कुसूर
सध्या ‘कुसूर’ भागातून भिवपुरी जाण्यासाठी सरळ सोंडेवरील वाट वापरतात. या वाटेला ‘कुसूर’ आणि खालची भिवपुरी, हुमगाव, वैजनाथ भागातील मंडळी 'लव्हाळीची वाट' तर काही जण याच वाटेला 'भिवपुरी घाट' असेही म्हणतात. कारण ही सोंड थेट भिवपुरी गावात उतरली असल्याने वेळेच्या दृष्टीनं सोयीची. आम्हीही चार वर्षांपूर्वी याच वाटेने उतराई करत आणि 'साईडोंगर' उर्फ 'मिरदीची वाट' चढाई असा ट्रेक केला होता. https://ahireyogesh.blogspot.com/2016/09/kusur-saidongar.html त्यावेळी समजलें की खरा इतिहासकालीन वाहतुकीसाठी वापरला जाणारा कुसूर घाट या वाटेच्या उत्तरेला. आता पुन्हा तेच घाटावरील आणि कोकणातील स्थानिक या कुसूर घाटाच्या वाटेला ‘साजी’ असेही म्हणतात. काही संदर्भ असलेली जुनी नावं, नवी नावं, तर दफ्तर नोंदणी असलेली नावं यात बहुतांश ठिकाणी तफावत असतेच.
भिवपुरी हुमगाव भागात बऱ्याच वेळा येणं झालं या वेळी राहुलकडे सहपरिवार धडकलो ते याच कुसूर घाटाच्या वारी साठी. सकाळी चढाईची सुरुवात साईडोंगर उर्फ मिरदीच्या वाटेने दिड तासात पदरात येत डावीकडे बहिरीच्या दर्शनाला (ढाक बहिरी नव्हे). या बहिरीला कुसूर भिवपुरी हुमगाव व धनगर पाड्यातील बरीच मंडळी श्रध्देने येतात.
तिथून मोठा धबधबा उजवीकडे ठेवत पहिल्या गिअरची चढाई, पुढे त्याला आडवं पार करत कड्याला बिलगून जाणारी अरुंद अशी वाट ही वाट सवाष्णी घाटाचा थ्रील देते (सुधागड जवळील सवाष्णी नव्हे) शेवटच्या टप्प्यात खिंडीच्या अलीकडे दोन्ही वाटा एकत्र येतात. थोडक्यात ही थ्रील असलेली शॉर्टकट वाट मिरदीच्या मुळ प्रशस्त वाटेला डायगोनली इंटरसेक्ट करते. पुढे शेवटची चढण पार करून माथ्यावर.
उजवीकडे दिसतो तो मोठा ढाक व त्याचं लांब लचक पठार. मळलेली वाट वीस मिनिटांत कुसूर गावात.
कुसूर घाट.. गावातून लव्हाळीची (सोंडवाली) वाट डावीकडे ठेवत शेताडीतून वाट शोधतच निघाव लागतं.
नाहीतर सोपा मार्ग खांडीचा रस्ता धरायचा दिड एक किमी गेल्यावर मोठा उतार संपल्यावर उजवीकडे लहानसा तलाव दिसतो बरोब्बर त्याचा समोरून ट्रॅक्टर जाईल अशी वाट जिथे नव्याने बांधलेली विहीर. पुढे त्याच वाटेने शेतं ओलांडत उजवीकडे मळलेल्या पायवाटेने रानात शिरलो.
पायाखाली वाट तर दिसतेय पण आजू बाजूला रान बक्कळ माजलेले बहुतेक ठिकाणी झोडपत जावं लागलं. ठरविक अंतरावर नुकतेच कुणीतरी झेंडे लावून गेलेले. त्यामुळे थोडा दिलासा होता नाहीतर पूर्ण वाट तयार करत येणं शक्यच नव्हते. माथ्यावरील रान पार करून वाट बाहेर काही वेळ खाली कोकण प्रांत नजरेत येतो पुन्हा वाट झाडीत शिरते इथून टप्पा टप्प्याने अगदी बांधीव अशी घाटाची उतराई.
मुख्य म्हणजे पुरातन ब्रिटिश कालीन मैलाचा दगड त्यावरील नोंद करण्यात आलेले अंक अगदी व्यवस्थित. अर्थात हे सहजासहजी नजरेत येत नाही, वाटेच्या बाजूला झाडीत लक्ष देत गेल्यावर दिसतात.
आता पर्यंतची स्थिती पाहता पदरात उतरल्यावर अवघड जाणार हे एव्हाना लक्षात आलं होतं आणि अगदी तसेच झाले.
अक्षरशः वाटेवर प्रचंड प्रमाणात झाडोरा, काटेरी झुडपे अनेक लहान मोठ्या वेली. काही जागी तर पडझड होऊन दरडी कोसळलेल्या. अगदी आरामात जनावरं जाऊ शकतात अशी वाट दिसतेय पण निव्वळ वापर नसल्यामुळे कधी काळची प्राचीन घाटवाट आज एकदम बिकट अवस्थेत.
जिथे समोर असला प्रकार तिथे बायपास करत जमेल तसं पुढं जायचं. जोडीला डास मच्छर माश्या यांचा त्रास होताच. एक दोन ठिकाणी गुगली पडली पण दिशेनुसार वर खाली जात जमवलं. या स्थितीत सोपानचा रोल फार मोठा तसेच या तासाभराच्या गडबडीत शांत राहून घरच्यांनी दिलेली साथ ही तितकीच महत्त्वाची. काही वेळाने लहानशा मोकळं वनात आलो तेव्हा जरा बरं वाटलं. आता समोर होती ती लव्हाळीची सोंड तिच्या उताराच्या दिशेने वळलो बरोबर कड्याला समांतर अशी गवतातून वाट अर्थात ही सुद्धा बायपास असणार मूळ वाट वरच्या भागातून कुठेतरी झाडी झुडपात नाहीशी झालेली. वीस एक मिनिटांत त्या अरुंद वाटेने चालत कुसूर घाटातील पाण्याच्या टाक्या जवळ आलो. इथेच कुसूर आणि लव्हाळीची वाट एकत्र येतात. थोडं उतरत जात खाली ओळीने कातळात खोदलेल्या चार पाण्याचा टाक्या.
गारेगार पाणी तोंडावर मारून फ्रेश झालो. समोर होते ते टाटा पॉवर विज निर्मिती केंद्र, मागे वाघजाई घाटाची सोंड त्याही पलीकडे घोडेपाडी घाटाचा भाग. इथवर निम्म्याहून अधिक उतराई झालेली. आता इथे सुध्दा खालच्या टप्प्यात जाईपर्यंत वाटेचे दोन भाग पडतात. आधी म्हणालो तसे, पहिला जिथे टाकी आहेत त्याच्या थोडं वर जिथे दोन्ही वाटा एकत्र येतात सरळ आडवी जाणारी मुख्य घाटाची वाट तर पाण्याचा टाक्यापासून उजवीकडे उतरत जाणारी वाट.
अर्थात टाक्याजवळील वाटच जास्त वापरातील कारण लव्हाळी वाटेच्या सरळ रेषेत सोंडेवरील नागमोडी वळणं घेत उतराई. दीड तासात भिवपुरी गावात आलो. गावात वाटेच्या आताच्या स्थिती बद्दल विचारलं त्यांचे साधे सोपे सरळ उत्तर कमीत कमी वेळात लव्हाळीने जाता येतं तर कोण वाट वाकडी करून उगाच फेरा मारील. एक हिशेबी तेही बरोबर थोडं खोदून विचारल्यावर, इतिहास मग अमका तमका ग्रुप पुढे विषय आमदार खासदार पर्यंत जाऊ लागला. त्यात काही तथ्य नाही.
बायको मुलांना इतिहास कालीन तलाव दाखविला. आता पुन्हा अर्ध्या तासाची चाल योगायोगाने ट्रॅक्टर जाताना दिसला. सोपानला आवाज द्यायला सांगितले. ट्रॅक्टरवाला नेमका राहुलचा चुलत भाऊ निघाला. तो ही आमच्याकडे पाहून हैराण इथला जन्म असून तो कधीही या वाटेला गेला नाही. घरी आल्यावर राहुलचे बाबा पण आश्चर्य चकित, अहो ही साजीची वाट पूर्वीचा कुसूर घाट त्याकाळी गुर ढोर भरपूर होती तेव्हा वाटेचा वापर होता आता रस्ते झाल्या पासून सारं बंद. इतर बरेच विषय, जेवण झाल्यावर परतीला लागलो. मन नकळत पूर्वीचं या वाटेवरील वैभव आणि आत्ताची परिस्थिती याची तुलना करू लागलं….
योगेश चंद्रकांत अहिरे
फोटो आणी माहिति दोन्हि छान.
फोटो आणी माहिति दोन्हि छान.
नेहेमीप्रमाणे लेख आवडलाच
नेहेमीप्रमाणे लेख आवडलाच
पण पुर्वीच्या वहिवाटीच्या पण आता आडवाट झालेल्या वाटेचे दस्ताऐवजीकरण म्हणूनही हा लेख महत्वाचा आहे.
आवडला लेख.
आवडला लेख.
धन्यवाद.... निर्झरा, हर्पेन
धन्यवाद.... निर्झरा, हर्पेन आणि SRD