‘हरिश्चंद्रगड’ व्हाया ‘गणेश दरवाजा’
गेल्या वर्षी नोव्हेंरमध्ये कुठल्यातरी तरी अनवट वाटेचा प्लान ठरत होता. साथीला होते अजयराव, राजेश मास्तर आणि विनायक. सारं काही जमलं असताना अचानक अश्विनीने काहीही करून मी ट्रेकला येणारच असा आक्रमक पवित्रा घेतला. बरं आता अश्विनी येणार म्हणजे सोबत आमची दोन्ही मुलं चार्वी आणि निशांत ही आलीच. छोटी चार्वी आता बऱ्यापैकी सरावलीय पण चौदा महिन्याचा निशांत, हे सर्व पाहता पुन्हा कुठं जावं इथपासून सुरुवात. मग फार डोकं न चालवता सोयीचं असे पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड ! आता हे सगळं एका अनवट आणि खेची ट्रेक साठी तयार झालेल्या भिडूंना स्पष्ट सांगितले. ते सर्व कुठलीही आडकाठी न घेता येण्यासाठी ठाम राहिले. शेवटी एकत्र बाहेर पडतोय तर चांगला ट्रेक होणं महत्वाचं, हेच मत पडलं.
शुक्रवारी रात्री आम्ही दोन फुल दोन हाफ आणि अजयराव व विनायक आमच्या गाडीतून थेट लव्हाळीच्या दिशेने. आधी जरी पाचनई मार्गे विचार होता पण सोबत जवळची खंबीर मंडळी असल्यामुळे लव्हाळीतून गणेश दरवाजाने चढाई करायचे ठरवले. अर्थात हा निर्णय पूर्णत: माझा होता आणि सर्वांची साथ यामुळे तो अचुक ठरला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास लव्हाळीत पोहचलो तेव्हा किरण त्याच्या मावस भाऊ श्रीकांतच्या घरी आमची वाटच पाहत होता. तर पुण्याहून रात्री निघून कडाक्याच्या थंडीत बाईक चालवत राजेश मास्तर व अनिल आमच्या आधीच हजर होते. प्रवास आणि थंडी यामुळे कुणीही गप्पा टप्पा या भानगडीत न पडता सरळ कॅरीमेट टाकून स्लिपिंग बॅग मध्ये गुडूप. सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला. विनायकने चुलीचा ताबा घेत चवीष्ट उपमा तयार केला. चहा नाश्ता इतर आवराआवरी करून निघपर्यंत साडेआठ वाजले.
लव्हाळी गावाच्या एका बाजूला भला मोठा डोंगर आडवा पसरलेला दिसतो. हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या यालाच गणेशसोंड / गणेशधार तसेच वेताळधार असेही म्हणतात. साधारणपणे सांगायचे झाले तर गडाच्या मंदिरातील आवारात उभं राहून पूर्वेला पाहिलं तर मोठं पठार लाभलेली सोंड नजरेस पडते ती हीच. याच धारेच्या अल्याड पल्याड पाचनई आणि लव्हाळी.
फारशा वापरात नसलेल्या या गणेश दरवाजाच्या वाटेबद्दल माहितगार घेणं गरजेचं, आमच्या सोबत खुद्द श्रीकांत होता. गावातून धनगर वस्तीत आलो. नोव्हेंबर महिना सुगीच्या हंगामाची सुरुवात ठिकठिकाणी शेत खळं स्वच्छ सारवून ठेवलेले. त्यात जागो जागी पेंढा रचलेला, ते सारं खूपच छान दिसत होतं. मागे एकदा साल्हेर ट्रेक वेळी अशाच खळ्यात गडाकडे बघत निवांत सायंकाळ घालवत मुक्काम केलेला आठवलं. डावीकडे ओढ्याला समांतर अशी सपाट वाट. सकाळच्या स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाचा फायदा घेत जमेल तितके जास्तीत जास्त अंतर कापायचे, उन्हात मुलांना घेऊन चढाईचा वेग आपसूकच कमी होणार.
डाव्या हाताला भैरोबा दुर्ग, उजवीकडे वेताळ / गणेशधार तर समोर सरळ रेषेत टोलारखिंड. निघाल्यापासून पाऊण तासात ओढ्यात तयार झालेल्या नैसर्गिक कुंडा जवळील देवाच्या स्थानी आलो.
शेंदूर लावलेले हे देवीच ठाणं, शुक्रवारी ग्रामस्थांची या देवीला ये जा असते. जागा बाकी भारीच रमणीय.
बच्चे कंपनी एकदम खुश, थोडा सुका खाऊ खात मोठा ब्रेक घेतला. इथून पुढची वाट वरच्या बाजूला सरकू लागली, लव्हाळीतील लोकांची गडावर जाण्यासाठी मुख्य वाट. पण खरी गंमत तर पुढे आहे, वीस एक मिनिटांच्या चाली नंतर आम्ही आलो ती मळलेली वाट सरळ टोलार खिंडीत जाते. याच वाटेला डावीकडून म्हणजेच कोतुळ भैरोबा दुर्ग कडून येणारी वाट मिळते. आमचं गणेश दरवाजा ठरलं असल्याने आम्ही उजवीकडे जाणारी बारीक वाट घेतली. पटकन सहजासहजी लक्षात न येणारी ही वाट त्या साठी कुणी माहितगार हवाच. आता खडी चढाई सुरू झाली, खालचा झाडीचा भाग पार करून कातळ टप्प्यावर आलो. वळून पाहिलं विरुद्ध दिशेला भैरोबा दुर्ग मागे पडला होता तर डावीकडे झाडी भरली टोलारखिंड बऱ्यापैकी जवळ वाटतं होती.
खिंडीला तसेच टाटा बाय बाय करत पुन्हा झाडीमध्ये शिरलो, या दिवसात जंगल चांगलेच बहरलेले. नागमोडी चढाईने मात्र दम काढला, खरतर दोन दिवसाचा ट्रेक असल्याने सर्वांच्या सॅक वजनदार त्यात निशांतला कडेवर घेऊन वेळ ही थोडा जास्तच लागत होता. चार्वी तरी आमच्यात सामील झालेल्या भुभू बरोबर मजा मस्तीत दंग पण निशांतचे थोडे टेन्शन होतेच. सुरुवातीला कुरकुर करणारा निशांत काही वेळाने गप्प झाला यामुळे थोडा थोडा वेळ त्याला प्रत्येकाकडे पासिंग पास. खरंच सोबत्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. मुलांच्या हिशोबाने जेव्हा जिथे वाटेल तिथे थांबायचं दम घेत तोंडत काहीतरी टाकून पुढे निघायचं. मुक्कामी ट्रेक त्यात आमच्यात कुणीही असं नव्हतं ज्याने गड पाहिला नाही, त्यामुळे ही वाट हेच मुख्य आकर्षण असल्याने एक निवांतपणा होता. कड्याला उजवीकडे ठेवत कधी दगड धोंड्यातून तर कधी झाडीतून तर कधी लहान लहान कातळ टप्प्यातून वाट तिरक्या रेषेत वर जात मुख्य कड्याला बिलगली.
इथेच शेंदूर फासलेला दगडाचा देव. आता अरुंद वाट वर जाऊ लागली, मधले किरकोळ कातळ टप्पे पार करून समोर आल्या त्या कातळात कोरलेल्या दीड दोन फूट रुंद अशा पायऱ्या.
मोजल्या नाहीत तरी अंदाजे साठ सत्तर किमान असाव्यात. निरीक्षण केल्यावर एक जाणवलं ते म्हणजे या पायऱ्या असलेल्या मोठ्या कातळटप्प्यातच त्या बाजूचा टोलार खिंडीचा कातळटप्पा जो खिरेश्र्वरहून येताना लागतो. थोडक्यात दोन्ही एकाच आणि समान पातळीवर.
पायऱ्या चढून जेव्हा वर आलो तेव्हा भैरोबा दुर्ग बराच खाली वाटू लागला. आता सुरू झाली ती कमरे एवढ्या झाडीतून चढाई. काही ठिकाणी उंचीच्या मानाने चार्वी तर पूर्ण झाकली जाऊ लागली. आता पर्यंत मजा मस्ती करणारी साहजिकच इथे ती वैतागली. हे जंगल कधी संपणार असे विचारू लागली. अजयरावांनी तिला खांद्यावर घेत झटपट पुढे नेलं. झाडी भरला चढाईचा टप्पा संपून वर मोठ्या नैसर्गिक गुहेजवळ आलो.
अर्धवर्तुळाकार गुहेसमोर वरून येणाऱ्या पावसाळी ओढ्यामुळे पाण्याची कुंड तयार झालेली. बऱ्यापैकी प्रशस्त अशा गुहेत इथली मंडळी पावसाळ्यात गाई गुरे ठेवतात. गुहेला डावीकडे ठेवत वरच्या पठारावर आलो.
बाजूलाच गणपतीचं स्थान तसेच या पठारावरील या कातळ भागात काही ठिकाणी पॉट होल्स. हे सारं पाहून आम्हा सर्वांना गडाच्या या काहीश्या दुर्गम वाटेने आल्याचं वेगळेच समाधान वाटले.
फोटोग्राफी, सुका खाऊ, लिंबू सरबत मग निशांतची पावर नॅप यात जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला. घड्याळात पाहिलं तर पावणे दोन, आता पुढची चाल ही हिरव्या पिवळ्या गवतातून. लहानशी टेकडी चढून वाट उजवीकडे आडवी जाऊ लागली. इथून मागे वळून पाहिले तर भैरोबा दुर्गला जोडलेली डोंगर रांग तर पूर्वेला कारकाई कडील रांग सहज नजरेत आली.
पुन्हा पंधरा वीस मिनिटांची खडी चढाई करत वर आलो तेव्हा बालेकिल्ला समोर आला. नीट निरखून पाहिलं तर काही मंडळी भगवा झेंडा घेऊन वर जाताना दिसली. बालेकिल्ला डावीकडे ठेवत आणखी एक टेकडी चढून वर आलो तेव्हा काही अंतरावर टोलार खिंडीतून वर येणारी वाट येऊन मिळाली.
आता इथून पुढची मंदिरा पर्यंतची वाट म्हणजे लहान चढ उतार असणारा हायवेच जणू. चार्वीला अजय, अनिल व श्रीकांत सोबत पुढे पाठवून दिले, आम्ही आरामात निशांत सोबत साडेतीन वाजता पोहचलो.
मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती, विकेंड असल्याने तेवढं चालायचं. गुहेत काही मंडळी आधीपासून होती तसेही लहान मुलांना घेऊन गुहेत फारसं सुरक्षित नाही वाटत. आमचा ढेरा वाळीबाकडे टाकला. पाहिलं काम पोटोबा, घरातून आणलेले जेवण संपवले.
मग फ्रेश होऊन निवांत, मुलं तर अंघोळ झाल्यावर मोकळ्या जागेत दंगा मस्ती करू लागली. खरंच डोंगरातल्या या हवेत वेगळीच जादू असते. सायंकाळी अर्थातच कोकणकडा हे वेगळं सांगायला नको.
गेल्या पंधरवड्यात नळीच्या वाटेने आलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या. सूर्यास्त पाहून झाल्यावर पुन्हा माघारी मंदिर परिसरात. थोडाफार शिधा घरातून आणला होता, बाकी वाळीबा कृपा. जेवणानंतर बराच वेळ गप्पा टप्पा त्यात काल लव्हाळीच्या तुलनेत इथे गडावर थंडी कमीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाचं दर्शन घेतल्यावर नऊच्या सुमारास गड सोडला. सुरुवातीला बैलघाटाने जाऊ असा विचार केला. मागे सादडे घाटाच्या वेळी बैलघाट माझा झाला होता, त्यामुळे अंतर आणि वेळ याचा अंदाज होताच. पण मुलांना घेऊन जास्त वेळ जाणार परत घाट संपल्यावर उलटं कच्च्या डांबरी रस्त्याने भर उन्हात पाचनईत येणं कंटाळवाणे. मुख्य म्हणजे गाडी लव्हाळीत त्यामुळे पाचनईतून अकराच्या सुमारास असलेली बस पकडणे गरजेचं होतं. सर्वानुमते पाचनईने उतरणे फिक्स केले.
पाचनईचा रूट तसा हवशे नवशे गवशे अशा सर्वांना सोयीचा. मंदिरा समोर डावीकडे जाणारी प्रशस्त वाट दहा पंधरा मिनिटांनी सौम्य उतरण घेत वाट रानात शिरली. फार तीव्र उतरण नाही तसेच वर येताना दम लागेल अशी चढाई नाही. अर्ध्या तासात वाट ओढयाजवळ बाहेर आली, मागेच काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात ओढा पार करणं सोपं व्हावं म्हणून वन विभागाने लोखंडी पुल बांधला आहे. ओढ्याला डावीकडे समांतर ठेवत, नंतर उजवीकडे वळून पुढची वाट कड्याच्या पोटातून.
आरामात अर्धा तास तशी आडवी चाल झाल्यावर वाट कातळटप्प्यातून उतरू लागली इथे काही ठिकाणी आधाराला रेलिंग लावलेले आहेत.
त्या पुढे जेमतेम पंधरा मिनिटांची उतराई, थेट पाचनई पेठेचीवाडी रस्त्यावर आलो. पाचनईत जिकडे तिकडे गाड्यांची गर्दी, रविवार त्यात दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे असावे. घड्याळात पाहिलं तर अकरा वाजत आलेले, बसची चौकशी केली असता सुट्टीच्या दिवशी वेळेचा भरवसा नसतो कधी कधी येत पण नाही असं समजले. थोडा वेळ वाट पाहून जीप मध्ये बसलो. चालकाचा महिंद्रा अँड महिंद्रावर प्रचंड विश्वास तो प्रुव्ह होता ते क्षमतेपेक्षा अडीच पट माणसं बोझ्यासकट डांबून. अर्ध्या तासाची थरारक सवारी अनुभवत लव्हाळीत उतरलो. श्रीकांतच्या घरी फ्रेश होऊन दुपारचं जेवण उरकून आरामात चारच्या सुमारास निघालो. राजेश मास्तर व अनिल लव्हाळी-कोहणे-कोतुळ-ब्राम्हणवाडा-ओतूर मार्गे पुण्याकडे रवाना झाले. जाता जाता त्या दोघांनी भैरोबा दुर्ग पाहून घेतला. पुढच्या वेळी वेताळधार जोडून राजदरवाज्याची वाट नक्की करायची असे ठरवून परतीच्या वाटेला लागलो.
अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/10/harishchandragad-ganeshdarvaja....
मस्त!!
मस्त!!
तुमच्या ट्रेकमध्ये सामील असल्याचा फिल आला.
धन्यवाद !
धन्यवाद !