लोकडाऊन ३.० - भांडी घासण्याची पाककृती

Submitted by ऋयाम on 2 May, 2020 - 05:42

साहित्य:

  • भांडी - दहा ते बारा (मध्यम आकाराची)
  • साबण - वडी. (द्रवरुप असला तरी चालेल. )
  • घासणी- एक स्कॉच ब्राईट, एक तारेची
  • पाणी - नळाचे. (बादलीत भरलेले असले तरी चालेल..)
  • पाककृती करण्यास लागणारा वेळ : *स्वादानुसार?

*स्वादानुसार - जी स्वादिष्ट पाककृती केली असेल, त्याप्रमाणे तिला लागणारी भांडी कमी किंवा जास्त प्रमाणात वापरावी लागतील.

* * * * * * *

चित्रपटामधे ज्याप्रमाणे लव्हयू मिसयू दाखवतात, पण नंतरचा संसार दाखवित नाहीत, त्याच प्रमाणे यूट्यूबवरदेखिल 'लोकडाऊन में बोर हो गये? तो घरमें होटल जैसा केक्/पिझ्झा/बिर्याणी/..' बनविण्याच्या चिकार पाककृती मिळतील. परंतु ह्या पाककृतींचा पुढचा भाग, अर्थात 'भांडी घासण्याची पाककृती' सहसा कुठे दिसत नाही. नाही म्हणायला अंदाज अपना अपना मधे श्री अमर शेठ उर्फ बडे मामू यांनी जाता जाता ह्या विषयावर थोडा प्रकाश टाकला आहे. मात्र ती क्रमवार पाककृती नाही.

तसे पाहता ही पाककृती बर्‍यापैकी सोपी म्हणता येऊ शकते. भांडी विसळून घ्यायची, साबण लावायचा, आणि घासून, धुवून-पुसून भांडी योग्य जागी ठेवून द्यायची. झालं. परंतु, एखादी पाककृती एखाद्यावेळेस करणे आणि लोकडाऊन च्या निमित्ताने नित्यनेमाने करणे ह्यात फरक असतो. लोकडाऊन ३.० घोषित झाला, तेव्हा मला आता बर्‍यापैकी जमू लागलेली ही पाककृती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली.

पूर्वतयारी: सर्वप्रथम भांडी विसळून घ्यावीत.
कुठलेही भांडे नंतर सहज घासता यावे, ह्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भांडे घासायला ठेवताना त्यात थोडे पाणी घालून ठेवणे ही होय. शक्य झाल्यास ती विसळून ठेवावीत. त्याच सोबत घरातील सर्वांनी आपापली ताटे ठेवत असताना त्यात काही शिल्लक राहिले असेल तर ते ताबडतोब ओल्या कचर्‍यात टाकावे. जास्ती तेलकट/ तूपकट भांडी सुरुवातीपासूनच वेगळी ठेवावीत आणि शेवटी घासावीत. त्यांना स्वच्छ करण्यास जास्त वेळ लागतो. शक्य झाल्यास अशा भांड्यांमध्ये गरम पाणी घालून ठेवावे. स्वच्छ भांडी स्वच्छ करायला सोपी पडतात.

क्रमवार पाककृती:

भांड्यांना साबण लावून घ्या
एकेक करून भांड्यांना साबण लावून लगेच ती धुवून घेणे शक्य आहे. पण त्यात पाणी आणि वेळ अशा दोन्हीचा अपव्यय होत असल्याने शक्यतो ते टाळावे. सर्वप्रथम सर्व भांड्यांना साबण लावून घ्यावा. इथे सर्वांसाठी एक टीप शेअर करावीशी वाटते - एकाच प्रकारची, किंवा आकाराची भांडी एका बाजूला करून ती गटागटाने हाताळली, तर ती स्वच्छ करणे सोयीचे पडते. माझ्या मते सर्वात पहिला क्रमांक चहाचे कप, किंवा काचेच्या डीशचा घ्यावा पण तुम्ही प्रेशर कूकर, पिंप किंवा टाकीपासूनही सुरुवात करू शकता.

भांड्यांना साबण लावताना एक नियम नेहेमी लक्षात ठेवावा, तो म्हणजे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा. खास करून काचेची भांडी हाताळाताना हा नियम जरूर ध्यानात असावा. सुरुवातीला एकदोन वेळेस विसर पडला, तरी पुरेशी भांडी पडल्यावर तो कायमचा मनावर कोरला जाईल, काळजी नसावी.

साबण लावतानाचा दुसरा नियम प्रमाणाशी (क्वांटीटी) निगडीत आहे. जास्त साबण वापरला, म्हणजे भांडी जास्त स्वच्छ होतात असे नाही. उलट त्यामुळे जास्तीचे पाणी आणि जास्तीचा वेळ खर्च होतो. मुळातच द्रवरूप असलेले साबण, झाकण उघडताच भसाभसा बाहेर येतात. मग ते प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पुन्हा भरणे गैरसोयीचे होते. ह्या कारणास्तव, साबणाची वडी वापरणे सोईचे ठरते . त्यामुळे गरजेपुरते साबण-पाणी वापरून, उरलेल्या वेळात पुढची लोकडाऊन-पाककृती पहावी.

भांडी घासून घ्या
माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हीसुद्धा गटागटाने भांड्यांना साबण लावला असेल, तर ती घासू लागण्यापूर्वी पुन्हा एकत्र करण्याची गरज नाही. भांडी घासताना देखिल ती गटागटाने घासणे सोयीचे पडते. काचेच्या किंवा इतर नाजूक भांड्यांसाठी स्कॉच ब्राईट किंवा तत्सम घासणी; तर तूप कढविण्यासाठी वापरलेल्या कढई, किंवा दुधाचे *करपलेले भांडे इत्यादीसाठी तारेची घासणी वापरणे सोयीचे पडते.
* सध्या माझा किचनमध्ये सर्वत्र वावर आहे...

तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण भांड्यांना साबण लावतानाचा न्यूटनचा गुरुत्त्वाकर्षणाचा नियम, भांडी घासून घेतानाही लागू पडतो हे जरूर ध्यानात ठेवावे. इथे सर्वांसाठी एक छोटीशी रंजक गोष्ट, म्हणजे स्वानुभव सांगावासा वाटतो. मोठी कढई बेसिनमध्ये असताना, आपण चमचे घासत असाल, आणि हातातले तीनचार चमचे अचानक कढईवर पडले, तर थेट 'डब्ल्यू-डब्ल्यू-एफ' ची मॅच जिंकल्यासारखा आवाज येतो. (कढईत पाणी नसताना..) नव्वदीच्या दशकातल्यांना हा आवाज परिचित असेल. मात्र इथे आपण जिंकलेले नसल्यामुळे काही क्षणांनी पुन्हा जमिनीवर यावे आणि काम सुरु करावे.

भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
पाण्याचे महत्त्व मी समजावून सांगण्याची गरज नसावी. त्यामुळे कृपया नळ सुरु ठेवून भांडी धुवायला सुरुवात करू नये. किमान, नळ किमान पातळीवर सुरु ठेवूनच भांडी धुवू लागावे. बादलीतले पाणी घेऊन भांडी धुवायची असल्यास, सगळी भांडी बादलीत बुचकळू नयेत. एकेक करून पाणी भांड्यांवर ओतून घ्यावे. साबण लावताना तसेच भांडी घासून घेतानाप्रमाणेच, ती धुवून घेतानाही गटागटानेच ठेवावीत.

भांडी योग्य जागी ठेवावीत
पाककृतीमधील ही पायरी वाटते तितकी सोपी नाही. सर्वप्रथम, धुतलेली भांडी लगेचच योग्य जागी ठेवता येतील हा समज मनातून काढून टाकावा. खरे तर धुतलेली भांडी कधीही योग्य जागी ठेवता येतील हा समजच मनातून काढून टाकावा. गटागटाने ठेवलेली भांडी चांगली झटकून घ्यावीत, त्यामुळे त्यातले ९९.९९% पाणी काढून टाकता येते. भांडी कितीही झटकली तरी शेवटी काही थेंब पाणी फडताळात पडतेच. त्याला इलाज नाही. लोकडाऊन ३.० मध्ये फडताळाचे दार नीट लागेल इतपत भांडी ठेवता येऊ लागली, तर ते पुरेसे योग्य समजता येईल..

फोटो : आज ही पाककृती इतकी चांगली जमली, की लगेचच भांडी योग्य जागी ठेवल्यामुळे फोटो काढता आला नाही. पुढच्या वेळेस फोटो पाठवीन.. तुम्हीही ही पाककृती करून पहा आणि फोटोही पाठवा.

धन्यवाद!

- - - - - - - -

समारोप १ :

सुरुवातीला कटकटीचे वाटणारे हे काम नंतर सवयीचे होते असे ५० टक्के लोक (स्त्रोत - सूत्र) म्हणतात. त्या एका व्हॉट्सअ‍ॅप जोकमधे 'ज्या दिवशी तुम्हाला भांडी घासण्याच्या साबणाचा वासही काहिसा बरा वाटू लागेल, त्या दिवशी तुम्ही गृहकृत्यदक्ष होण्याची एक पायरी पास झालात (एकूण पायर्‍या : १००)!" असे काहीसे लिहीलेले वाचले होते. ते थोडेसे पुढे नेऊन "रोज भांडी घासू लागल्यावर काही ठराविक भांडी (उदा. गंज वगैरे उंच भांडी) नावडतीच राहतील. पण आवडती भांडी घासण्याचे कष्ट वाटणार नाहीत", ती म्हणजे दुसरी पायरी असावी की काय? असे मला वाटले.

लॉकडाऊन १.० संपत आला, तोपर्यंत ह्या कामाची बरीच सवय झालेली होती. आता एक मोठे पातेले धूत असताना अचानक सई परांजप्यांच्या 'कथा' चित्रपटातल्या त्या चिडक्या काकू आठवल्या. खाली खेळणार्‍या लहान मुलांचा रबरी बॉल त्यांच्याकडे जातो आणि काच फुटते. त्या चिडून लहान मुलांचा रबरी बॉल विळीवर चिरून त्यांना परत देतात. ह्याच चिडक्या काकू नंतर त्यातल्या "कौन आया"(?!) गाण्याच्या वेळी खुशीत एक तांब्याचा हंडा घासताना अगदी तालात त्या हंड्यावरुन हात फिरवतात. ही आठवण अचानक का यावी, ह्याला फारसा अर्थ आणि कदाचित उत्तर देखिल नाही.

मात्र लॉकडाऊन नं३ सुरु होईपर्यंत विविध भांडी धुवायला लागल्यामुळे कॉपर बॉटम भांडी, लहान भांडी, मोठी भांडी, इडली पात्र, रवी, मोठ्या परातीचे ठोकून काढलेले नक्षीकाम, भेट मिळालेल्या जुन्या भांड्यांवर लिहीलेली नावे सतत दिसत राहतात. जुन्या भांड्यांचे घाट आणि आकार इत्यादी लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आठवू लागतात आणि ह्यात आपल्याला अजूनपर्यंत फारसा न कळालेला काही भावबंध आहे, असे काहीसे डोक्यात येऊ लागते.. दोन मिनीटे ठिक आहे, लगेच पुढचे भांडे हाती घ्यावे.

समारोप २ :

कोणी कितीही नवशिका असला, तरी सकाळी दात घासल्यावर काल रात्री खाल्लेल्या पालकच्या भाजीचे अवशेष आज दिसत नाहीत. ती टूथपेस्टची जाहिरात खोटी आहे. त्याचप्रमाणे कोणाही नवशिक्या/कीने वरील पाककृती मनापासून केल्यास तुमची भांडी लख्ख निघतील, शिल्पा शेट्टीच्या मैत्रीणीसारखी गत होणार नाही.

