* नावे मुद्दाम काल्पनिक घेतलेली आहेत.
_____________
काही महीन्यांपूर्वी प्रीती फेसबुकवरती सापडली. या पूर्वीही अनेकदा शोध घेऊनही सापडली नव्हती ती अवचित गुगलवरती पहील्यांदा सापडली. फोटोवरुन मी तिला तत्काळ ओळखले व नंतर फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. तिने ती अॅक्सेप्ट केली तो दिवस अतिशय आनंदात गेला. कारण हॉस्टेलवरचे मनोरम दिवस आम्ही एकत्र एन्जॉय केलेले होते, तिला माझी सिक्रेटस जशी माहीत होती तशी मला तिची. अनेक एकत्र केलेले नाईटआऊटस व मग्गुगिरी डोळ्यांसमोर तरळून गेली. प्रीती सुंदरच दिसत होती. अंगयष्टी राखलेली, राँग साईड ऑफ ४० मध्ये असली तरी पस्तीशीची वाटणारी, डिझायनर कपडे व बॅकग्राऊंडला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील फोटो. कधी पॅरिसचे कलादालन तर कधी ग्रीक पुतळे, कधी बँकॉकच्या, सिंगापूरच्या इमारती तर कधी सिडनीचे ऑपेरा हाऊस. हे सर्व पाहून डोळे निवण्याआधी माझे लक्ष गेले ते तिच्या आडनावाकडे प्रीती शुक्ला. ह्म्म्म ... प्रीती श्रीवास्तव नाही. : (
हॉस्टेल ११ वरती आमच्या दोघींच्या रुम्स समोरासमोरच्या. सकाळी आंघोळी ला पळताना, मेसमध्ये दुपारी किंवा रात्री जेवताना, एकमेकींशी हाय हॅलो होत असे ज्याची परिणीती मैत्रीत कधी झाली त्याचा पत्ताही लागला नाही. मिथुन राशीची, प्रीती मला चटकन आवडली. फुलपाखरासारखी रंगीबेरंगी, लाइट हार्टेड, स्वभावाने गोड, मदतशील व जनरसही. प्रीतीच्या मैत्रीतील आकर्षणाचे श्रेय थोडे तिच्या फक्त तिच्या रुमवरती असणार्या इलेक्ट्रिकल हॉट प्लेटलाही जाते. दर नाईट आऊटला म्हणजे दर वीकेंडलाच आमचे रात्रीचे जागरण तिच्या रुममध्येच होई. कारण चहा व २ मिनटस मॅगी तिच्याकडे करता येत असे. त्याकरता मग बॉइज हॉस्टेल २ च्या जवळच्या चिंको (चायनीज कॉर्नर) मध्ये खेप घालावी लागत नसे. कॉलेजच्या आवारातच असल्याने, जरी अगदी १००% सुरक्षित असले तरी तिथे जाऊन ऑर्डर करणे जीवावरती येई. त्याऐवजी कोरडा खाऊ व मॅगी, चहावर वेळ मारुन नेता येत असे.
ती इलेक्टिकल इंजिनिअरींग मध्ये पी एच डी करत होती. तिचा सिनीअर होता - संजय श्रीवास्तव. तोही पी एच डीच करत होता. पण २ वर्षे प्रीतीहून पुढे होता. मी त्याला त्या २ वर्षात कधीच पाहू शकले नाही कारण तशी संधी आलीच नाही पण ऐकून खूप होते. तो कसा हुषार आहे, अबोल आहे, प्रीतीला तो किती आवडतो, त्याचे अमेरीकेला जाण्याचे स्वप्न वगैरे वगैरे. प्रीतीला तो वेड्यासारखा आवडे. म्हणजे ती तासन तास स्वप्नाळू आवाजात तिच्या व त्याच्या भविष्याबद्दलचे मनसुबे मला सांगे, भरभरुन बोले. खरं त्याचा नकार हा आम्ही दोघींनीही तेव्हाच ताडायला हवा होता. कारण मुलींच्या खोलींवरती त्या त्या मुलीचा मित्र येत असे. पण प्रीतीकडे श्रीवास्तव कधीच आला नव्हता. तिने बोलावले नव्हते असे नाही पण त्याने नेहमीच टाळले. पण प्रीती आणि मी आमचे वय असे होते की प्लॅटॉनिक, अंतरावरच्या प्रेमावरती आमचा तेव्हा अगदी पूर्ण विश्वास होता.
प्रीतीने रविवारचा पेपर लावलेला होता व रविवारी सकाळी कधीकधी दारावर थाप मारुन ती मला त्या पेपरातील "लव्हर्स कॉर्नर" दाखवे. कोण्या नोमॅड का तत्सम नावाचा आय डी त्यात काहीबाही शेर, फिश्पाँड टाके. प्रीतीला वाटे लाजाळू असल्याने श्रीवास्तव या माध्यमातून तिच्याकडे प्रेम जाहीर करतो. बरे माझ्याही कधी लक्षात आले नाही की हे Pure delusion असू शकते. एकदाच मी तिला विचारले होते कशावरुन तो श्रीवास्तवच होता? यावर तिचे म्हणणे होते की तिला खात्री होती. मी मग फार खोदले नाही.
श्रीवास्तवचा थिसिस पूर्ण झाल्यावरती श्रीवास्तव निघून गेला. प्रीती वाट पहात असे त्याच्या पत्राची. तिनेही त्याला बरीच पत्रे पाठवली पण उत्तर कधीच आले नाही. शेवटी सैरभैर झाल्याने तिला इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा ताण झेपेनासा झाला, गाईडनेही आशा सोडली व एके दिवशी प्रीती तिच्या आईवडीलांबरोबर मध्य प्रदेशात निघून गेली. पुढे मी पासाआऊट झाले. कालांतराने मला प्रीतीच्या लग्नाची बातमी मैत्रिणीने सांगीतली. प्रीतीला पत्र पाठवुन मी प्रीतीचे अभिनंदन केले.
फेसबुकवर अॅड केल्यानंतर तिने श्रीवास्तवचा विषय कधीच काढला नाही. पण एके दिवशी मनाचा हिय्या करुन्,मीच तिला मेसेज केला. की बाई तू खुशीत दिसतेस खरी पण काय झाले तू सोडून गेल्यावरती तू काय केलेस? तुला श्रीवास्तव कधी भेटला का? कारण delusional असलं, फसवं धूसर असलं तरी तिने उत्कटच प्रेम केलेले होते. तिचे यावर उत्तर होते की बराच काळ शोक करुन, बराच काळ डिनायलमध्ये घालवुन, तिने श्रीवास्तव चॅप्टरच अॅम्प्युट केला होता.व एकदा ते वास्तव सिविअर केल्यानंतर खरं तर स्वीकारल्यानंतर तिने परत मागे वळून ना पाहीले ना तिला त्याबद्दल काही भावना आहेत. या सर्व कथेत एक सोलेस हा होता की त्याने कधीच तिला फसवी आशा दाखवली नव्हती, ना कधी तिचा फायदा मग आर्थिक अथवा कसाही घेण्याचा प्रयत्न केला होता.
खरं तर या तिच्या उत्तरानंतर मी विचारात पडले होते की असं आपल्या कल्पनेतील का होईना पण प्रियकराला तोडता येत असेल का? नवर्याच्या बाहूपाशात प्रीतीला एकदाही तो आठवला नसेल? मनात का होइना तिने कधीच प्रतारणा केली नसेल? पण हे विचारणारे कोणाला पेक्षाही विचारणारी मी कोण होते? तिच्या डागण्या तिला माहीत. तेव्हाही प्रीती फुलपाखरुच होती आत्ता फेसबुकवरही ती तशीच विविधरंगी मोहमयी फुलपाखरुच दिसत होती. नवरा सुखवस्तू भासला व लौकिकार्थाने तो यशस्वी तर होताच. प्रीती अनेकानेक देश फिरली होती, फिरत होती, नोकरी करणे ना तिची गरज होती ना विकल्प. एक टीनेजर मुलगाही होता. पण ती सुखी होती का? ना ती मला सांगणार होती ना फेसबुकवरचे मायावी फोटो आपण होऊन मला काही सांगत होते. माझ्या फ्रेन्ड लिस्टमध्ये फक्त एक आकडा वाढला होता, फ्रेन्ड्लिस्ट जरा अधिक फुगली होती. जय फेसबुक! ज्याने लोक जवळ येण्यापेक्षा अधिक दुरावतानाच पाहीले आहेत. प्रामाणिक संवादापेक्षा, बेगडी आभासांच्या मागे धावतानाच पाहीले आहेत. पण मनातून मला वाटत राहीले ही नवी प्रीती भेटली नसती तरच बरे झाले असते कारण परत ना आम्ही मेसेज पाठवला ना फोन केला. फक्त फुले, पक्षी, फोटो, सुखद आभास नित्यनेमाने शेअर करतो.कदाचित श्रीवास्तवच्या चॅप्टरचाच मीही एक भाग होते, अँप्युट करण्यालायक. अगदी हेच कारण मला पटते.
छान आणि खरं लिहिलंय.. आवडलं..
छान आणि खरं लिहिलंय.. आवडलं.. काही नाती मुळातच आभास असतात..
पण ती मुव्ह on झाली हे वाचून
पण ती मुव्ह on झाली हे वाचून चांगले वाटले.
काही काही नाती त्या त्या दिवसांपुरती असतात. तेव्हा ती तितकीच खरी , उत्कट आणि जवळची असु शकतात. मेबी तुम्ही तिला तिच्या जुन्या प्रेमाची आठवण करून देता म्हणून तिने टाळले असेल. माणसाचे मन काय कशाशी रिलेट करेल सांगता येत नाही.
>>>>तिच्या जुन्या प्रेमाची
>>>>तिच्या जुन्या प्रेमाची आठवण करून देता म्हणून तिने टाळले असेल.>>> नाही आदिश्री इन रिअॅलिटी मी तिला कधीच विचारु शकले नाही. मला धीर झाला नाही. आणि तरीही तिने मला टाळले. तेव्हा मी हे प्रसंग मनातच रचले. तिला मात्र तो गेल्यावरती फार लागले होते. शी ड्रॉप्ड आऊट फ्रॉम आय आय टी, इन्जिनीअरींग. खूपच धाडस लागतं, आय आय टी ची डिग्री हवेत सोडून द्यायला.
विचारुन नाही फक्त दिसल्याने,
विचारुन नाही फक्त दिसल्याने, फोटो पाहिल्याने नाव पाहिल्याने वगैरे actual presence ने नाही. मला माहिती आहे तू कुणाला awkward करणार नाहीस ..विचारणे तर दूरच...Sorry मी नीट लिहायला हवे होते
अर्रे नो प्रॉब्स. लोकांना
अर्रे नो प्रॉब्स. लोकांना ऑकवर्ड करण्यात मी केपेबल आहे
माझ्या एका मैत्रीणीचं नाक चेटकिणीसारखं लांSSSब आहे. मी तिला विचारलेलांं की नाक लहानपणी लहान असतं व पुढे तेही वाढतं का 
(No subject)
मी लिहिलेला एक मोठा प्रतिसाद
मी लिहिलेला एक मोठा प्रतिसाद गायब झाला
असो. आता परत सगळं लिहीत नाही.
लिखाण आवडलं. मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली.
सर्वांचे आभार. वावे जमल्यास
सर्वांचे आभार. वावे जमल्यास प्रतिसाद परत टायपावा
माझीही ती मैत्रीण मध्य
माझीही ती मैत्रीण मध्य प्रदेशातलीच. पुण्यात नोकरीसाठी आली होती. मी तेव्हा कॉलेजला होते. एकाच पेईंग गेस्ट accommodation ला आम्ही रहात होतो. रूम्स वेगवेगळ्या.

तिच्या कॉलेजच्या एका सीनिअरवर तिचं प्रचंड प्रेम होतं. म्हणजे तिचं एक वाक्य अजून माझ्या लक्षात आहे. " वो आदमी अगर जिंदगी में नहीं है तो कुछ नहीं है" त्याच्या नावाचा (first name) (आणि म्हणे त्याच्यासारखा आवाजही असणारा ) एक वृत्तनिवेदक तेव्हा रात्री नऊ वाजता एनडीटीव्हीवर हिंदी बातम्यांंना असायचा. तर ही त्या बातम्या नक्की जाऊन ऐकायची. तिने तिकडे असताना त्याला प्रपोज केलंही होतं. पण त्याने सांगितलं होतं म्हणे की मला आत्ता करिअरकडे लक्ष द्यायचंय. हिची थांबायची तयारी होती आणि.
अशा या मुलीला मग इथल्या ऑफिसमधल्या एका मुलाने प्रपोज केलं. पहिल्या पहिल्यांदा त्याचा फोन आला की रागाने कट करून फोन खाली आपटणारी ती, नंतर त्याच्या प्रेमात पडली!! पार बुडाली प्रेमात. मग त्याच्याशी लग्नही झालं.
आता बऱ्याच वर्षांत काही संपर्क नाही तिच्याशी.
अरे मस्त कहाणी आहे तुमच्या
अरे मस्त कहाणी आहे तुमच्या मैत्रिणीची.
खूप आवडले लिखाण... काही
खूप आवडले लिखाण... काही गोष्टी अर्धवट राहतातच...
बादवे - हि एक कथा म्हणून मजेशीर बनवता येईल... शेवटच्या परिच्छेदात असा ट्विस्ट मारायचा कि निवेदिकेचे लग्नानंतरचे नाव श्रीवास्तव आहे
छान लिहीलं आहे. शेवटचा
छान लिहीलं आहे. शेवटचा परिच्छेद छान वाटला..
तुमची इतकी छान मैत्री होती तर
तुमची इतकी छान मैत्री होती तर मला वाटत प्रीती बोलेल तुला,आणि तुला टाळायचं च असत तर request accept केली नसती.
त्या वेळी खूप महत्वाच्या
त्या वेळी खूप महत्वाच्या वाटण्याऱ्या गोष्टी आज अगदी क्षुल्लक वाटू शकतात. प्रत्येक वेळी मनःस्तिथी वेगळी असू शकते. आयुष्य इतकं पुढे निघून जातं की काही घटना आठवाव्याशाही वाटत नाहीत. त्यावर बोलणं तर निव्वळ वेळेचा अपव्यय.