लॉकडाऊनच्या काळात घरात समाधान कसं राखाल? - भाग ३ - समुपदेशन

Submitted by अतुल ठाकुर on 8 April, 2020 - 10:53

sulabhatai_2.jpg

पहिल्या लेखात लॉकडाऊनच्या काळात नाना प्रकारच्या समस्या कशा येऊ शकतात याबद्दल सुलभाताईंनी चर्चा केली. आज त्या या समस्यांशी आपण कशाप्रकारे तोंड देऊन आपले समाधान राखु शकतो याबद्दल सांगत होत्या. सुलभाताई ज्याप्रकारे सकारात्मक बोलत होत्या (त्या नेहेमी सकारात्मकच बोलतात) त्यामुळे मला असे वाटले की हा लॉकडाऊन कुटूंबातील हरवलेला संवाद पुन्हा सुरु करण्याची जणु चालून आलेली संधीच आहे. त्या म्हणाल्या बहुतेकदा शहरात एकत्र मिळून कुटूंबात अलिकडे फारसं काही केलंच जात नाही. फार तर आपण एकत्र बसून टिव्ही. पाहतो. ज्याला एकत्र मिळून केली जाणारी कृती म्हणता येणार नाही. आता मात्र आपल्याला एकत्र राहावंच लागणार आहे आणि कामही करावं लागणार आहे. तेव्हा स्वतःच्या स्पेसचा विचार करून वादविचाद करायचा आहे की एकमेकांची बलस्थाने आणि मर्यादा ओळखून हे दिवस सुखासमाधानाने काढायचे आहेत हे आपल्यात हातात आहे.

हे करायचे कसे विचारले असता सुलभाताईं म्हणाल्या की आपल्याला नव्याने सर्वांचा मिळून दिनक्रम आखला पाहिजे. यात आपल्याला सर्वांच्या मर्यादांचेही भान लक्षात घेतले पाहिजे. घरातील ज्येष्ठांना काही आजार असु शकतात. काहींना इतर काही मर्यादा असु शकतात. याचा विचार करून हा दिनक्रम बनवता येईल. यात कामांची विभागणी करता येईल. ही विभागणी केल्यावर अनेकदा ती काटेकोरपणे पाळली गेलीच पाहिजे अशी अपेक्षा नेहेमीच करता येणार नाही. उदाहरणार्थ समजा आता घरात कामासाठी बाई येत नाही तेव्हा पत्नीने भांडी घासण्याची जबाबदारी घेतली आणि पतीने झाडू मारणे आणि जागा पुसण्याची जबाबदारी घेतली असेल तर पत्नीला बरं नाही म्हटल्यावर भांड्यांची जबाबदारी तु घेतली आहे तेव्हा भांडी तूच घासली पाहिजेस असे म्हणता येणार नाही.

कामाची विभागणी केल्यावर काम करताना सूर जुळणे महत्त्वाचे. यांत्रिकपणा येता कामा नये. आणि यासाठी मनाचा लवचिकपणा आवश्यक आहे हे सुलभाताईंनी आवर्जून सांगितले. स्वत:ची जबाबदारी ओळखून एकमेकांबद्दल आदर राखून, एकमेकांच्या मर्यादा ओळखून हे काम केल्यास काम सुरळीत होऊ शकेल. मात्र काटेकोरपणाच्या फुटपट्टीने सगळीकडे मोजायला गेलं तर मात्र चीडचीड होईल. मशीन सुरळीतपणे चालण्यासाठी जसे वंगण लावले जाते तसे या काळात मनाची स्निग्धता, उदारपणा हा घरात एकत्र राहताना वंगणासारखा कामी येईल. तो असला तरी हा नवा दिनक्रम मार्गी तर लागेलच शिवाय एकत्र मिळून केली जाणारी कामे हा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन जातील. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात आपल्यातला संवाद वाढवूया.

सुलभाताई स्वतः मैत्र हेल्पलाईनच्या फेसबुकपेजवर लिहित असतात. त्याची लिंक देत आहे.

https://www.facebook.com/Maitra-Emotional-Distress-Helpline-229722830395368

(क्रमशः)

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users