लिंकनची गोष्ट असा काहीसा धडा मला शालेय पुस्तकात होता .
लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांना त्यांच्या गावाकडील लोक भेटायला येत आणि नोकरीची मागणी करीत.
असंच एकदा एक टोळकं नोकरी मागायला आलं होतं. लिंकननं त्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.
एकदा एका देशाचा राजा शिकारीसाठी अरण्यात चालला होता. बरोबर लवाजमा होता. राजा घोड्यावर बसून पुढे चालला होता. मागून निवडक सैनिक, हाकारे चालले होते. इतक्यात पुढून एक शेतकरी गाढवावर बसून येत होता. त्यानं राजाला हटकलं , " काय राजेसाहेब? शिकारीला निघालात वाटतं? राजा हो म्हणाला.
शेतकरी म्हणाला " पण राजेसाहेब थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे."
राजा म्हणाला " कसं शक्य आहे? माझ्या राजज्योतिषानं आज पाऊस पडणार नाही म्हणून सांगितलं आहे."
असं बोलून राजा पुढे गेला आणि काय आश्चर्य? पावसाला सुरुवात झाली. राजानं शिकारीचा प्रोग्राम कॅन्सल केला. परत राजधानीत आला. राजवाड्यात पोचल्यावर सैनिकांना त्या शेतकऱ्याला बोलावून आणण्याकरिता सांगितले. शेतकरी राजापुढे येताच राजानं त्याला विचारले, " पाऊस पडणार आहे हे तू खात्रीनं कसं काय सांगितलं?" शेतकरी म्हणाला, " महाराज, पाऊस पडणार असला की माझं गाढव दोन्ही कान खाली पाडतं त्यावरूनच मी तुम्हाला म्हणालो पाऊस येईल."
राजानं शेतकऱ्याला जावू दिलं आणि त्याच्या गाढवाची नेमणूक राजज्योतिषी म्हणून केली.
लिंकन पुढं म्हणाला, " अन् त्या दिवसापासून त्या देशातील सगळी गाढवं स्वत:ला राजज्योतिषी समजू लागली"
लिंकनची गोष्ट ऐकून टोळकं उठून चालतं झाले.
अत्रेंनी सांगितलेली लिंकनची गोष्ट
Submitted by आर्यन वाळुंज on 19 February, 2020 - 02:45
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान,
छान,