पोट साफ - Squatty potty - प्रॉडक्ट रिव्ह्यू

Submitted by चामुंडराय on 16 February, 2020 - 17:26

ज्यांना "पडल्या पडल्या झोप येते आणि बसल्या बसल्या साफ होते" अशी मंडळी जगात सर्वात सुखी असे थोर विभूतींनी सांगून ठेवले आहेच. ह्या पैकी चांगल्या झोपेसाठी मी वेटेड (वजनदार) ब्लॅंकेटचा धागा पाडला होता (या निमित्ताने त्याची झैरात https://www.maayboli.com/node/73128) आणि जर कोणी ते ब्लॅंकेट वापरत असेल तर त्याबद्दल मत प्रदर्शित करण्याचे आवाहन केले होते. आता ज्यांना मलावरोध किंवा पोट नीट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांच्या साठी रेचक किंवा औषधा व्यतिरिक्त एखादे उपकरण (प्रॉडक्ट) उपलब्ध आहे का ह्या बद्दल चर्चेसाठी या धाग्याचे प्रयोजन आणि उपकरण समीक्षा (प्रॉडक्ट रिव्ह्यू).

बदलती, बैठी जीवनशैली, शारीरिक श्रम किंवा व्यायामाचा अभाव त्या बरोबरीने बदलती आणि सकस अन्नाचा अभाव असलेली आहारशैली, जेवणाच्या अनियमित वेळा ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे ही समस्या असावी. किंवा जंतू संसर्गाने देखील हे होत असावे. अर्थात येथील डॉक्टर मंडळी याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील.

ह्या व्यतिरिक्त आणखी काही कारण असू शकेल काय? या विषयावर अंजात्खनन करताना आणखी एका कारणाचा उलगडा झाला, तो म्हणजे शौच्याचा विधी करतानाची शारीरिक स्थिती (sitting posture). हे प्रकरण जरा इंटरेस्टिंग वाटल्याने अधिक शोध घेतल्यावर असे आढळले की उकिडवे बसून शौच करणे ही शरीर शास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात योग्य पद्धत आहे !

सर्वसाधारणपणे शौच करण्यासाठी दोन पद्धती आहे. एक म्हणजे उकिडवे बसून (squatting) किंवा खुर्चीत बसल्यासारखे बसून (sitting). ह्या व्यतिरिक्त आणखी काही पद्धती जाणकार लोकांना माहीत असतील तर प्रकाश टाकावा (अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे उदाहरण सोडून). squatting साठी भारतीय पद्धतीचे संडास वापरले जातात तर sitting साठी आधुनिक पद्धतीचे कमोड किंवा टॉयलेट. आता कमोड म्हणायचे की टॉयलेट ह्या पुरातन विषयावर वाद नको. शेवटी काय, कार्यभाग उरकल्याशी मतलब, नाही का? कमोडचे डिझाइन हे "वासुदेवाचा प्याला" ह्या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना समजण्या आधी जगात सर्वत्र squatting पद्धत वापरली जात होती किंवा "होल वावर इज आवर" अशी परिस्थिती असेल तर दुसरा पर्याय नसावा. उकिडवे बसणे हे खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त शास्त्रीय आहे हे लक्षात आल्यावर कमोडवर बसूनदेखील उकिडवे बसल्याचा लाभ कसा मिळवता येईल ह्याचा विचार चालू झाला आणि एका नवीन प्रॉडक्टचा जन्म झाला.

पाश्चात्य जगात जी वेगवेगळी फॅडस् येत असतात त्यातील हे एक नवीन फॅड म्हणजे "squatty potty". काय आहे ही स्क्वॅटी पॉटी? हा आहे एक स्पेशल डिझाइन असलेला साधारणतः ६ इंच उंचीचा कमोडवर बसून स्टूल करताना वापरायचा स्टूल !! कमोडवर बसल्यावर हा स्टूल पुढे ओढून त्यावर दोन्ही पाय ठेवले की गुडघे कमरेच्या वरती उचलले जातात आणि उकिडवे बसल्या सदृश्य स्थिती निर्माण होते. आणि तो स्टूल खूप दणकट वगैरे असायचीही काही गरज नाही. त्याच्यावर फक्त पाय ठेवायचे आहेत, उभे नाही राहायचे!

म्हणजे बघा आपल्या साठी जे most natural posture आहे ते या पाश्चात्य मंडळीं साठी desired posture आहे तर.

आंजा वर squatty potty चा एक छान व्हीडीओ सापडला. तो बघितला तर हे काय प्रकरण आहे ते स्पष्ट होईल.
https://www.youtube.com/watch?v=pYcv6odWfTM
आणि हि एक मजेदार झैरात.
https://www.youtube.com/watch?v=YbYWhdLO43Q
डिस्क्लेमर : ह्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही किंवा त्यांच्या उत्पादनाची हि शिफारस नाही. केवळ हि पॉटी म्हणजे काय हे कळावे ह्या कारणासाठी हि लिंक.

एखादा नवीन शोध लागल्यावर किंवा संकल्पना पुढे आल्यावर त्याचे जीवनोपयोगी प्रॉडक्ट्स् मध्ये रूपांतर करून मार्केटिंग कसे करावे हे या लोकांकडून शिकावे. या स्क्वॅटी पॉटीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर यु ट्यूब वर DIY चे अनेक व्हिडीओज अपलोड केलेले आहेत.

माझ्या मते भारतीय पद्धतीशी तुलना करता मुळात कमोड हायजेनिक नाही आणि squatty potty वापरूनही उकिडवे बसण्या इतपत अपेक्षित परिणाम साधता येत नाही परंतु पर्यायच नसेल तर squatty potty वापरणे उत्तम.

आजकाल बहुसंख्य लोकांकडे (उच्च मध्यमवर्गीय मराठी - उमम) कमोडची सोय असलेली शौचालये असतात. ममम आणि कमम देखील ह्या बंदवाघिणी मध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या नेहेमीच्या शिरस्त्या प्रमाणे शारीरिक दृष्ट्या अयोग्य अश्या कमोड संस्कृतीचा आपण अंगीकार करत आहोत का? मलावरोध किंवा "होऊन देखील, काहीतरी अजूनही आहे तेथे" तक्रार वाढण्यामागे हे एक कारण असावे का?

बरं, तो विषय बाजूला ठेवू या. तुम्हाला जर हा त्रास असेल तर विधी करायला कमोडवर बसल्यावर एखादा छोटा स्टूल हाताशी... आपलं... पायाशी असलेला बरा. आणखी एक गोष्ट म्हणजे स्टूल करतानाच हा स्टूल वापरायचा आहे, कमोडवरच्या दुसऱ्या विधीसाठी त्याची आवश्यकता नाही म्हणे. आता हे असे का ते येथील डॉक्टरच सांगू शकतील.

जमिनीवरच्या कमोड पेक्षा जमिनीत पुरलेले कमोडचे डिझाईन चांगले तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा वृद्ध व्यक्तींसाठी जमिनीच्या वर असलेले कमोड + संडासच्या भांड्याचे डिझाइन चांगले. दोन्ही पद्धतीचे फायदे अशा प्रकारच्या कमोड मुळे मिळू शकतील.

तर अशा स्क्वॅटी पॉटीचा कोणास अणभव आहे का? डझ इट रिअली हेल्प टू "गो" इझीली?

यानिमित्ताने अश्या इतर प्रॉडक्टसचा विचार करता योग साधनेसाठी लागणारी आणि मार्केटमध्ये उपलब्ध असणारी विविध साधने (प्रॉप्स) आणि योगा इंडस्ट्री भारताबाहेर कशी भरभराटीला आली आहे हा मोठा अभ्यासाचा विषय आहे.

आता या पुढची पायरी म्हणजे जमिनीवर बसून, मांडी घालून जेवण करणे हे शारीरिक दृष्ट्या सर्वोत्तम आहे असा शोध जेव्हा या पाश्चिमात्य लोकांना लागेल तेव्हा काय काय नवीन प्रॉडक्ट्स येतील आणि त्यांचे मार्केटिंग कसे केले जाईल हे बघणे मनोरंजक ठरेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हँ, काही उपयोग झाला नाही( आम्हाला तरी असे वाटते).
त्या स्टूलाची अडगळच वाटली ज्यास्त.
दुसरे मुख्य कारण म्हणजे, असा स्टूल वापरून पारंपरीक संडासात उकीडवे बसतो ते काही तितकेसे साध्य होत नाही; पसाराच वाटतो.... पाईपचा वापर करताना त्रास आणि चिखल..
पाश्चाच्य संडास काही मोठे नसतात...

<< उकिडवे बसून शौच करणे ही शरीर शास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात योग्य पद्धत आहे >>
मुळात याबद्दलच शंका आहे. एखादा रिसर्च पेपरचा संदर्भ दिलात, तर उपयोगी पडेल.

शरीराची नैसर्गिक ठेवणं जशी आहे त्या नुसारच संडासला बसणे योग्य आहे.
त्या साठी कोणत्या रिसर्च पेपर ची गरज नाही.
कृत्रिम पने बदलेल्या सवयी ह्या अशास्त्रीय आहेत .
पहिली संडास नव्हती लोक उघड्यावर शेतात किंवा ओढ्या काठी कार्यक्रम उरकायचे..त्या विष्टेचे विघटन नैसर्गिक रित्या किडे आणि बाकी सुश्म जीव करायचे..
ते सर्व नैसर्गिक होत .
गाव खेड्यांचा विचार केला तर डास हा प्रकार पाहिला बघायला सुद्धा मिळायचा नाही जेव्हा पासून संडास गावी झालेत तेव्हा पासून डास सुद्धा वाढले आहेत.

गाव खेड्यांचा विचार केला तर डास हा प्रकार पाहिला बघायला सुद्धा मिळायचा नाही

आपल्या या म्हणण्याला कोणताही आधार नाही.

हिवताप (मलेरिया) हा आपल्या आयुर्वेदिक ग्रंथात लिहिलेला आहे त्यामुळे पुराणकाळापासून आपल्या कडे डास आहेतच आणि शौचालये हि सुद्धा आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहेत. फरक एवढाच आहे कि ती घरापासून लांब असत आता जागा कमी असल्यामुळे घराजवळ आली आहेत

मुळात फक्त काही तर्हेच्या डासांच्या माद्या आपल्याला चावतात. बहुतांशी डास हे फुलातील मकरंद शोषूनच जगतात.

हिवताप हा पहिल्या पासून आहे हे योग्य आहे.
आणि तो डास चावल्ामुळे होतो असा शास्त्रीय निष्कर्ष आहे हे सुद्धा मान्य आहे.
पण पूर्वी हिवतापाचे साथ यायची म्हणजे ज्या वर्षी खूप पावूस पडला तर दलदल निर्माण होणे आणि पोषक वातावरणामुळे डासांची पैदास होणे असे चक्र असू शकत .
ते केव्हातरी .
पण आता सारखे 12 महिने 24 तास डास नसावेत असा एक माझा कयास आहे.
माझे खूप आयुष्य खेडेगावात गावात गेले आहे.
आणि माझी जी पिढी आहे त्यांनी आधुनिक ,आणि अगोदरचे दोन्ही जीवनपद्धती जवळून बघितलेल्या आहेत.
पावसात गवताच्या कुरणात डास निर्माण होत असत पण ते वेगळे होते आकारणी आता पेक्षा थोडे मोठे आसायचे .
पण फक्त पावसाळी वातावरण मध्येच. अस्तित्वात असायचे

वरील फोटोत घोड्याच्या आकाराचा जो कमोड आहे त्याला खऱ्या घोड्यावर पाय ठेवण्यासाठी (अडकविण्यासाठी) जिथे जागा असते तिथे दोन्ही बाजूला मजबूत फूटरेस्ट जोडले की आपोआप पाय पोटाशी येऊन लेखात लिहिलेली भारतीय पद्धत साधता येईल. Lol