ती लाकडी चौकट आणि दरवाजा
याच दरवाजातून आजीनी अोवाळून मला घरात घेतलं तेंव्हा आअीच्या कुशीत बाळमुठी चोखत अंगड्या टोपड्यातून मी पहिल्यांदा ह्या दाराला पाहिलं असणार.छोटा दिंडीदरवाजा भक्कम लाकडी चौकट ,त्यावर असणारा गणपती , दणकट अुंबरा आणि भव्य दरवाजा,डोळ्यात न मावणारा!
मग घरचा गडी मला गंमत दाखवायला याच दारात अुभा राह्यचा, पण गंमत अशी की त्याचं तोंड रस्त्याकडे आणि माझं अातल्या बाजूला!मग मी बहुदा चिमटे काढत असणार कारण माझी तक्रार घरात जात असे आणि मग आजोबा येअुन माझी विवंचना सोडवायचे कडेवर घेअुन माझं तोंड रस्त्याकडे करायचे.!आणि मग गंमत दिसायची.
आजी आणि आजोबांबरोबर बाबांची वाट मी याच देवडीत आणि दिंडीत बसून बघितली.
गणपती आणायला टोपी घालून जायचो, याच दारात आजोबा मूर्तीवरचं रेशमी कापड बाजूला करायचे,आेवाळताना आजी म्हणायची "सुंदर आहे बरं श्रींचं रुप" खरंखुरं आणि दरवेळी
अगदी न चुकता!ती परंपरा आअीनी चालू ठेवली आणि मग माझ्या पत्नीनीपण.
रात्र झाली की मला भीती वाटायला सुरुवात व्हायची मग जेवणं झाली की आजोबा हाताशी धरुन दरवाज्यात न्यायचे.मग क्रमानी दिंडी मग दरवाज्याला कड्या घालायचा सोहळा व्हायचा आणि सर्वात शेवटी भरभक्कम अडसर घातला की माझ्या मनातल्या सर्व भीती मिटून जायच्या सुरक्षितपणाची साय मनावर साठायची.
याच दारानी मला ही सुरक्षित असल्याची भावना दिली. अडसरानी अपप्रवृत्ती लांब ठेवल्या.
लपंडाव खेळत असताना मी अिथंच दडलो आहे, बारीकसारीक खोड्यांच्या शिक्षांपासून तात्पुरतं यानीच तर पाठीशीही घातलंय.
याच दारातून मी वराती आणि मिरवणुका पाहिल्यात तशीच स्वप्नसुद्धा. काही विरली काही फळली आहेत .तरुणपणचा बराचसा मुक्काम अिथेच असायचा अिथूनच सायकलवरचा पाय टेकवून मित्र हाक मारायचा, अिथंच गप्पांचे अड्डे बसायचे,सर्व प्रकारचे ज्ञानसागरातले शिंपले अिथेच गोळा केलेत ,गाणी म्हणली आहेत, शिट्टया वाजवल्यात सगळं काही अिथंच! पण माझ्यानंतर जन्मलेल्या माझ्या बहिणीला मात्र हे सगळं करायची मुभा नव्हती ,त्यांनी अुंबऱ्याच्या आत मैत्रिणींबरोबर देवडीत बसायचं.अिथंच लग्नानंतर बहिणीनी बायकोला माप अोलांडायच्या आधी नाव घेण्यासाठी अडवलं होतं.शुभकार्याची तोरणं, दिवाळीच्या रांगोळ्या सगळं याच्या भवतीनं!हा दरवाजा आमच्या घराण्याचा जणू मूळपुरुष होता.भारदस्त आणि जबाबदार , कधी खट्याळ , अेक डोळा बारीक केलेला.त्याच्या आसपासच सगळ्या चळवळी, खटपटी ,लटपटी चालायच्या.
याच दरवाजातून दिसणारा आकाशाचा तुकडा हेच आयुष्य होतं.स्वप्न होती पण डोळ्यात मावणारी होती.माझं आणि माझ्या घराचं आणि आजूबाजूच्या समाजाचं मुखपत्र हा दरवाजाच तर होता.
दिवस बदलत चालले, सकाळच्या रांगोळ्या पुसकट होत होत नष्ट झाल्या.अेकत्र कुटुंब हळुहळू विखुरलं.
लाकडी अुंबरा अोलांडणं अनिवार्य झालं.दारानी हा बदल खुल्या मनानी स्वीकारला. चौकटीबाहेरचे विचार आपलेसे केले. सुरक्षितता सोडून अितर कारणांसाठी अडसर वापरला नाही.याच दरवाजातून आजीआजोबा आअीबाबा यांच्या शेवटच्या यात्रा निघताना दारानी ढाळलेले निशब्द अश्रू मी अनुभवले आहेत तसंच त्याचं माझ्या पाठीशी खंबीर अुभं राहणंही.हे सगळ्यांना कसं समजवणार.
मुलाचं लग्न, नातवाचं येणं सगळं अगदी तसंच परंपरेनुसार चाललं आहे पण आता दरवाजा थकत चाललाय ,कधी कुठे भेगा कुठे चिरा पडताहेत.मुलगा सून नवीन घर बांधायच्या मागे आहेत आणि मी मनात ढासळतो आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे पण मला त्या नियमात बसताच येत नाहीये !सुनेनी जुनी अेक खिडकी नवीन घरात बसवून माझं मन वळवायचा प्रयत्न केलाय.मी प्रगती,नवे वारे याच्या आड नाहीये पण माझ्या जिवलगाची साथ सोडणं फार जड जातंय.घरी त्रागा होतोय,अेका निर्जीव गोष्टीसाठी जिवंत माणसांच्या सुविधा मागं पडताहेत म्हणून ....पण या माझ्या आधाराला मी मुळीच निर्जीव समजत नाही हा युक्तिवाद आता फार काळ टिकणार नाही.मान तुकवण्याआधी त्या दाराच्या मोठ्या दोन ढलप्या माझ्यासाठी ठेवून घेतल्या आणि काळाला नमस्कार केला.माझं रक्षण करणाऱ्या माझ्या पाठीराख्याला मी वाचवू शकलो नाही.पण आता या अखेरच्या प्रवासात त्या दोन ढलप्या बरोबर असताना मला त्या अज्ञात अंधाराची मुळीच भीती वाटत नाहीये. . .
©मृण्मयी
कालाय:.तस्मै न म:
कालाय:.तस्मै न म: