(दुसऱ्यांचे) दात कोरून पोट भरणारे
लक्ष्मी प्रसन्न करायची असेल तर दात स्वच्छ ठेवा. तुम्ही म्हणाल काहीही काय? उचलली जीभ अन् लावली दाताला… ( यातील काही शब्द उच्चारण्यासाठी जीभ दातांना लावावी लागते. प्रयत्न करून पाहा.) पण, हे गरुडपुराणातच लिहिलेय.
हे पाहा –
कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।
(अर्थ- कपडे मळकट असणे, दात स्वच्छ नसणे, कठोर बोलणे, सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी झोपून राहणाऱ्याकडे लक्ष्मी वास करीत नाही.)
दात स्वच्छ नसले की लक्ष्मी प्रसन्न होत नाही, हा गरुड पुराणात सांगितलेला साधा नियम लहानपणीच कोणी सांगितला असता, तर आज ‘निष्ठूर’ दंतवैद्यांस तोंड ‘दाखवायची’ वेळ आली नसती, हे प्रांजळपणे कबूल करावेच लागेल. चुलीला दोन्ही बाजूला पाय लावून शेकता शेकता राखीचा ढेपसा घेऊन तर्जनी वा अनामिका (जी सोयीची पडेल ती) मुखातून या कडेची त्या कडेला दोनदा फिरवली की झाले दात घासून!
काही काळानंतर घरोघरी बिटको दंतमंजन अवतरले. या दंतमंजनाने दात आणि हातही ‘काळे’ करण्यात (आणि त्याच्या खारट…तुरट चवीत) जी मजा होती, ती आजपर्यंत कुठलीही महागडी पेस्ट देऊ शकली नाही, हे इतर कंपन्यांचे अपयशच म्हणावे लागेल. बरं सटीसहामासी कधीतरी विको किंवा डाबर नामक (मीठमिरची एकत्र केल्यानंतर जसे मिश्रण होते, तशा आणि चवीनेही तिखट) जहाल दंतमंजनाने दात घासण्याचा नाद अनेकदा सोडून द्यावा लागायचा. या दंतमंजनांनी घरोघरच्या फळकुटांवर ठाण मांडल्याने ‘दात घासलेच पाहिजेत का’, असा प्रश्न पडून त्याचं उत्तर मनातल्या मनात ‘नकोच’ इथपर्यंत आलेल्या आमच्या बरोबरच्या कित्येक पोट्ट्यांना शाळेत दात विचकण्याची सोय उरली नव्हती. ‘कोलगेट’च्या नावात कोल असले तरी ती पांढरीशुभ्र कशी काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी तेव्हा गुगल नव्हते. त्यातच तिचे गुळगुळीत भुकटी स्वरुप पाहता ती दात घासण्याची कमी आणि तोंडाला लावायची पावडरच जास्त वाटायची. कोलगेट वापरणे हे त्याकाळी संपन्न घराचे लक्षण असे. दात घासणे हा भांडी घासण्याची अनुभूती देणारा शब्द वाटत असला तरी एकंदरीत ती दंतमार्जनाची क्रिया पाहता त्याला 'घासणे' हाच शब्द योग्य होता. ब्रश करणे असा नाजूक शब्द टीव्हीवाल्यांनी माथी मारला.
लिमलेटच्या गोळ्या, रावळगाव चॉकलेटांनी दात किडतात असे संशोधन तोपर्यंत तरी झाले नसावे किंवा दूरदर्शनवर विको वज्रदंतीच्या जाहिरातीतूनही ते कधी जाहीरपणे सांगितले नाही. परिणामी… इतरांवर दात खाता खाता किड्यांनी आमचे दात कधी खाल्ले कळलेही नाही. हळू हळू अन्न पोटात जाण्याऐवजी आधी दातांच्या गुहेत जाऊन बसू लागले. भारतात अगरबत्त्यांना वाढलेल्या मागणीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिचा दात कोरण्यासाठी होऊ शकणारा चपखल वापर. अगदी घरोघरी, कुठेही सहज उपलब्ध होऊ शकणारं सर्वसामान्यांचं हक्काचं कोरोपकरण. त्याखालोखाल नंबर लागतो तो कार्यालयातील टाचण्यांचा. टाचण्यांचे उत्पादन करताना ती कागदांना जोडण्याबरोबरच दात कोरण्यासाठीही कामी पडेल, असा दुहेरी उद्देश होता की काय हे टाचणीच्या उद्गात्यालाच ठाऊक. या दोन्ही सहज सुलभ साधनांपुढे ‘टूथ पिक’, ‘फ्लॉस’ ‘एकदाती ब्रश’ वगैरे ‘मेडिकेटेड प्रॉडक्ट्स’ही फिकी पडावी, इतका त्यांचा मुक्त वापर. असो.
साहजिकच, आमचे दात कधी स्वच्छ राहिले नाहीत आणि त्यामुळे लक्ष्मीनेही कधी जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. मग गरुड पुराणातील हा श्लोक कुठून तरी आमच्या वाचनात आला. लक्ष्मीची सुरुवात कपडे आणि दात स्वच्छतेपासून होते, हे कळण्यास आयुष्यातली २०-२५ वर्षे निघून गेलेली. ही पोकळी भरून काढायची तर आधी दातांच्या पोकळ्या भरल्या पाहिजेत, हे तत्वज्ञान कोणीतरी सांगितले. त्यासाठी दातांच्या डॉक्टरकडे जावं लागेल असा विकतच्या ‘ट्रीटमेंट’साठी फुकटचा सल्लाही मिळाला. कळतं होईपर्यंत सगळ्या आजारांसाठी जाड भिंगांच्या चष्म्यावाला एकमेव डॉक्टर माहिती. तोंडून ‘आई…’ निघेपर्यंत सुई टोचणारा!!
दंंतवैद्याकडे जाण्याची कळकळ ज्याच्या दातात कळ निघते अशाच व्यक्तीला कळू शकते. ‘जरा कळ काढा’ हे दातदुखी असणाऱ्याला सांगण्याची हिंमत करून दाखवा. त्याच्या मनात तुमची बत्तीशी घशात घालण्याचे विचार सर्वप्रथम येतील. एकवेळ पहिलवानाची कळ काढणे परवडले, पण दाताची कळ… नको रे बाबा. ‘ते मले सैनच होत नै’. डोक्यात जाणारा राग आणि लोकं यापेक्षाही दाताची कळ जाणे अतिभयानक. विचारानेही दातखिळी बसते हो. दाताच्या पोकळीच्या पदार्थांची गोडी खोलवरील नसांना लागली की त्यांच्या त्या आनंदाची कळ दाढेतून जबड्यात आणि मस्तकामार्गे डोळ्यांतून गालांवर कधी ओरघळते ते कळत नाही. मग, अन्न हे कितीही पूर्णब्रह्म असलं तरी ते मुखी घालणेही निषिद्ध होऊन जाते. अशा वेळी दंतवैद्याचा उंबरा शोधण्याशिवाय पर्याय उरतोच कुठे?
पहिल्यांदाच दातांच्या डॉक्टरकडे जाणाऱ्या फार भारी वाटते. विमानाच्या पायलटला असते तशी अगदी आरामदायी खुर्ची. मग डॉक्टर त्यावर आपल्याला बसायला सांगतो. आणि मग आरामबससारखी हळूच पाठ खाली करीत आपल्याला ‘आडवा’ करतो. ( पेशंटला ‘आडवे’ करण्यासाठीच तमाम डॉक्टर टपलेले असतात, हे सत्य येथे नाकारून चालणार नाही.) बरं डॉक्टर आधीच सांगतो, दोन ‘सिटींग’ मध्ये होऊन जाईल. पण, नंतर दोनाच्या चार-पाच-सहा कधी होतात, हे आपल्यालाही कळत नाही. डॉक्टरच्या हातातली हत्यारं पाहिली की तो तोंडात बसून युद्ध करणार आहे की, काय हा प्रश्न न पडला तरच नवल. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं. अर्थात, दुसरा पर्याय तरी कुठे असतो आपल्याकडे? दुसऱ्यांकडे पाहून दात काढणे हे किती सोपे असते हे प्रत्यक्ष दात काढलेल्यास विचारा...
एकदा का डॉक्टरने मोठा ‘आ’ करायला सांगितला की समजून घ्यायचं, पुढचा तासभर तुमचा जबडा पराधीन झाला. मग डॉक्टर सांगेल त्या सूचना आपण निमूट पाळायच्या. बरं, हातात ड्रिलिंग, कटींग करणारी सर्रर्रर्र... सुर्रर्रर्र आवाज करणारी विजेवरची उपकरणं (की हत्यारं?) पाहिली की धस्स होतं. थोडा जरी नेम चुकला, इकडच्या तिकडं झालं तर काय??? हे आठवून आपली डॉक्टरवर दातओठ खाण्याची इच्छा होते, पण जबडा ताणलेला असल्याने ते शक्य नसते. मग, डॉक्टर आपले खोदकाम सुरू करतात. डोंगरावर अवजड ड्रिल मशीनने सुरू असलेल्या खोदकामाची अनुभूती देणारीच ही मिनी प्रक्रिया. मूळांचे पाट मोकळे करण्याची क्रिया (सोप्या भाषेत रूट कॅनॉल) करायचे असले तर भूल द्यावी लागते. या भूलीचीही मोठी गंमत असते. ज्या बाजूला काम चालू आहे, त्या बाजूचा गाल, ओठ, दात बधीर झालेले असतात. त्यामुळे आपल्या एका गालाला मोठे वजन बांधले की काय असे उगाच वाटत असते. डॉक्टरने गुळणी करायला सांगितले की, आपल्याला दुसऱ्या बाजूचा ओठ आणि गाल नाहीच, असे समजून आपण गुळणी करतो, जी गालावरून ओरघळण्याची दाट शक्यता असते. बरं आता डॉक्टरांकडे फारसा वेळ नसल्याने ते पेशंटला गुळण्या वगैरे टाकण्यात वेळ घालविण्याच्या फंदात पडत नाहीत. दुसरा एक छोटासा पाइप टाकून त्याद्वारे तोंडात जमा होणारे पाणी बाहेर काढत (सक्शन) असतात. बरं, यामुळे गोची अशी होते की जबडा ताणून इतका दुखायला लागतो की आता तरी डॉक्टर आपल्याला तोंड बंद करायला सांगेल, अशी आपण वाट पाहत असतो. पण, कसचं काय? असे डॉक्टर इतके ध्येयवेडे असतात, की ते खोदकामाचे ठराविक ‘टार्गेट’ पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. कितीही भूल दिलेली असली तरी खोदकाम करताना नेमका कीडीच्या वर्मावर घाव बसला की जी कळवळ होते… आई…आई…आई… सांगता सोय ना बोलता सोय. ती थेट डोळ्यांतून टपकते. चाणाक्ष डॉक्टर डोळ्यांच्या हावभावावरून पेशंटला नेमके काय होतेय, हे ओळखू शकतो. पण, ते इतके भावनिक होण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण, जवळपास सगळेच पेशंट सारखेच तर असतात. खोलवर रूटमधील कीड काढताना जसा भिंतीवर एखादा स्क्रू जोर लावून फिट करावा, तशी डॉक्टरची बॉडी लँग्वेज असते. अशी क्रिया दहा-बारा वेळा तरी डॉक्टर करतात आणि त्या प्रत्येक वेळी डॉक्टरविषयी मनात काय (काय आणि कशी कशी) ‘शब्दसुमने’ येतात, हे लिहिणे येथे प्रस्तुत होणार नाही. प्रत्येकाच्या स्वभावप्रवृत्तीनुसार ते वेगवेगळ्या दर्जाचे, वेगवेगळ्या तीव्रतेचे असू शकतात. त्यानंतर आपल्या भाषेत सिमेंट किंवा चांदी त्यात भरली जाते, तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो. पुढे पुन्हा काही दिवसांनंतर डॉक्टर आपल्याला त्यावर टोपी (यालाच आपण चांदीचा दात म्हणतो. आणखी शिकलेले लोक त्याला क्राउण म्हणतात. ) बसविण्याचे सुचवितात. त्यासाठी आहे तो दात अक्षरश: कापून टाकतात. जोपर्यंत कॅप बसवत नाही, तोपर्यंत आपली जीभ त्या दाताशी इतकी करुणेने वागते, की दर दुसऱ्या मिनिटाला त्यावर फिरून त्याची चौकशी करीत असते. कॅपचे माप घेण्यासाठी