कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद

Submitted by कुमार१ on 4 March, 2020 - 08:28

लेखाच्या शीर्षकावरून गोंधळला असाल ना ? लगेच खुलासा करतो. एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल हा लेख आहे. मूळ इंग्लीश पुस्तक आहे ‘The old man and the sea’ आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘एका कोळीयाने’.
अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे पुस्तक १९५२मध्ये प्रकाशित झाले आणि पुढे ते जगभर गाजले. त्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला आणि तो १९६५मध्ये प्रकाशित झाला. हे मराठी पुस्तक माझ्या संग्रही असून नुकतेच मी त्याचे पुनर्वाचन केले. पुस्तकाचा अनुवाद ही देखील एक साहित्यकला आहे. चांगला अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. दिग्गज लेखकाच्या दर्जेदार पुस्तकाचा तितकाच दर्जेदार अनुवाद करायला त्याच तोलामोलाचा लेखक लागतो. तसा तो पुलंच्या रूपाने लाभल्याने हा मराठी अनुवाद उच्च प्रतीचा झाला आहे.

आपल्यातील काहींनी मूळ इंग्लीश पुस्तक तर काहींनी हा अनुवाद वाचला असेल. पुस्तक तसे बहुचर्चित असल्याने बहुतेकांना त्यातील कथा माहित असते. या लेखाचा उद्देश त्या कथेबद्दल लिहिण्याचा नाही. हा मराठी अनुवाद करून घेताना आपल्या प्रकाशकांना किती कष्ट पडले आणि कशा अडचणी आल्या, त्यासंबंधी मी काही लिहिणार आहे. ही दर्जेदार कलाकृती तयार करताना प्रकाशक आणि अनुवादक यांचा अगदी कस लागतो. त्यांना अनेक पातळ्यांवर लढावे लागते. वरवर वाटते तितके हे प्रकरण अजिबात सोपे नसते. हे सर्व वाचकांना समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.

ज्यांनी हे पुस्तक वाचलेले नाही त्यांच्या माहितीसाठी त्याचा गोषवारा अगदी थोडक्यात लिहितो. ही एक लघुकादंबरी आहे. मासेमारी करून पोट भरणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची ही कथा. सतत ८४ दिवस एकही मोठा मासा पकडता न आलेल्या या म्हाताऱ्याच्या गळाला अचानक एक अजस्त्र मासा लागतो. त्यावेळी तो खोलवर समुद्रात असतो. आता ही शिकार घेऊन त्याला किनारी पोचायचे असते. मात्र हा परतीचा प्रवासच खूप कटकटीचा ठरतो. त्या दरम्यान समुद्रातील शार्क मासे या शिकार झालेल्या माशावर हल्ला चढवून त्याचे लचके तोडतात. कोळी त्या हल्लेखोर माशांशी प्राणांतिक झुंज देतो खरी, पण तो किनार्‍यावर पोचेपर्यंत त्या मृत माशाचा फडशा पडतो. आता उरला असतो तो केवळ त्या माशाचा सांगाडा. अशा पराभूत स्थितीत देखील म्हातारा निराश होत नाही. उलट तो आता आफ्रिकेच्या जंगलातील सिंहांच्या शिकारीची स्वप्ने बघू लागतो. थोडक्यात, जिंकण्यात हार आणि हरण्यात जय अशा अनुभवाचे सुंदर चित्र लेखकाने रेखाटले आहे.
.........
मूळ इंग्लीश पुस्तक जगभर गाजले आणि पुलित्झर पुरस्काराने सन्मानित झाले. पुढे दोन वर्षांतच हेमिंग्वेना साहित्यातील ‘नोबेल’ देखील प्राप्त झाले. अर्थातच या अलौकिक पुस्तकाचा अन्य जागतिक भाषांत अनुवाद करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु झाले. आता आपण मराठी अनुवादाची खडतर वाटचाल पाहू.

हे पुस्तक मराठीत आणण्याची कल्पना ‘देशमुख आणि कंपनी’चे रा.ज. देशमुख यांनी १९५५मध्ये उचलून धरली. प्रथम मूळ लेखकाची परवानगी घेण्यात आली. मग त्यांनी दिग्गज मराठी लेखकाचा शोध घेणे चालू केले. सर्वप्रथम त्यांनी विनंती केली वि. स. खांडेकरांना. त्यांनी ती मान्य करून या पुस्तकावर अभ्यास चालू केला. सुमारे तीन वर्षे ते त्यावर काम करीत होते. पण, त्यांच्या तब्बेतीने साथ न दिल्याने त्यांनी ते काम सोडून दिले.

आता दुसऱ्या लेखकासाठी शोध सुरु झाला. विचारांती देशमुखांनी अनंत काणेकरांना विनंती केली. काणेकरांनी या पुस्तकावर दोन वर्षे अभ्यास केला. पण त्यांच्या अन्य व्यापांमुळे त्यांना हे काम काही तडीस नेता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुखांच्या पदरी निराशाच पडली. एका दर्जेदार अनुवादासाठी तोलामोलाचा साहित्यिक काही मिळेना म्हणून ते अगदी निराश झाले. मूळ लेखकाची परवानगी सहज मिळाली, पण मनासारखा अनुवादक काही मिळेना. ही स्थिती एखाद्या साक्षेपी प्रकाशकासाठी अगदी यातनामय असते.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पुलंना पत्र लिहून विनंती केली. आता जर का या प्रयत्नात अपयश आले तर मात्र ते या प्रकल्पाचा नाद सोडून देणार होते. पण वास्तवात तसे होणार नव्हते ! पुलंनी या कामासाठी होकार कळवला आणि पुस्तकावर काम चालू केले. सुमारे चार वर्षे त्यांनी हे काम अगदी झटून केले. अखेरीस १९६५मध्ये हा मराठी अनुवाद प्रकाशित झाला.

एखाद्या भाषेतील पुस्तकाचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे ही अनुवादकाची सत्वपरीक्षा असते. निव्वळ दोन्ही भाषांचे ज्ञान एवढीच शिदोरी त्यासाठी पुरेशी नसते. बरेच सांस्कृतिक संदर्भ अभ्यासावे लागतात. पुस्तकाचा विषय खोलातून आणि प्रात्यक्षिकासह समजून घ्यावा लागतो. हे सर्व कष्ट कसे घेतले, हे पुलंनी या पुस्तकाच्या छोट्या मनोगतात लिहिले आहे. त्यात प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या कोळ्यांकडून शिकणे आणि मग तज्ञांशी चर्चा यांचा समावेश आहे. समुद्र आणि मासे या अफाट विश्वात अक्षरशः झोकून दिल्यावरच पुलं हा अप्रतिम अनुवाद लिहू शकले. ते काम हातावेगळे केल्यावर हेमिंग्वेच्या असामान्य प्रतिभेचा सहवास संपल्याचे दुखः पुलंनी व्यक्त केले आहे.

अनुवादाच्या कामात कितीही मन लावून काम करा, तो सर्वार्थाने मूळ पुस्तकाच्या चवीचा होऊ शकत नाही, हे वास्तव आपण सगळे जाणतो. पुलंनी देखील याचा उचित उल्लेख केला आहे. ज्यांना इंग्लीश समजत नाही केवळ त्या मराठी भाषिकांसाठीच आपण हा अनुवाद केलेला आहे, याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. साहित्यिक भाषांतराबाबत एक टिपणी मार्मिक आहे ती अशी:

‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’

पुलंनी त्यांची प्रतिभा पणाला लावून हा अनुवाद केलेला आहे हे निःसंशय. त्यामुळेच जागतिक साहित्यातील हे अनमोल पुस्तक मराठी भाषिकांना उपलब्ध झाले.
.............
आता थोडे पुस्तकाच्या व्यावहारिक आणि तांत्रिक बाबींबद्दल लिहितो.

त्याची पहिली आवृत्ती १९६५मध्ये प्रकाशित झाली. पुढे दुसरी १९९९मध्ये निघाली. २००३मध्ये त्याचे पुनर्मुद्रण झाले. ही आवृत्ती माझ्याकडे आहे. त्यातील काही गोष्टी लक्षवेधी आहेत. तिच्या छापील मजकुरातील अक्षरांचा आकार हा नेहमीच्या साहित्य पुस्तकांच्या तुलनेत बराच मोठा आहे. अगदी लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांचा असतो तसा. कारण उघड आहे. मुळात ही लघुकादंबरी आहे. ती नेहमीच्या अक्षरआकारात छापली तर पुस्तकाचा एकूण आकार लहानसा होईल. इथे अक्षरआकार बराच मोठा करून ती १५४ पानांची केली आहे. तिची बांधणी जाड पुठ्ठयात केलेली असून त्यावर गुळगुळीत कागदाचे सुंदर वेष्टन आहे. त्यावरचे मुखपृष्ठ दीनानाथ दलाल यांनी रेखीव आणि सुबक केले आहे. पुस्तकात मजकुराच्या ठराविक अंतराने समर्पक चित्रे आहेत. ती या आवृत्तीत बहुरंगात छापली आहेत. पुस्तकाची संपूर्ण छपाई चार रंगात केलेली आहे. मुद्रकांसाठी तेव्हा हे एक आव्हानच होते आणि ते त्यांनी समर्थपणे पेलले.

एकंदरीत समकालीन मराठी पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक अगदी रुबाबदार झाले आहे. या सर्वाला शोभेल अशी त्याची किंमत देखील दणकून आहे – ३५० रुपये. १७ वर्षांपूर्वीच्या साधारण मराठी पुस्तकांच्या किमतीच्या तुलनेत हे महाग आहे. पण पुस्तकाचा दर्जा आणि देखणेपण पाहता ते योग्यही आहे. २००४मध्ये मी पुस्तक प्रदर्शनातून याच्यासह अन्य काही पुस्तके खरेदी केली होती. ती घरी घेऊन आल्यावर याची किंमत पाहून घरच्यांनी कौतुकाने डोळे विस्फारलेले मला आठवतात.

पहिल्या आवृत्तीचे लेखन जुन्या शुद्धलेखन नियमांनुसार झालेले होते. त्यामुळे तेच लेखन याही आवृत्तीत कायम ठेवण्यात आलेले आहे. आज ते वाचताना बरेच इकारांत शब्द आणि क्रियापदांवरचे अनुस्वार पाहताना आपल्याला मजा वाटते. पुस्तकातील मजकुरात आलेले ‘पागणे, सालाव, टावरण’, असे खास मासेमारी विश्वातील शब्द आपले छान मनोरंजन करतात. कथेतील पात्रांची नावे ही मूळ पुस्तकातीलच ठेवली आहेत. इतकेच काय पण पुस्तकाची अर्पणपत्रिका देखील हेमिंग्वेनी लिहिल्याप्रमाणेच ठेवली आहे. पुलंनी हा अनुवाद करताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले नाही हे यांतून दिसते. या पुस्तकाच्या वाचनातून शहरी पांढरपेशाला एक अनोखी व धाडशी समुद्रसफर घडते आणि तो आनंदाने निथळतो.
.............

आपण वाचनप्रेमी लोक या सदरात पुस्तक परिचय करून देत असतो. त्या रूढ अर्थाने हा लेख पुस्तक परिचयाचा नाही. हे पुस्तक बरेच जुने असून बहुतेकांना परिचित आहे. ते जागतिक पातळीवर गाजलेले आहे. त्याबद्दल नव्याने मी काय सांगणार ? त्याचा मराठी अनुवाद करताना प्रकाशक आणि मुद्रकांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्यातून हे देखणे पुस्तक आकारास आले. अनुवादित पुस्तकांच्या इतिहासात त्याने एक मानाचे स्थान पटकावलेले आहे. पुस्तक निर्मितीतील ही बाजू देखील वाचकांना माहित व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला. तो वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.

मुळात हे पुस्तक म्हणजे माणसातल्या झुंजार वृत्तीचे एक गौरवलेखन आहे. हेमिंग्वे यांच्या हस्तसिद्ध लेखणीतून ते चितारले गेले. पुलंनी तितक्याच ताकदीने त्याचा अनुवाद केला. देशमुखांनी चिकाटीने अनेक अडचणींतून वाट काढत ते प्रकाशित केले. अशा या अजरामर झालेल्या पुस्तकाचे निर्मितीमूल्य देखील अत्युत्तम आहे. ते आपल्या संग्रही कायम ठेवावे असेच प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीला वाटेल यात शंका नाही.
**************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे. यात त्या कोळ्याचं नाव सान्तियागो आहे आणि द अल्केमिस्टमधल्या मुलाचं नावही सान्तियागोच आहे Happy ही दोन्ही पुस्तकं कमी अंतराने वाचल्यामुळे याची तेव्हा गंमत वाटली होती.

भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’ हे आवडलं. डॉक्टर, चांगला परिचय करून दिला आहे. अशी विशिष्ट बांधणीची पुस्तके मला लहानपणापासून आवडतात.

छान! Happy

लेख आवडला.
आयुष्यात जिंकण्या हरण्याला महत्व नसून आव्हाने स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे. हे या कादंबरीतून शिकण्यासारखे आहे.

>>>>>
अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. दिग्गज लेखकाच्या दर्जेदार पुस्तकाचा तितकाच दर्जेदार अनुवाद करायला त्याच तोलामोलाचा लेखक लागतो>>>> + ७८६

एक वेगळा पैलू... सुंदर लेख
एवढे परिश्रम घेणारे लेखक आणि प्रकाशक आता फक्त तुमच्या सारख्याच्या लेखातूनच भेटतात.

ही खरे तर एक छोटीशी कादंबरी (नॉवेला). पण त्याचे भाषांतर किती प्रामाणिकपणे व कष्टाने पुलंनी केले. त्याआधी असे दिसते की खांडेकर व काणेकरांनीही बरेच दिवस याला दिले. एखादे भाषांतर उत्कृष्ट का होते यामागे काय कष्ट असतात हे दिसते.

ही कादंबरी (अनुवाद तसेच मूळ) समज नसलेल्या वयात वाचली होती. त्यातले अनेक बारकावे डोक्यावरून गेले होते. मात्र ओल्ड मॅन अँड द सी वाचलेले'च' असले पाहिजे या प्रौढीखातर वाचले. आता समज वाढली अश्यातला भाग नाही पण थोडे थांबून वाचता येऊ लागले आहे. तेव्हा पुन्हा या कादंबरीस हात घातला पाहिजे.

वरील सर्व पुस्तकप्रेमी आणि दर्दी वाचकांचे आभार !
या वेगळ्या विषयात आपण सर्वांनी उत्सुकता दाखवली याचा आनंद वाटतो.

ट स,
नॉवेला >>> किती सुंदर शब्द आहे हा !

असाच एक सुंदर शब्द म्हणजे कादंबरीला गुजरातीत ‘नवलकथा’ म्हणतात.

या चर्चेच्या निमित्ताने थोडी भर घालतो.

१. या पुस्तकाची अर्पणपत्रिका दोन व्यक्तींच्या नावे आहे. त्यापैकी एक म्हणजे Max Perkins. हे गृहस्थ हेमिंग्वे यांचे संपादक होते. हेमिंग्वेनी त्यांना लिहिलेल्या एका पत्रातील एक वाक्य सर्व लेखकांसाठी बोधप्रद आणि मार्गदर्शक आहे. ते असे:

“मला जे काही यश लेखक म्हणून मिळालं त्याचे कारण म्हणजे, मला नीट माहित असलेल्या विषयांबद्दलच मी लिहिलं”.

२. ‘एका कोळीयाने’ तयार होईपर्यंतच्या काळात हेमिंग्वे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे मराठी पुस्तक हेमिंग्वेना भेट न देता आल्याची खंत प्रकाशकांनी मनोगतात व्यक्त केली आहे.

छान लेख.

विलास सारंगांनी पुलंच्या अनुवादातले दोष दाखवले आहेत, जमल्यास तेही वाचा.

हे पुस्तक अशातच वाचण्यात आले. भारतातून येताना आणले होते. आल्यानंतर कळले की मुलाच्या English AP साठी दिलेल्या यादीत Old man and the Sea आहे. मग दोघांनी एकत्र वाचले....त्यांने त्याचे आणि मी माझे....काहीठिकाणी तो परतीचा प्रवास कंटाळवाणा वाटला... पण मुलाचे आणि आजोबांचे नाते आवडले... आणि शेवटी ती सिंहाची स्वप्नं म्हणजे मला वाटले की तो कायमस्वरूपी झोपी गेला आहे.....आणि ते एक सूचक आहे.. हेंमिग्वेचा अंत मोठा दूर्दैवी झाला.
लेख आवडला....

विलास सारंगांनी.... >>>> पूरक माहितीसाठी आभार.

आणि ते एक सूचक आहे. >>> वेगळा व रोचक विचार .
धन्यवाद !