मीरा का मोहन - एक विधिलिखत प्रेमकहाणी

Submitted by तुषार विष्णू खांबल on 10 April, 2020 - 15:26

मीरा आज खूप आनंदी होती... त्याला कारणही तसेच होत. २०-२२ वर्षे बंद पडलेला त्यांच्या कुलदेवतेचा देवीचा गोंधळ यावर्षी पुन्हा सुरु होणार होता.
लहानपणापासून कोकणात वाढलेली हि मीरा गावडे, अवघी तीन वर्षाची असताना मालतीताईंसोबत (मीराची आई) मुंबईला आली. मधुकरराव गावडे (मीराचे बाबा) मुंबईतच एका मिलमध्ये काम करत होते. आपल्या तुटपुंज्या पगारातून त्यांनी एक छोटीशी झोपडी वजा खोली विकत घेतली होती आणि आता त्यातच त्या राजाराणीचा संसार सुरु झाला होता.
चांगल्या संस्कारात वाढलेली मीरा ह्या मुंबईच्या वातावरणात सहज मिसळून गेली. आणि तिच्या गोड आणि बोलघेवड्या स्वभावामुळे सर्व शेजारी तिच्यावर मुलीसारखे प्रेम करीत होते. आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर मीराला तिथल्याच एका चांगल्या शाळेत ऍडमिशन देखील मिळालं. आणि बघतात बघता मीरा एक एक यश आपल्या नावावर करत होती. अल्पावधीतच ती शाळेतसुद्धा लोकप्रिय झाली.
आपल्या संसाराला थोडा हातभार लावावा म्हणून मालतीताईंनीसुद्धा मधुकररावांच्या ओळखीने मिलमध्ये जेवणाचे डबे द्यायचे काम सुरु केले. मुळातच सुगरण असलेल्या मालतीबाई त्याकाळी १५-२० डबे दिवसाला पुरवत असत. मीरा शाळेत जाताना आईसोबत डबे घेऊन निघायची. आणि येताना मधुकरराव डबे घेऊन यायचे. डबे पोचवून झाल्यावर मालतीबाई उद्याच्या जेवणासाठी भाजी आणणे किंवा इतर सामग्री आणणे हे काम करीत असत. एकंदरीतच सर्व आनंदी वातावरण यांच्या कुटुंबात नांदत होते.
बघता बघता दोन वर्षे संपली. गावी देवीचा गोंधळ आहे सर्वानी यावे अश्या आशयाचे पत्र एक दिवस गावडे कुटुंबियांच्या घरी येऊन पोहचले. ते वाचून मीरा आनंदाने उद्या मारू लागली. आणि का नाही.. तब्बल दोन वर्षांनी ती आपल्या गावी जाणार होती.
सर्व तयारी करून मीरा आपल्या आईबाबांसोबत गावी पोचली. दोन वर्षानंतर तिला पाहत असल्यामुळे सर्वच आनंदून गेले होते. मुंबईच्या गमतीजमती सांगताना गावातील आनंद आपण खूप मिस करतो हेदेखील ती तितक्याच ठामपणे सांगत असे. गोंधळाचा दिवस जवळ येत होता. गावातल्या प्रत्येकाची गडबड सुरु होती. तांदूळ निवडणे, पत्रावळी गोळा करणे. गोंधळाच्या दिवशी लागणारे सर्व साहित्य जमा करणे इत्यादी कामे भराभर उरकली जात होती. ह्या सर्वात मीरा मात्र आपले गाव आपल्या डोळ्यात साठवत होती पुढील तीन वर्षांसाठी. कारण त्यांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होत असे.
गोंधळ दोन दिवसांवर येऊन ठेपला. सर्वत्र आनंदी वातावरण होते. दुपारची जेवणे उरकून सर्वजण आज थोडे निवांत झाले होते. इतक्यात खालच्या बावडेवरचा झिलूकाका एक वाईट बातमी घेऊन आला. देवीचं वारं ज्यांच्या अंगात यायचं ते सदाभाऊ एका अपघातात गेले. आनंदी वातावरण क्षणार्धात शोकाकुल झाले. सर्वजण धाय मोकलून रडू लागले. ज्या खळ्यात ज्यांच्या अंगात देवी खेळायची अश्या सदाभाऊंचं शव त्या खळ्यातून निघताना जणू देवीचं आपल्यावर रुसून जाते आहे असा आभास निर्माण होत होता. आणि काही अंशी तसेच घडले होते. सदाभाऊंनंतर देवी कोणाच्याच अंगात आली नाही. त्यानंतर त्या गावात मनमुराद आनंद असा कोणी अनुभवालाच नाही. कुठलेही कार्य निर्विघन पार पडले असे होतच नव्हते. वर्षे उलटत होती; सर्व सुबत्ता असूनदेखील गावात सुख असं नव्हतं. गावात मृत्यूचे प्रमाण वाढत होते. आपले गाव इतिहास जमा होणार कि काय अशी भीती सर्वांना वाटत होती.
अश्यातच २०-२२ वर्षे उलटून गेली. हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे ह्या उद्दिष्टाने एकनाथ काकांनी नवीन पिढीला आपल्या हाताशी धरले. आपण देवीची माफी मागू. "आमच्या वाडवडिलांच्या हातून काही चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो, त्यांना माफ कर आणि तुझी सेवा आमच्या हातून घडवून घे." असे गाऱ्हाणे घालून त्यांनी गोंधळ करण्याचा चंग बांधला.
इकडे मीरा आता आपले शिक्षण संपवून मार्केटिंग जगतातल्या एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पदावर कामाला लागली होती. मिल बंद झाल्या परंतु मुधुकररावांना त्यांच्या शेठने त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे आपल्या दुसऱ्या फॅक्टरीत कामाला ठेवले. मालतीताईंचे सुद्धा डबे बंद झाले म्हणून त्यानीं छोटासा अल्पोपाहाराची गाडी सुरु केली. गावाशी संपर्क फक्त सुयेर-सुतक सांगण्यापुरता राहिला होता.
मीरा आता वयात आली होती. निसर्गानेसुद्धा तिला मुक्तहस्ते सौंदर्य बहाल केले होते. गोरीपान नितळ त्वचा, हरिणीसारखे पाणीदार डोळे, गुलाबांच्या पाकळ्यांसारखे ओठ, शरीराची उत्कृष्ट ठेवणं आणि हसताना गालावर पडणारी खळी तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होती. योग्य वेळीच तिचे शुभमंगल उरकून आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हावे अशी इच्छा तिच्या आईवडिलांच्या मनात जोर धरत होती.
विविध स्थळाची मागणी येत होती. परंतु काही ना काही कारणाने लग्न जुळत नव्हते. मीरालासुद्धा म्हटलं तर ह्यापैकी कुठलंही स्थळ तितकसं पसंत नव्हते. कारण तिला आपले गाव सोडून दुसऱ्या गावी जाण्याची इच्छा होत नव्हती. आपलं लग्न आपल्याच गावात कोणाशीतरी व्हावे अशी तिची इच्छा होती. असे असताना एके दिवशी मधुकररावांना एकनाथ काकांचा फोन आला. “गावी गोंधळ पुन्हा सुरु करणार आहोत; तू सर्वाना घेऊन गावी ये” असा निरोप वजा आग्रह त्यांनी केला. आपल्या देवीवर अपरंपार भक्ती करणाऱ्या मधुकररावांनी देखील तो तात्काळ मान्य केला. घरी जेव्हा मधुकररावांनी हि बातमी सांगितली तेव्हा सगळे आनंदी झाले. मीरा तर आनंदात न्हाऊन निघाली. जणू देवीनेच आपल्या मनातील ऐकायला बोलावले आहे असे तिला वाटू लागले.
गोंधळाची तारीख ठरली. सगळे चाकरमानी हळूहळू गावी येऊ लागले. मीरा देखील आपल्या कुटुंबासोबत गावी जायला निघाली. कोकणात ट्रेन आल्यामुळे प्रवास सुखकर झाला होता. कणकवली स्टेशनवर उतरून मधुकररावांनी आपल्या गावात जाण्यासाठी रिक्षा बुक केली. आता गावही बरेच बदलले होते. लाल मातीचे रस्ते जाऊन डांबरी रस्ते आले होते. कौलारू घरांची जागा स्लॅबच्या घरांनी घेतली होती. मोटारसायकलची वर्दळदेखील तितकीच वाढली होती. गाव हळूहळू शहरीकरणाकडे झुकत होते. मीराचे गाव मात्र काहीसे आतल्या बाजूस असल्याने अजूनही खेडेगाव वाटावे असेच राहिले होते.
अर्धा पाऊण तासाच्या प्रवासानंतर रिक्षा गावाच्या जवळ येऊन थांबली. खाली उतरल्या उतरल्या मधुकररावांनी आपल्या जन्मभूमीला नमस्कार केला आणि तिथली माती आपल्या कपाळाला लावली. मालतीताई आणि मीराने देखील याचे अनुकरण केले. कित्येक वर्ष बंद असलेले मधुकररावांच्या घराचे दार आज उघडले होते. दुर्लक्षित राहिल्यामुळे घरात बऱ्याच भागाची पडझड झाली होती. मालतीताई आणि मीरा यांनी सर्व सामान एकाबाजूला करून घराची झाडलोट करायला घेतली. बघता बघता सर्व घर स्वच्छ झाले. सामानाची नीट व्यवस्था करून सर्वानी आपल्या आंघोळी उरकून घेतल्या.
‘सर्वांची जेवणे एकत्रच करूया, जेणेकरून इतक्या वर्षानंतर सगळी भावकी एकत्र दिसेल’ असा विचार एकनाथ काकांनी मांडला होता आणि सर्वानुमते तो मंजूर देखील झाला होता. त्यामुळे जेवण बनविण्याची घाई नव्हती. तरी सुद्धा जेवण बनविण्याच्या ठिकाणी तिघे जाऊन पोहचले.
मधुकररावांना आलेलं पाहून त्यांच्या सवंगड्याना खूप आनंद झाला. बरेच जण वयोमानामुळे आणि काहीजण परिस्थितीमुळे वार्धक्याकडे झुकलेले दिसत होते. गावात आज बऱ्याच वर्षानंतर शुभकार्य होत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्वांमध्ये वारं कोणावर येणार ह्याची चर्चा सुरु होती. मीराला पाहून सुद्धा सर्वांचे डोळे दिपून गेले असे आरस्पानी सौंदर्य तिचे होते. सर्व तिच्या सौंदर्याची आणि हुशारीची तारीफ करीत होते. चहुबाजूनी होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावामुळे मीरापेक्षा तिच्या आईवडिलांना भरून आलं होत.
दुसऱ्यदिवशी मीरा आपल्या मैत्रिणींसोबत नदीवर कपडे धुवायला गेली असताना काही अंतरावर गावातील मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती. त्यातच एक दिसायला देखणा, पिळदार शरीरयष्टी असलेला तरुण मीराच्या नजरेस पडला. त्याला पाहताच क्षणी मीराच्या हृदयात काहीशी हलचल जाणवली. कपडे धुवत असताना ती सतत त्या मुलाकडे पाहत होती. घरी जातानासुद्धा त्याचा चेहरा तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. बहुतेक ती पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडली होती.
आता तीच कशातही लक्ष लागत नव्हतं. एकटीच बोलायची, हसायची. कोणी काही विचारलं तर वेगळीच उत्तर द्यायची. तिला पुन्हा पुन्हा त्याला पाहावस वाटत होत. त्यासाठी तिला दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागणार होती. उद्या पुन्हा त्याला पाहणार या विचाराने तिला झोपच लागत नव्हती. सकाळ कधी होते आणि कधी नदीवर जाते असे तिला झाले होते.
अखेर रात्र संपून दिवस उजाडला. सर्वांच्या आधी तिने सर्व उरकून घेतलं. आईबाबांची आंघोळ उरकल्या नंतर तिने घरातील धुण्याचे कपडे घेतले आणि सर्व मैत्रिणींना जमा करून ती नदीवर जाण्यास निघाली. आज तिची पावले झपाझप रस्ता कापत होती. तरी दोन मिनिटांचे अंतर तिला दोन तासांचे वाटत होते. परंतु मनातील हि हुरहूर ती कोणाला सांगू शकत नव्हती. अखेर ती आपल्या मैत्रिणींसह नदी वर पोहचली. परंतु आज त्या पोहणाऱ्या मुलांमध्ये तो नव्हता. तिचा काहीसा हिरमोड झाला. परंतु तो येईल या आशेने तिने कपडे धुवायला घेतले. हे करत असताना ती त्या मुलाला शोधायचे विसरत नव्हती सर्व कपडे धुवून झाले. परंतु तो काही आला नाही.
आता मात्र मीराची चिडचिड होऊ लागली. घरी जाऊन धुतलेले कपडे तसेच ठेवून ती झोपी गेली. आईने विचारले असता आपलं डोकं दुखतंय असं तिने खोटंच उत्तर दिलं. बाहेर सर्व गोंधळाच्या गडबडीत होते. मीराचं तिथे नसणं कोणाच्या लक्षात येत नव्हतं आणि इकडे मीरा मात्र त्या अनोळखी मुलाच्या आठवणीत आसवे गाळत होती. शेवटी आपल्याला दिसलं ते एक स्वप्न होत असं आपल्या मनाला समजावून मीरा उठली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि कामात मदत करू लागली.
गोंधळाला अवघे चार दिवस बाकी होते. बरीचशी कामे झाली होती. आज तालुक्याचा बाजार होता. त्यामुळे काही उरले-सुरले सामान आणायला ४-५ मुले गेली होती. घरातील बायका दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. मुली बाहेर तांदूळ निवडत होत्या. मीरा देखील त्यांना मदत करत होती. आपले संपूर्ण लक्ष ती कामाकडे देण्याचा प्रयत्न करत होती. पुढ्यातील तांदूळ निवडून संपले तसे दुसरे ताट आणण्यासाठी मीरा आणि तिची मैत्रीण उठली. इतक्यात एक रिक्षा दारात येऊन थांबली. बाजाराला गेलेली मुले परतली होती. रिक्षातले सामान उतरवून आतल्या खोलीत ठेवण्याचे काम सुरु होते. मीरा देखील आपल्या ताटात तांदूळ घेऊन बाहेर येत होती. एक मुलगा पत्रावळींची गोणी घेऊन आत जात होता. इतक्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला.
“ए मोन्या… आवर लवकर... आजून भांडी हानूक जाऊचा हा..." तसा पत्रावळीची गोणी घेऊन जाणारा मुलगा मागे वळला. त्याच्या हातातील त्या गोणीचा धक्का मीराच्या हाताला लागला. तिच्या हातातले तांदळाचे ताट हवेत उडाले आणि त्या तांदळाचा वर्षाव त्या दोघांवर झाला. मीराचा मूड आधीच खराब होता त्यात हे असं घडलं म्हणून रागाने तिने त्या मुलाकडे पाहिलं. तो बिचारा झाल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागत होता. आणि मीरा........................
ती मात्र सर्व भान हरवून त्याला पाहत राहिली... हो.. हाच होता तो. काल आपल्याला नदीवर दिसलेला. मोहन.. त्याच्या अश्या अनपेक्षितपणे समोर येण्यामुळे मीरा मात्र संपूर्ण गांगरून गेली होती. काय कळावं तिला काहीच कळत नव्हते. सगळं एखाद्या चित्रपटात व्हावं तसं घडतंय असं मीराला वाटत होत. ती खाली उचलून तांदूळ जमा करू लागली. तो देखील तिला मदत करू लागला. इतर काही मंडळी त्यादोघांना ओरडत होती. मोहन त्या सर्वांची माफी मागत होता. परंतु मीराला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं. ती पुन्हा एकदा सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती. तिच्या मैत्रिणीने तिला हलवले तशी ती भानावर आली. मोहनला सॉरी बोलून मीरा पुढे निघाली आणि जाताना तिने त्याला एक गोड स्माईल दिली जी त्याच्या हृदयात घर करून गेली.
दुपारी जेवणाच्या पंगती बसल्या. मोहन सुद्धा होता त्यात. त्याला पाहून मीराचा उत्साह द्विगुणित झाला होता. दोघेही एकमेकांस चोरट्या नजरेने पहात होते. खरं तर आज देवाच्या दारात त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव झाला होता. दोघांच्याही मनात प्रेमाचे अंकुर उमलू लागले होते. संपूर्ण दिवस दोघेही एकमेकांच्या जवळच घुटमळत होते. ओठांवरून शब्द निघत नसले तरी नजरेची भाषा बरेच काही सांगून जात होती. दोघांनाही एकमेकांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. संपूर्ण दिवसातल्या वावरण्यातून मोहनला मीराबद्दल बरीच माहिती समजली होती. म्हणजे तिचे आई वडील कोण आहेत, मुंबईला कुठे राहते काय करते इत्यादी... आणि मीराला फक्त त्याच नाव माहित होत…. ‘मोहन’……
मोहन नंदकुमार परब. एकनाथ काकांच्या बहिणीचा म्हणजेच नर्मदा आत्येचा मुलगा. अवघा १०-१२ वर्षांचा असताना आईवडील अपघातात वारले. बहिणीला दिलेल्या वचनानुसार एकनाथ काकांनी त्याचा सांभाळ केला. काकींनी सुद्धा त्याला कधी परका मानला नाही. आपल्या मुलांइतकंच प्रेम त्याच्यावर सुद्धा केलं. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यातही मोहनने दहावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं. शेतीची आणि बागकामाची आवड असलेल्या मोहनने दहावी नंतर आपले सर्व लक्ष बागायतीकडे वळवले. काकांच्या नावे असलेल्या २० एकर जमिनीवर त्याने आंबा आणि काजूची रोपे लावली. दिवसभर फिरून, मोठमोठया बागायतदारांना भेटून तो आंबा आणि काजू बागायतीविषयी माहिती गोळा करीत असे. त्यानंतर त्यात आपले थोडे बुद्धिकौशल्य लावून तो निरनिराळे प्रयोग आपल्या बागेत करीत असे. मोहनच्या मेहनतीचं फळ अवघ्या तीन वर्षातच दिसू लागले. त्याने लावलेल्या सर्व झाडांना पहिला मोहर आला. झाड अजून बहरण्यासाठी तो खुडून टाकायचा असतो; असे त्याने ऐकले होते. म्हणून मनावर दगड ठेवून त्याने तो मोहर खुडून टाकला. त्याचा हा प्रयोग १००% यशस्वी ठरला. त्याच्या पुढच्या वर्षी संपूर्ण गावात मोहन इतकं उत्पादन कोणत्याही बागायतदाराने घेतले नाही. त्यानंतर मोहनने कधीच मागे वळून पहिले नाही. नवनवीन बागा विकत घेणे आणि त्यावर आपल्या पद्धतीने उत्पादन घेणे अश्याप्रकारे मोहन आपला व्यवसाय वाढवत होता. केमिकल विरहित फळ उत्पादन करीत असल्यामुळे मोहनच्या फळांना बाजारात खूप मागणी होती. तो तालुक्यातील पहिल्या पाच क्रमांकातील एक आणि तरुण वयातील एकमेव बागायतदार बनला. फक्त शिक्षणाअभावी तो जास्त पुढे जाऊ शकला नाही. असो….
पुढल्या दिवशी मोहन मीराच्या नदीवर जाण्याची वाट पाहत होता. मीरा देखील मुद्दाम त्याच्या समोरूनच नदीकडे जाण्यास निघाली. लगेच मोहनने बच्चेकंपनीला नदीवर अंघोळी करण्यासाठी तयार केले. आता नदीवर मीरा आणि मोहन यांचे नजरेने एकमेकांकडे प्रेम व्यक्त करणे सुरु होते. हि गोष्ट शोभा म्हणजेच मोहनच्या बहिणीच्या (एकनाथ काकांची मुलगी) नजरेतून सुटली नाही.
तिने ह्या दोघांची गंमत करण्यासाठी मोहनला जवळ बोलावले. मोहन देखील पटकन पाण्यात सूर मारून तिच्या समोर येऊन उभा राहिला. शोभाने त्याला नदीच्या बाजूला असलेल्या झाडावरून रातांबे काढून देण्यास सांगितले. मीरा त्याच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहत होती. मोहनने थोडसं वर जाऊन झाड हलवायला सुरुवात केली तसे पिकलेले रातांबे नदीच्या पाण्यात पडू लागले. शोभा, मीरा आणि त्यांच्या मैत्रिणीने लगेच ते जमवायला सुरुवात केला. झाडावरून मीराला न्हाहाळतांना मोहनला खूप आनंद मिळत होता.
