पडू आजारी

Submitted by सदा_भाऊ on 7 March, 2020 - 03:44

काही लोक जन्माला येतानाच चांदीचा चमचा घेऊन येतात असं म्हणतात. उदाहरणा दाखल, शाळेत कितीही उनाडक्या करून कसेबसे पास झाले असले तरी नोकऱ्या पटापट मिळवतात. नोकरीत बाॅस ची मर्जी सांभाळू शकतात आणि स्वार्थ साधून घेऊ शकतात. यांना संसारातल्या वाळक्या कटकटी कधी त्रास देत नाहीत. यांना बायको धाकात ठेवत नाही. यांची मुलं कशी अगदी आज्ञेत असतात. यांच्या फेसबुकच्या फोटोना हजार काॅमेंटस आणि तीन हजार लाईकस मिळतात. थोडक्यात काय तर यांचे आयुष्य कसे अगदी छान चालू असते. खरंच! मला अशा लोकांचा अगदी मनापासून हेवा वाटतो. माझं आयुष्य ना कायमच बाॅस, बायको, आणि क्लाएंट याना घाबरण्यात संपत आलं. काय करणार? नशीब!

आता नुकतीच घडलेली गोष्ट! आमचा असाच एक सुखी शेजारी श्रीमान जोशी अचानक ताप, सर्दी, खोकल्या मुळे आजारी पडला. सौ जोशी नी पतीसेवेची सुवर्ण संधी मिळाल्याच्या आनंदात सर्व महिला वर्गात व्हाटसॲपीय दवंडी पिटवली. शिवाय जड अंत:करणाने त्याना अत्यंत महत्वाच्या गाॅसिपींग च्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. बायको ने मला ही बातमी अतिशय सनसनाटी पध्दतीने सादर केली आणि जोशाच्या घरी धडकून येण्याचा निर्णय तिच्या एकमताने घेण्यात आला. शेजार धर्म पाळण्याच्या विरोधात मी मुळीच नाही पण तो फाजील जोशा माझ्या डोक्यात जातो. असो. तरीपण आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डजझनभर संत्री घेऊन त्यांच्या घरी पोचलो. दरवाजा बाळ जोशीने उघडला आणि ओरडून आम्ही आल्याची वर्दी दिली. “डॅड, कुलकर्णी अंकल आणि आंटी तुम्हाला भेटायला आलेत. तुम्ही आत जाऊन झोपा.” कदाचित जोशा किचन मधे काहीतरी खुडबूड करीत असावा. त्याला हातातला घास टाकून बेडरूम कडे पळ काढावा लागला. आम्ही हाॅल मधे वाट पहात बसलो. दोन मिनीटातच सौ जोशी बाहेर आल्या. आमच्या हातातली संत्र्यांची पिशवी बघून त्या उत्साहाने बोलू लागल्या. “अहो! तुम्हाला सांगते, अगदी परवा पर्यंत ठिक होते. बघा!” मी मनात म्हणलं “हो. हो. त्याला बाल्कनीत दात टोकरत बनियन वर उभा असलेला मी पाहीला होता.” जोशी बाईंचे पुराण चालूच होते. “अचानक ताप भरला हो! मग मी त्याना रजा काढून घरी बसा असा आग्रह केला. तेव्हा कुठे हे तयार झाले. याना ऑफीसच्या कामाचे फार टेन्शन असतंय हो!” आता याना काय माहीत की हा जोशा ऑफीसात रोज कशा पाट्या टाकतो आणि चकाट्या पिटत फिरत असतो! तरीपण मी होय होय म्हणत जोशाला उगाचच सहानभुती युक्त कौतुक दिले. “या ना आत मधे! आत्ताच झोपेतून जागे झालेत. केवढे अशक्त झालेत! काही काही खात नाहीत हो!” वास्तविक त्याच्या हनुवटीच्या खाली चिवड्याचा कण चिकटलेला दिसत होता आणि अशक्त? छे! मला तरी कोणत्याच कोनातून बारीक झाल्यासारखा वाटत नव्हता. मला पुन्हा एकदा होय होय म्हणावे लागले. “काय जोशी बुवा! लौकर बरे व्हा” मी असं काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. आमच्या आगमना मुळं थोडासा गोंधळलेला जोशा उठून बसला. मला त्यानं समोरच्या खुर्ची वर बसण्याचा आग्रह केला. सौ जोशी नी “तुम्ही बसा बोलत मी पटकन चहा टाकते.” असा पाहुणचार दाखवत स्वयंपाक घराकडे धाव घेतली. त्याच्या मागोमाग माझी सौ पण नको नको बोलत गेली. खरंतर जोशा मला चांगलाच फ्रेश दिसत होता. मीच ऑफीसमधून आल्यामुळे दमून गेलो होतो आणि जांभया आवरायचा प्रयत्न करीत होतो. “अरे हक्काची मेडीकल लिव मिळते ना? ती वापरायची तरी कधी? शिवाय बायको कडून जरा सेवा करून घेतली तर काय बिघडतंय?” असा काही तर्क सांगत त्याने फक्त किरकोळ सर्दी झाल्याची कबुली दिली. या उपर त्याने बायकोला सुध्दा कसा पत्ता लागू दिला नाही याची फुशारकी मारून झाली. सौ जोशी परत आल्या. त्यांच्या हातात चहा नव्हता. माझ्या बायकोने त्यांचा आग्रह उधळून लावला होता. मी नाईलाजाने उठलो आणि जोशाकडे बघून पुन्हा एकदा “लौकर बरा हो रे! असा तुला आजारी बघून माहीत नाही.” असा खोटा भाव देत मी बाहेर पडलो. जोशाला स्वत:च्या ढोंगीपणाचे उगाचच कौतुक वाटत होते.

घरी आल्यावर सौ ने जोशीण बाई केवढ्या त्या फुशारक्या मारत होती याचा पाढा वाचून दाखवला. “नवरा आजारी पडला म्हणून ही बया एकदम सेलिब्रिटीच झाली का काय? असली ही कसली जगावेगळी हौस?” मी हं हं म्हणत साफ दुर्लक्ष केले आणि थोडा अंत:र्मुख होऊन विचार करू लागलो. खरंच किती राबतोय मी? थोडासुध्दा स्वत:चा विचार करत नाही. एकतर जीव तोडून ऑफीसमधे राबा आणि जर कधी रजा काढलीच तर सह कुटूंब हिंडवून या. म्हणजे नशीबात आराम नाहीच. नशीबाला दोष देत मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी आवरून ऑफीसला गेलो आणि बातमी आली की बाॅस आजारी! किमान दोन तीन दिवस तोंड बघायला मिळणार नाही. म्हणजे दोन दिवस बाॅसची तरी कटकट नाही या सुखी विचाराने कामाला लागलो. संध्याकाळी कोणीतरी आतल्या गोटातली बातमी सांगितली की बाॅस वास्तविक आजारी नाहीच. उगाचच ढोंग करून घरी बसलाय. आता मात्र माझी खरंच सटकली. हे जरा जास्तच होतंय. पण काय करणार? जाब तरी विचारू शकत नाही. माझ्या चांगल्या तब्येतीचा मला प्रथमच मनस्वी राग वाटू लागला. ताप वगैरे राहू दे; साधा कधी खोकला सर्दी पण होत नाही. तशी माझी काही फार मोठी अपेक्षा आहे का? आनंद मधल्या राजेश खन्ना सारखा दमदार असाध्य रोग व्हावा अशी कधी मागणी केलीय का? निव्वळ एक साधा ताप आणि किरकोळ खोकलाच तर मागतोय. तसा मी सुध्दा ढोंग करू शकतो पण तसलं आपल्या तत्वात बसत नाही ना!

मनातूनच स्वत:चा वाटलेला तिरस्कार हळूहळू मी गिळून टाकला आणि माझी गाडी रोजच्या रूळावरून धावू लागली. साधारण महिन्याभराने माझ्या आयुष्यात काहीतरी घडणार असावे पण मला मात्र मुळीच कल्पना नव्हती. एक दिवस सकाळी आवरून बाहेर पडलो आणि जोराचा पाऊस आला. आडोसा शोधे पर्यंत क्षणार्धात चिंब भिजून गेलो. ऑफीसला उशीर झाल्यामुळे तसाच तडक गेलो आणि भिजलेले कपडे ऑफीसच्या एसी मधे अंगावरच वाळवले. कामाच्या नादात दिवस कसा संपला लक्षातच आले नाही. संध्याकाळी घरी आलो. घरात टिव्ही वरील कोणतीतरी टुकार मालिका कर्णकर्कष्य आवाजात प्रदुषण करीत होती. एकंदरीत सर्व प्रकाराने माझे डोके गरगरायला लागले. पटकन जेवण करून बेडरूम मधे गेलो. अचानक थंडी वाटल्यामुळे पांघरूण ओढून झोपायचा प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने बायकोच्या बोलण्याने जाग आली. “अगो बाई! हे काय? काही होतंय का?” मला तर बोलण्याची इच्छाच नव्हती. बायकोने अंगाला हात लावून “अय्या! हे काय? चांगलाच ताप आहे की अंगात! उद्या ऑफीसला आजीबात जायचे नाही.” असा हुकूम सोडण्यात आला. पडत्या फळाची आज्ञा स्विकारून मी ताबडतोब प्रस्तावाला दुजोरा दिला आणि पांघरूण तोंडावर ओढून घेतले. सौ ने एक क्रोसीन ची गोळी आणि पाणी आणून दिले. गोळी घेऊन मी निद्रादेवीची आराधना करीत पडून राहीलो.

सौ ला आता भलताच आनंद झाला होता. अतिशय उत्साहाने तिने ही आनंदाची बातमी अख्या सोसायटी मधे वाऱ्यासारखी पसरवली. अचानक सौ ला आणि ओघाने मला सोसायटीत मानाचे स्थान निर्माण झाले. सौ ला धडाधड फोन येऊ लागले. “अगं काय सांगू? सकाळी ऑफीसला जाताना एकदम ठिक होते गं!” अशी सुरवात झाली की साधारण अर्ध्या तासाच्या संक्षिप्त संवादा नंतर “पडलेत आता गोळी घेऊन.” असा शेवट होऊ लागला. तब्बल दीड तास हा प्रेमळ संवाद मी पांघरूणा आडून ऐकला.अखेरीस मलाच झोप लागली. सकाळी ऑफीस ला जायचे नसल्यामुळे निवांत उठलो. कन्या आवरून कधीच शाळेला पळाली होती. खरंतर मला आता एकदम फ्रेश वाटत होतं. तरीपण ऑफीसमधे माझ्या आजारपणाची बातमी पोचवली. गरमागरम ब्रेकफास्ट आणि चहा पिण्यासाठी आवरून बाहेर येऊन बसलो. “अरेच्या! हे काय? आता फ्रेश दिसताय ना! अजूनही ऑफीसला गेलं तरी चालू शकतंय.” सौ ने ब्रेकफास्ट पुढे ढकलत मला निरोगीपणाचे प्रमाणपत्र देऊन टाकले. आणि मला वाटलं की आता ऑफीसला खरंच पिटाळते का काय! “आता राहू दे ना!” अशी विनंती वजा गयावया केली. कदाचित सेलिब्रीटी स्टेटस मेनटेन करण्यासाठी तिने माझी जाहीर विनंती मंजूर केली. त्या बरोबरीने काही सुचना पण देण्यात आल्या. “कोणी बघायला आलं तर त्याना तुम्ही आजारी असल्याचं वाटू दे. मला ढिगभर कामं पडलीत. त्यात उगाच लुडबूड नको.” आता ही ढिगभर कामं म्हणजे नक्की काय याचा उलगडा मला आज पर्यंत झालेला नाही. आणि इतक्या ढिगभरातून गाॅसिपींगला वेळ कधी मिळतो हा एक संशोधनाचा विषय. माझ्या नव्हे...
sick.png

उगाच पेपर चाळत सोफ्यावर लोळत पडलेलो असताना बेल वाजली. मी पटकन दार उघडायला उठलो पण समय सुचकता दाखवून मला सौ ने थांबवले. ताबडतोब बेडरूम मधे पळण्याचा इशारा केला. आणि खोकण्याची आठवण करून दिली. मी सर्व सुचना लक्षात ठेऊन बेडरूमकडे पळ काढला. सौ ने दरवाजा उघडला. आमचे सख्खे शेजारी कानडी श्रीयुत बेनगिरी आणि त्यांच्या मातोश्री यांचे आगमन झाले. “कसे आहेत साहेब? आजारी आहे कळलं, म्हणून बघायला आलो.” अशी दमदार आवाजात एंट्री केली. सौ ने जोशी बाईचा कित्ता गिरवत “खुप अशक्त झालेत हो! रात्रभर ताप होता. अजून खोकतायत.” असं म्हणत त्याना माझ्या खोलीचा रस्ता दाखवला. मी सुध्दा प्रशिक्षीत प्राण्यासारखे खोकून त्यांचे स्वागत केले. बेनगिरी चा आवाज अजूनही टिपेलाच होता. “काय झालं रे? बाहेरचं काही खाल्लास काय रे? घरचं जेवण ते घरचंच असतं. जरा पार्ट्या कमी कर.” मी त्याच्या विद्वत्तापुर्ण संवादावर उडालोच. “तसं काही नाही, काल जरा भिजलो.” माझा आवाज त्याच्या समोर भलताच मिळमिळीत होता. उगाचच “हा हा हा” अशी त्यानं न केलेल्या विनोदाला त्यानं स्वत:च दाद दिली. मी पण नाईलाजास्तव त्याला हासून साथ दिली. “हे तापाचं लै अवघड काम असतंय बघा. आमचं नणदेचा पुतण्या असतंय बघा, तिकडं धारवाडला.. असंच तापानं फणफणलं की हो. महीनाभर उठलंच नाही. कसंबसं वाचलं बघा.” बेनगिरी आज्जी नी ज्ञान दिले. “#%#% टायफाईड #%#%” अशी काहीतरी मुलानं कानडी भाषेत आईला माहीती पुरवली. “ते काय मला कळत नाही.” आज्जी नी स्वत:ची बाजू सावरून घेतली. मी मात्र माय लेकाचे संवाद शांतपणे खोकत ऐकून घेतले. मला आता खरंच ताप आल्याचा भास होऊ लागला. साधारण पाऊण तास बसून मायलेक चहा बिस्कीटं वसूल करून गेली. जाता जाता आज्जीनी खोकल्यावर कसलातरी काढा घ्या असा सल्ला देऊ केला. मी उगाचच “हो घेतो.” अशी मंजुरी दिली. साधारण तासाभराने आज्जी स्वत:च एका कपातून काहीतरी रसायन घेऊन आल्या. त्यांच्या प्रेमापुढं नकार देण्याची हिम्मत सौ मधे आणि माझ्यामधे मुळीच नव्हती. अशा हौशी वैद्यांचा एक मोठा प्राॅब्लेम असतो. ते निदान करून थांबत नाहीत. त्यावरील औषधं घश्यात उतरवे पर्यंतची जबाबदारी चोख पार पाडतात. मी कसेबसे ते रसायन दोन घोट प्याले आणि मला पोटात ढवळून आले. सकाळी जरा बरं वाटायला लागलेलं पण आता पुन्हा डोकं गरगरू लागलं. मी थोडा झोपतो असं सांगून कपात उरलेल्या काढ्या पासून माझी सुटका करून घेतली. थोड्या वेळाने आज्जी परत गेलेल्या पाहून कप बेसिन मधे रिकामा केला.

माझं डोकं त्या काढ्यानं खरंच गरगरू लागलं होतं. मी जवळच्याच एका डाॅक्टरला भेटून येतो अशी इच्छा बोलून दाखवली. सौ ने तिला आता मुळीच वेळ नाही, कारण कामवाली बाई येणार आहे असे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. मी एकटाच डाॅक्टरची पायरी चढायला गेलो. माझ्या आधी चार पाच लोक नंबर लावून बसले होते. सर्वां पासून स्वत:ला शक्य तेवढं दूर ठेवत मी वाट बघत बसून राहीलो. साधारण अर्ध्या पाऊण तासाने माझा नंबर आला. वृध्द डाॅक्टरनी गळ्यातला स्टेथो कानाला लावून माझी तपासणी सुरू केली. मला काहीच प्रश्न विचारला नाही तरी मीच माहीती द्यायला सुरवात केली. कोणतीही प्रतिक्रीया न देता त्यानी गोळ्यांच्या तीन पुड्या बांधल्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायला सांगितल्या. सरते शेवटी पाचशे रूपये दक्षिणा देऊन बाहेर पडलो. कालचं भिजणं आणि बेनगिरी आज्जींचा काढा मला पाचशे रूपयाना पडला.

तसा दिवसभरात बऱ्याचवेळा फोन वाजला पण आजारी असणे सिध्द करण्यासाठी मी एकदा सुध्दा उचलला नाही. फोनची रिंग वाजली की मी खोकून दुर्लक्ष केले. दिवसभरात कामवाली बाई, इस्त्रीवाला, पेपरवाला, वाॅचमन, वर्गणी मागायला शेजार पाजारची पोरं, सौ च्या रिकाम टेकड्या मैत्रीणी यानी सतत बेल वाजवून मला मुळीच निवांतपणा दिला नाही. बाॅसचा फोन वाजल्यावर मात्र नाईलाजानं घ्यावा लागला. “कशाला आजारी पडलास?” आता या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं? “कोणी मुद्दामून आजारी पडतं काय?” असं न बोलता “काल जरा भिजलो ना.. त्यामुळं” असं काहीतरी बोलून गेलो. “ बंर. पटकन बरा हो आणि लौकर कामावर ये.” या बोलण्याला क्रूर न समजता बाॅसची मर्जी समजून मी स्वत:ला धन्य मानून घेतले. दुपारी कन्या शाळेतून आली. पाठीवरची बॅग आदळतच तिचा प्रश्न आला. “आज बाबा का घरी?” अगं जरा मी आजारी आहे अशी सहानभुती मिळवायचा मी व्यर्थ प्रयत्न केला. तिनं फक्त “सो लकीऽऽऽ” अशी प्रतिक्रीया देऊन सुटका करून घेतली. मी बेडवर उगाचच झोपण्याचा प्रयत्न करीत लोळत राहीलो. दुपारी झोपायची सवय नसल्यामुळे वेळ जाता जाईना. सौ पण तिच्या ढिगभर कामात व्यस्त असल्यामुळे मी उपेक्षित जीव पेपर मधल्या त्याच त्याच बातम्यांची उजळणी करीत पडून राहीलो. एक आदर्श बाप या नात्याने मुलीचा अभ्यास घ्यावा असा विचार माझ्या मनात आला. पण मुलीने कावेबाज पणाने मैत्रीणी बरोबर अभ्यास करणार असल्याचा कार्यक्रम जाहीर करून माझ्या योजनेवर पाणी फिरवले. दुपारचे जेवण, चारचा चहा इत्यादी गोष्टी वेळापत्रका प्रमाणे घडत होत्या. दिवसभर घरात बसून अगदी उबल्यासारखं झालं होतं. संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हणलं तर सौ ने विरोध केला. उगाच कोणी बघितलं तर! अशा अनामिक भीतीने माझी नजर कैदेतून सुटका होऊ शकली नाही.

आज संध्याकाळी जोशाची भेट नशीबात होती. जोशा स्वत: माझ्या भेटीला उगवला. त्याच्या हातात संत्र्याची पिशवी होती. पण आम्ही दिलेल्या संत्र्यांच्या संख्येपेक्षा कमी वाटत होती. कदाचित खाऊन शिल्लक राहीलेली परत द्यायला आलाय अशी शंका माझ्या मनात येऊन गेली. ठरल्या प्रमाणे मी बेडवरच बसून राहीलो आणि जोशा तिथंच खुर्ची ओढून बसला. “पडु आजारी, मौज हीच वाटे भारी... मग काय? किती दिवस आराम?” अशी त्यानं सुरवात केली. “नाही रे! आता बरं वाटतंय.” मी प्रांजळ कबुली देऊन टाकली. त्यानं हेका न सोडता बडबड चालूच ठेवली. “मस्त पैकी आठवडाभर आराम कर. बायको कडून सेवा करून घे. जरा स्वत: साठी वेळ दे.” त्याचा पट्टा चालूच होता. “असं अंथरूणावर पडून कंटाळा येतो यार!” माझ्या वाक्या कडे पुर्ण दुर्लक्ष करीत तो बोलतच होता. “हक्काची मेडीकल लिव वाया कशाला घालवायची? टिव्ही बघ, पुस्तकं वाच. जरा स्वत:साठी जगा.” मला होय म्हणण्या शिवाय पर्याय नव्हता. इतक्या वेळात त्यानं चार बिस्कीटं आणि कपभर चहा संपवला. “चल ना. बाहेर एक चक्कर मारून येऊ. घरात बसून कंटाळा आलाय.” असं बोलून मी पटकन उठलो. माझ्या या अचानक पवित्र्यामुळे तो जरा गडबडला. “आलो असतो रे पण जरा कामं आहेत घरी.” असं बोलून त्यानं काढता पाय घेतला.

सर्वांच्या फोनला उत्तरं देऊन आणि आलेल्या लोकाना चहा देऊन बायको पण वैतागली. “आजारपणाची हौस पुरी झाली. आता एकदम छान दिसताय.” असा प्रेमळ संवाद सुध्दा ऐकावा लागला. मला घरामधे बिनकामाचं बसल्यामुळे उगाचच अपराधीपणा वाटू लागला होता. एकतर खरंच मी तसा काही आजारी नव्हतो आणि मी सोडून बाकी सर्व भलतेच बिझी होते. हे आजारपणाचं सोंग माझ्या सारख्याला परवडण्या सारखे नव्हते. हे ओळखून मी दुसऱ्या दिवशी मुकाट्याने ऑफीस गाठायचा निर्णय घेतला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फॅनटॅस्टिक! चि वि जोश्यांची आठवण करून दिलीत. असेच लिहा. खूप लिहा. लिहित रहा. शुभेच्छा .
आणि ते सुंदर चित्र कुणी काढले?

छान लिहलंय!
एव्हढं आठवत नाही पण बिमार न होने का दु:ख अशी एक कथा हिंदी मध्ये वाचली होती. त्यात लेखकाला तो कधीच आजारी पडत नाही पण इतर जण आजारी पडल्यावर कसे नातेवाईक, शेजारीपाजारी त्यांची विचारपुस करतात ते पाहून आपण ही आजारी पडलं पाहिजे असे नेहमी वाटत असते अशी ती कथा होती.

धन्यवाद _/\_ चिवी जोशींची बरोबरी म्हणजे माझे भाग्यच समजतो.कविता मला माहीती आहे. एक ओळ या कथेत टाकली आहे.