पडून होता. अचानक लांबून कुठूनतरी कोल्ह्याच्या रडण्याचा अभद्र आवाज बबनला ऐकू आला. तसा बबन उठला व त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर पाहताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. समोर तलावाजवळ एक पांढरी आकृती उभी होती व बबनने तिच्याकडे पाहताच ती अतिशय संथ गतीने बंगल्याच्या दिशेने सरकू लागली. हे पाहून बबनला धडकी भरली. पहिल्यांदाच तो घाबरला होता. त्याने खोलीच्या दाराला आतून कडी लावली व सतरंजीवर अंग पसरलं. खिडकीतून बाहेर पाहण्याची त्याची आता हिम्मत होत नव्हती. तो बराच वेळ तसाच पडून राहिला. अजूनही मनात भीती होतीच पण तितकंच कुतूहल ही वाटत होतं. शेवटी नराहवून बबन उठला व त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं. ती आकृती आता कुठेच दिसत नव्हती. नेहमीप्रमाणेच आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजूत काडून बबनने पुन्हा अंग पसरलं. मध्यरात्रीच केव्हातरी त्याला गाढ झोप लागली.
पहाट झाली तसा सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हवेत चांगलाच गारठा होता. तलावावरून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे बबन कुडकूडतच जागा झाला. रात्री दिसलेली ती पांढरी आकृती सोडली तर भयानक असं काहीच घडलं नव्हतं. त्याने मित्राला फोन लावून त्या आकृतीबद्दल सांगितलं व तलावाच्या पाण्याने हात पाय तोंड धुवून तो परत जायला निघाला.
आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहात बबन निवांतपणे रिक्षा पळवत होता. ती पांढरी आकृती काहिकेल्या त्याच्या मनातून जात नव्हती. सूर्य अजून उगवायचा होता. त्यामुळे अजूनही अंधार होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ होती त्यामुळे हवेतला गारवा आता जास्तच जाणवत होता. रस्ता पूर्ण मोकळा होता. आता निम्मं अंतर संपलं होतं. पुढे वळणावर एक बाई उभी असलेली त्याला दिसली. एवढी सुंदर बाई बबनने याआधी पाहिलीच नव्हती. “कुठे जायचय.” त्या बाईसमोर रिक्षा थांबवून बबनने विचारलं. “येवतेश्वरला सोडाल का?” बाईने अतिशय गोड नाजूक आवाजात विचारलं. “सोडतो की! बसा.” अतिशय खुश होऊन बबन म्हणाला. बाई रिक्षात बसली. “येवढ्या पहाटेच कुठं गेलता बाई?” बबनने विचारलं. “म्या सुईन हाय. गावातल्या पाटलाची पोरगी अडलीवती म्हून गेलेवते.” बाई म्हणाली. “मग काय झालं पोरगा की पोरगी?” आरशात दिसणाऱ्या सुंदर चेहेऱ्याकडे पाहात बबनने विचारलं. “पोरगी.” बाई एवढंच म्हणाली. “तुमी सुईन वाटत नाय हो.” बबन म्हणाला तसा आरस्यातला चेहरा हसला. “बाहेर येवढा गारठा हाय तुमाला थंडी नाय वाजत का?” बबनने चावटपणे विचारलं व आरस्यात पाहिलं पण बाईचा चेहेरा आता दिसत नव्हता. बबनने मागे वळून पाहताच त्याला घाम फुटला. मागची सीट रिकामी होती. आता मात्र बबनची चांगलीच टरकली. त्याने रिक्षाचा वेग वाढवला. थोडं पुढे गेल्यावर वळणावर एक आकृती त्याला दिसली. जवळ जाताच त्याने ओळखलं ती बाईच तिथे उभी होती. पण आता ती जख्ख म्हातारी दिसत होती. तिचे पांढरे केस वाऱ्यावर उडत होते. बबनची रिक्षा तिच्या समोरून जाताच ती रिक्षाच्या बाजूने धावू लागली. बराच वेळ ती रिक्षाच्या बाजूने धावत होती. बबन जिवाच्या आकांताने शक्य तितक्या जास्त वेगात रिक्षा पळवत होता. बाजूला पाहायचंही त्याला धाडस होत नव्हतं. येवतेश्वरची हद्द ओलांडताच ती थांबली. बबनमात्र अजूनही बाजूला पाहायला तयार नव्हता. कशी बशी त्याने रिक्षा घरासमोर आणली आणि तो दारातच कोसळला. त्याच दिवशी त्याला ताप चढला. बऱ्याच दिवसानंतर बबनचा ताप उतरला. पण अंगातली रग आता गेली होती व भटकंतीही कायमची थांबली.
क्रमशः
मस्त रंगतेय कथा... कथेत कथा
मस्त रंगतेय कथा... कथेत कथा त्यामुळे अजून वाचायला मजा येत आहे. लेखनशैली छान आहे.
तुमची नवनवीन भाग टाकायचा वेगही चांगला आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
मस्त घाबरवतेय तुमची कथा
मस्त घाबरवतेय तुमची कथा
हा तर एका कथेत कथांचा खजाना
हा तर एका कथेत कथांचा खजाना आहे.
मज्जा येतेय वाचायला.
हा तर एका कथेत कथांचा खजाना
हा तर एका कथेत कथांचा खजाना आहे.
मज्जा येतेय वाचायला. >>>> +१
रिक्षाच्या बाजूने धावणाऱ्या
रिक्षाच्या बाजूने धावणाऱ्या म्हातारीचं दृश्य डोळ्यासमोर आलं. बापरे.