बघता बघता एक टोपली भरून रातांबे काढून झाल्यावर मोहन खाली उताराला, मीरा मात्र आपले लहानपणीचे दिवस आठवून त्या पाण्यात रातांब्यांसोबत खेळण्यात मग्न होती. शोभा आणि मोहन आपल्याला बघतायत याचे तिला भानच नव्हते. जेव्हा तिच्या हे लक्षात आले तेव्हा ती लाजेनं चुरचुर झाली. नंतर शोभाने त्या दोघांची ओळख करून दिली. प्रथमच ते दोघे एकमेकांशी बोलत होते. सर्वसाधारण हाय-हॅलो नंतर सर्व आपापल्या वाटेने घराकडे येण्यास निघाले.
आता त्यांच्यात संवाद सुरु झाला होता. सर्व कामे करीत असताना मोहन मुद्दाम मीराला मदत करण्याचा बहाणा शोधत होता. शोभाची साथ त्याला होतीच. रात्रीची जेवणे उरकून सर्वजण अंगणात बसले होते. गोंधळ दोन दिवसांवर येऊन ठेपला होता. कोणी काय काम करायचं याची आखणी केली जात होती. सर्व कामात मोहनच नाव अग्रेसर होत. म्हणजे हा सर्व कार्यक्रम त्याच्या देखरेखीखाली पार पडत होता असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. शेवटी मात्र सर्वांनां सदाभाऊंची आठवण येत होती. एकनाथराव लहान मुलांना सदाभाऊंचे किस्से सांगत होते. त्यांच्या आठवणीने सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. गप्पा संपल्या तसे सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराकडे वळले. मोहनच्या घराच्या वाटेतच मीराचे घर लागत असल्याने मीरा, मोहन आणि शोभा असे तिघे एकत्रच घरी जाण्यास निघाले. चालताना मुद्दामच शोभाने मोहनला मध्ये ठेवले त्यामुळे चालताना अधेमधे त्यांच्या हाताचा स्पर्श एकमेकांना होत होता. त्या स्पर्शाने दोघेही सुखावत होते.
गोंधळाच्या आदल्या दिवशी सर्व तयारी झाली आहे याची एकनाथ काकांनी खात्री करून घेतली. आजूबाजूच्या सर्व गावात आमंत्रण दिले गेले. जेवणाची भांडी जमा करून घासून तयार ठेवली गेली. एक ना अनके कामे भरभर हातावेगळी केली जात होती. ह्या कामात एकनाथ काकांना मदत करणारा मोहन मात्र सगळ्यांच्या नजरेत भरला होता. न थकता अखंड काम करणाऱ्या मोहनने मधुकरराव आणि मालतीताईंचे मन देखील जिंकून घेतले होते. मीराचे देखील तसेच होते. घरातल्या सर्व कामात ती हातभार लावत होती. लहान मुलांना वेळेवर खाऊपिऊ देणे हि जबाबदारी मीरावर सोपविण्यात आली होती. मीरादेखील ती आनंदाने पार पडत होती. वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळत असल्यामुळे बच्चेकंपनी सुद्धा तिच्यावर खुश होती. ह्या धावपळीत आज दोघांना एकमेकांकडे पाहण्यास सुद्धा वेळ नव्हता. आज दुपारी जेवतानासुद्धा मोहन मीराच्या नजरेस पडला नव्हता. त्यामुळे ती काहीशी अस्वस्थ झाली होती. दिवस संपला रात्रीच्या जेवणाच्या पंगती बसू लागल्या. सर्व पुरुष मंडळी जेवून उठली. मोहन अजूनही उर्वरित कामे पूर्ण करण्यात व्यस्त होता. तो नसल्यामुळे मीराला जेवणाची इच्छा नव्हती. सर्व कामे संपून जेव्हा तो परत आला तेव्हा फक्त शोभा, मीरा आणि तीन चार मुली जेवायच्या बाकी होत्या. मोहनला पाहताच मीराचा चेहरा आनंदाने खुलला. शोभाने सर्वांना जेवायला वाढले. जेवणे उरकून सर्व आपापल्या घरी झोपायला निघून गेले.
गोंधळाचा दिवस उजाडला. स्पीकरवर देवीच्या गोंधळाची गाणी वाजत होती. आचारी जेवणाची तयारी करण्यात मग्न होते. एकनाथ काकांनी गावकरांना बोलावणे धाडले. देवीला गाऱ्हाणे घालण्याचा त्यांचा मान असतो. गावकार आले तशी सर्व भावकी मंडळी देवघरात जमली. गावकरांनी आपल्या खास शैलीत खणखणीत आवाजात देवीला गाऱ्हाणे घातले. माफीची पाने ठेवली गेली. नारळ ठेवला गेला. देवीची माफी मागून तिला दर्शन देण्यास विनंती करण्यात आली. संभळ वाजू लागला. त्याचा नाद संपूर्ण घरात घुमू लागला. गावकार देवीला येण्यास आर्जव करीत होते. २-३ मिनिटातच एक जोरदार किंकाळी ऐकू आली. सदाभाऊंचा मुलगा अविनाशदादा आपल्या जागेवर हलताना आणि उड्या मारताना सर्वांना दिसला. संभळ जसा जोरजोरात वाजत होता तस तो अजून जोरजोरात हलू लागला. देवीचा कौल लागला. सर्वजण आनंदी झाले. अविनाशदादा मध्ये आज सर्वांना सदाभाऊ दिसत होते. तोच आवाज, तीच पद्धत, अगदी सर्वच्या सर्व तंतोतंत जशास तस. संभळ हळूहळू शांत झाला तसा अविनाशदादा बोलू लागला.
"इतकी वरसा लागली तुमका माका बोलवूक........ हा………..... मी खय नाय गेल्लय.......... हा……….....माझो मालक माका इसरलो हुतो... तेका जसो जास्त तरास होऊक लागलो, तशी त्येका माझी आठवण ईली.... म्हणून तेना आज सगळ्यांका हय बोलावल्यानं हा........... दारात ईलेल्याक तू जेवूक न देता माघारी धाडलस...... मी इलय हुतंय तुझ्या दारात..... तेव्हा उपाशी धाडलास म्हणून आज तुका सगळ्यांका जेवूक घालूक लावलाय...... आज माझा प्वाट भरला म्हणून मी हय ईलय...... मी माझ्या पोरांका इसरत नाय....... सगळ्यांवर लक्ष असा माझा.......... काळजी करा नको...... आणि कोणाक दुखवू नको..... माझो मान खय असा........ हान.....हान......हान.......हान......हान..... हुं हुं हुं हुं हुं हुं हुं हुं”
हे सर्व सुरु असताना मोहन आणि शेखर (एकनाथ काकांचा मुलगा) देवघरात दोन बाजूला दोन आरवते कोंबडे घेऊन उभे होते. मोहनच्या मागे मीरा आणि शेखरच्या मागे शोभा शेणाचा गोळा घेऊन उभ्या होत्या. देवीने "हान...हान....हान....हान" असा आवाज दिल्यावर एकनाथ काकांनी दोघांना कोंबडा कापण्यास सांगितले. दोघांनी कोंबडे कापून दोघे वेगवेगळ्या वाटेला गेले. त्यांच्या मागे मीरा आणि शोभा रक्तावर शेण सारवित गेल्या.
गोंधळाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे सर्व आनंदी होते. मोहन कोंबडा सोलण्यात व्यस्त होता. मुंबईत सोलले चिकन पाहणारी मीरा मोहनला कोंबडा सोलताना पाहण्यात गर्क होती. सर्व कामे आवरली. आचारी जेवण बनवून बसले होते. देवीला नैवेद्य दाखवून जेवणाच्या पंगतीला सुरवात झाली. एक एक करून पंगती उठत होत्या. जेवण उरकल्यावर गोंधळींनी रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी केली. सर्व तयारी झाल्यावर पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळी देवीच्या कथा सांगत होते. मीरा शोभा आणि मोहन एकत्र बसून ऐकत होते, जागरणाची जास्त सवय नसलेली मीरा मोहनच्या खांद्यावर कधी झोपी गेली तिला कळलेच नाही.
कथा संपल्यावर पहाटे चार वाजता देवीची ओटी भरणे आणि आपले मागणे सांगण्याचा कार्यक्रम सुरु होणार होता. तेव्हा मोहनने मीराला उठवले. आपले डोके मोहनच्या खांद्यावर होते हे पाहून मीरा थोडी ओशाळली.
सर्वजण फ्रेश होऊन पुन्हा एकत्र जमले. सुहासिनींनी देवीला (अविनाशदादाला) ओवाळले आणि तिच्या ओट्या भरल्या. दिवटीत तेल ओतून एकेकीनी आपले नवस सांगायला सुरुवात केली. काही जणी आपले नवस फेडत होत्या. मधुकररावांची वेळ आली. सर्वांनी देवीला नमस्कार केला. मीराने मनातल्या मनात मोहनशी आपले लग्न व्हावे असा वर मागितला. मधुकरराव काही सांगणार त्या आधीच देवीने सांगायला सुरुवात केली..
"लेकीच्या लग्नाची चिंता हा ना..... काय काळजी करा नको.... सोन्यासारखी लेक हा..... जावई पण तसोच मिळतलो..... तुझी लेक हयच माझ्या जवळ ऱ्हवतली… चालात ना गो मीरे तुका...????” असं विचारल्या बरोबर मीरा लाजली. तिने मान खाली घालूनच मोहनकडे पहिले. तिकडे मोहन आणि शोभा देखील तिच्याकडे पाहत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत होता. देवीच्या ह्या आशीर्वादाने मीरा आणि तिचे कुटुंबीय सुखाच्या सागरात म्हणून निघाले होते.
मीराला जरी मोहनच्या प्रेमाची पुष्टी मिळाली असली तरी अजून त्याने स्वतःहून ते तिच्यासमोर कबूल केले नव्हते. तसेच काहीसे मधुकररावांचे देखील झाले होते. 'मीरा इथेच राहणार' ह्या देवीच्या बोलण्याचा अर्थ त्यांना उमजत नव्हता. एकेक करून सर्व ओट्या भरल्या गेल्या. नवीन नवस बोलले गेले; पूर्ण झालेलं नवस फेडले गेले आणि अविनाशदादा शांत झाला.
दुसऱ्या दिवशी होम होता. सकाळी मोहन मुलांसोबत नदीवर पोहत असताना शोभा आणि मीरा कपडे धुण्यास येऊन पोचल्या. आज त्या दोघीच असल्यामुळे मोहनला आपले प्रेम व्यक्त करायला सुवर्ण संधी होती. शोभाने लगेच त्याला आवाज देऊन बोलावून घेतले. तसा मोहन त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. शोभाने त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यास सांगितले तसे दोघे लाजू लागले. शेवटी मोहनने विचारले….
मोहन - "देवीच्या सांगण्याप्रमाणे हयच ऱ्हवणार काय???"
मीरा - "बघू"
मोहन - "माका तू आवडत... माझ्याशी लगीन करशी काय???"
या अशाप्रकारच्या अनपेक्षित प्रपोजने मीरा गांगरून गेली.. तिने कसबस "आई बाबाना विचाराव लागेल" असं उत्तर दिल.
मोहन - "तुका मी आवडतंय काय???"
मीरा - ".........."
मोहन - "बोल कायतरी???"
इतक्यात शोभाने त्याला एक चापटी मारली आणि म्हणाली "गप ऱ्हवली म्हणजे तुका समजला नाय??? त्येचा पण प्रेम हा तुझ्यार.... जा आता घराकडे आणि बाबांक सांग तिच्या बाबावांगडाक बोलूक... ह्या वर्षाक तुमचा लगीन करून टाकूया." हे ऐकताच मीरा लाजेनं पाणीपाणी झाली. मोहनला आपल्या प्रेमाचा होकार मिळाला होता. आता फक्त घरून परवानगी मिळवायची होती. गावातले सर्व शुभकार्य उरकल्यानंतर मधुकररावांचे कुटुंब मुंबईला रवाना झाले. मुंबईत हसती खेळती मीरा आता शांत शांत राहू लागली. इकडे मोहन देखील असच काहीसा वागत होता. ‘निघताना आपण साधा एकमेकांचा मोबाइलला नंबर सुद्धा घेतला नाही. इतके कसे आपण बावळट’ असे त्या दोघांना राहून राहून वाटत होते. त्यांच्या वागण्यातील हा फरक दोघांच्या घरच्यांना लक्षात आला होता. परंतु दोघेही काहीच सांगत नव्हते. शेवटी शोभाने एकनाथ काकांना सर्व हकीकत सांगितली.
एकनाथकाका मीराला लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळे ते लगेच तयार झाले. मोहनच्या नकळत त्यांनी मधुकररावांना फोन केला. सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. त्याबरोबर देवीच्या बोलण्याचा अर्थ मधुकररावांना समजला. तसाही गावी असताना मोहनला त्यांनी पाहिलं होत. त्याचसोबत लग्न झालं तर आपली मुलगी सुखात नांदेल याची त्यांना खात्री होती. परंतु मीराचे शिक्षण वाया जाणार याचे त्यांना वाईट वाटत होते. घरी येऊन त्यांनी मालतीबाईंनी सकाळचा प्रसंग सांगितला. मालतीबाईंनी देखील मोहन पसंत होता. परंतु मीराला याबद्दल कसलीही कल्पना दिली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी एकनाथरावांना फोन करून मुंबईला येण्यास सांगितले. सर्व गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या. येणारी रविवारी बघण्याचा कार्यक्रम ठेवू आणि दोघांना सरप्राईस देऊ असे सुचविले.
मीराला आदल्या दिवशी तिला एक मुलगा पाहायला येणार आहे असे सांगितले. मोहनसोबत संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या मीराला एका क्षणात सर्व संपत आहे असे जाणवलं. मोबाइल नंबर घेतला नसल्यामुळे मोहनशी बोलू पण शकत नव्हती. घरी सांगावं तर आईवडिलांची मान खाली जाईल असं तिला करायचं नव्हतं. शेवटी त्यांच्या सन्मानासाठी तिने आल्याप्रसंगाला समोर जायचं ठरवलं. इकडे एकनाथकाकानी ‘आपल्या सर्वाना उद्या मुंबईला जायचं आहे’ असे सांगितलं. काकींनी कारण विचारलं असता ते तिच्यावर ओरडू लागले. तिकडे काय काम आहे हे फक्त त्यांना आणि शोभालाच ठाऊक होते.
मुंबईला आल्यावर एकनाथ काका आणि सर्व कुटुंब एका नातेवाईकाकडे उतरले. तिकडे थोडा आराम करून सर्वजण मीराच्या घरी येण्यास निघाले. वाटेत काही मिठाई आणि भेटवस्तू खरेदी करून सर्वजण मीराच्या घरी पोचले. तिकडे जाईपर्यंत काकी, मोहन आणि शेखर यापैकी कोणालाच काही कल्पना नव्हती. आणि काकांचा कालचा अवतार बघून काही विचारण्याची हिम्मत पण नव्हती. मीराच्या घरी मीराचे मामा-मामी, मावशी आले होते. घरात सर्व अनोळखी असल्यामुळे मोहन त्यांना ओळखू शकत नव्हता. फॉर्मल बोलणी झाल्या नंतर काकांनी इथे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि ते मीराच्या मामांसोबत बोलू लागले.आपल्यासाठी मुलगी बघत आहे हे समजल्यावर मोहनचा चेहरा एकदम उतरून गेला. आपण काकांना मीराविषयी सांगायला हवं होत असं त्याला वाटू लागलं. पण आता हि योग्य वेळ नाही; येईल तिला नकार देऊ आणि नंतर काकांशी बोलू असे त्याने मनाशी ठरविले.
काकांनी पाहुण्यांना मुलीला बोलाविण्यास सांगितले. मावशींनी मीराला बाहेर येण्यास सांगितले. तसे मधुकरराव आणि मालतीताई मीराला घेऊन बाहेर आले. समोर ह्या तिघांना पाहून मोहन जागच्या जागी उडाला. काकी आणि शेखर तर अजूनही काही समजत नव्हते. मीरा बिचारी खाली मान घालून हातात पोह्यांचा ट्रे घेऊन उभी होती. मालतीताईंनी तिला सर्वांना पोहे देण्यास सांगितले. तसे पुढे होऊन तिने सर्वाना पोहे देण्यास सुरुवात केली. बाकी सर्वानी निमूटपाने आपल्या प्लेट्स घेतल्या. मीरा शोभाकडे वळली तसा शोभणे तिला चिमटा काढला. शोभाच्या ह्या अनपेक्षित कृतीमुळे मीरने चिडून वर बघितले. समोर शोभला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर तिने मोहनकडे पहिले, तोदेखील अजून शॉक बसल्यासारखा बसून होता. माधवराव, मालतीताई, एकनाथकाका आणि शोभा मात्र गालातल्या गालात हसत होते. नंतर मधुकररावांनी बोलण्यास सुरुवात केली.
"ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. पण आपले संस्कार आणि आपला आदर यामुळे ह्या दोघांनी आपल्याला काही सांगितले नाही. सुदैवानं हि गोष्ट शोभाला माहित होती. तिने हे सर्व एकनाथला सांगितले. त्याला मीरा सून म्हणून पसंत होती. लागलीच त्याने मला ह्या गोष्टीची कल्पना दिली. देवीने मीरा तिच्या जवळ राहणार असे का सांगितले ह्याचा मला उलगडा त्यावेळी झाला आणि मोहन विषयी सांगायचं झालं तर गावी असताना एक आदर्श जावई कसा असावा ह्याच मूर्तिमंत आणून मोहन माझ्या डोळ्यासमोर होता. मला आणि मालतीलादेखील तो जावई म्हणून पसंत आहे. आता आम्ही जे ऐकलं ते खरं आहे कि खोटं हे ह्या दोघांनी सांगावे.... काय मीरा.... मुलगा पसंत आहे का???" असे बोलताच मीरा लाजून आत पळाली. मोहन देखील तितकाच लाजून जमिनीकडे पाहत होता. थोड्या वेळाने मीरा बाहेर येऊन बसली तसे एकनाथकाका बोलू लागले.
"मधुकरा, बिना आवशी बापासाचो पोर मी माझ्या पोरासारखो सांभाळलंय. माझ्या घरची परिथिती काय हुती ती तुका माहिती हा. आज जा पण काय माझ्याकडे हा ती सगळी ह्या पोराची मेहनत हा. ह्येना कधीच आमचो शब्द खाली पडूक दिल्यानं नाय. आज देवान दिलेला सगळा आमच्याकडे हा. आणि तुझा चेडू माझ्या घरची सून व्होऊचा हि देवीची इच्छा असा. ह्या दोघांच्या आनंदापुढे आमका काय मोठा नाय. तेव्हा तू मीराक नुसत्या अंगावरच्या कपड्यांसकट जरी पाठवलंस तरी आम्ही तेचो स्वीकार करुक तयार असावं. बाकी आता तुझा काय ता तू सांग."
मागच्या जन्मी काय पुण्य केले होते म्हणून हे असं स्थळ आमच्या मीराच्या नशिबी आले असे तिच्या आईवडिलांना वाटत होते. एकनाथकाका नको म्हणत असताना देखील मधुकररावांनी आपल्या ऐपती प्रमाणे बोलणी केली, शेवटी हे त्यांच्या घरातील पाहिलं आणि शेवटचं लग्न होत. फक्त मीरने तिच्या शिक्षणाचा काहीतरी सदुपयोग तिथे करावा हि एकच आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर मोहन आणि मीरने "आम्ही आंब्याचं अजून चांगल्याप्रकारे मार्केटिंग करणार आहोत" असे एकदम उत्तर दिले. त्याबरोबर सर्व मंडळी हसू लागली. त्यांना हसताना पाहून दोघेही ओशाळले. बाकी सर्व मंडळी लग्नाची तारीख आणि कार्यक्रम ठरविण्यात व्यस्त होती. इकडे मीरा आणि मोहनच्या मनात आतापासूनच सनई-चौघडे वाजत होते. विधात्याने लिहिलेली एक प्रेमकहाणी त्याच्या पूर्णत्वाकडे सरकत होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults