डायना मावशी अर्थात प्रिन्सेस डायना हिच्या बद्दल मला सगळ्यात पहिले ज्या पद्धतीने कळलं तो दिवस हा खरंतर तिच्या अपघाती मृत्यूचा होता. मी आणि आई हॉल मध्ये गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि घरचा दरवाजा उघडाच होता. (त्या काळी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या शेजार्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असायचे आणि शक्यतो संध्याकाळी सगळ्यांचेच दरवाजे उघडेच असायचे. ) आमच्या शेजारचा दादा धावत आमच्या घरी आला आणि म्हणाला, "अहो काकू, डायना मावशी गेली. या ना टीव्ही वर दाखवतायेत..". त्या क्षणाला माझ्या डोक्यात दोन - तीन प्रश्न आले ते मला स्पष्टपणे आठवतायत. एक म्हणजे, पाटील आडनाव असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मावशीचं नाव डायना कसं काय असू शकतं?? आणि समजा असलंच तरी मावशी गेल्याचं कोणी हसत, धावत येऊन कसं काय सांगेल?? आणि त्या ही पलीकडे ही मावशी इतकी फेमस आहे की ती गेल्याचं टीव्हीवर दाखवतायेत???
नंतर लक्षात आलं की ही डायना म्हणजे इंग्लंडच्या राणीची सून, युवराज चार्ल्सची बायको. तिचा मृत्यू झाला, अपघातात. सौदीच्या उद्योगपतीसोबत गाडीत असताना मागावर असणाऱ्या "पापाराझीं" पासून बचाव करताना. अर्थात पापाराझीं चा अर्थ मला दुसऱ्या दिवशी मराठी वृत्तपत्रांतून कळला.
नंतर जवळजवळ आठवडाभर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये डायनाबद्दल लिहून येत होतं. ते कळण्याइतका मोठा मी नव्हतो तेव्हा. पण अर्थातच डायना बद्दलचं कुतूहल संपलं नव्हतं. नंतर काही वर्षांनी मी डायना बद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या चार्ल्स सोबत बिघडलेल्या संबंधांबद्दल वाचलं. तिचा अपघात, त्या मागच्या थिअरी वाचल्या. तिचे निळे डोळे, गळ्यातली मोत्यांची माळ आणि देखणं हसू यात काहीतरी मेस्मराइजिंग वाटायचं. प्रसारमाध्यमांनी तिची उभी केलेली "आहे मनोहर तरी गमते उदास " ही प्रतिमा मनात रुतून बसलेली.
शनिवारच्या निवांत दुपारी हाईड पार्कच्या हिरवळी वरून चालताना हे आठवत होतं. डायना मेमोरियल फौंटन बघायचं होतं. या मेमोरियल कडे जाण्याचा रस्ता फार सुरेख आहे. त्याचं नावच मुळात "द डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्स मेमोरियल वॉक "
एका बाजूला हाईड पार्कची हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला सर्पेंटिने तळ्याचा काठ. निवांत दुपारी नौकाविहार करणारे टुरिस्ट, तळ्याकाठने डौलात विहरणारे राजहंस बघत बघत चालत राहायचं. मेमोरियल कडे जाणाऱ्या मार्गात दर दीडशे मीटरवर, पंचधातूचं गुलाबाचं फूल कोरलंय. चालता चालता त्या गुलाबाच्या फुलाकडे नजर जातेच. एल्टन जॉनने डायनाच्या अंत्यविधीला गायलेलं, "गुडबाय इंग्लंडस रोज, मे यु एव्हर ग्रो इन आवर हार्ट्स" हे गाणं नकळत कानात वाजायला लागतं. जगभरात अंदाजे अडीचशे कोटी लोकांनी तिच्या अंतिम निरोपाचा प्रसंग पाहिला. आज सुद्धा तिच्या मेमोरियल फौंटनला वर्षाला आठ लाख लोक भेट देतात. बावीस वर्षांनंतरही डायनाचं गारुड कमी होत नाही.
मेमोरियल फाऊंटनच्या दरवाजातच तिचा हसरा फोटो लावलाय. आत शिरताच लक्षात येतं हे "This is not a regular fountain". हाईड पार्कच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करत, कॉर्निश ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे कारंजे रूढार्थाने कारंजासारखे नाहीच मुळी. या कारंज्याचं पाणी थुईथुई नाचत नाही. यातलं पाणी वाहतं. खळाळतं. आजूबाजूला हिरवाई आणि मध्येही हिरवाई. त्यामध्ये बांधलेल्या ग्रॅनाइटच्या घळीतून पाण्याचा हा प्रवाह अखंड सुरु राहतो. इतर कारंज्यांसारखं नुसतं कडेकडेने फिरायचं आणि चार हात लांबून सौंदर्य बघायचं असं इथं नाही. एक छोटीशी पायवाट तुम्हाला थेट कारंज्याच्या मध्यात असलेल्या हिरवळीवर आणून सोडते. सभोवार नजर टाकली की दिसतात वाहणाऱ्या पाण्यात खेळणारी लहान मुलं. एकमेकांच्या अंगावर कारंज्याचं पाणी उडवणारं तरुण जोडपं किंवा मग नुसतंच पाण्यात पाय सोडून बसलेली इंग्लिश आज्जी. कारंज्याच्या मध्यातून पुन्हा त्याच्या कडेला यावं आणि खळाळत्या पाण्याच्या सोबतीने एक चक्कर मारावी. मी काही जगातले प्रसिद्ध फाऊंटन्स पाहिलेले नाहीत. उंचच उंच उडणाऱ्या पाण्याचं, त्याच्या तुषारांचं, संगीताच्या तालावर नाचणाऱ्या रंगीबेरंगी कारंज्यांचं मला आकर्षण आहेच. तरीसुद्धा, हा वाहणारा, पाण्याला उंचावर, अधिक लांबवर न नेता जवळ आणणारा आणि सहजपणे ज्याच्या अवतीभवती बागडता यावं, गाभ्यात शिरता यावं असा वेगळासा कारंजा मनात घर करून राहिलाय.
बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच्या व्हिक्टोरिया मेमोरियलचा ग्रँडपणा या मेमोरियल मध्ये नाही. पण डायनाच्या मेमोरियल मध्ये आपलेपणा, सहजपणा आहे. मेमोरियलच्या डिझाईन मध्ये, त्या मागच्या थॉट मध्ये आणि त्याच्या एक्सिक्युशन मध्ये सुद्धा. प्रिन्सेस डायनाच्या सामाजिक आयुष्यातही तो होताच. म्हणून तर ती नुसती प्रिन्सेस न राहता "People's Princess" ठरली. डायनाच्या हसऱ्या फोटोकडे पाहत मी तिथून निघालो. शनिवारची दुपार समाधानकारक होती.
अभिषेक राऊत
झकास
झकास
at least one photo was
at least one photo was required
छान एकदम. फोटो हवा.
छान एकदम. फोटो हवा.
खूप वाईट वाटले होते तेव्हा.