एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहाते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो...
अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो. थोडा मोकळा वेळ मिळाला, म्हणून सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलो, आणि गल्लीतल्या गुलमोहोरांच्या सावलीतून पुढे जात असताना अचानक एका बंगल्याच्या पाटीवर नजर स्थिरावली. मन क्षणभर मोहरलं... 'प्रख्यात कथाकार जी. ए. कुलकर्णी येथे राहात होते', असा फलक बंगल्याच्या दर्शनी भिंतीवर दिसला, आणि आम्ही थबकलो. असं काही दिसलं, की फोटो काढून ठेवावासा वाटतोच! तसंच झालं. मोबाईल काढला, त्या बंगल्याचा फोटो काढला, तेवढ्यात, 'पुणे ऐतिहासिक वास्तु स्मृती' म्हणून जतन केलेल्या त्या बंगल्याच्या खिडकीतून कुणीतरी डोकावताना दिसलं. मग मात्र, आपण आगाऊपणा करतोय असं वाटू लागलं, आणि तीनचार फोटो काढून झाल्यावर, सभ्यपणानं विचारलं, 'फोटो काढले तर चालतील ना?' त्यांनी मंद हसून परवानगी दिली, आणि पुढच्या काही मिनिटांतच बंगल्याचा दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. आम्ही गेटबाहेर, रस्त्यावर होतो. मग त्याच म्हणाल्या, 'आत या, आणि फोटो काढा'!... पुन्हा एक पर्वणी चालून आल्यासारखं वाटलं. आत शिरलो. नवे फोटो काढले. जुजबी बोलणंही झालं, आणि त्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी आम्हाला अगत्यानं घरात बोलावलं. मी आणि वीणा- माझी बायको, दोघं आत गेलो, आणि गप्पा सुरू झाल्या... आता एक खजिना -आठवणींचा खजिना- आपल्यासमोर उलगडणार हे अलगद लक्षात यायला लागलं, आणि, पूर्वी झपाटल्यागत वाचून काढलेल्या जीएंची मी मनातल्या मनात उजळणी करू लागलो...
जी. ए. कुलकर्णी नावाचं एक गूढ, साक्षात त्यांच्या भगिनीच्या, नंदा पैठणकरांच्या मुखातून उलगडू लागलं, आणि आम्ही कानात प्राण आणून ते साठवून ठेवू लागलो... जीएंच्या कथांनी तरुणाईच्या उंबरठ्यावरच वेड लावलं असल्याने, मधल्या, एवढ्या वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा, जीएंच्या घरात बसून, त्यांच्या भगिनीकडून जीए नव्याने ऐकू लागलो. जीए एकलकोंडे होते, माणसांपासून अलिप्त रहायचे, फारसं बोलत नसत, त्यांच्या जगण्यातही त्यांच्या कथांसारखं काहीसं गूढ होतं, वगैरे काही समजुती, -त्या वाचनकाळापासूनच- मनात घर करून होत्या. आज त्यांचा उलगडा होणार, याची खात्री झाली, आणि गप्पा रंगत चालल्या. जीएंवरच्या प्रेमापोटी, कुतूहलापोटी आणि आस्थेने कुणीतरी घरी आलंय याचा आनंद नंदाताईंना लपविता येत नव्हता.
मग उलगडू लागले, जीएंच्या स्वभावाचे आणि त्या भावंडांचे भावबंध... जीएंचे मोजके सुहृद, त्यांच्या मैत्रीचे रेशीमधागे, आणि त्या गूढ, अबोल, एकलकोंड्या माणसाच्या जीवनातील काही नाजूक धाग्यांचीही उकल होत गेली... जीए नव्याने समजले... जीए माणसांमध्ये मिसळत नसत हे खरे असले, तरी ते माणूसघाणे नव्हते. त्यांचा स्वतःचा एक अस्सल असा रेशीमकोश होता, आणि त्या कोशात काही मोजक्या माणसांनाच प्रवेश होता. त्यांच्याशी ते समरसून गप्पा मारत, हास्यविनोद होत, याच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून सिगरेटचे झुरके मारत जीएंच्या गप्पांच्या मैफिली सजत, हे वेगळे जीए नंदाताईंकडून समजत गेले...
कधीकधी, एखाद्या अज्ञात समजुतीचं ओझं मनावर दाटून राहिलेलं असतं. इतकं नकळत, की आपण त्या ओझ्याखाली दबलेलो असतो, हेही आपल्याला माहीत नसतं. नंदाताईंशी गप्पा मारल्यानंतर एकदम हलकं, मोकळं वाटू लागलं, आणि मनावर दीर्घकाळापासून दाटलेलं एक ओझं उतरल्याची जाणीव झाली. आपल्या मनावर त्या समजुतीचं ओझं होतं, हेही तेव्हाच कळून गेलं...
जीएंच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे अनेक प्रसंग आपल्या 'प्रिय बाबुआण्णा' या पुस्तकात नंदाताईंनी रेखाटले आहेत. ते प्रसंग नंदाताईंकडून ऐकताना, ते पुस्तक जिवंत होत गेलं, आणि जीए नावाचं एक गूढ अधिकृतरीत्या आपल्यासमोर उकलतंय, याचा आनंदही वाटू लागला. नंदाताईंच्या आठवणींचे पदर हळुवारपणे आमच्यामुळे उलगडू लागले, आणि सासरी आल्यानंतरचे ते, पहिले दिवस, त्यांच्या डोळ्यासमोर तरळताना आम्हालाही स्पष्ट दिसू लागले. सासरी आल्यानंतर दर आठवड्याला पत्र पाठवायचं, हा जीएंनी नंदाताईंना घालून दिलेला दंडक, आणि त्यात कसूर झाल्यावर जीएंचा व्यक्त होणारा लटका राग, सारं सारं त्यात आमच्या डोळ्यासमोर नंदाताईंच्या आवाजातून उमटत होतं...
नंदाताई आणि जीए ही मावसभावंडं... प्रभावती, नंदा आणि जीए अशा त्या कुटुंबातल्या तीन पक्ष्यांचं एक अनवट घरटं त्या काळात इतक्या नाजुक विणीने बांधलं गेलं होतं, की त्यातला नंदा नावाचा हा छोटा पक्षी त्या धाग्याशी समरसून गेलाय, हे लक्षात येत होतं. धारवाडच्या घरात जीएंच्या मायेच्या सावलीत सरलेलं आणि आईवडिलांचं नसलेपण चुकूनही जाणवणार नाही अशा आपुलकीनं सजलेलं बालपण नंदाताईंच्या आवाजातही स्पष्ट उमटलं होतं... पुढे अखेरच्या दिवसांत जीए पुण्याला या नंदाताईंच्या बंगल्यात आले, आणि नंदा पैठणकरांचं घर पुन्हा बालपणातील मायेच्या शिडकाव्यानं सुगंधी झालं.
याच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून जीएंच्या मोजक्या मित्रांसोबत गप्पांच्या मैफिली रंगत असत... याच घरात जीएंचे सुनिताबाईंसोबतचं, ग्रेससोबतचं अनोखं, नाजूक मैत्रीचं नातं मोहोरलं, असं सांगताना नंदाताईंचा क्षणभर कातरलेला आवाज त्या नात्याच्या वेगळेपणाला हलकासा स्पर्श करून गेला. जीए आणि सुनिताबाईंची पत्रमैत्री मोहोरत असताना त्या दोघांनीही स्वतःभोवती आखून घेतलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा आणि ती न ओलांडण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करून परस्परांविषयी जपलेला आदर...
...जिवाचे कान करून हे सारं ऐकलं नसतं, तर नंदाताईंच्या आवाजातला आणि त्या नात्यातला नाजूक अलवारपणा मनाला जाणवलाच नसता...
बोलताबोलता नंदाताईंनी एक लहानशी पुस्तिका समोर धरली, आणि आमचे डोळे विस्फारले. जीएंनी रेखाटलेल्या चित्रांचा खजिना त्या छापील पुस्तकाच्या रूपाने समोर उभा होता. जीए नावाचं गूढ त्या एकाएका चित्रातून उलगडतंय असा नवाच भास उगीचच होऊ लागला. खडकाळ, लालसर लाटांनी, स्वच्छ, झगझगीत आकाशापर्यंत वर चढत गेलेली टेकडी, तिच्यावरची ती किरकोळ हिरवी खुरटलेली पानं मिरवणारी, टेकडीपलीकडे, आकाशापर्यंत गेलेली बाभळीची झाडं... 'काजळमाया'मधला एक 'ठिपका' समोर चित्रातून उलगडला, आणि 'चित्रमय जीए' पाहताना मन हरखून गेलं... जीएंच्या मनात रुतून बसलेल्या, बेळगावातल्या रेसकोर्सवरून परतताना आकाशात आभासलेल्या आकारातून उमटलेला पाण्याचा निळाशार तुकडाही एका चित्रातून व्यक्त झालेला पाहायला मिळाला... मग नंदाताई, एकएका चित्रावर बोट ठेवून त्याचं जणू जिवंत रसग्रहण करू लागल्या आणि आम्ही कानातले प्राण डोळ्यात आणून ती चित्र न्याहाळू लागलो...
बोलताबोलता नंदाताईंनी एक पान उघडायला सांगितलं... जीएंनी रेखाटलेलं तीन पक्ष्यांचं सुंदर चित्र...
मग नंदाताईंना, किती बोलू असं झालं असावं हे आम्हाला जाणवलं...
"बाबुअण्णा, पबाक्का- प्रभावती आणि मी"... त्या स्वतःच म्हणाल्या...
"यातले जीए कोणते असतील, ओळखा बरं"... नंदाताईंनी मिश्किलपणे मला विचारलं, आणि मी क्षणभरच विचार करून, फांदीवर एकट्याच, दोघा पक्ष्यांपासून काहीसा दूर बसलेल्या पक्ष्याच्या चित्रावर बोट ठेवलं. तेच जीए असणार, हे ओळखणं अवघड नव्हतंच...
मग जीए आणि नंदाताईंमधील त्या चित्रासंबंधीच्या संवादाची उजळणी झाली...
"जीएंनी ते चित्र पूर्ण केलं, आणि मी गंमतीनं त्याला म्हणाले, अरे, हे तर तू आपलंच चित्र काढलंयस.. तो म्हणाला, कशावरून?... मी म्हटलं, हे बघ ना, तू असा अगदी एका बाजूला तटस्थ, आमच्याकडे लक्ष आहे पण, आणि नाही पण, अशा अवस्थेत बसलायस... मग त्यानं मला विचारलं, तू कुठली यातली?... मी म्हणाले, तूच सांग... त्यात एक छोटासा पक्षी आहे ना, ती मी... आणि मधली ती प्रभावती... मी तिच्याकडे सारखी भुणभुण लावते ना, तेच चाललंय... असं मी म्हणाले, आणि तो खळखळून हसला...''
"ते चित्र काढताना ते त्याच्या मनात नव्हतं... पण मी हे सांगितलं, आणि तो खुश झाला... अरे वा, म्हणजे तुला डोकं आहे म्हणायचं... तो म्हणाला..."
हे सांगताना नंदाताईंच्या नजरेसमोर तो प्रसंग पुन्हा जिवंत झालाय, हे आम्ही अनुभवलं आणि त्यांच्या त्या आनंदात आम्हीही खळखळून सामील झालो...
"आमचे खूप छान, सुंदर संवाद असायचे... भरपूर गप्पा व्हायच्या... घरातला जीए आणि बाहेरचा जीए ही दोन वेगळीच रूपं होती... बाहेरच्यांमध्ये तो फारसा मिसळत नसे... सभासन्मान, समारंभांपासून तो लांबच राहायचा... फाय फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला, तेव्हा तो घ्यायला जायचं की नाही यावरून त्याची थोडी कुरबुरच सुरू होती. कशाला जायचं, असंच म्हणत होता... पण मीआग्रह केला. तुला नाही, तर तुझ्या निमित्ताने आम्हाला तरी मिरवता येईल, तुझ्या बहिणी म्हणून... तू हवंतर गप्प बस... आम्ही खूप आग्रह केला...."
...जीएंच्या कथांची पुस्तकं झाली त्याचं नंदाताई अगदी निगुतीनं कौतुक सांगतात.... जीएंच्या कथा दिवाळी अंकात वगैरे प्रसिद्ध व्हायच्या... हातकणंगलेकरांनी त्या वाचल्या, आणि भटकळांना पत्र लिहिलं, "सोन्याचं अंडं देणारी एक कोंबडी मी तुमच्याकडे पाठवतोय, तू ती पाहा"
"मग भटकळांनी त्याचा कथासंग्रह काढला. नाहीतर, बाबुआण्णा स्वतःहून कथा घेऊन प्रकाशकाकडे गेलाच नसता... ते त्याच्या स्वभावातच नव्हतं..."
कौतुकानं, अपूर्वाईच्या आणि आपलेपणाच्या आनंदानं ओथंबलेले नंदाताईंचे शब्द मी त्या दिवशी कानात जसेच्या तसे, अक्षरशः, 'टिपून' घेतले!
जीएंची ही सारी मूळ चित्रं आज नंदाताईंकडे आहेत. त्याच्यावरून तयार केलेल्या चित्रांचा एक आल्बम बेळगावातल्या लोकमान्य वाचनालयातील जीए दालनात आहे...
जीए केवळ कथाकार, साहित्यिक, चित्रकारच नव्हते. त्यांना शिल्पकलेचीही जाण होती. एकदा चालताचालता त्यांना रस्त्यावर एका गुलाबी रंगाचा दगड सापडला. त्यांनी तो घरी आणला, आणि जीएंचा हात त्यावरून फिरला... एक सुंदर बुद्धमूर्ती साकारली... एका दगडातून घोडा साकारला. धारवाडहून पुण्यास येताना ट्रकमधील सामानातील ती बुद्धमूर्ती काहीशी डॅमेज झाली. जीएंना खूप रुखरुख लागली.
"पुण्यास गेल्यावर नव्याने नवी मूर्ती घडवून देईन असे तो म्हणाला, पण इकडे आल्यावर ते नाहीच जमलं...''
नंदाताईंचा स्वर काहीसा कातर झाला...
त्या तासभराच्या गप्पांमध्ये नंदाताईंनी आमच्यासमोर त्यांचं 'प्रिय बाबुआण्णा' हे पुस्तक आणि त्यातलाही काही अप्रकाशित भाग समरसून जणू वाचून दाखविला होता...
गप्पांमधून उलगडणारे जीए मनात साठवत आम्ही नंदाताईंचे आभार मानून निघालो.
बंगल्याबाहेर पडल्यावर रस्त्यावरून पुन्हा मागे वळून पाहिलं.
गच्चीवरचा झोपाळा झुलतोय, असा उगीचच भास झाला.
वाऱ्यासोबत कुठूनसा आलेला सिगरेटचा गंधही त्याच वेळी नाकात परमळून गेला...
जीए नावाचं गूढ थोडसं उकलल्याच्या आनंदाचा गंध त्यात मिसळून छातीभर श्वास घेत आम्ही परतलो...
त्या दिवसानं मनाच्या कोपऱ्यात आता स्वतःच आपला मखमली कप्पा तयार केला आहे !..
आकाशफुले !
Submitted by झुलेलाल on 18 March, 2020 - 13:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर लेख. अगदी भाग्यवान आहात
सुंदर लेख. अगदी भाग्यवान आहात तुम्ही इतकी सुंदर ठेव मिळाली.
सुंदर लेख! खरंच भाग्यवान
सुंदर लेख! खरंच भाग्यवान तुम्ही!
हे ललितही ताकदीने लिहीले आहे.
हे ललितही ताकदीने लिहीले आहे. तुम्ही अनुभवलेल्या गुलाबपाण्याचे थोडे तुषार वाचकांवरही वाचताना, अलगद बरसून जातात.
व्वा....
व्वा....
व्वा ...काय सुंदर लिहिलं आहे.
व्वा ...काय सुंदर लिहिलं आहे. भाग्यवान. पुलेशु
त्यांच्या कथांचा प्रभाव
त्यांच्या कथांचा प्रभाव एखाद्या सावटासारखा व्यापून टाकणारा असतो..
अशा थोरांच्या वैयक्तिक जीवनात डोकावण्याचे कुतूहल नेहमीच असते. त्याचा उत्तम जवळून दिसलेला कवडसा आमच्यापर्यंत पोहोचवलात , इतक्या सहजपणे ! धन्यवाद.
लेखाच्या शीर्षकातून आधी जी ए यांचा निर्देश झाला तर आणखीही संबंधित वाचकांना हे वाचण्याचे भान येइल.
छानच लिहलंय. नशीबवान आहात.
छानच लिहलंय. नशीबवान आहात.
सुंदर लेख! भाग्यवान आहात!
सुंदर लेख! भाग्यवान आहात!
सुंदर लेख! भाग्यवान आहात! >+१
सुंदर लेख! भाग्यवान आहात! >+१
लेखाच्या शीर्षकातून जीए यांच्यावर हा लेख आहे याचा निर्देश झाला तर आणखीही वाचकांना हा लेख उघडून वाचावासा वाटेल हे नक्की.
सुंदर, अप्रतिम अजून काय काय
सुंदर, अप्रतिम अजून काय काय विशेषणे लाऊ?
भाग्यवान!!! जी(ए)ओ
फार छान भाषा आहे तुझी
फार छान भाषा आहे तुझी
वा, सुरेख.
वा, सुरेख.