मोर
मी झाले तेंव्हा आईला फार आनंद झाला, एकतर दोन भावानंतर (तिच्या भाषेत शर्ट चड्डी)मी झाले त्यामुळे तिला जी मुलींच्या वेण्या घालायची, फ्रॉक्स शिवायची हौस होती ती पूर्ण झाली.तिसरं बालक आणि उशीरा झालं असूनही तिच्यात खूप उत्साह आणि आनंद होता.ती सगळीकडे न्यायची मला, पायात पैंजण घालून, घुंगरं लावलेला फ्रॉक घालून थाटात ती सगळीकडे मला न्यायची.तिला खूप वाटायचं मी नाच शिकावा, पण त्यावेळी बेबीताईंचा क्लास डेक्कनवर आणि शरदताईंचा घरापासून लांब त्यामुळे राहिलंच.मला नाचायची कोण हौस ,मग अस्मादिकांनी शाळेतल्या नाचाच्या कार्यक्रमात जागा मिळेल का ते पाहिलं पण हुजूरपागेत फोक डान्स (ज्याला शालेय भाषेत फोगडान्स) फार उच्च लोकांसाठी असायचा, आमच्यासारख्या सामान्य माणसांना तिथे वाव नव्हता पण त्याचं फार दुःख नव्हतं बरं, कारण या हेवेदाव्याच्या भावना अजून जागृत व्हायच्या होत्या.पण तिथली प्रॅक्टिस बघून घरी येऊन आरशासमोर करून बघण्यात फार धन्यता वाटायची. आईबरोबर लायब्ररीत जाताना किंवा भाजी आणायला जाताना हात नृत्याच्या हालचालीत आणि पाय दुडक्या चालीतच असायचे.मोर मनात डुलत असायचा.आमच्याकडे आलेल्या एका पाहुण्या बाईंबरोबर तुळशीबागेत जाताना(हे कर्तव्य सर्व आलेल्या महिला पाहुण्यांप्रति मला करावंच लागायचं)त्यांनी माझे हे विभ्रम पाहून खसकन "हे गं काय वेडगळपण "असं म्हणल्यामुळे मोराचे पंख कापले गेले ,पण काही दिवस असे भाकड गेल्यावर वैराग्य सरलं.मोराच्या अंगात परत लय भरायला लागली.कारण आमच्या घरात सगळ्याच गोष्टींचं कौतुक होतं.
अगदी लहान असताना बापू मला झुकून मॅडमुझेल give me the pleasure of your dance असं म्हणायचे मग मी मान लवून होकार दिल्यावर ते मला उचलून घ्यायचे आणि बॉल डान्सच्या काही स्टेप्स करायचे तोंडानी ते तारारी तारारी असं म्हणत संगीत निर्माण करत.फार म्हणजे फार भारी वाटायचं म्हणजे तेंव्हा मोर नाचत असायचा मनात,कधीतरी पु शि रेंगेची सावित्री आली वाचण्यात. मोर भेटला असाच कुठल्या कुठल्या वळणावर आणि आपसूक स्वतःच मोर व्हायला झालं.
हिंदी सिनेमे बघायचा छंद जडला म्हणजे त्यातल्या नृत्याच्या अविष्कारांवर इतकं मन जडलं मग पूर्वीइतुके मोकळेपणानी नव्हे पण खोलीचं दार लावून का होईना आरशासमोर माधुरी ,मीनाक्षी यायला लागल्या,आणि तेंव्हाच सर परशुरामकडून पुरुषोत्तमला घोंटूल केलं ,त्यात आदिवासी नृत्य करायला मिळालं ,अहाहा मोर खूष! मग पडघमचे दिवस अवतरले आणि खुलेपणानी नाचता आलं,मनातल्या मोरानी चक्क पिसारा फुलवला.कथकचे तोडे, लावणीचे तुकडे आणि मॉडर्न डान्स या सगळ्याचा मनसोक्त आविष्कार करता आला.तिथं धमाल नाचणारी मंडळी भेटली, काही सुंदर नाचणारी मंडळी होती आणि बाकी आमच्यासारखी तालात नाचणारी आणि मुख्य म्हणजे सगळेच जण आनंद मोडकांच्या सूर तालावर भन्नाट नाचणारे आणि नाचातला आनंद लुटणारे . मोर मनसोक्त नाचला,तालमीमध्ये, नाटकामध्ये,नाटकांच्या दौऱ्यात प्रवासात रेल्वेमध्ये अगदी बिनधास्त नाचायला मला पडघमच्या मित्रमैत्रिणींनी शिकवलं.
हा नाद घरच्यांनी मान्यच केला.माझा भाऊ संजय पण खूप छान नाचायचा, त्याचा स्वतःचा एक इलेक्ट्रिक डान्स त्यानं विकसित केला होता,ते पाहून मी लोटपोट होऊन पडले होते.असो!त्यानंतर मोराला काही संधी मिळाली नाही.आयुष्याच्या लढाया आणि जबाबदाऱ्या स्वीकारताना,मोर कुठंतरी लांब गेला,त्याची आठवण मागे पडली,अधूनमधून मनात डोकवायचा इतकंच. आयुष्य पुढे सरकत राहिलं ,मुलांबरोबर ,त्यांच्या शाळेतल्या बडबड गीतांवर ,शाळेत शिकवलेल्या गाण्यांवर त्यांच्यासारखं थोडं थोडं नाचत राहिले ,पुढे लेकीला कथकच्या क्लासला घातलं आणि तिच्या स्टेजवरच्या पहिल्या पावलासरशी भरुन भरुन आलं,कार्यक्रमाहून परतताना गाडी चालवताना डोळ्यातून पाण्याच्या धारांमुळे बराच काळ काही दिसलं नाही.प्रेरणा देशपांडे तिची नृत्यशिक्षिका अत्यंत गुणी आणि संवेदनशील,तिला एक छोटं पत्र लिहून ह्या सगळ्या भावना कळवल्या, लेकीलाही सांगितलं.काही कारणांनी पुढं तिनं नृत्य चालू ठेवलं नाही याचं दुःख मला जास्त झालं ,
मोराची पुढची पिढी आली .आता मुलं मोठी झाली आहेत ते वेगवेगळे डान्स फॉर्म्स मला समजावून सांगतात "वत्से तुजप्रद कल्याण असो" ह्या उदात्त हेतूनी. आतून
मोर पण मनात थुईथुई नाचत राहतो.कोणाच्याही लग्नात जरा वाजलं काही की पाय थांबू देतंच नाहीत.मग आपल्याला कोणी काही नावं ठेवत असेल वगैरे तुच्छ विचार त्यावेळी मनाला शिवतही नाहीत.सुदैवानं जवळच्या माणसांना (बाकी पर्याय नसल्यामुळे)कौतुक वाटतं. लग्नानंतर नवऱ्यानी माझं हे खुळेपण अगदी खुलेपणानी स्वीकारलं.त्याला नाचाची मुळीच आवड नाहीये पण त्याला माझ्या आवडीचं कायम कौतुक वाटत आलं. आता बहुतेक लग्नात संगीत असल्यामुळे चांगलाच बहर आहे तरीही कधी वय, कधी नातं ,कधी शरीर आड येतं,लोकं काय म्हणतील अशी दुष्ट शंका मनात येईपर्यंत,सुदैवानं माझ्या आजूबाजूला जी नृत्यप्रेमी मंडळी म्हणजे तरुण मंडळी आहेत,ती माझ्या मदतीला येतात,ही लबाड मंडळी मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि मग मोराला थांबता येतंच नाही.माझी शिंगं मोडून मला त्यांच्या कंपूत घेतात.तनू तर फार बहार नाचते ,मोहक, डौलदार आणि बिनधास्त. उत्साहाचा जिवंत झरा,नुसतं नृत्यचं नाही तर त्या शब्दांवरचा अभिनय केवळ बघण्यासारखा असतो. माझी मुलं, भाच्या, पुतणे सगळे धमाल नाचतात. मला नेहमी गणपतीत नाचणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं, अर्थात ते नशा करून नाचणारे नव्हे पण ज्यांना तो ताल नाद चढतो त्यांचं. त्यांचे हात वर करून दुखत नाहीत का असा बालप्रश्नही पडतो.पण एकंदरीत त्यांच्या नकारात्मक भावना ,नकारात्मक ऊर्जा कुठेतरी पार दूर झटकून टाकल्या जातात असं वाटतं. नृत्यात खरंतर तुम्ही अगदी तुमचे, तुमचे असता.मोर पिसारा फुलवत राहतो ,मनात डोलत राहतो.
हिंदी सिनेमातली अनेक नृत्य पाहिली असतील पण तुम्ही गाईड सिनेमातली वहिदा रेहमान पाहिली आहे? विचित्र , वाईट स्वभावाच्या ,आणि तिला यत्किंचित लेखणाऱ्या नवऱ्याशी भांडून ती गाईडला(देव आनंदला) नागनृत्य करणाऱ्यांचा पत्ता विचारते आणि राजू गाईड तिला तिथे घेऊन जातो,नृत्य तिच्या नसानसात असतं त्यामुळे ती "सपेरन' नाचायला लागल्यावरअगदी काही क्षणात तिची पावलं थिरकायला लागतात .तिचं शास्त्रशुद्ध आणि सपेरनचं साधंसुधं नागनृत्य अशी थरारक जुगलबंदी होते.तिच्या मनातला सगळा विखार ती नृत्यात अक्षरशः ओतते,शेवटी अगदी भान हरपेपर्यंत नाचते आणि भानावर आल्यावर तिची ती परत एकदम कोषातली स्त्री ,एका प्रसिद्ध व्यक्तीची बायको बनते.लाल साडी आणि काळा ब्लाउज घातलेली ,एक सैल अंबाडा असलेली वहिदा उर्फ रोझी बघणं हा आनंदानुभव मी असंख्य वेळा घेतलाय.त्या सिनेमात नंतरही ती वेळोवेळी नाचते,तिचं "आज फिर जीने की तमन्ना है! बघताना प्रश्न पडतो की अतिशय उत्कट आणि वेदनेतून जन्माला आलेलं नागनृत्य करणारी हीच ती?संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन नाचणारी रोझी वेगळी, त्यानंतर पैसे मिळवायचं साधन म्हणून नाचणारी वेगळी .पण मला मात्र तिचं नागनृत्य फार भावतं कारण ते फार आतून आलेलं असतं.तिच्या वाटेला आलेलं नाकारपण निपटून काढणारं.माझ्यामते हिंदी सिनेमाच्या इतिहासातलं सगळ्यात सुंदर चित्रीकरण झालेली जी काही गाणी आहेत त्यात ह्याचा नंबर पहिला लागेल.विजय आनंदला पुन्हा एकदा सलाम.ह्या नृत्याबद्दल अजून लिहायला आवडेल ,पुन्हा कधीतरी.ते गाणं बघताना when in doubt dance it out हे वाक्य आठवलं.किंवा अस्सल मराठी "क्षण एक पुरे नृत्याचा,वर्षाव पडो प्रश्नांचा"
नृत्य शिकलं असणाऱ्या व्यक्तींना तर परमेश्वराच्या वरदहस्ताचा अनुभव वारंवार येत असणार हे नक्कीच.त्यांची साधना, कष्ट हे तर आहेच पण पूर्व जन्मीची पुण्याई नक्कीच असणार.नटराजाची मूर्ती किती सुंदर दिसते.नक्कीच त्याचं कुठल्यातरी अवचित क्षणी नृत्यसाधकांना दर्शन होत असणार. पण माझ्यासारख्या न शिकलेल्या पण नृत्यामधला आनंद घेणाऱ्या सामान्य व्यक्तीलाही हा अनुभव आलाय आणि तो शब्दातीत असतो.. ज्यांचे फक्त पाय हलतात त्या हालचाली असतात पण ज्यांचं मन सूर, तालात हलतं तिथे नृत्य असतं,नृत्य ही आपल्या आत्म्याची भाषा असते ती आपणच समजून घेतली पाहिजे.dance like there is no tomorrow and no one is watching you.तेंव्हा सतत येणाऱ्या अडचणींचं वादळ शमायची वाट न बघता, वय , शरीर,दुखणी ह्यांची पर्वा न करता नाचलं पाहिजे.मनातून नृत्य सुरू केलं तर पाय आपोआप बरोबर येतील.केवळ शारीर नाही कारण कधी शक्यही नसतं तर मनातून, हृदयातून , बुद्धीतून, आपल्या आत असलेल्या त्या परमेश्वरी अंशासाठी बाहय स्वरूपी नाही तर नाही , निदान आपल्या आत नाचलं पाहिजे.त्याच्याशी अद्वैत जोडलं पाहिजे.मोर डुलत राहिला पाहिजे सदैव,आपल्या जिवंतपणाची लखलखीत निशाणी आहे ती.तो कधी गाणं असतो ,कधी कविता,कधी गद्य पण मोर असतोच.मला कधी कुठल्या वळणावर, मोर भेटला माहिती नाही.कधी तो माझ्यात मिसळला ?माहिती नाही.तो आईनी पायात घातलेल्या पैंजणात होता,की बापूंच्या कडेवर घेऊन केलेल्या बॉलडान्समध्ये, मित्रमैत्रिणींच्या बिनधास्त नृत्यात होता ,की मुलं लहान असताना त्यांना हसवायसाठी नाचून दाखवलेल्या तुकड्यात होता की आत्ताच्या वयात तरुण मंडळींबरोबर होणाऱ्या नाचात होता, मधला काळ तो कुठंच नव्हता की माझ्याबरोबर होता पण मी कठोरपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं?तो मात्र सदैव माझ्याबरोबर सावलीसारखा गुपचूप राहिला,माझी साथ देत , आनंदात,पंख फुलवून,पण मी त्याच्याकडे वळून बघीन अशी वाट बघत,
निरपेक्ष..मितवा..
छान !
छान !
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
मला शब्दात सांगता येत नाही पण तुमच्या लिखाणातले काहीतरी तरल मनाला भिडतं.
सुरेख!
सुरेख!
माय गॉड! खूप तरल लिहीले आहे.
माय गॉड! खूप तरल लिहीले आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक आरस्पानी नजरिया/दॄष्टीकोन म्हणेन मी.
धन्यवाद ,माझा हुरुप वाढला
धन्यवाद ,माझा हुरुप वाढला
खंप छान आणि आतून लिहिलंय...
खूप छान आणि आतून लिहिलंय... आवडलं..
खूप तरल लिहीले आहे.
खूप तरल लिहीले आहे.
आज नाचतोच. बायको हसते पण तिच्यातल्या मोरालाही नाचायला लावतो.
खूप सुंदर लिहिलंय!
खूप सुंदर लिहिलंय!
Mast! Tumchya vicharanmadhye
Mast! Tumchya vicharanmadhye aani tyanchya mandanithi mohak 'mor'pan aahe! Khup chan! Asech chan lihit raha.shubhechha!
सुंदर लिहिलंय! पु ले शु
सुंदर लिहिलंय!
पु ले शु
सुंदर
सुंदर
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
मला शब्दात सांगता येत नाही पण तुमच्या लिखाणातले काहीतरी तरल मनाला भिडतं.>>>>+१
when in doubt dance it out >
when in doubt dance it out >> > आहाहा..
सगळा लेखच अगदी जमून आलाय. वेगळीच अनुभूति देणारा लेख. मनापासून धन्यवाद !!
वा, सुरेख
वा, सुरेख
छान लेख!
छान लेख!
नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेख!!
नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेख!!
खूप सुंदर!!! आजचा दिवस छान
खूप सुंदर!!! आजचा दिवस छान जाणार, मोर नाचायला लागला मनात...
फार छान लिहिलेत....
फार छान लिहिलेत....