सुटकेस ४

Submitted by जव्हेरगंज on 7 May, 2020 - 08:56

सुटकेस ३
------------------------------
ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार!

धूप, उदबत्त्या, फुले यांनी मंदिर अगदी दरवळून गेले होते. भाविक भक्तीत तल्लीन होऊन शंकराचे दर्शन घेत होते. आणि मी एका दगडी खांबाला टेकून उदासवाणा बसलो होतो.
एका उजळ चेहऱ्याच्या साधूने मला खायला प्रसाद दिला. "शंभो.." म्हणून तो पुटपुटला.
"महाराज, मला आशिर्वाद द्या." मी त्याला चरणस्पर्श केला.
"शुभस्तू" तो म्हणाला.
"एक अर्जंट गरज आहे" मी स्वतःला सावरत म्हणालो.
"बोल मुला, काय हवं आहे तुला?" साधूमहाराज दगडी फरशीवर फतकल मारत मला विचारते झाले.
"मला झटपट पैसे कमवायचेत. एका दिवसात. कसे करावे.?" बघूया आता हा साधू काय सुचवतोय ते ऐकायला कान आतूर झाले.
महाराजांनी एक दिर्घ सुस्कारा सोडला. आणि म्हणाले,
"मुला, पैसा म्हणजे शेवटी काय असतं रे? कागदी कस्पटेच ती. जेवढा मागे धावशील, तेवढा त्यात अडकशील. आयुष्यात एकदा जगायला शिक. मग बघ आयुष्य किती सुंदर आहे"

महाराजांनी भलतंच प्रवचन झाडल्याने पुढे काय बोलावे मला कळेना.
"बरं, आभारी आहे महाराज" मी मुंडी हलवत म्हणालो. कदाचित माझा मार्ग मलाच शोधावा लागेल.

मग दुपारी एका हॉटेलात भरपेट जेवलो. नंतर बँकेत गेलो. दरवाज्यापाशी रायफल घेऊन ऊभ्या असलेल्या जवानाला सलाम ठोकला. मग पेट्रोलपंप आणि ज्वेलर्सच्या दुकानात भटकून आलो. रणरणत्या ऊन्हात बाईक घेऊन झोपडपट्ट्या पालथ्या घातल्या. गल्लीबोळात जाऊन पुन्हा टेकडीवरही हिंडलो. शेवटी कंटाळलो आणि मंदिरात आलो.

"अंधार पडत चाललाय पोरा.., आता देऊळ बंद होईल.." साधूमहाराज एका कोपऱ्यात गांजा फुकत बसले होते. तिथूनंच ते म्हणाले.
"महाराज.. मी एक झुरका घेऊ का?" मी त्याच्यापाशी जाऊन कोपऱ्यात बसलो.
"बेतानं पोरा.. कशाततरी अडकलेला दिसतोय.." महाराजांनी चिलीम मला देऊ केली.
"लय मोठ्ठं झेंगाट हाय महाराज.." मी धूर छातीत भरून घेत बोललो. " ऊद्या आपला खेळ खल्लास!

"यावर एक सनदशीर मार्ग आहे" महाराज विचारात हरवून गेले.
"कोणता?" मी डोळे झाकून शांतपणे धूर बाहेर जाऊ दिला. आता हा बुवा अजून एक प्रवचन झाडतोय बहुदा.

"तो" महाराजांनी बोट दाखवले. मी तिकडे पाहिले. ते एक पोलिस स्टेशन होते. हे मला आधीच का सुचलं नाही.

मी लगबगीने उठलो. मनातल्या मनात काय सांगायचे आहे याची जुळवाजुळव केली. आणि गाडीला किक मारली. पोलिस स्टेशनच्या आवारात शिरताच माझा फोन वाजला.
"कुछ नही होगा.."
"हेल्लो?"
"उधर जाके कुछ नहीं होगा" आवाज ओळखीचा वाटला.

"भाई, आप किधर हो? मुझे आपसे बात करना है"
"तेरे पिछे ही खडा हू. मुडके तो देख.."
मी वळून पाहिले तर ती शाही गाडी हायवेच्या टोकाला ऊभी होती. मी झरझर तिकडे निघालो.

"भाई आप बात को समझीये, इतना सारा पैसा मै चोबीस घंटे मे नहीं ला सकता?"
"तो कैसा करेगा?"
"मुझे को सुझ नहीं रहा, आपही बता दिजीये.."
मग त्याने विचार केला. म्हणाला,
"हर महिने दस लाख रूपये"
"मुश्कील है भाई.. ये भी नहीं हो सकता.."

मग त्याने पुन्हा विचार केला. डोकं हलवत म्हणाला,
"अब तू मेरा टाईम वेस्ट कर रहा है. तु बोल, तू क्या करेगा?"
"अगर मै आपके किसी काम आ सकता हू तो.. यानी किसीको मारना हो तो..."
यावर बॉस खळखळून हसला. बाकीचे चौघेही खळखळून हसले.
"आदमी मारके पैसा नहीं मिलता.." भाई माझ्याकडे पहात धारदार म्हणाला," आदमीको जिंदा रखना पडता है. जैसे के तुझे रखा है .."
च्यायला!

"एक पार्सल है भाई.." गाडीतला एकजण म्हणाला.
भाईने त्याच्याकडे पाहिले. आणि त्यांनी काही चर्चा केली. मग भाई माझ्याकडे वळत म्हणाला,
"तुझे साबित करना पडेगा, तू वाकई कितना कामका है. ये सलीम तुझे एक पार्सल देगा, तुझे इस पते पे पहुचाना है." एक चिटोरं मला देत तो म्हणाला.

"कब देना है" चिटोरं वाचत मी म्हटले.
"तू अभी तुरंत निकल, कल पार्सल जतिनभाईको पहुचना चाहिए.. स्टेशन के बाहर सलीमसे पार्सल ले ले." तो सलीमकडे बोट दाखवत म्हणाला.

"भाई, कमसे कम एक गन तो दे दो मुझे.." मी आता रोकडा सवाल टाकला. गाडीतल्या चौघांनी थक्क होईन पाहिले. भाई माझ्याकडे थंडगार नजरेने पाहत राहिला.

"जितना लगता है ऊतना च्युतिया है नहीं तू.." कमरेत हात घालत तो म्हणाला, "ये ले" पिस्तुल हातात देत तो शांतपणे म्हणाला. "इससे सिर्फ डरानेका, चलानेका नै. समझ्या?"
"जी भाई." चकचकीत पिस्तुल हातात घेऊन मी क्षणभर न्याहाळले. आणि लगेच बॅगेच्या आतल्या कप्प्यात लपवून ठेवले.

"सलाम भाई.." चेहऱ्यावर हास्य ठेवत मी भाईला सलाम ठोकला.

उलटे वळण घेऊन शाही गाडी भरधाव निघून गेली.

अंधार बराच पडला होता. प्रखर दिव्याच्या गाड्या धावत होत्या. हायवे नेहमीसारखाच पण विचित्र भासत होता. "जिंदगी हे ऍडव्हेंचर आहे." विक्या एकदा म्हणाला होता. "जितके धक्के जास्त खाशील. जिवनाला तितक्या जवळून पाहशील."

मी गाडीला किक मारली आणि शेवटी घराकडे निघालो.

"अरे पण गुजरातला कशी ही व्हिजीट? आणि एवढ्या अचानक? आधी कधी गेला नाहीस असं?" बायको विचारत होती.
"नवीन साईड चालू झालीय ऑफिसची. वरून ऑर्डर आहे. जायलाच पाहिजे." मी बॅग भरत बोललो.
"किती दिवस आहे?"
"असेल दोन चार दिवस " मी कपाटातल्या बंडलातले पन्नास हजार हळूच काढून घेतले.
बायको मागेच ऊभी होती. कधी आली कळालेच नाही.

"कसली सिगारेट पिलायस तू? किती भयंकर वास येतोय.." आता ती जास्तच मागे मागे करत होती.
"जरा वेगळी ट्राय केली आज. नाही आवडली. सॉरी." मी शूज वगैरे घालून निघायला तयार झालो.

"काळजी घे." ती म्हणाली.

"बाय.." म्हणत मी स्मितहास्य करून खाली आलो आणि गाडीला किक मारली. आणि हायवेने सुसाट स्टेशनच्या दिशेने निघालो.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Too filmy.

भारी !

हा भाग वाचून वाटलं शॉर्ट फिल्म किंवा वेब्सिरिज होइल मस्त