समारोप ३ :

राखीव. (लॉकडाऊन ३. नंतर लिहीणेत येईल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिले आहे.
चहा आणि दुधाची भांडी पण शेवटी. आणि नंतर ती घासणी स्वच्छ करुन त्याला दुधा-तुपाचा वास येत नाही ना ह्याची खातरजमा करुन ठेवावी. मी उगीच वर्गीकरण करत नाही. हाताला येईल ते भांड घासायचं. नळ बारीक धार सुरू ठेवल्याने फरक पडतो. मनाला यातना होत असतील तर ठेवू नये.

मस्त लेख. आमच्याकडे मुलगा घासतो आहे एक महिन्यापासून. बऱ्याचदा कुरकुर करतो पण त्याला पैसे मिळणार आहेत. न कुरकुरता करण्याचे, भांडी तर घासावीच लागणार आहेत असे ठरले आहे. कुरकुर केली की नो पे Happy .
मुलगी कुरकुरीचा हिशेब ठेवते आहे Lol .

आत्ता एक तासापुर्वी माझ्या बँक अकौंटला दीड हजार रू. जमा झाल्याचा मेसेज आला. दीड हजार कसले जमा झाले असावेत, हेच काही कळेना. पगार बँकेकडे पाठवला आहे असा कंपनीचा मेसेज सकाळीच आला होता. हे दीड हजार कुठले? ही काय शासकीय मदत बिदत आली की काय ?

बायकोला मेसेज दाखवला आणि नवरा म्हणाला, "अगं हे दीड हजार रूपये कशाचे जमा झाले हेच लक्षात येईना ?"

बायकोने सांगितले - " मीच ट्रान्सफर केलेत, तो तुमचा एप्रिल महिन्याचा घरकामाचा पगार आहे. खाडे धरले नाहीत. या महिन्यात मात्र दांड्या मारू नका नाहीतर कट करेन.."

नवरा - " फक्त दीड हजार ? कामवालीला तर तीन हजार रुपये देतेस."

बायको - "कामवालीला जेवून खावून पगार नसतोय, सुका असतोय. तुमचे दोन वेळच्या जेवणाचे आणि चहा, नाष्ट्याचे कापून घेतलेत."

#लॉकडाऊन इफेक्ट.

मस्त उपयुक्त लेख आहे. प्रतिसादही उपयुक्त आणि विनोदी येतील

सुदैवाने आमच्या घरी स्वयंपाक, भाण्डी घासणे, साफसफाई हि तीन कामे माझ्या हातचे कोणी खाऊ शकत नसल्याने, मला स्वच्छ घासणे जमत नसल्याने आणि धुळीची ॲलर्जी असल्याने माझ्या वाट्याला येत नाहीत.

पण एखादा लॉकडाऊन आई सोबत नसेल आणि फक्त बायकोसोबतच काढावा लागला तर तेव्हासाठी धागा वाचनखूणात ठेवतो

सुदैवाने आमच्या घरी स्वयंपाक, भाण्डी घासणे, साफसफाई हि तीन कामे माझ्या हातचे कोणी खाऊ शकत नसल्याने, मला स्वच्छ घासणे जमत नसल्याने आणि धुळीची ॲलर्जी असल्याने माझ्या वाट्याला येत नाहीत. >>>> ही सोयीस्कर पळवाट वाटते आहे. नशीब तुमचं, माझ्यासारखी बायको नाही. मी स्वच्छ न निघालेली भांडी परत धुवायला दिली असती. रोज दोनवेळा भांडी घासावी लागताहेत म्हटल्यावर पाच दिवसानी फर्स्ट अटेम्प्टलाच स्वच्छ घासली गेली असती. आणि स्वयंपाक येत नसेल तरी तयारी करणं किंवा चॉपिंग करणं अशी काम करत येतात. बायको अगदीच अमृता ( रेफरन्स - थप्पड) टाइप दिसते आहे Wink

भांडी घासणे कृती मस्त ! एकदम तपशीलवार लिहिले आहे.