फक्त स्त्रियांसाठी - तुम्हाला मूल हवं होतं / आहे का ?

Submitted by राधानिशा on 17 April, 2020 - 13:21

ह्या धाग्यातले प्रश्न फक्त स्त्रियांचे या विषयावरचे विचार जाणून घेण्यासाठी आहेत . आई , बहीण , पत्नी , नातेवाईक स्त्रिया किंवा एकूण जग पाहून आलेल्या अनुभवातून स्त्रियांच्या विचारभूमिकेचे एक्सपर्ट समजणाऱ्या किंवा खरोखरच एक्सपर्ट असलेल्या पुरुष सदस्यांनी प्रतिसाद नाही दिलेत तर मी आभारी राहीन .. फक्त मायबोलीवर सक्रिय असलेल्या स्त्री सदस्यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे .

भारतात अजूनही बहुतेक स्त्रियांना नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य नाही ... मूल हवं आहे की नाही असा प्रश्न स्वतःला विचारण्याचं स्वातंत्र्य / परिस्थिती नाही असं कंडिशनिंग आहे अशी सामाजिक परिस्थिती आहे ... सुशिक्षित स्त्रियाच याबाबत थोडाफार विचार करू शकतील अशी परिस्थिती आहे ..

१ - तुम्ही विवाहित असाल तर विवाहापूर्वी आपल्याला मूल हवं आहे का , असा प्रश्न स्वतःला विचारला होता का की 10 वी नंतर 11 वीला जाणं ह्याशिवाय बहुतेक मुलांसमोर दुसरा ऑप्शन नसतो , त्याप्रमाणे ती गोष्ट अपरिहार्यच आहे असा विचार तुम्ही केला होता ? किंवा त्यात काय विचार करायचा , लग्नानंतर मूल होणारच / व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा इतरांची तुमच्याकडून असणार , तेव्हा याबाबतीत आपल्याला चॉईस नाहीच ... अशी परिस्थिती होती ?

अविवाहित असाल तरी हाच प्रश्न आहे .. तुम्ही " मला मूल हवं आहे का ? " ह्या गोष्टीचा विचार केला आहे का की परिस्थितीमुळे हा प्रश्न उपस्थित करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही ?

२ - विवाहित , मूल असलेल्या स्त्रियांना - मातृत्वाची भूक / माझं स्वतःचं मूल असावं ही इच्छा तुमच्या मनात नक्की कधी निर्माण झाली ?

वैवाहिक आयुष्याची स्वप्नं रंगवताना प्रेग्नन्सी आणि बाळाचा विचार सुरू केला होतात का ?

की त्याहीपुर्वी लहानपणी किंवा साधारण 12 - 13 व्या वर्षीपासून असल्यापासून कुटुंबातील / शेजारच्या / दुसऱ्या कुणाच्यातरी लहान मुलांना खेळवताना मातृसुलभ भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या होत्या का ? बाळाची काळजी घ्यावी ; त्याला जपावं वगैरे .. आणि भविष्यात एक दिवस
माझंही असंच छान बाळ असणार हा विचार करून बरं वाटलं होतं का ? कि प्रत्यक्ष तुमचं मूल जन्मल्यानंतरच मातृसुलभ भावना निर्माण झाल्या ? त्यापूर्वी मुलांची विशेष आवड नव्हती पण स्वतःच्या मुलावर मात्र लगेच प्रेम उत्पन्न झालं असं कोणाच्या बाबतीत झालं का ?

अविवाहित स्त्रियांना - तुम्ही याबाबत काय विचार केला आहे ?

३ - विवाहित आणि अविवाहित स्त्रियांना प्रश्न - मूल नको असणाऱ्या बाईशी कोण लग्न करणार ... आणि ते बरोबरच आहे तेव्हा मूल हवं की नको ही काही विचार करण्याची गोष्ट नाहीच , असं तुम्हाला वाटत होतं का ? अजूनही तसंच वाटतं का ?

४ - ठराविक वयानंतर जोडीदार हवा , शारीरिक , भावनिक गरजा भागविण्यासाठी... अशी स्पष्ट सूचना शरीर आणि मन देतं असं गृहीत धरलं ... म्हणजे एखादी मुलगी म्हणते मला लग्न , जोडीदार हवा आहेच , मला एकटीला राहायचं नाही हे निश्चित आहे .. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऍडजस्टमेंट्स अगदी क्षुल्लक वाटतात... उदा . दुसऱ्या घरात जाऊन ऍडजस्ट होणे , नवीन माणसांशी जुळवून घेणे वगैरे

तशी स्पष्ट सूचना शरीर आणि मन बाळाबाबत देतात का ? की मला आता माझं मूल हवच आहे .. तो सर्वस्वी माझा स्वतःचा निर्णय आहे ... मला मातृत्व अनुभवायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे ... एवढी क्लॅरिटी तुमच्या मनात होती का / ( अविवाहित असाल तर ) आहे का ?

की मूल व्हावं ती एक कुटुंबाच्या , समाजाच्या अपेक्षांमधून निर्माण झालेली इच्छा असते ? प्रत्येकीचा वेगळा अनुभव असणार , तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा सांगितलात तरी फर्स्ट हँड इन्फर्मेशन मिळेल .

क्षणभर कल्पना करा जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कुटुंबापासून , समाजापासून लांब एखाद्या बेटावर राहत असता , कोणाच्याही मतांचा तुमच्यावर दबाव किंवा प्रभाव नसता आणि तुमचा जोडीदार याबाबतीत " तुझी जी काय इच्छा असेल ती मला मान्य आहे " असं म्हणत असेल ... तर तुम्ही काय निवडाल ? मूल होऊ देणं की न होऊ देणं ?

५ - विवाहित स्त्रियांना - जर लग्नापूर्वी " मूल होऊ देणं न देणं हा तुझा निर्णय असेल / हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुला असेल असं सांगणारा चांगला मुलगा ( म्हणजे वर म्हणून इतर सर्व दृष्टींनी चांगला मुलगा ) तुम्हाला सांगून आला असता तर त्याच्या निवडीकडे तुमचं झुकतं माप असलं असतं का ?

अविवाहित स्त्रियांना - हाच प्रश्न ... लव्ह मॅरेज नसेल , अरेंज्ड करणार असाल तर असं निर्णयस्वातंत्र्य देणारा मुलगा तुम्ही अधिक पसंत कराल का ? आणि मला मूल नको आहे हा निर्णय घ्याल का ?

६ - दुर्दैवाने सगळेच संसार काही दृष्ट लागण्यासारखे नसतात .. जोडीदाराच्या स्वभावामुळे / सासरच्यांच्या वागण्यामुळे काही स्त्रिया असमाधानी असतात ... अशावेळी मूल नसतं तर आपण या माणसाला सोडून बाहेर पडलो असतो .. माहेरी किंवा दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो , नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला असता . . पण मुलाला सोडून जाता येत नाही किंवा मुलाची जबाबदारी एकटीने पेलण्याची क्षमता नाही म्हणून किंवा मुलाला आईवडीलांच्या विभक्तीमुळे प्रचंड मनस्ताप होईल म्हणून ... किंवा तत्सम कारणांनी विवाह टिकवून ठेवणे या परिस्थितीतून कोणी गेलं आहे का ... अशावेळी मूल होऊ देण्याची इतकी घाई केली नसती तर बरं झालं असतं असा विचार तुमच्या मनात आला आहे का ?

मुलाला घेऊन विभक्त झाल्यानंतर मूल होऊ देण्याची घाई केली नसती तर बरं झालं असतं असा विचार तुम्ही केला आहे का ?

अरेंज्ड लग्नानंतर 1 - 2 वर्षातच मूल झालं आणि जोडीदार आणि आपण एकमेकांना योग्य नाही , हे लक्षात आलं पण मुलाला घेऊन विभक्त झालेल्या स्त्रीची लग्नाच्या बाजारात किंमत कमी झालेली असणार / कशाला आपल्या स्वार्थासाठी मुलापासून त्याचे वडील तोडायचे / सावत्र बाप नको / एकटीने वाढवणं जमणार नाही / एकटीने मूल सांभाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही ........
अशांपैकी एखाद्या कारणाने नाईलाजाने लग्नबंधन तोडलं नाही असा कोणाचा अनुभव आहे ... अशावेळी मूल नसतं तर बरं झालं असतं , असा विचार अनुभवला आहे का ?

७ - विवाहित आणि मूल असलेल्या स्त्रियांना प्रश्न -

प्रेग्नन्सीचा अनुभव , डिलिव्हरीचा अनुभव , स्तनपानातून आईला मिळणारं सुख , मुलाला मोठं होताना पाहण्याचा अनुभव , त्याचे लाड , हट्ट पुरवणं इत्यादी इत्यादी ... , हा आयुष्यातला सर्वात सुंदर अनुभव होता असं तुम्हाला वाटतं का ? की विशेष काही नाही , शाळा , कॉलेज , लग्न इत्यादी सारखी ती एक अपरिहार्य , चॉईस नसलेली तेव्हा स्वीकारायचीच तर आनंदाने का स्वीकारू नये म्हणून स्वीकारलेली घटना होती ? त्यात तुम्हाला आनंद शोधावा / मानावा लागला ... कर्तव्यपूर्तीचं समाधान किंवा समाज , कुटुंबाच्या नजरेत स्वतःला स्त्री / आई म्हणून सिद्ध केल्याचं समाधान ... नवऱ्याला आपण मूल दिलं आहे , त्यामुळे त्याचं आपल्यावरचं प्रेम वाढलं आहे याचं समाधान .... इत्यादी ...

की एकूण तो अनुभव हा अंगभूत , नॅचरली अत्यंत आनंददायी होता ? बाळाचं हसू , रांगणं , अडखळणं , पडणं , चालणं , खाणं पिणं , इव्हन शी शू ... प्रत्येक गोष्ट करण्यात तुम्हाला आतून एक विलक्षण आनंद मिळत होता ? तुमचा स्वतःचा काय अनुभव होता ?

या प्रश्नांची उत्तरं या धाग्यावर द्यावीशी वाटली नाही तरी काही हरकत नाही काही प्रश्न खूप पर्सनल आहेत , काहींची उत्तरं वेदनादायक / जखम उकरून काढणारी असू शकतात तेव्हा दुर्लक्ष हा एक मार्ग आहे याची मला जाणीव आहे .... थोड्या जरी स्त्रियांनी क्षणभर जरी स्वतःशी या गोष्टींचा विचार केला तरी माझ्या पोस्टचं सार्थक झालं असं मला वाटेल ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते लग्न हा एक मोठा जुगार आहे. (विशेषतः स्त्रियांसाठी).कारण एकदा लग्न झाले की तिला तोच माणूस(कितीही विकृत असला तरी)सहन करावाच लागतो।(especially आर्थिक स्वातंत्र्य नसेल आणि माहेरून पाठिंबा नसेल तर घटस्फोट घेणे अतिशय कठीण आहे).मूल झाल्यावर तर एक vicious trap तयार होतो कारण त्यानंतर घटस्फोट घेणे भावनिक दृष्ट्या कठीण जाते आणि दुसऱ्या लग्नाची शक्यता संपते. अशावेळी त्या अपत्याला आर्थिक स्वावलंबन सुद्धा स्त्रीलाच द्यावे लागणार.त्यामुळे लग्न नको, मूलही नको अशी माझी वैयक्तिक धारणा आहे.
लग्न ही जबाबदार्यांची non-ending शृंखला आहे.आर्थिक जबाबदारी, म्हणजे नोकरी, रोजचा स्वयंपाक, घरकाम, सासू सासर्यांची सेवा, पाहुण्यांची उठबस, अपत्यजन्म,संगोपन, संस्कार, शिक्षण खर्च. आणि एवढे करून श्रेय मिळणार नाही. टोमणे मिळणार.
आपल्या समाजात no child couple कडे चुकीच्या नजरेने पाहतात.तेव्हा कितीही वात्सल्य वाटले तरीही या जबाबदार्या पहाता **नको पण**आवर असे होईल. अनाथाश्रमाला देणगी उत्तम पर्याय आहे.
वरील सर्व मते वैयक्तिक अनुभवावर आधारित आहेत.
थोडे अवांतर झाले आहे. क्षमस्व.

मूल नको , मूल हवे च वगैरे निगेटिव्ह स्टेटमेंट्स पासून सुरु झालेला धागा आहे... त्यामुळे थोड़ी निगेटिविटी आहे...
दुर्दैवी अनुभव असलेल्या स्त्रिया असतील ही पण त्या मुळे अगदी लग्न मूल नको म्हणणे म्हणजे जरा अति च आहे अस वाटते.
लग्नाच माहित नाही पण मूल होणे आणि त्याला मोठे करणे हा एक छान अनुभव असतो.
हल्ली खुप स्त्रिया लग्नाशिवाय मूल दत्तक घेतात... समाज बदलत आहे. पूर्ण पणे नाही पण सुरुवात झाली आहे.
ज्याला नको मूल त्याला नको, ज्याला हवे त्याला हवे इतके सिंपल आहे...
होय नाही कोण काय म्हणेल वगैरे सर्व प्रोब्लेम्स आपण स्वता बनवतो... स्वता ला मनापासून वाटेल तेच करा...

अनंत हस्ते कमलावराने,
देता किती घेशील दो कराने!

.
मला लग्नानंतर मूल हवे होते. नवर्‍याला इतक्यात नको नको नको होते. चार वर्षांनी सर्व प्रिकॉशन्स घेउनही बाळ आलं आमच्याकडे. पण मी खूप मनात कल्पना करत असे खरी. मला हेही माहीत होते की मुलगी असणार व जास्त करुन कर्क - लग्न किंवा सूर्य किंवा चंद्र असणार. ती कुंभेचा सूर्य घेउन येईल असेही वाटे. आता ते का वाटे यात डिट्टेलवार जात नाही. आणि माझी अटकळ खरी ठरली.
तेव्हा बाळ होत नसेल तर किंवा कोणत्याही स्वप्नपूर्तीकरता, तुम्ही कल्पना करणे व इच्छाशक्ती वाढवणे हे फार महत्वाचे असते. कदाचित हा माझा इगो असेल ही की अरे 'मी' स्वप्न पाहीलं म्हणुन मी वास्तवाला खेचून आणलं वगैरे. तसे नसेलही किंबहुना नसतेच. लहान बाळ ही ईश्वराची कृपा मी समजते. एका जीवातून दुसरा जीव जन्मास येतो - पहायला गेलं तर केवढं अद्भुत आहे हे.
______________________________________
डिलीव्हरी अतोनात इझीली झाली. पण डिलीव्हरीनंतर मला अतिशय मोहक/ सुंदर अश्या कल्पना सुचत, मी देवाबद्दल फार विचार करे. एकदा तर समोरची इमारत एखाद्या पाना वारा वाहून पानारखी कलकल हलल्याचा भास झालेला. ही सर्व हायपोमॅनियाची लक्षणे असावी असे आता मागे पहाता वाटते. पण मी बाळ झाल्यानंतर एकामागो एक सपाट्याने कित्येक अतिशय जुनी अध्यात्मिक पुस्तके वाचून काढली. खूप वेगाने व भरभरुन, अध्यात्मिकता येत गेली. एकदा बाळाला छातीशी धरले असता एक अननुभूत असा आनंद हृद्यातून फुटला. म्हणजे जर हृदया मध्ये इंद्रधनूचे खळे पडले तर कसे दिसेल तसे 'वाटले'. १००% माझ्या मेंदूत, हार्मोन्स्मध्ये फार बदल घडले होते.
___________________________
डिलीव्हरीनंतरचे पहीले काही महीने तर झोपेतून उठले की आठवे अरे आपण आई झालोय, आपल्याला एक बाळ आहे आणि मग जो आनंदी आनंद वाटे. सकाळी सकाळी ती माझ्या आधी उठून, शांतपणे हात-पाय हलवत खेळत पहुडलेली असे. काही त्रास दिला नाही. एक शांत बाळ होती. फक्त काही २-३ महीने कॉलिकी बेबी होती. आपल्या बाळाचं अप्रुप आयुष्यभर रहातं.

स्त्रिया ना निसर्गाला दिलेली सुंदर देणगी आहे .लग्न नको बाळ नको अस शुष्क आयुष्य जगण्यात काहींत अर्थ नाही असं मला वाटत आणि आताच्या पिढीतल्या मुली शिकत आहेत आर्थिक दृष्ट्या ही खूप सक्षम आहेत. आपला जोडीदार निवडण्याचे त्यांना स्वतंत्र ही आहे.अगदी arrange marriage असताना सुध्दा आई वडील पुरेसा वेळ देत आहेत.आणि अपरिहार्य अस काही राहील नाही म्हणल्या पेक्षा कमी झालाय.हे जोडपं पुरेसा वेळ घेऊन आर्थिक ,मानसिक,शारीरिक विचार करून बाळाला जन्म देतात.अगदी या मुली बाळावर गर्भसंस्कार ही करत आहेत.प्रोटीन, व्हिटॅमिन चा चार्ट follow करत आहेत.
खूप मुलीना लग्न नंतर बाळ हवं असत पण ते निरोगी सुदृढ बुध्दीवान जन्माव अस वाटत असते,आणि ते तस जन्माल नाही तर काय होईल या विचारांनी त्या मूल होऊ द्यायला घाबरतात.
थोडक्यात काय तर मूल कधी होऊ द्यायचं ते होऊ द्यायचं की नाही यात आता समाज येत नाही.तो तिचा निर्णय झाला आहे.

माझ्यात व काही मावसभावंडाच्या वयात खुप अंतर आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळवायची आवड, 
शी-शु काढायची सवय होती.

माझे लग्न बत्तिशी पार करताना झाले. नवर्याचेही साधारण तेच वय. लग्न ठरवताना आम्ही काही 
महत्वाच्या विषयावर चर्चा केली होती, त्यातील एक विषय अपत्याचाही होता.
(आमचे ठरवुन लग्न झाले तरी तो आधीपासुन मित्र होता. त्यामुळे मोकळेपणाने हे विषय बोलता आले.
अगदीच नवख्या माणसाशी अशी चर्चा कठीण आहे, याची कल्पना मला आहे. पण प्रयत्न जरुर करावा.)

आम्हाला एकमेकांना जाणुन घेण्यासाठी वेळ हवा होता आणि लगेच मुल नको होते. तसेच नैसर्गिकरित्या 
गर्भधारणा झाली तर ठीक आहे, अन्यथा कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत घेउन अपत्यप्राप्ती करायची 
नाही यावर आम्ही ठाम होतो. वैद्यकीय मदत घेण्यात काही गैर नाही. परंतु त्यात जो शारिरिक आणि 
मानसिक त्रास होतो, तो सहन करण्याची आमची तयारी नव्हती.

लग्न झाल्यावर साधारण दिडेक वर्षाने सासुबाईंनी विषय काढला तेव्हा हीच मते सौम्य आणि ठामपणे 
त्यांना सांगितली. तसेच आईकडे विषय निघाला तेव्हाही आमची भुमिका समजावुन सांगितली. सुदैवाने 
दोन्ही बाजु समजुतदार असल्यामुळे (किंवा पोरं आपल्याला धुप घालणार नाहीत य़ाची खात्री असल्यामुळे) 
आमच्यावर पालकांचा दबाव नव्हता. याचा अर्थ मधुचंद्राला जाण्यापुर्वीच "आता लवकर चान्स घ्या हं" 
असं सांगणार्या नातेवाईकांची कमतरता होती असं नाही. पण अशा सुचनांचा आम्हाला फ़रक पडत नव्हता.

दीडेक वर्षांनी आम्ही कुटुंब-नियोजनाची साधने वापरणे बंद केले. काही काळ गेल्यानंतर मला 
हायपो-थायरॉइडिझम आहे असे कळले. (पायांवर सतत सुज असायची म्हणुन काही चाचण्या केल्या होत्या 
त्यावेळी समजले.)यावर उपचार सुरु झाल्यानंतर साधारण सहा महिन्यांनी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होउन 
अपत्यप्राप्ती झाली. मला वाटतं की हायपोथायरॉइडिझम मुळे गर्भधारणेत अडचणी येउ शकतात.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

गर्भावस्था मी मनापासुन एन्जॉय केली आणि संगोपनही. इन फॅक्ट माझ्या बाळाचा जन्म ही माझ्यासाठी 
आत्तापर्यंतची सर्वात जास्त एक्सायटिंग गोष्ट आहे.

पण बालसंगोपन ही फार मोठीजबाबदारी आहे आणि तुमच्या प्राथमिकता बदलवुन टाकणारी गोष्ट आहे. 
पूर्वी ऑफिसमध्ये कुठल्याही कामासाठी कितीही थांबण्याची तयारी असणारी मी बाळाच्या ओढीने वेळेवर 
निघण्याचा प्रयत्नकरु लागले. करीअरच्या शिड्या चढण्यापेक्षा मी स्थिर राहण्याला प्राधान्य दिले. पण हे 
निर्णय स्वेच्छेने घेतल्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. बालबच्चेवाल्या काही मुली करीअरही तेवढ्याच 
जोमाने करतात याची मला असुया नाही. मी करीअरवर लक्ष द्यायचे ठरवले तर नवरा त्याच्या करीअरमधे 
बॅकसीट घेइल हे ही नक्कीच.

विवाहापूर्वी 'आपलं मूल' ह्याबद्दल कधीही विचार केला नव्हता, किंबहुना असा विचार मनात आला नव्हता. सर्व भावंडांमध्ये लहान असल्याने माझ्यावर विशेष कोणा बाळाला खेळवण्याची किंवा सांभाळायची वेळही आली नव्हती. मात्र लग्नानंतर मला एकच मूल हवं आणि त्यानंतर हवं असल्यास दत्तक घ्यायचं हा निर्णय नवऱ्याला सांगितला.
आम्हाला साधारण दोन वर्षानंतर बाळ झालं. त्यानंतर मात्र आयुष्य एकदम बदलून गेलं. अर्थात चांगल्या अर्थानेच! त्यावेळी दोघांच्या आईवडिलांपैकी कोणीही येऊन राहणं शक्य नसल्याने आम्ही दोघच असायचो. त्यामुळे बाळाचं सगळं आम्हीच केलं, चुकतमाकत... अनुभवातून शिकत... तो आयुष्यातील सुंदर काळ होता. रोज काहीतरी नवीन असायचं !

माझ्या नात्यात असं जोडपं आहे जिथे बायकोची मानसिक तयारी नसल्याने त्यांनी मूल होऊ दिलेलं नाही. सुरवातीला आडून- आडून, स्पष्टपणे विचारणा होत असे पण ती दोघंही खंबीर होती. कधीही त्यांच्या वागण्या बोलण्यात खंत किंवा एकटेपणा नसतो.
मला असं वाटतं की लग्न करावं की नाही, केव्हा करावं, मूल होऊ द्यावं की नाही, कधी आणि किती मुलं होऊ द्यावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याकडे समाज, बिरादरी, घरच्यांची ईच्छा, घराण्याची परंपरा, नातेवाईकांना दिलं जाणारं अवास्तव महत्त्व आणि त्यांची ढवळाढवळ, ह्या गोष्टीमधून आपण बाहेरच पडत नाही.

मला आठवतं त्याप्रमाणे वय वर्ष 15 ची असल्यापासून मला लग्नानंतर मूल (स्पेसिफिकली मुलगीच) हवं आहे हे माहीत होतं.मला मी लग्नाची, जोडीदाराची स्वप्न पाहिलेली फारशी आठवत नाहीत पण माझी मुलगी असेल, तिचं नाव मी काव्या ठेवेन वगैरे सगळं चालू असायचं डोक्यात नेहमी.

स्वतः चं किंवा दत्तक अस काही स्पेसिफिकेशन नव्हतं डोक्यात कधी पण मला मातृत्वाचा अनुभव घ्यायचा होता कधी ना कधी. एक जीव 9 महिने पोटात वाढवणं, कळा देणं, बाळाला दूध पाजणं वगैरे मला करायचंच आहे या कॅटेगिरी मध्ये होतंच. बायोलॉजीकल मुलाइतकीच माया मी दत्तक मुलावरही करू शकते. मला दुसरं मूल ही हवं आहे पण ते बायोलॉजीकल की दत्तक त्याचा निर्णय अजून झालेला नाही. याबाबतीत माझ्या जोडीदाराचं मत 'आत्ता विचार करायलाच नको, नंतर बघू' असा आहे.

लग्नाआधी मला होणाऱ्या नवऱ्याने मूल नकोय असं सांगितलं असतं तर मी लग्नाला नकार दिला असता. मी माझ्या नवऱ्याला गृहीत धरलं होतं की त्यालाही मुलं हवं असणारच आहे (ज्याअर्थी लग्नाआधी आमच्यात मुलं नको टाईप्स डिस्कशन कधीच झालं नाही त्याअर्थी).
याचाच अर्थ मी त्याला आणि त्याने मला या बाबतीत गृहीत धरलं हे मान्य आहे आणि आम्ही दोघं ही याबाबतीत हॅपी आहोत.

बहुतेक वरच्या 2 पॉईंट्स मध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कव्हर झालंय. माझ्या मैत्रिणीच्या new born मुलीला जवळ घेतल्यावर आलेली फिलिंग आणि माझ्या मुलाला जवळ घेतल्यावर आलेली फिलिंग यात फार टोकाचा फरक नव्हता. फक्त हे आपलं हक्काचं स्वतःचं आहे एवढंच काय ते वेगळं जाणवलं.

प्रत्येक स्त्री ने आई झालंच पाहिजे असं काही मला वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आई ही भावना फार वेगळी असते हे ही नमूद करतेच. 'आई' म्हणल्यावर जी जबाबदारी/ समर्पण/ तडजोड वगैरे असते ती मावशीच्या भूमिकेत असूच शकत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतं (बायोलॉजीकली किंवा दत्तक मूल घेऊन किंवा एखाद्याला मुलगा/ मुलगी मानून किंवा कोणत्याही प्रकारे का असेना).

चौथ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन का ते माहीत नाही. आधी म्हणाल्या प्रमाणे स्वतःचं मूल जन्माला घालण्यासाठी मी मेंटली आणि फिजिकली कायमच तयार होते. लग्नानंतर पहिल्याच महिन्यात मी प्रेग्नन्ट असल्याचं कळालं तेंव्हा थोडासा धक्का बसला होता कारण हे लगेच होईल असं वाटलं नव्हतं. नवरा वेगळ्या राज्यात राहात असल्याने आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम नसल्याने तेंव्हा मी पूर्णपणे शॉक मध्ये होते पण त्याच दिवशी सोनोग्राफी केली आणि माझ्या पोटातल्या माझ्या बाळाचा एक काळा ठिपका दिसला तेंव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा इतकी आनंदी झाले होते हे ही आठवतंय.
मला मुलं असण्याची एवढी ओढ होती की सगळ्या प्रकारची काळजी घेऊन , पहिल्याच महिन्यात (माहीत नसताना) जवळपास 70 किलोच्या बॅग्स स्वतः उचलून, 2 मनाली ट्रेक करून, आणि या पूर्ण ट्रिप मध्ये 5 ते 6 दिवस फक्त केळ आणि पपया खाऊन काढल्यावरही माझ्या बाळाला धक्का सुद्धा पोहचला नव्हता. आय फील सो blessed अबाऊट इट.

माझ्या नवऱ्याला संपूर्ण प्रेग्नन्सी मध्ये फक्त 2-3 वेळा येता आलं, पूर्ण 9 महिने मी एकटीने स्वतःची काळजी घेत काढले त्यामुळे मी आणि माझा नवरा कुठल्याही बेटावर असलो असतो तरी मला मूल हे असलंच हे नक्की.

पाचवा प्रश्न valid वाटला नाही किंवा मला कळालेला नाही. कोणी तुम्हाला मुलं हवं का नको हा निर्णय देत असेल तर त्या व्यक्तीबाबत निवड करायचा न करायचा संबंध कुठे येतो? हां मला कोणी ठामपणे मला मूल नकोय सांगितलं असतं तर मी त्याला नाकारलं असतं.

माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये टोकाची भांडणं झाली आहेत तरीही मला कधीही मूल असल्याचा पश्चाताप झालेला नाही. मी आणि माझा नवरा काही कारणांनी कधी 'हनिमून पिरियड' मध्ये राहू शकलो नाही आणि याबाबत सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आता मूल नसतं तर आयुष्य जास्त एन्जॉय करता आलं असतं. पण मला तसं काही वाटत नाही

प्रेग्नन्सीचा अनुभव , डिलिव्हरीचा अनुभव , स्तनपानातून आईला मिळणारं सुख , मुलाला मोठं होताना पाहण्याचा अनुभव , त्याचे लाड , हट्ट पुरवणं इत्यादी इत्यादी ... , हा आयुष्यातला सर्वात सुंदर अनुभव होता असं तुम्हाला वाटतं का ?
>>>>
हो हो आणि त्रिवार हो! ! मी माझया मुलाची प्रत्येक गोष्ट करण्यात खूप आनंदी आहे. अगदी त्याची शी शु काढण्यापासून ते त्याच्या प्रत्येक लीला बघण्यापर्यंत हर एक गोष्ट मला अतीव आनंद देते.

कर्तव्यपूर्तीचं समाधान किंवा समाज , कुटुंबाच्या नजरेत स्वतःला स्त्री / आई म्हणून सिद्ध केल्याचं समाधान ... नवऱ्याला आपण मूल दिलं आहे , त्यामुळे त्याचं आपल्यावरचं प्रेम वाढलं आहे याचं समाधान ....
>>>>
यातलं काहीच मला वाटत नाही अथवा माझ्यासाठी मॅटर करत नाही. माझ्या नवऱ्याला मात्र वाटतं.

आता पुढे जाऊन आणखी न विचारलेल्या प्रश्नांबाबतही माझी मतं मांडते.
मला लग्नाआधी मुलं झालं असतं तर मी ते राहूच दिलं असतं पण मुद्दाम लग्न न करता मूल जन्माला घालायला गेले नसते. तिथे मी माझं मन सामाजिक दबावामुळे मारलं असतं.

माझ्यामध्ये मुलं होण्यासाठी काही शारीरिक दोष असता तर मी सरोगासीचा विचार केला असता.
नवऱ्यामध्ये दोष असता तर एकतर मी स्पर्म डोनरचा विचार केला असता किंवा मूल दत्तक घेतलं असतं. थोडासा भावनिक प्रश्न असल्याने त्याच्या मताला जास्त value दिली असती मी स्वतः मूल कितीही हवं असलं तरी नवऱ्या शिवाय इतर कोणाकडून (शारीरिक संबंध ठेवून) ते मिळवलं नसतं संसारही महत्वाचा आहेच आणि मूल ही काही वस्तू नाही की एका ठिकाणी अवेलेबल नाही म्हणून दुसरीकडे जा.

आम्हाला काही कारणांनी मूल होत नसतं आणि नवरा इतर कुठल्याच ऑपशन ला तयार नसता (सरोगसी, स्पर्म डोनर, दत्तक वगैरे) तर जशी देवाची मर्जी म्हणून शांत राहिले असते आणि मित्र मैत्रिणीच्या मुलांसाठी, भाच्यांचे लाड केले असते. तरीही स्वतःचं मूल ते स्वतःचं मूल. तिथेही मन मरावं लागलं असतं पण इट्स ओके.

आणि माझ्या मुलामुळे माझी मातृत्वाची आस पूर्ण होतेय पण आधी म्हणाल्या प्रमाणे मला एक मुलगी सुद्धा हवी आहे त्यामुळे दुसरं मुलं, दत्तक मूल वगैरे पर्यायांचा काही वर्षांनी विचार करेन.

दोन पेक्षा जास्त अपत्य सांभाळण्याची माझी शारीरिक व आर्थिक capacity नाही त्यामुळे त्यापेक्षा जास्त मुलांचा विचार करणार नाही. अर्थात जुळं झालं तर देवाची इच्छा Happy

पण बालसंगोपन ही फार मोठीजबाबदारी आहे आणि तुमच्या प्राथमिकता बदलवुन टाकणारी गोष्ट आहे.
पूर्वी ऑफिसमध्ये कुठल्याही कामासाठी कितीही थांबण्याची तयारी असणारी मी बाळाच्या ओढीने वेळेवर
निघण्याचा प्रयत्नकरु लागले. करीअरच्या शिड्या चढण्यापेक्षा मी स्थिर राहण्याला प्राधान्य दिले. पण हे
निर्णय स्वेच्छेने घेतल्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. बालबच्चेवाल्या काही मुली करीअरही तेवढ्याच
जोमाने करतात याची मला असुया नाही. मी करीअरवर लक्ष द्यायचे ठरवले तर नवरा त्याच्या करीअरमधे
बॅकसीट घेइल हे ही नक्कीच.
>>>>
याला 100 मोदक. आजही मला 10 वर्ष अनुभव असताना नोकरी सोडल्याचं काहीच वाटत नाही का ? मुलं कशीही मोठी होतात वगैरे म्हणणारे लोकं भेटतात, त्यांना मी इतकंच सांगते की मुलं कशीही मोठी होत असली तरी ती कशी मोठी होतायेत हे बघण्यात, अनुभवण्यात मला जास्त आनंद मिळतोय. पैसा आणि नोकरी कधीही मिळवता येईल.

कालच मैत्रीण बरोबर हा विषय निघाला होता. मी अविवाहित आहे. मला आता जरी बाळ झालं असतं तर मी आयुष्य त्या बाळा बरोबर काढलं असतं असं मी तिला बोलली होती.

कालच मैत्रीण बरोबर हा विषय निघाला होता. मी अविवाहित आहे. मला आता जरी बाळ झालं असतं तर मी आयुष्य त्या बाळा बरोबर काढलं असतं असं मी तिला बोलली होती.

