प्रतिजैविके :-- समज आणि गैरसमज.
सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?
सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ.
यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.
यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.
या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव
जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी किंवा जिवाणूंनी इतर जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.
यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.
जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.
१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.
२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.
दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.
काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
पाळी पुढे ढकलण्यासाठी वहिनीला दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता घेतली आणि नंतर पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे आलेल्या महिलेला तुम्ही "गरोदर आहात" त्यामुळे पाळी अली नाही हे सांगितल्यावर धक्का बसला. अर्थात तिला गर्भपात करून घेण्याची पुढची कटकट आणि खर्च आलाच.
दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.
३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.
४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.
५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.
६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.
७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते.
दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो.
अशीच स्थिती क्षयरोगाच्या रुग्णात दिसते. सुरुवातीला औषधे घेतल्यामुळे क्षयरोगाचे जंतू मोठ्या प्रमाणावर मरतात आणि त्यांचे विष शरीरभर पसरते. यामुळे रुग्णाची भूक जाते जेवण पचत नाही आणि त्याचे वजनही कमी होते. यामुळे अनेक रुग्ण विशेषतः हातावर पोट असणारे आणि शारीरिक कष्टाचे काम करणारे रुग्ण औषध सोडून देतात. यामुळे रोग बरा तर होत नाहीच परंतु शरीरात शिल्लक राहिलेले क्षयरोगाचे जंतू या प्रतिजैविकाला जुमानेनासे होतात( antibiotic resistant)
या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.
८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.
काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?
"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.
९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात केवळ "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही.
याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.
यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"
मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1
१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.
प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे
१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते
२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.
३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.
४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.
प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही.
बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते. त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात.
माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चा ही झाली आहे. केवळ त्याचे वैयक्तिक मत.
एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो.
तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की.
प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो.
जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने.
या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले.
जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली.
कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो.
ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो.
सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.
दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे.
नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात.
मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो.
मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग औषध घ्या अथवा घेऊ नका. सर्दी खोकल्यासारखे अनेक साधे आजार घरगुती उपचारांनी बरे होतातच आणि सुरुवातीला तसेच करावे असाच मी आग्रह धरेन.
बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच.
शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल.
आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे?
१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.
बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही.
एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे.
हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
निदान चुकवून चुकीचे इंजेक्शन
निदान चुकवून चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा 1 दिवसात मृत्यू झाल्याची घटना घडलेली नुकतीच पाहिली आहे.
जरा डिटेलमध्ये द्या
सगळेच अतिशयोक्ती करतात हेच
सगळेच अतिशयोक्ती करतात हेच काय ते खरं.
आपण जागरूक राहून कुठल्या वेळी कुठल्या डॉक्टरकडे जायचं आणि कुठल्या डॉक्टरचे सल्ले घ्यायचे हे अनुभवाने ठरवावे.
रामबाण उपायवाल्यांपासून जपून रहावे.
माझा स्वतः च अनुभव आहे खूप
माझा स्वतः च अनुभव आहे खूप वर्षा पूर्वीचा आहे.
ताप आला होता आणि अस्वस्थ वाटतं होते म्हणून डॉक्टर कडे गेलो होतो.
त्यांनी खुभ्यात इंजेक्शन दिले आणि लगेच थोड्या वेळानी कमरे खालच्या सर्व शरीराची सवेंदना निघून गेली मी तर घाबरलो पण डॉक्टर बोलले घाबरु नका थोड्या वेळानी ठीक होईल तसे ठीक झाले पण .
पण काही वेळासाठी मी घाबरलो होतो.
वेळ आली नसली तर गळके होडके
वेळ आली नसली तर गळके होडके समुमुद्र ओलांडते. पण आली तर टाईटानिक.
हो ना. संजय ची वेळ चांगली
हो ना. संजय ची वेळ चांगली होती म्हणायची. नैतर बिचारा पांगळा झाला अस्ता.
खुब्यात सुई घुसते? टेरीवर
खुब्यात सुई घुसते? टेरीवर म्हणायचं आहे का. सभ्य भाषेत नितंबावर.
नेहमी सुईचा नंबर विचारायचा.
नेहमी सुईचा नंबर विचारायचा. बारीक घ्या म्हणायचं. सुइचं टोक कुठल्या मोठ्या स्नायुला टेकलं असेल का?
स्नायुतच देतात
स्नायुतच देतात
नेहमी सुईचा नंबर विचारायचा.
नेहमी सुईचा नंबर विचारायचा. बारीक घ्या म्हणायचं >>>
नको हो. नसेत, स्नायुत, चरबीत की कुठे द्यायचं आणि त्या साठी कुठली सुई वापरायची हे त्या बिचाऱ्या डॉक्टरला ठरवू द्या.
