सुशेगात
'गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा' ह्या ओळी आपल्याला ताडा-माडाच्या, नारळ-पोफळीच्या वाडीत नेतात. तिथून अजून खाली आलं तर आपलं लाडकं गोवा आपलं हसून स्वागत करतं. गोवा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येऊन जातं. विशीत तरुण होऊन बीचेस वर भटकत, रात्रभर एका बीच वरून दुसऱ्या बीच वर, दोन चाकी वरून विशीतलं हे गोवा धुमाकूळ घालतं. त्यात जास्तं करून उत्तर गोवा अग्रेसर! तिशी-चाळीशीत तेच गोवा आपल्याला उत्तरेतून दक्षिणेकडे घेऊन येतं! तोपर्यंत खरं गोवा कुणी बघितलेलंच नसतं! आमच्या आयुष्यात गोवा आलं तेच मुळी निवांत तिशीत आणि मागच्या जन्मीच्या पुण्यसंचयामुळे हक्काच्या घरात, इथं घर असायला पुण्यंच लागतं, अगदी खरं!
सुशेगात व्हाऱ्यांड्यात बसलेले गोव्यातले अंकल (इथे आजोबा म्हणलं तर पाप ठरेल), छानसे गोवन झगे घालून एका हातात छत्री तर दुसऱ्या हातात पिशव्या घेऊन बाजारात चालेलल्या आँटीज आपल्याला इथे आल्याची वर्दी देतात. गोव्याची एक बाजू जशी अगदी उनाड तितकीच ही दुसरी बाजू निवांत सुशेगात असते. दिवस पाव वाल्यांच्या सायकल ने सुरु होतो तोही अगदी आरामात, कुठे कसली घाई - लगबग नाही! इथल्या मातीत, वातावरणात एक लय आहे,एक ठेहराव आहे, सूर्योदयया पासून रात्रीच्या शांततेत सगळ्यांत संगीत आहे, त्याचा ताल तुम्हाला गवसला तर तुम्ही गोव्याचेच होऊन जाल नक्की!
सकाळी मस्त बेगल्स, बन्स, कोलंबीचं हुमण किंवा कसलीशी उसळ खाऊन लोकं निवांत मासे आणायला बाहेर पडतात, जेवणात मासे वगळता गोवेकर उपाशी मरतील, अलबत! हं पण म्हणून गोवन जेवण मासे-भात पुरतं मर्यादित मुळीच नाही! इथल्या लहान लहान गल्ल्या-बोळांत फिरून जेवल्या शिवाय इथली समृध्द खाद्य संस्कृती कळणं निव्वळ अशक्य! अशा जेवणांवर ताव मारल्याशिवाय ते कळणार नाहीच! गोवा म्हणजे अखंड किनाऱ्यावर जाऊन 'मौज' करण्यापलीकडे बरंच काही आहे.
इथल्या गल्ल्या इथली गावं पावला-पावला वर इथल्या अशा वेगळ्याच संस्कृतीच्या खुणा दाखवतात! पोर्तुगीज, कोकणी, मराठी मुख्य अश्या अजब संस्कृत्या इथे एकत्र नांदतात.
मराठी संस्कृती मूळची, खूप मोठ्या प्रमाणात फोंडा, पणजी मडगाव या ठिकाणी जास्तं विसावलीए. इथली देवळं इतकी देखणी! इथल्या देवळांत पण एक प्रकारचा निवांतपणा आहे! निवांत दर्शन घ्या, सभा मंडपात बसा, कुठे कसली घाई नाही, ना देवाला ना येणाऱ्या माणसांना. कुठे चाफा, नारळ डुलत असतात, कुठे आंबे फणस लगडलेले असतात. नागेशी मंगेशीच्या गाभाऱ्यात जी सादगी तिच बाहेरच्या परिसरात. महाळसेच्या मंदिरात बसलो तर ब्रह्म्हांनंदी टाळीच! इथला देव गाभाऱ्यात नाहीच मुळी, तो बाहेरच इथल्या ताडा- माडात आणि भाताच्या शेतात तर कधी समुद्रात!
पुढे पणजीत आलो की मराठी-पोर्तुगीज-ख्रिश्चन संस्कृतीची सरमिसळ पाहायला मिळते! इथल्या 'फौंटनहास (Fontainhas)' मधल्या गल्ल्या आपल्याला एखाद्या युरोपातल्या शहरात नेतात!Fontainhas हे लॅटिन क्वार्टर, साधारण १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात अँटोनियो जोआओ डी सिक्वेरा नावाच्या सधन पोर्तुगीजाने फोंटाइनहासची स्थापना केली. त्यांनी या जागेचा उपयोग नारळाच्या लागवडीसाठी केला. पण, जुन्या गोव्यामध्ये साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यामुळे १८०० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज सरकारचे मुख्यालय पणजी मध्ये हलविण्यात आले. परिणामी, पोर्तुगीज प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्त्यांसाठी या क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर झाले. १९८४ मध्ये, युनेस्कोने फोंटाइनासला हेरिटेज झोन म्हणून मान्यता दिली.इथल्या घरांची आखीव-रेखीव बांधणी, मोठाल्ले व्हरांडे, रंगीत बाल्कन्या उतरणीवर असलेले टुमदार बंगले आणि त्यांची लाल कौलं आपल्याला मागच्या काळाची सफर घडवून आणतात! इथली एक गंमत म्हणजे ते दरवर्षी पावसाळ्यात हि घरं रंगवतात; हा एक नियम आहे जो पोर्तुगीजांनी आखला होता, जो आज पाळला जातो. अशी रंगीत घरं, सुंदर व्हरांडे, नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि दारं मन मोहून टाकते. इथे अगदी १००-१५० वर्षं जुने कॅफेज आणि बेकऱ्या आहेत, इथल्या गल्ल्यांमधून फिरताना बेकरीच्या सुगंधाने पावलं आपोआप तिथे वळतात, Confectaria ३१ De Janerio हि अशीच एक कॉन्फेकशनरी १६० वर्षं जुनी, इथल्या वूड ग्रील मधल्या कुकीज, टोस्ट्स वर ताव मारण्यात निराळीच मजा येते! आणि त्याही पेक्षा गंमत सुंदर नक्षीकाम केलेल्या चिनी मातीच्या नाजूक टि-सेट मधून चहा-कॉफी पिण्यात आहे! निव्वळ स्वर्गीय!
अजून खाली वास्को च्या दिशेने येऊ तसं गोव्यातली मजा अजूनच वाढते! सुदैवाने पर्यटकांचे लोंढे अजून तरी इथल्या अनवट वाटांवर फिरत नाहींत तेच बरं आहे. मेन हायवे सोडून आतल्या रस्त्याने फिरण्यात वेगळीच मजा आहे! वेल्साओ, उतोर्डा, फुतोर्डा, माजोर्डा आणि कोलवा अशा सलग किनाऱ्यांची माळच इथे आहे. नितांत सुंदर किनारे आणि कमी रहदारी त्यामुळे इथे सूर्योदय,सूर्यास्त बघणं म्हणजे मेजवानीच. भल्या पहाटे इथे आलं तर वेल्साओच्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यालगत गावातल्या ५-६ आँट्या नवऱ्याने दर्यातून आणलेली रत्नं विकायला बसतात. पांढऱ्या वाळूत, निळ्याशार पाण्यातले ते चकचकीत मासे माणिक मोत्याना लाजवतील इतके सुंदर असतात. सोबत विकणाऱ्या बायकांच्या खट्याळ कोकणी गप्पांनी त्यावर अगदी चारचाँद लागतात.
ताडा-माडाची, सुपारी-पोफळीची हिरवाई आणि त्या अगदी विरुद्ध रंगाची टुमदार घरं व्हार्यांड्यात मासे खाऊन निवांत पहुडलेली मांजरं- कुत्रे एक वेगळाच लँडस्केप तयार करतात, खरंतर इतके भडक रंग ह्या घरांचे पण ह्या वातावरणात अगदी फिट बसतात! लहानपणी चित्रकलेत शिकलेले सौम्य रंग-उष्ण रंगछटा वगरे सगळी गणितं इथे सपशेल नापास ठरतात.
सकाळ संध्याकाळ भाताचे डोंगर बांगडा-सुरमई च्या हुमाणा सोबत रिचवल्यावर अस्सल गोवेकर आपापल्या घराच्या बाहेर निवांत फेणीचा (की अजून कसला?) आनंद घेताना दिसतो. मासे, फेणी नंतर सर्वात लाडकं गोव्यात काही असेल तर ते 'सिएस्ता' म्हणजे दुपारची झोप! त्याशिवाय गोवेकर गोवेकर नव्हेच!
इथून पुढे जसे आपण कोलव्याच्या दिशेने येऊ तिथेच एका वळणावर परत एकदा तो मोहक अद्भुत बेकरीचा सुगंध दरवळतो, तिथे वळायचंच! छोटीशी सेंट व्हिक्टोरिया नावाची बेकरी लागते, तिथे नाना प्रकारचे केक हादडल्या शिवाय पुढे गेलं तर शिक्षा करावी इतकं इथे थांबणं गरजेचं आहे. गोव्याच्या दक्षिणेला जावं तसतसं त्याचं सौदर्य आणिकच वाढत जातं, किनारे अजूनच सुंदर होतात, नारळांची डुलणारी रांग वाढते, भाताची हिरवी शेतं वाढतात, हिरव्या छटा गडद होत जातात वाढत जातात.
देवाच्या दालनातल्या इंटिरियर डेकोरेटर च्या टीम ने जीव ओतून ह्या भागाला सजवलंय असं हे द.गोवा.
पालोलेमच्या किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या थोडं आधी येऊन बसलं की पांढऱ्या वाळूत परतीला लागलेल्या होड्या आणि कोळ्यांची लगबग बघायची, सूर्याचाही पाय निघवत नाही लवकर, हळू हळू अस्ताला जात, तरी बराच वेळ संधिप्रकाशाच्या रूपात रेंगाळत राहतो तोही. लाटांची गाज ऐकत, वारं अंगावर घेत कुठल्यातरी इंग्लिश नाहीतर कोकणी गाण्याच्या ओळी आपल्यात भिनत जातात. इथल्या गोव्याच्या हवेतच एक नशा आहे.
मला भावलेली बरीच शहरं आहेत, बऱ्याच जागा आहेत! काही ठिकाणं ऐतिहासिक असतात काही बघणीय असतात! काही नुसतीच फेमस म्हणून पालथी घातलेली असतात! गोवा मात्र ह्या पलीकडे आहे. शहर, गाव, ठिकाणं, पर्यटन ह्यापलीकडे गोवा हा एक अनुभव आहे! त्याची धुंदी ही इथल्या फेणी आणि माश्यांमुळे नाहिच मुळी, ती इथल्या हवेतच आहे, इथल्या निसर्गात आहे, इथल्या लोकांत आहे! कोणतीही एक जागा किंवा एक संस्कृती गोव्याला साच्यात ठेऊ शकत नाही, देशांच्या-संस्कृतींच्या सीमा ओलांडून काही असेल तर ते हे गोवा आहे! इथली चर्चेस देखणी तर देवळं मोहक आहेत. पाव सोबत उसळ आणि भात सोबत मासे, कोलंबीचं लोणचं आणि नारळाच्या दुधातलं बेबिन्का हे गोवा आहे! त्याचा गोडवा कुठल्याही साच्यातन बघून नाही तर दरवेळी वेगळा दिसणारा, वाटणारा कॅलिडोस्कोप म्हणजे गोवा आहे!
१
२ पालोलेम
३ Fontainhas ची साक्षीदार
४ Confectaria ३१ De Janerio
५
६ Fontainhas
७
८
९
१०
११ कोलवा
गोव्यात पार फिरवुन आणलस गो
गोव्यात पार फिरवुन आणलस गो माजी बाय ! धन्यवाद! मस्त माहिती आणी झकास फोटो.
अप्रतिम वर्णन! सुंदर!
अप्रतिम वर्णन! सुंदर!
@rashmi, thank you, lock down
@rashmi, thank you, lock down zala ki ya nakki govyat
Thank you vave!
सुंदर फोटोज आणि लिखाण
सुंदर फोटोज आणि लिखाण
झकास लेख !
झकास लेख !
As you extend a mile on the beach shore, you also extend the privilege to live better.
मंद्र सप्तकातला दक्षिण गोवा फार आवडतो आणि जुनी कलाश्रीमंती मिरवणारी गोवन घरे पण.
As you extend a mile on the
As you extend a mile on the beach shore, you also extend the privilege to live better>>+++1111
Thanks jaai and anindya
छान लेख
छान लेख
मस्त. सुशेगाद की सुशेगा त?
मस्त.
सुशेगाद की सुशेगा त?
मस्तच.... लेख सुंदर व फोटो
मस्तच.... लेख सुंदर व फोटो अप्रतिम..
गोव्यात सुशेगात फिरायचे आहे मला, आरामात चवीचवीने गोवा बघत. ...
सुंदर लेख.
सुंदर लेख.
गोवा भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या.
वा एक्दम झक्कास ... तुझ्या
वा एक्दम झक्कास ... तुझ्या शब्दानी गोवा फिरवुन आणले. मस्त टिपलयस सर्व काही
हायला
हायला
आता ४ते ७ फेब्रुवारीला निवांत गोव्यालाच जाऊन आलो. मुळात १९९९ ते २००४ असे साडे चार वर्षे गोव्यात पोस्टिंग होते. तेंव्हा पासून जवळ जवळ दर वर्षी गोव्याला जातोच. बाकी उत्तर गोवा हा लग्न होण्याच्या अगोदरच जाण्याच्या लायकीचा आहे.
संपूर्ण दक्षिण गोवा किती शांत आहे. नौदलाच्या रेस्ट हाऊस मध्ये राहिलो आणि चार दिवसासाठी एक मोटार भाड्याने घेतली होती( १००० रुपये दिवस).
(गोव्यातील टॅक्सीवाले महाचोरच आहेत)
चार दिवस राहून पोट फुटेस्तोवर सोरपोतेल, शाकुती, रशाद, फिश अँड चिप्स खाऊनही पोट भरलंच नाही.
आठ जेवणात एकदाही उत्तर भारतीय जेवण जेवलो नाही.
७ क्रमांकाचा फोटो हॉलंट( विस्वसी) किनाऱ्याचा वाटतोय?
होंटेड चर्च, वेळसाव, उतोरडा, बाणावली किनारा शांत स्वच्छ असतात.
यावेळेस कार्निव्हाल मुळे कोलवा किनारा जरा जास्तच गजबजलेला होता.
बाकी लेख परत एकदा डोळ्यासमोर गोवा जिवंत पणे उभा करतो
सुंदर
Sarva pratisadanbaddal
Sarva pratisadanbaddal dhanyawad
Bingo!
@subodh, tumchi Goa bhatkanti mastach, khanyaryane khat jave asa ahe Goa, 7 number cha photo हॉलंट cha ch ahe..
Tumhi Navyt asal tr tumcha Vasco bogmalo velsao chikalim sagla parisar firun zala asel!
@devki kahi thikani sushegad hi wachlay pan ithe tari sushegat ch mhantayt..
ओ.के.
ओ.के.
मस्त लेख मस्त फोटो
मस्त लेख मस्त फोटो
कसलं रिलॅक्स वाटतय फोटो बघून
कसलं रिलॅक्स वाटतय फोटो बघून
. सुशेगात आवडल.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
मस्त लेख!
मस्त लेख!
खूप आठवण येते आहे गोव्याची.
छान
छान
सुंदर वर्णन लेख आणि फोटोज.
सुंदर वर्णन लेख आणि फोटोज.
फार आवडला लेख.
फार आवडला लेख.