ज्याला मुल हवं त्याला हवं ज्याला नको त्याला नको हे सिंपल आहे हे समजुन कोण घेतो?
लग्न झालंय आणि दोघांना मुल नको म्हणजे काय नुसतं हिंडायल हवं असेल, कुठल्या जबाबदार्‍या नको असतील इथपासुन मग म्हातारपणात कळेल इथपर्यंत कंमेंट्स.
अगदी इतक्यात नको, काही वर्षांनी बघु म्हणणारांनाही तसंच. जसं काही लग्न फक्त मुल होण्यासाठीच केलंय.
दुसरी बाजु म्हणजे काय बाई लगेच लग्न झालं आणि ही प्रेग्नंट. काहींना तर तिटकारा येतो कुणाचा लग्नाचा वाढदिवस आणि मुलांचा जन्म/ वाढदिवस आसापास मागेपुढे असतील तर. किंवा दोन भावंड अगदीच कमी अंतराने पाठोपाठची असतील तर. काय संबंध तुमचा?
कितीतरी कपल तिसरं मुल जन्माला घालतात आवडीने. इथल्याच एका उच्चशिक्षित मैत्रीणीने मुलगा मुलगी असतानाही तिसरं बाळ जन्माला घातलंय.
एक मित्र मैत्रीण कपलने मुल नको असं स्पष्ट सांगितलं कुटुंबाला.
मला स्वतःला पहिली मुलगी लग्नाला एक वर्ष पुर्ण व्हायच्या आत झाली. मग ९ वर्ष दुसरं मुल नकोच वर आम्ही ठाम राहिलो. अगदी दोन्ही कुटुंब अजुन एक मुल होउदेत. भावंडं असावं वैगेर म्हणायचे तरीही. मग अचानक मनात आलं की चला आताजरा नीट चालंलय सगळं तर परत घडी विस्कटुया Lol मग दुसरं मुल झालं.
मग काय एवढा गॅप? आधीच विचार केला असतास तर दोघेही बरोबरीने मोठे झाले असते ना? वैगेरे वैगेरे.
ज्याची त्याची आवड सवड कंफर्ट असं म्हणून पुढे जाता येत नाही का आपल्याकड्च्या लोकांना?

खूप छान धागा..
मला वाटतं हे आईपणाचे natural instinct प्रत्येकीला असणं compulsary का आहे.. मला ती न पेलता येणारी जबाबदारी वाटू शकते.. आणि हा प्रत्येकाचा personal decision आहे. आणि ते अमुक एक वयातच कळलं पाहिजे हेही आततायी आहे. मूल व्हायच्या आत कळलं म्हणजे मिळवलं.. नाहीतर पोराची फरपट.. इतर प्रतिसाद नंतर निवांत देईन.

अरे रिलॅक्स आता बायकांना आपले एग्ज फ्रीज करून ठेवता येतात व आपल्या सोयीने तिशीनंतर बाळ होउ देणे शक्य आहे. ह्यामुळे विशीतली महत्वाची वर्शे करीअर बिल्डिंग करून आर्थिक स्थैर्य मिळवून मग कामात रजा, बालसंगोपनासाठी ब्रेक हे सर्व आरामात करता येते. सिनीऑरिटी बिल्ड होते त्यामुळे नंतर परत करीअर जॉइन करणे सोपे जाते( रिस्किलिन्ग करून) कोणत्याही द डपणास बळी पडण्याची गरज नाही. व आईपण नैसर्गिक रीत्या आलेच पाहिजे वगिअरे हाइप कानावेगळी करावी. मेक युअर ओन कन्फिगरेशन अ‍ॅन्ड प्रोसीड. मूल झाल्यावर ग्रोथ होते ती वेगळ्या दिशेने . ग्रेट अनुभव आयदर वे.

प्रतिसाद टाईप केला आणि लक्षात आले कि फक्त स्त्रियांसाठी प्रतिसाद ओपन आहेत. असो , आता वाट बघणे आले कि कधी हा धागा सर्वांसाठी खुला होतोय आणि कधी मी प्रतिसाद टाकतो.

मूलं नकोतच असं माझं कधीच नव्हतं.इन फॅक्ट लग्न ठरल्यानंतर मुलांचा विषय निघाल्यावर २ मुले जन्माला घालायची असंही आमचं ठरलं होतं.
पहिल्यांदा दिवस राहिले- काळजी घेऊनही राहिले. आमची मानसिक तयारी नव्हती म्हणून ऍबॉर्शन केले.
नंतर १ वर्षाने दिवस गेल्यानंतर आम्ही दोघांनी पुढचे ९ महिने एन्जॉय केले. आहार व्यायाम गर्भसंस्कार सगळं मनापासून केलं.
त्यात आम्ही दोघे काही महिने वेगवेगळ्या ठिकाणी होतो. तरी सुद्धा जमेल तेव्हा नवरा भेटायला यायचा.
यथावकाश ९ महिने ९ दिवस घेऊन मुलगी जन्माला आली.बाळंतपण नॉर्मल झाले.
मी आणि ती दोघीही व्यवस्थित होतो . तरी सुद्धा तिला दूध पुरत नव्हते म्हणून मला अपराधी वाटायचे. नवरा तेव्हा दुसऱ्या शहरात होता. मी माहेरी.
तो तिला वरचं दूध दे.तुझं येतंय तेवढं दे असं सहजपणे सांगायचा तेव्हा राग यायचा.माझा गिल्ट त्याला समजत नाहीये असं वाटायचं.
त्यात ती कॉलिकी बेबी होती. सतत रडायची. नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही असं वाटायचं.
ती १ वर्षाची होईपर्यंत अनेक घटना घडल्या ज्यामुळे मला वाटायला लागलं मी मूल जन्माला घालून चूक केली आहे.
मी तिच्यावर खूप प्रेम करते,तिला मोठं होताना बघताना आनंद च होत आहे.पण त्याबरोबर ज्या गोष्टी अपरिहार्यपणे मला स्वीकारायला लागत आहेत त्यामुळे मला वाटत ती जर नसती तर मी जास्त एन्जॉय करू शकले असते माझं आयुष्य.
एकूणच नवऱ्याचं ,सासू-सासर्यांचं वागणं ,नोकरी ,घरातल्या देवधर्माच्या करायला लागणाऱ्या गोष्टी आणि हे सगळं करून मिळणारा आनंद ह्यात आनंदच पारडं नक्कीच कमी भरत आहे.
त्यामुळे आता दुसरे मूल नकोच असं वाटतंय.

दूध कमी आले तर वरून दुसरे दूध द्यायचे

त्यात अपराध काही नाही

आणि तसेही सहा महिन्यांनी मदर्स मिल्क अपुरेच पडणार असते , त्यामुळे वरचा आहार सुरूच करावा लागतो

आमचे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने झाले . त्यावेळी मूल लवकर नको इतकेच ठरले होते , त्या प्रमाणे ३. ५ वर्षे थाबंलो . नवऱ्याला पहिल्यापासन मुले आवडत होती . मी मात्र मुले फारशी न आवडणाऱ्या कॅटेगोरीतील . नंतर नॉर्मल कोर्से मध्ये बाळासाठी प्रयन्त केले , पण कॉनसिव होत नाही पाहून वैद्यकीय सल्ला घेतला पण त्या दरम्यान माझी मात्र आई होण्याची इच्छा अतिशय प्रखर झाली, पण वैदयकीय उपचार नंतर पण बाळ होत नव्हते . दोघांमध्येही प्रॉब्लेम नवहता. या मुळे मी मात्र पॅनिक मोड मध्ये गेले, आणि adoption चा विचार करू लागले. नवरा मात्र शांत होता. आमच्या बरोबर लग्न झालेल्या सर्व जोडप्या ची मुले ४-५ वर्षाची झाली. त्यामुळे मी आजून डिप्रेशन मोड मध्ये जाऊ लागले. मग आम्ही ठरवले कि आता सर्व वैद्यकीय उपचार थांबवू, जे होईल ते पाहू. नवरा मात्र adoption साठी तयार नव्हता. मग अचानक २-३ महिन्यांनी प्रेग्नंसी डिटेक्ट झाली. मग मात्र आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. माझा प्रवास मुले फारशी 'न' आवडणे ते मूल हवेच असणे या कॅटेगरी मध्ये झाला .मी प्रेग्नंसी पिरियड खूप एन्जॉय केला . आहार व्यायाम, गर्भसंसकार सर्व केले. नंतर लहान मूल म्हणून केवळ त्याला वेळ देता यावा म्हणून IT मधील उत्तम करियर सोडले. आता योग्य वेळ आल्यावर छोट्या कंपनी मध्ये माझ्या टर्म्स वर जॉब करते. आमच्यातही टोकाची भांडणे झाली आणि होतात पण त्या मध्ये मुलगा कधीही येत नाही. रिशांन झाला नसता तर हा विचार सहन होत नाही. या सर्व व्यक्ती सापेक्ष गोष्टी आहेत. पण स्त्री चा मातृवाकडंचा प्रवास मात्र नैसर्गिक आहे असे मला वाटते. मूल नको हे आता वाटणारी स्त्री किंवा जोडपे यांना कधीतरी आयुष्यात मुल हवे असे एकदातरी वाटतेच.

त्यात अपराध काही नाही >>>+१
तेव्हा हे 'कळतंय पण वळत नाही ' असं झालं होतं.
आता विचार करताना वाटतं उगीच पॅनिक झाले होते.

एकूणच नवऱ्याचं ,सासू-सासर्यांचं वागणं ,नोकरी ,घरातल्या देवधर्माच्या करायला लागणाऱ्या गोष्टी आणि हे सगळं करून मिळणारा आनंद ह्यात आनंदच पारडं नक्कीच कमी भरत आहे.>>>>>>> माझ्या बाबतीतही थोडंफार असंच आहे.

चान्गला प्रश्न आहे. मला दोन मुले - मुलगा व मुलगी - दोघे आता कॉलेजात आहेत. आमच्यापासून वेगळे राहत्तात. माझी मुले मला आवडत असली तरी वाढवताना अनेकदा नक्की आपल्याला काय हवे होते, आपण मुले का जन्माला घातली? नसती तर आयुश्यात बरेच काहि करता आले असते असे वाटायचे. खूप गोश्ति मुले लहान आहेत, पुढे त्यांच्या शाळा अभ्यास यामुळे करता यायच्या नाहीत. त्यावेळी बरेचदा असे वाटून जायचे. त्यांच्या टीनेज मध्ये तर बरीच वादावादी याने हैराण झालेली मी. त्यातून त्यावेळी माझा मेनॉपॉझ, आम्ही बदललेली जागा - नविन ठिकाण अश्या बर्‍याच गोश्टी एकत्र होत्या. गांजून गेले होते २-३ वर्श. नोकरीत पण कटकट होती आणि दोघांच्या कॉलेजला पैसे लागतील म्हणून नोकरी सोडता पण येत नव्हती. परत तेच.मुले नसती तर एवढा विचार न करता स्वतःला हवी तेव्हा नोकरी सोडता आली असती अस वाटायच.
आता ठीक आहे. मुले लांब असतात, मोठी झाली आहेत. वर्शातून ३-४ वेळाच भेटत्तत त्यामुळे आता सर्व छान आहे. अजून २-३ वर्शानी नोकरी पण सोडून देणार आता. मग मनासारखे करत आयुश्य घालवणार. मुलांची मुले सांभाळायची जबाबदारी नक्की घेणार नाही. त्यांना पण वर्शातून ४-६ वेळा भेटणार की बस.

मी लग्नानंतर ठरवलं होते.. कि मला दोन मुले हवीतच..पहिला मुलगा झाल्यावर, नवरा मुलगी दत्तक घेऊया या हट्टावर पाच वर्षे होता पण सासरच्यांपुढे आमचा निर्णय नाही टिकू शकला आणि आम्ही तो विचार सोडून दिला..
माझ्या पाहण्यात बरेच नातेवाईक,मैत्रिणी आहेत ज्यांना सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही मुल होत नाहीये किंवा काहींना उशिरा झाले...त्यामुळे मला मुलं हवी होती आणि आहेत याचा खूप आनंद होतो...
मुलांशिवाय मी आयुष्य इमाजिन नाही करू शकत...त्यामुळे खरंच हवी होती का हा प्रश्न कधीच मनात नाही आला.

Pages