अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
27th फेब्रुवारी 2019
माझे सिकंदर भाई,
आज मात्र कहर झाला. पुढच्या प्रवासासाठी पहाटे निघायच्या माझ्या सवयीनुसार माझी बॅग घेऊन गावाच्या नाक्यावर जाऊन बसले. पण आज मेघालयात निवडणुका असल्यामुळे रस्ते ओस पडले होते. नाही म्हणायला इलेक्शन ड्युटी वरची वहाने फक्त इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. मुळीच समजत नसलेले राजकारणही उगीच पब्लिकच्या नसानसात वहात असते शिवाय ऐन निवडणूकीच्या मुहूर्तावर मिळालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या बातमीमुळे तर जनसमजाचा – गैरसमजाचा विस्फोट झाला. माझी नागालँड पर्यंत पोहोचायची सोय आणि सुरक्षितता या दोघांची गोची आहे हे माझ्या लक्षात आले.
नऊ वाजत आले म्हणजे साडेतीन तास उलटून गेले. हाली ने तर गृहीतच धरले होते की पहाटे पहाटे तोऱ्यात निघालेली ही बया दिवस चढला की फिरून घरी येणार. आज माझ्यावर तीच वेळ येणार असे मलाही वाटू लागले. एव्हाना माझ्या परिस्थितीची खबर त्या छोट्याशा गावातल्या अनेक घरात पोहोचली होती. कोण्या एका घरातल्या कोण्या एका सदगृहस्थाला स्वत:च्या कामासाठी पनुर्सलाला जायचे होते, पण त्याने गाडी आणून नाक्यावर उभी केली. म्हातारा दरवाजा उघडून म्हणाला, "बैठो"! क्षणाचाही विलंब न करता मी गाडीत बसले. त्या सद्गृहस्थाने 100 रुपयांत मला पनुर्सलास्टँड वर सोडले.
दुसरा टप्पा पनुर्सला ते शिलॉंग हा झाला! तो ही प्रवास कसाबसा पार पडला. पण शेवटच्या टप्प्यावर मात्र माझ्या जिद्दीचा पुरता कस लागला.
मागच्या पत्रांत लिहिल्या प्रमाणे शिलॉंग ला इकडून तिकडच्या स्टँड वर फेऱ्या अटळ असतात इतके सारे स्टँड तिथे आहेत. ते सारे स्टँड पालथे घालून झाले. पण प्रवासाची सोय काही होईना. पोलो ग्राउंड च्या बाजुला एक बसस्टँड आहे तिथून म्हणे रोज दुपारी चार वाजता दिमापूरसाठी एक बस सुटते. घ्या. आधीच शिलॉंगच्या अनेक स्टँडसच्या भूलभूलैयात मी हरवून गेले होते आणि इथे वार्ता अजून एका नवीन स्टँडची चालली होती. पण तो ही चान्स घ्यायचा असे मी ठरवले.
मी स्टँड वर पोहोचले तेव्हा स्टँड ओस पडला होता. इथून आज कुठंचीही बस निघणार नव्हती. समान पाठीवर वहात वणवण फिरून मी मात्र थकून गेले होते. त्यात पाऊस पडू लागला. मी आणि माझे समान भिजून गेलो. थंडी वाजू लागली. खांदयात कळ येऊ लागली. डोक्याचे तर खोबरे झाले होते. काहीच उपाय दिसेना तसे भुकेल्या पोटाला गरमागरम कुठे काही खायला घालता येईल ती शोधाशोध सुरू केली. एक महागडे हॉटेल दिसले, एरव्ही स्वतः चे हे असले लाड मी पुरवलेच नसते पण आज माझीच मला दया आली. आज मी अख्या प्रवासातील सर्वात महागडे जेवण जेवले.
स्टँडवर परतले तर एका बसमध्ये ड्रायव्हर का क्लीनर ची हालचाल दिसली.
"ये बस किधर जाएगी?"
"ईटानगर"
"मुझे रस्ते में किधर भी छोड देंगे क्या?"
"आप को किधर जाना है?"
"वैसे तो दिमापूर जाना था, लेकिन रास्तेमें किधर भी छोड दिजीए| मेघालय से बाहर निकलुंगी तो कुछ ना कुछ इंतजाम तो हो ही जाएगा।"
600 रुपये देऊन तिकीट घेतले, बस सुटायला 3 तास होते मग बसमध्येच माझ्या 27 नंबर च्या चाकाच्या ठीक वरच्या सीट वर आरामात बसून तुम्हाला पत्र लिहायला घेतले.
बस वेळेवर सुटली, शिलॉंग वरून ईटानगर ला जाणाऱ्या रस्त्यावर दिमापूर कसे लागले, याचा मी आजवर शोध घेतच आहे. की माझी ऐकण्यात चूक झाली? ती बस खर तर ईम्फाळ ला चालली होती? हे मला काही माहित नाही. पण मेघालय सोडून आसाम मधील NH 27 वरून बस धावते आहे इतपत GPS ने दाखवले. पुढे आसाम सोडून नागालँड सुरू झाले हे कळायला GPS ही लागत नाही. रस्त्यातले खड्डे (की खड्यातला रस्ता) पार करताना 27 नंबरच्या सीट वर बसून प्रवास करणाऱ्याला तर ते सर्वात आधी समजते.
त्यावेळी माझ्या मोबाईल नो नेटवर्क, नो इंटरनेट आणि लो बॅटरी अशा तीन तीन अडचणींचा सामना करीत होता, मी त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा ठेऊ?
नाही म्हणायला शिलॉंग स्टँड वरूनच इंटरनेट ची थोडी कृपा असतानाच दिमापूरजवळच्या एक गावात रहाणाऱ्या कौच सर्फिंग वरील एका मेम्बरला मी मला रात्रीपूरते राहू देईल का असा मेसेज लिहिला होता आणि त्याच्या गावाचे नाव लिहून ठेवले होते. मधेच वाऱ्याचा झोत येतो तशी इंटरनेट ची रेंज येउन जाता जाता त्याचे yes असे उत्तर मला वाचता आले. त्यावर मी लिहीले की मी दहा वाजता पोहोचेन. आणि मग माझा मोबाईल निकामी झाला. बॅटरीचा एक पाय फक्त दिसत असताना तिला हवे तेव्हा चालवता याये म्हणून मी फोन बंद करून ठेउन दिला.
Mhonthung Tsopoe हे ज्याचे नाव मला धड बोलायला येत नव्हते त्याच्या गावी जायचे. इंडोनेशीआ, सिंगापूर पासून पाकिस्तान, इराण ला जोडणाऱ्या Asian Highway 2 (AS2) वरच्या मला उच्चारायलाही जमत नव्हते अशा Kukidolong गावात मी उतरवायला सांगितले तेव्हा बसचा ड्रायव्हरही थोडा घाबरला होता असे मला वाटले. रात्रीचा दीड वाजला होता. त्यात पावसाने कायतरीच कहर केला होता. बसमध्ये कशीतरी जेमतेम जी वाळली होते ती पुन्हा एकदा मला पाठीवरच्या बॅगे सकट भिजवून टाकले. आधार घ्यायला कुठे आडोसाच नव्हता. तो कोण मोहन थुंग टोसोपोय त्याला फोन जोडला. पण समोरून काहीच उत्तर नाही. असे तीन फोन करून झाले तसे माझी आशा संपली. आजूबाजूला नजर फिरवली तर एक चिटपाखरूही दिसेना. आजची रात्र हायवे च्या बाजूला कडाक्याच्या थंडीत भिजत काढायची या साठी मी मनाची ताकद गोळा करू लागले. अशा निर्जन ठिकाणाला सुरक्षित समजावे की धोकादायक म्हणावे हे डोक्यात आले तसे मात्र छातीत चर्र झाले.
तेवढ्यात माझा मरायला टेकलेला फोन वाजला, समोरून तोच तो बोलला, "रोड क्रॉस करना, मैं आप के सामने खडा हू।" ज्याचे नाव माहीत नाही, चेहरा पाहिलेला नाही, तो देवदूत आहे की सैतान आहे हे तरी कसे ठाऊक असेल? पण माणुसकी वरचा माझा विश्वास कसा तो कडकच आहे. माझा नाईलाज आहे. अनुभवच एकेक असे आले आहेत की कुठे बोट ठेवायला संधी मिळालीच नाही.
अंधारात हायवे क्रॉस करता करता मला तो दिसला, हायवे च्या पलीकडेच रस्त्यालगत उतरलं की त्याची रहाती झोपडी होती. बसने एवढ्या अचूक ठिकाणी मला कसे काय उतरवले याचे मी आश्चर्य करू लागले. आम्ही आत शिरलो तसे त्याचे कुत्रे भुंकू लागले. एका पलंगावर चार पाच ब्लॅंकेट्स च्या घड्या ठेवल्या होत्या. त्याने म्हटले, "अभी आप क्या करना चाहोगे, सोओगे की?..." त्याला “की...” च्या पुढे खायचा प्यायचा पाहुणचार विचारायचा असेल असा मीच माझा समज करून घेतला आणि झोपाण्याची इच्छा व्यक्त केली.
तसेही ती खायची प्यायची वेळ नव्हती आणि तसाही मी थोडा फलाहार केला होता.
मग तो आतल्या खोलीत झोपायला निघून गेला. थकल्या अंगाने, मिटल्या डोळ्यानी पडल्या पडल्या मी उशाशी असलेला दिवा मालवला आणि थरथरणाऱ्या ओल्या अंगावरून, डोक्यावरून दोन तीन चार ब्लॅंकेट्स ओढून घेतली, हुडहुडी तरीही कमी होई ना. अंगाची चुळबूळ चालू होती आणि मधेच पांघरुण डोक्यावरून सटकले तर डोळ्याला काय दिसले असेल? एका सुंदर चंद्रमौळी घरात मी निजले होते. चटईने विणेने उभारलेल्या भिंतीतून घुसून चंद्रकिरणांनी मातीच्या जमिनीवर शंकरपाळीची रुपेरी नक्षी काढली होती. मी हलेन तशी माझ्याही अंगावर ती नक्षी भिरभिरायची. दिवसभराचा सारा शीण त्या रुपेरी छायेत विसरायला झाला. गरजू स्त्री ला आपल्या फाटक्या झोपडीत आसरा देऊन तो सदगृहस्थ स्वस्थ झोपुनही गेला, मी मात्र माझाच विलास हरखून पहात, त्याच्या ऋणात उशिरा पर्यंत जागीच राहिले.
सिकंदर भाई, सर्वात कठीण परिस्थितीतून पार पडतानाच माणसातला असा देव भेटतो, जो आजपासून ठीक तीन वर्षांपूर्वी मला हिंदुस्थान पाकिस्तान च्या बॉर्डरही तुमच्या रुपात भेटला होता.
LOC वरच्या सदपोरे फॉरवर्ड पोस्ट ला जाण्यासाठी दिवसभर वणवण फिरून सारी कारवाई पार पडली. मला वाटले नशिबाची साथ मला आहे. शेवटची गाडी निघतच होती. कागदपत्रांवर ऑफिसरची शेवटची सही तेवढी राहिली होती आणि मुद्दा निघाला की टांगधरच्या रहिवशाची माझ्या हमीपत्रावर सही असणे गरजेची आहे. टांगधर मध्ये मी कोणाला नि मला कोण ओळखणार? अशा घडीला, माझ्या हमीपत्राची फोटोकॉपी काढायला म्हणून तुमच्या दुकानात आले आणि तुमच्याकडे न मागताच तुमची सही घेऊनच दुकानातून बाहेर पडले, तुमच्या ऋणातून मात्र आजवर बाहेर पडले नाही. सही देताना तुम्ही जे बोललात ते आजही कानी तसेच ऐकू येते, "बेहेन, तू कोई ऐसा वैसा काम नही करना। तेरा भाई मुसीबत में पड जाएगा।"
तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. मी कसा विश्वास ठेवू त्यांच्यावर जे सांगतात की कोणावर विश्वास ठेऊ नकोस.
जे दाखवले जाते, ऐकवले जाते, मनात ठसवले जाते त्याला लोक सत्य मानून चालतात;
माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, मी अनुभव घेतला नाही तर माझे मन मात्र मानत नाही.
मी पेपर वाचत नाही, घडामोडी जाणत नाही, म्हणून माझे प्रश्न बाळबोध असतील. पण त्यांची उत्तरं मला सोशल मीडिया वर वाचायची नाहीयेत आणि तसेही कितीही विद्वान असले तरी ज्यांच्या विद्वत्तेला माणूस, मुसलमान, पाकिस्तानी, जिहादी आणि राजकारणी या पाच वर्गांचे वर्गीकरण जमले नाही त्यांच्या मांडणीने माझ्या मनातले प्रश्नही नाही सोडवायचे.
आज जगाच्या समोर सर्वात ज्वलन्त प्रश्न नेमके कोणते आहेत? युद्धाने युद्ध थांबवता येईल? खरंच? सैनिकांच्या बलिदानाचा पायंडा तर पडत नाहीये? सैनिकांऐवजी शांतिदूत सीमापार जाऊन काम फत्ते करून येऊ शकतील का? देशभक्तीहूनही मोठी उदात्त भावना कुठची असू शकते का? मातृभूमी हून धरती माता मोठी नाही का? तिच्या जमिनीवर कोण नेमके कुठच्या हक्काने कोण मालकी सांगतय?
थोडा चार्ज झालेला फोन सहज उघडून पाहिला तर लक्षात आलं की एका दिवसात सोशल मिडियाने आगीत फार तेल ओतलं आहे. ज्या गर्दी पासून मी दूर आलेय त्या गर्दीचं रक्त उसळून निघालय. त्यांच्या किंवा माझ्या अशा कुठच्याच ज्वलंत प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही. पण तरीही मी भाग्यवान आहे कारण माझ्यातला प्रवासी तूर्त या घडामोडीच्या पलीकडच्या जगात विसावला आहे. खूप शांत, निर्धास्त वाटतंय. अंग सुकत आलंय आणि डोळेही मिटतायत.
तुमची,
सिस (sis ...अशीच हाक मारता ना मला?)
खूप आवडलं.
खूप आवडलं.
हा भाग देखील आवडला,
हा भाग देखील आवडला,
फार ओघवते वर्णन.