सिमेंटची बत्तीशी तयार करावी लागते. हुबेहुब आपल्या जबड्याची कृत्रिम नक्कल. ती इतकी परफेक्ट असते की ती आता बोलायला लागेल असे वाटावे. एका डॉक्टरने ती घरी दिली होती आणि मी ती शोकेशमध्ये जपून ठेवली होती. ही बत्तीशी बनविण्यासाठी स्टिलच्या साच्यामध्ये एक हिरवट पदार्थ भरून आपल्याला त्यात कच्चकन दात खुपसायला लावतात. बरं ते दुसऱ्याच क्षणी इतके फिट्ट बसतात की ‘कही ये फेविकॉल का मजबूत जोड तो नही’ अशी शंका येऊन जाते. काढताना डॉक्टरच्या ताकदीचा कस तर लागतोच, पण आपले आहे ते दात उपटून येतात की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. पण, डॉक्टरच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने तसे काही होत नाही. नंतर डॉक्टर आपल्याला त्यांच्या ठेवणीतले चांदीचे, पितळेचे (सोन्याचा मुलामा दिलेले) किंवा आपल्या दातांसारख्याच दिसणाऱ्या सिरॅमिकच्या कॅप आपल्याला दाखवितात. येथे आपण बाजारात असल्याची अनुभूती येते. डॉक्टर प्रत्येक दाताची किंमत सांगतात. आपण उगाचच आपल्याला त्यातलं सगळं कळतं असं दाखवून हं… हं.. करीत राहतो. उगाचच महागड्या दाताच्या किंमतीत काही कमी होते का ते विचारतो. अर्थात, डॉक्टरने पेशंटकडे पाहिल्यावरच त्याला कळलेले असते की, हे दहा रुपयांची मेथी पाच रुपयांना मागणारं गिऱ्हाइक आहे. अपेक्षेप्रमाणे आपण शेवटी त्या स्वस्त कॅपवर येतो आणि घासाघीस करू लागतो. डॉक्टरला हे रोजचंच असतं. त्यामुळे त्याने आधीच हजार रुपये जास्त सांगितलेले असतात. डॉक्टर सांगतात, तुम्ही जवळचे आहात म्हणून पाचशे रुपये कमी करतो, पण कुणाला सांगू नका. आपण स्वस्तात कॅप मिळविल्याच्या आनंदात असतो, पण डॉक्टर याच्याकडून पाचशे रुपये कसे जास्त काढले या दुहेरी आनंदात असतो. अगदी कंजूष माणसाबाबत ‘दात कोरून पोट भरणे’ अशी मराठीत म्हण आहे. पण, दुसऱ्यांचे दात कोरून स्वत:ची पोटं भरणाऱ्या, वर त्यातूनच इमले बांधणाऱ्या दंतवैद्यांकडे आपल्याला कधी ना कधी ‘दाती तृण’ धरून जावेच लागते, हेही तितकेच सत्य.
(प्रस्तूत लेखकास समस्त दंतवैद्यांबद्दल नितांत आदर आहे हे. सर्वांची क्षमायाचना करून हा लेखनप्रपंच)
माझं सुद्धा झालंय रूट कॅनल
माझं सुद्धा झालंय रूट कॅनल त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या वाचताना सगळ relate होऊन खूप हसू येत होत.. मस्तच एकदम..
छान जमलंय. भारी.
छान जमलंय. भारी.
टोच्याराव का हो लेख टंकलात?
कालच जाऊन आले. वाटलं होत, आजची शेवटची सिटींग. पण
दातवाले वैद्य, "अजुन 2 सिटींग बाकी आहेत तुमच्या!"
मी: आता हसु का रडु? असा केविलवाणा चेहेरा करुन. "आता पुढची अपॉइंमेंट कधी?"
थोडक्यात, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्याच्या प्रत्येक शब्दाला "मम" म्हणाले तरी कमी पडेल..
असाच दातावरील लेख कुठेतरी
असाच दातावरील लेख कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय.. 'माझे दंतपुराण' की काय शिर्षक होते. त्यावेळेस देखील मला माझ्या एक दाढेच्या रुट कॅनोलवेळी लागलेल्या ७ सिटींगच्या प्रत्येक दिवसाचा अनुभव डोळ्यासमोरुन सरकला.
अमृताक्षर, सस्मित, मन्या एस,
अमृताक्षर, सस्मित, मन्या एस, डीजे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आवडले!
आवडले!
छान!
छान!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/11594 - दंतमनोरंजन
खूप जुनी रिक्षा
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
वेड्या वाकड्या आलेल्या अक्कल दाढा काढण्या करता दोनदा दन्त वैद्यांकडे जाण्याचा योग आला. त्यामूळे दोन्ही वेळेस एकाच सिटिंग मध्ये निभावले.
त्यावेळी दन्तवैद्यांनी सगळे दात मशीनने घासून घेण्याचा सल्ला दिला, मी त्यांना ही दाढ काढुन झाली की येतो की असे सांगून दोन्ही वेळेस त्यांची बोळवण केली आणि दात दाखवून अवलक्षण होण्याचे टाळले.
अजून एक तिरपी आलेली अक्कलदाढ काढणे शिल्लक आहे, कदाचित या उन्हाळ्यात काढुन घेईन.
ललिता प्रीती, जुनं ते सोनंच.
ललिता प्रीती, जुनं ते सोनंच. जबरी लिव्हलाय. धन्यवाद.
कनिका, सुजाता यादव प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मानव पृथ्वीकर, <अजून एक तिरपी आलेली अक्कलदाढ काढणे शिल्लक आहे, कदाचित या उन्हाळ्यात काढुन घेईन.>
माझ्याही दोन्ही दाढा बाहेरच्या बाजूने तोंडं करून आहेत. त्या काढण्याची 'अक्कल' अजून तरी आलेली नाही.
मला तर अक्कलदाढा आल्याच नाहीत
मला तर अक्कलदाढा आल्याच नाहीत.
अक्कलदाढा आल्यात आणि काही त्रास झाला नाही म्हणून माहित नाही असं होऊ शकतं का?
दंतमनोरंजन
दंतमनोरंजन
खूप जुनी रिक्षा Proud
Submitted by ललिता-प्रीति>>>> धमाल आहे हा पण लेख.
सस्मित दात मोजून बघा. २८
सस्मित दात मोजून बघा. २८ पेक्षा जास्त नसतील तर यायच्यात अजून. मल खूप उशीरा आल्या, पस्तीशीच्या आसपास.
मोजले. २७ आहेत.
मोजले. २७ आहेत.
एक दाढ काही वर्षांपुर्वी काढलेली.
म्हणजे अक्कलदाढा यायच्यात अजुन? आता नाही आल्या तरी चालेल. की येतातच?
आईsss गं कस्सलं लिहिलंय !
आईsss गं कस्सलं लिहिलंय !!प्रत्येक वाक्या -प्रसंगा गणिक अगदी अगदी होत होत .धमाल आली
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
अक्षर नि अक्षर तंतोतंत अनुभव
अक्षर नि अक्षर तंतोतंत अनुभव व्यक्त करणारे आहे. खूपच छान लिहिले आहे. किती वास्तववादी पण तरीही खुसखुशीत लिहिले आहे तुम्ही. आता दंतवैद्याकडे जायच्या आधी हा लेख नक्की वाचून जायला हवा म्हणजे हास्यरसातून का होईना, धैर्य धारण करता. :स्मित :
माझी एक अक्कलदाढ काढली ते
माझी एक अक्कलदाढ काढली ते नेमकी ९\११च्या दिवशी.
डॉक्टर समोर आ वासून बसलो होतो. भुल दिली अन तेवढ्यात असिस्टंट भोंगा वाजवत आला ट्वीन टॉवर पडल्याचे. टिव्ही बघण्यात डॉक्टर एवढा रमला की पुन्हा भुल द्यावी लागली. अन नंतर कामात लक्ष कमी. दाढेचे एक मुळ आतमधे तुटले. वाढवा काम.
तदपश्र्चात कानाला खडा....
दुसरी वाकडी अक्कलदाढ तिन्ही त्रिकाळ ब्रश करून सांभाळतो आहे.
अंजली कूल, स्वाती २, प्राचीन,
अंजली कूल, स्वाती २, प्राचीन, पाथ फाइंडर प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. लेखनाचा हा प्रकार पहिल्यांदाच हाताळला. प्रतिक्रियांवरून वाटतंय की जमतंय थोडंफार. आणखी प्रयत्न करायला हरकत नाही.