कोठे तू गेलास विठ्ठला ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 March, 2020 - 05:30

प्रेमामध्ये ठेचकाळला
पडलेल्यांवर नाही हसला

मन राधेसम निर्मळ होते,
अनुभव आले... रंग फासला

तू माझ्या डोळ्यातिल वादळ
समुद्र मीही तुझ्याआतला

आयुष्याच्या कॅनव्हासवर
नियतीचा निष्णात कुंचला

अशी जखडते तुझी आठवण
प्रेम म्हणू की म्हणू शृंखला ?

परिस्थितीचा गुलाम मानव
निसर्गापुढे कायम झुकला

वामांगी तिष्ठते रुक्मिणी
कोठे तू गेलास विठ्ठला ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users