>>होमियोपॅथी / आयुर्वेद /
>>होमियोपॅथी / आयुर्वेद / युनानी वाले आमच्या औषधाचे साईड इफेक्ट्स नाहीत हे संगतात तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते कि तुमच्या औषधाचे मुळात इफेक्ट्सच नाहीत, मग साईड इफेक्ट्स कसले आलेत ?>>
जी व्यक्ती निष्ठेने वैद्यकीय व्यवसाय करत आहे ती मुळात साईड इफेक्ट्स काहीच नाहीत हा दावा करणार नाही मग ती अॅलोपॅथी असो वा आयुर्वेद. औषध असेल तर त्या सोबत काही ना काही साईड इफेक्ट्स हे असतातच. ते काय आहेत ते जाणणे, मान्य करणे, त्यापासून कमी त्रास कसा होईल हे पहाणे हे चांगले वैद्यकीय व्यावसायिक करतात. हर्बल म्हणजे सेफ वगैरे खुळचट समजूती. तसे बघायला गेले तर योग्य डोस(मात्रा?) असेल तर साधे पाणी देखील घातक होते (Water intoxication) आणि योग्य प्रमाणात दिलेली रेडीएशन जीव वाचवते.
हर्बल म्हणजे सेफ ?
हर्बल म्हणजे सेफ ?
अफू, चरस, तंबाखू, कोकेन हे सर्व हर्बलच आहेत.
ठाण्यातील जुन्या कालचे एक
ठाण्यातील जुन्या कालचे एक प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ यांची पत्नी त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात शल्यक्रियेसाठी भूल देण्याअगोदर द्यायच्या इंजेक्शन ला रिऍक्षन होऊन शल्यक्रिया टेबल वरच त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावल्या.
काही वेळेस असे का होते हे सांगता येत नाही.
अर्थात आपण लिहीलेल्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसताना काही टिप्पणी करणे चूक ठरेल.
परंतु कोणताही डॉक्टर जाणूनबुजून असे नक्कीच करणार नाही.
"हलगर्जी पणा मुळे झाले की दुर्दैवाने" हे सांगणे पूर्ण माहिती शिवाय अशक्य आहे.
मुळात साईड इफेक्ट्स काहीच
मुळात साईड इफेक्ट्स काहीच नाहीत असा कोणताही पदार्थ नाही.
मग त्यात आपण रोज खातो ते मीठ साखर का होईना.
अगदी प्राणवायू सुद्धा https://en.m.wikipedia.org/wiki/Oxygen_toxicity
प्रमाणाबाहेर सेवन केल्यास अपाय होईलच.
ठराविक प्रमाण मध्ये घेतलेलं
ठराविक प्रमाण मध्ये घेतलेलं विष म्हणजेच औषध.
प्रमाण बदल की अर्थ बदलला
सिंपल
खरंच?
खरंच?
मुळात साईड इफेक्ट्स काहीच
.
फार जनरलाईज्ड स्टेटमेंट आहे
प्रमाणाबाहेर सेवन केल्यास अपाय होईलच.
Submitted by सुबोध खरे on 1 March, 2020 - 20:51>>>
फार जनरलाईज्ड स्टेटमेंट आहे हे.
औषधं हे प्रमाणाबाहेर सेवना साठी नसतात.
डॉक्टरांनी योग्य त्या ठरवलेल्या डोस मध्ये घेऊन सुद्धा नको असलेले होणारे परिणाम म्हणजे साईड ईफेक्ट्स.
अशा डोसेज मध्ये सुद्धा कुठल्याही आयुर्वेदीक / होमिओपॅथी औषधाचे काहीच दुष्परिणाम नसतात अथवा सगळ्याच एलोपथी औषधांचे नको ते साईड ईफेक्ट्स असतात ही मिथके आहेत.
माझ्या त्रिपुरा येथील
माझ्या त्रिपुरा येथील मित्रानं सांगितलेला किस्सा.
होमिओपॅथी औषधे प्लासिबो इफेक्ट देण्यासाठी असतात अशी चर्चा काही मुले करीत होती. काही म्हणत होते तसे नाही, ती खरोखरच पॉवरफूल असतात. ही चर्चा होमिओपॅथी दवाखान्यात चालली होती. एका मुलानं तावातावाने गोळ्यांची छोटी बाटली घेऊन सर्व गोळ्या गिळून टाकल्या. लगेचच त्याला आकडी आली आणि तोंड वाकडं झाले. हातपाय लुळे पडले. परत तो कशानेही नीट झाला नाही.
गोष्ट खरी की खोटी मित्राला माहिती.पण तो खोटं बोलणार नाही अशी मला खात्री आहे.
जांभळाच्या बी या ह्या
जांभळाच्या बी या ह्या रक्तातील साखरेच्या प्रमाण कमी करतात हे खरे आहे.
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तींनी मधुमेह लवकर बरा होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात जांभळाच्या बिया उगळून पील्या आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होवून मृत्यू झाला.
ह्यात दोष कोणाचं
नमस्कार मंडळी,
नमस्कार मंडळी,
हा धागा मी वाचत आहे. आणि खरे डॉक्टर सांगतात ते अगदी तंतोतत खरे आहे.
मंडळी चर्चा जरूर करा. पण खरा मुद्दा काय ते समजून घ्या. प्रतिजैविके ह्या विषयावर हा लेख आहे.
जे लोक प्रतिजैविके synthetic drugs समजतात त्यांना मला सांगावेसे वाटते की प्रतिजैविके ही नैसर्गिक औषधे आहे. निसर्गातील बुरशी आणि काही बॅक्टरिया त्यांना स्व संरक्षण साठी बनवतात. त्यातील नवीन पिढीच्या प्रतिजैविक मध्ये माणूस थोडे फेर फार करून त्यांना अधिक उपयुक्त बनवतो.
राहिला प्रश्न इतर उपचार पद्धतीचा त्या आपापल्या पद्धतीने उपचार करीत आहेत. त्यात ही कमी जास्त आहेच.
अजून एक side effects. ह्या विषयावर एक अख्खा मास्टर्स course आहे. त्यामुळे इथे मी काही लिहीत नाही.
गूगल आणि विकिपीडिया काही तज्ज्ञ नव्हेत. त्यामुळे तिथे जे असते ते सर्व खरेच असेल असे नाही.
औषधे व उपचार पद्धती ह्या प्रत्येकवेळी सरसकट नसतात बऱ्याच वेळा माणसा माणसात उपचार करताना फरक पडतो.
दर वेळी 100 टक्के च खात्री देता येत नाही. कारण माणूस किंवा निसर्गातील काहीही यंत्र नव्हे. त्यामुळे अपघात घडत राहतात.
औषधे आणि त्यांची मात्रा म्हणजे डोस हे एक शास्त्र आहे medicine and pharmacy मध्ये त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.
हर्बल आहे म्हणून अगोचारा सारखे खातच सुटले तर दुष्परिणाम होणारच.
मायबोलीवर येऊन खरे डॉक्टर
मायबोलीवर येऊन खरे डॉक्टर बरेचसे खरे अॅलोपथी डॉक्टर झालेत हे पाहून ऊर भरून आला.
डाक्टर, तुझ्यासमोर साधना, एसार्डी सारखे खंदे योद्धे उभे आहेत, हे लक्षात ठेव, इतकेच साम्गतो.
बाकी १ दिवसात "चुकीचे" इंजेक्शन घेऊण म्मरूण जाने पा।इलेल्यांना सलाम, कुर्निसात, मुजरा वगैरे.
बाकी मी "बिनचुक" इंजेक्शन दिल्या दिल्या/ देतांना मेलेले रुग्ण पाहिले आहेत. इंजेक्शन देणारा मी स्वतः किंवा माझा भूलतज्ज्ञ असतानाही.
आता हे इंजेक्शन चुकीचे होते हे छाती ठोक, अर्थात उरबडवून (निर्लज्जपणे) सांगताना इंजेक्शनच्या चूक असण्याच्या कारणांची मीमांसा करण्याची तुमची क्वालिफिकेशन्स काय? तेही सांगायची हिंमत करा पाहू.
आपण काय लिहिलं आहे ते जरा नीट
आपण काय लिहिलं आहे ते जरा नीट समजावून सांगाल का?
तो डोक्यावर पडलेला आहे. आरारा
तो डोक्यावर पडलेला आहे. आरारा वाया गेलेलं.... आहे.
नेहमी सुईचा नंबर विचारायचा.
नेहमी सुईचा नंबर विचारायचा. बारीक घ्या म्हणायचं. सुइचं टोक कुठल्या मोठ्या स्नायुला टेकलं असेल का)))) सुयांचे नंबर हे औषधाचा प्रकार आणि शरीरात ज्या ठिकाणी इंजेक्ट करायचे आहे त्यानुसार ठरलेला असतात.
स्नायू,रक्तवाहिन्या,त्वचा यासाठी वापरात येणाऱ्या सुया वेगवेगळ्या असतात.
धन्यवाद.. माहितीपर लेख..
धन्यवाद.. माहितीपर लेख..
Pages