परजीवी असुरन

Submitted by संदीप आहेर on 21 February, 2020 - 04:22

परजीवी असुरन #parasite #asuran

एकाच आठवडयात दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पहिले. दोन्ही त्या त्या मूळ भाषेतच उपलब्ध आहेत. डब करून डबा झाले नाहीत, हि जमेची बाजू. मुळात भाषेचा तितकासा अडथळा जाणवतच नाही. पहिला असुरन आणि दुसरा पॅरासाईट. एकाच वैश्र्विक पातळीवर वारेमाप कौतुक तर दुसऱ्याच मात्र राष्ट्रीय पातळीवरही तितकंसं कौतुक नाही. तिळमात्र उणीवांसह दोन्ही चित्रपट म्हणून खूप समृद्ध अनुभव देऊन जातात.

दोन्ही सिनेमांच्या मुख्य कथेचे बाह्यरंग निश्चितच वेगळे वाटू शकतात पण अंतरंगात शिरल्यावर मात्र अनेक साम्यस्थळं खुणावू लागतात. एक कथा शहरात घडते (#पॅरासाईट) तर दुसरी कथा गावात (#असुरन). एका कथेचा कालखंड अगदी थोडका काही महिने ते उणेपुरे एक वर्ष . दुसऱ्या कथेचा कालखंड हा जवळजवळ दोन पिढयांचा. एका कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला पिझ्झा बॉक्स (प्रिन्टिंग, कोरिगेशन नि व्यवस्थित क्रिझीग केलेला) फक्त फोल्ड करण्यासाठी #youtube ची नितांत आवश्यकता भासते, दुसऱ्या कथेतील नायकाच्या पौंगडा अवस्थेतील मुलाला बाँम्ब बनविण्यातही तितकीशी अडचण येत नाही.

नायकाचं नायकपण सिद्ध करणं हि स्थानिक गरज असुरन ला वाटते ती मात्र पॅरासाईटला वाटत नाही. असुरनच्या नायकाने सहनशीलता सोडून पलटवार करणे तेही हिंसेचा मार्ग अवलंबुन हि प्रेक्षक म्हणून गरज बनते, कारण अत्याचारांचा परमोच्च बिंदू आलेला असतो वाटतं तु मार नाहीतर आम्ही मारू त्याला पण पॅरासाईट मध्ये नायकाने हिंसेचा मार्ग स्विकारत चाकूने वार करणे तितकं गरजेचं वाटत नाही. (असुरन) डोक्यावर चप्पल घेऊन गावभर काढलेली धींड पुरेश्या टोकदारपणे अंगावर येत नाही पण (पॅरासाईट) गरिबीचा वास श्रीमंती ज्या पध्द्तीने झिडकारते ते अधिक वेदनादाई होतं.

आता जरा साम्यस्थळांवर येऊ.

सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं काहीसं घासुन गुळमिळीत झालेलं वाक्य न पटणारी जनता आज खूप जास्त प्रमाणात आहे. बिघडलेला समाज सिनेमांतून चित्रित होत नाही तर सिनेमांतून चित्रित झालेल्या दृश्यानी समाज बिघडतो आहे ह्यावर ठाम विश्वास असणारेच जास्त पॉवर मध्ये आलेले आहेत. ती पॉवर त्यांनी काही वर्षात ठळकपणे दाखवून दिली आहे. तरीही हे दोन्ही चित्रपट मात्र आजच्या त्या समाजाचे दर्शन घडवतात जो समाज कपाळमोक्ष निश्चिंत असणाऱ्या दरीच्या टोकावर उभा आहे.

दोन्ही कथेतील नायक कथेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हतबल दाखवले आहेत. दोघेही बऱ्याचदा सुस्त, नशेत पेंगळलेले अक्षरश: झोपलेले दिसतात. त्यांची मुलं मात्र परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती अंगी बाळगुन विविध क्लुप्त्या लढवतात. अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याची जिद्द मात्र मार्ग चुकविते. मुलं चुकीचा मार्ग का निवडतात? आजची पिढी अशीच आहे. त्यांच्यात पेशन्स नाहीत. त्यांना सगळं कसं झटपट पाहिजे. मग ती श्रीमंती ( #parasite )असो व न्याय ( #asuran ). हा काहीसा पोकळ विचार झाला, कारण सिनेमा जे मांडतो त्यामुळे अहिंसेच्या समर्थनातून तयार झालेल्या सद्सदविकेक बुद्धीलाही दोन्ही सिनेमांतील हिंसा समर्थनीय वाटते. (एकावर तर ऑस्करनेही शिक्कमोर्तब केलंय ... तोच ऑस्कर जो कोणत्याही वैयक्तिक किंवा सामाजिक समस्यांचं सोपं उत्तर हिंसा असणाऱ्या चित्रपटांना कधीच थारा देत नाही आहे.)

इथं ते घासुन गुळमिळीत झालेलं वाक्य कामाला येत की सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. स्थानिक, राष्ट्रीय अगदी वैश्विक पातळीवरही तेच चालू आहे. हि परिस्थिती आलेली आहे, येणार आहे, अजून खूप दूर आहे. तुम्ही भर ऊन्हात रस्त्यावरून पायपीट करताय, पेट्रोल वाचविण्याकरिता AC बंद करुन खिडक्या उघड्याकरुन कार चालवताय, कि merc च्या बॅकसीटला बसून हातात ccd ची कॉफी धरून ड्रायव्हरची टेस्ट घेताय यावर अवलंबुन आहे.

सहा महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रांत एक लेख वाचनात आला होता. त्याचा सार साधारण असा होता कि, नामंकीत मानांकन देणाऱ्या संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील अतिश्रीमंतांना असं वाटतं की त्यांना आणि त्यांच्या श्रीमंतीला मुख्य धोका जागतिक मंदीने होणारी शेअर मार्केट ची घसरण किंवा नैसर्गिक आपत्ती हा नसून गरीब वर्ग हा आहे. पण श्रीमंतांनी इतक्यात घाबरून जाण्याची तितकीशी गरज नाही आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये शेवट हा शिक्षण आणि शिक्षणातून मिळणाऱ्या शाश्वत समृद्धी वर ठाम विश्वास व्यक्त करतो.

संदीप आहेर.
#thesandeepaher

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults