स्थळ : एका शहरातील उद्यान
वेळ: असाच एक रविवार, सकाळी ९ वाजता
हवामान : निरभ्र आकाश आणि सुखद वातावरण
या उद्यानात साधारण शांतता आहे. तुरळक लोकांची येजा चालू आहे. एवढ्यात एका बाजूने काही लोक शिस्तीने आत प्रवेश करतात. हे एकूण २४ जण आहेत. या सर्वांचेच पोशाख सामान्य आहेत. त्यांच्या बरोबर ते ६ सतरंज्या घेऊन आलेले आहेत. आता त्या अंथरल्या जातात. मग समूहातले २२ जण त्यावर बसतात. आता फक्त दोघेजण उभे आहेत- त्यातला एक ‘तो’ आणि दुसरी ‘ती’ आहे. आता पुढे काय ? तर आज इथे त्या दोघांच्या लग्नाचा हा छोटासा मेळावा आहे.
या लग्नाची नोंदणी प्रक्रिया २ दिवसांपूर्वीच झालेली आहे. आज इथे फक्त १० नातेवाईक (त्यापैकी ४ पालक) आणि बाकीचे मित्रमैत्रिणी आलेले आहेत. सर्वांनी मिळून हा अनौपचारिक स्नेहपूर्ण विवाहमेळावा आयोजला आहे. आता थोडेफार हास्यविनोद होतात आणि कार्यक्रमाला सुरवात होते.
दोघेही उत्सवमूर्ती सर्वांच्या मधोमध उभे राहतात. दोघांचे कपडे रोजच्या वापरातलेच आहेत. त्या दोघांच्या हातात प्रत्येकी एक घड्याळ आहे. बाकी अंगावर कुठलाही अलंकार नाही. दोघेही समोरासमोर उभे राहून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात. मग एकसुरात म्हणतात, “आम्ही दोघे एकमेकांचा मनापासून स्वीकार करीत आहोत”. बस्स. आता दोघेही आपापल्या मनगटावरचे घड्याळ काढतात आणि दुसऱ्याच्या हातात बांधतात. आता ही घड्याळांची देवाणघेवाण कशासाठी? तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनी लगेच दिले. संसारात पतीपत्नीनी एकमेकास द्यायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘वेळ’. त्याचे प्रतिक म्हणून ही घड्याळे !
आता दोघांचेही पालक वधूवरांचा थोडक्यात परिचय उपस्थितांना करून देतात. मग दोघेही उत्सवमूर्ती आपले मनोगत व्यक्त करतात. या दोघांनीही १ वर्षभर एकत्र राहून एकमेकांचा पुरेसा अंदाज घेतलेला आहे. आपण एकमेकास अनुरूप आहोत याची खात्री झाल्यावरच विवाहनिर्णय घेतला. आता दोघांनाही सध्याचा ‘बॉलीवुडी’ प्रकारचा ठराविक लग्नसोहळा नको होता. म्हणून हा छोटासा मेळावा.
कार्यक्रमाच्या पुढच्या भागात या दोघांच्या प्रत्येकी २ मित्रांनी मनोगत व्यक्त केले. त्यात मुख्यतः आपला त्याच्याशी किंवा तिच्याशी परिचय कसा झाला ते सांगितले. तसेच त्यांना या मैत्रीमुळे या दोघांचे कोणते गुण जाणवले त्याचे कथन केले. आता सर्वांनी मिळून जोरदार टाळ्या वाजवल्या. मग सर्वजण उठले आणि सतरंज्या गुंडाळल्या गेल्या. उद्यानाचे बाहेरच्या बाजूस खाऊ आणि चहाच्या गाड्या उभ्या होत्या. तिथे सर्वांचा हसतखेळत अल्पोपहार झाला आणि या छोटेखानी कार्यक्रमाचे सूप वाजले.
लग्नसमारंभ हे पारंपारिक पद्धतीचे खर्चिक असावेत की साधेसुधे, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. या विषयाच्या दोन्ही बाजूंचे समर्थक आपापली बाजू हिरीरीने मांडतात. खर्चिक समारंभातून रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते, हा एक मुद्दा अलीकडे वारंवार चर्चिला जातो. ते जे काय असेल, ते असो. प्रस्तुत कार्यक्रमाला आलेल्या मंडळींनी हा सर्व काथ्याकूट काही वेळासाठी बासनात बांधून ठेवला होता. छान मोकळ्या हवेत, नैसर्गिक प्रकाशात आणि कुठलाही कर्कश आवाजविरहित झालेला हा कार्यक्रम सर्वांनाच सुखावून गेला. जेमतेम दीड तास चाललेल्या या सुटसुटीत कार्यक्रमाचा आनंद मनात साठवून ते सर्वजण तिथून बाहेर पडले.
व्वा मस्तच
व्वा मस्तच
आवडला. सोहळा आणि लेख दोन्ही.
आवडला. सोहळा आणि लेख दोन्ही.
पण ही खरी घटना आहे का??
होय, १००% खरी !
होय, १००% खरी !
अगदी परवाच घडलेली.
धन्यवाद.
सगळेच आनंदात होते ना... मग
सगळेच आनंदात होते ना... मग छानच!!
नाहीतर पोरांची ईच्छा मग काय करणार? आमची मात्र हौस करायची राहून गेली अस असेल तर मजा नाय.
<< संसारात पतीपत्नीनी एकमेकास
<< संसारात पतीपत्नीनी एकमेकास द्यायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘वेळ’. त्याचे प्रतिक म्हणून ही घड्याळे ! >>
खूप छान. आवडले.
वधूवर तुमच्या माहितीतले असतील तर त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि नवीन विचारांबद्दल अभिनंदन कळवा.
खुप मस्त सोहळा. आवडली ही
खुप मस्त सोहळा. आवडली ही पद्धत.
घड्याळांची कल्पनाही छानच.
(रागाऊ नका पण हा प्रसंग अगदी यांत्रीक पद्धतीने सांगीतल्यामुळे हा छोटेखानी सोहळाही तसाच पार पडला की काय असे वाटले.)
हे फार आवडले!
हे फार आवडले!
वधूवरांना शुभेच्छा!
वरील सर्वांचे आभार.
वरील सर्वांचे आभार.
त्या जोडप्यास आपल्या शुभेच्छा जरूर कळवेन.
मलाही ही घटना आवडली.
म्हणून थोडक्यात सरळसोट वर्णन केले. त्याला उगाच अलंकारिक करीत बसलो नाही.
लग्नाआधी लिव्हीन केले हे छानच
लग्नाआधी लिव्हीन केले हे छानच.
नोंदणी पद्धतीने विवाह केला हेदेखील छान.
२२ लोकंच होती तर नोंदणीनंतर लगेच जरा बऱ्याश्या हॉटेलात जाऊन हे वरंच सगळं करू शकले असते. पण ज्याची त्याची आवड, निर्णय वगैरे. मला काही फारसं कौतुक करण्यासारखं वाटलं नसतं हे, २२ पैकी कोणीही असते तर
मला पण असे वाटले की लिव्ह इन
मला पण असे वाटले की लिव्ह इन नंतर एकमेकाला नीट ओळखून मग लग्न केले हे छान पण खर्च, अवडंबर नको हा मुद्दा असेल तर नोंदणी पद्धतीने लग्न झालेच आहे की. पुन्हा बागेतला समारंभ कशाला? म्हणजे लग्न सोहळा तर हवा, मग असे असेल तर तो असा यांत्रिक आणि बोरिंग असायला का हवा? आनंदाचा दिवस आहे, चांगले कपडे वगैरे का नकोत? ते घडयाळ बांधणे वगैरे पण मला तरी काही रीलेट करता आले नाही.
समारंभ तरी कशाला? >>
समारंभ तरी कशाला? >>
मुद्दा विचार करण्याजोगा.
माझ्या एका मित्राने फार पूर्वीच याहून पुढची पायरी गाठली होती. त्याने २६ जानेवारीला लग्न केले. कुठलाही समारंभ नाही. लग्नाची उपस्थिती २+४. बास.
नंतर एका कागदावर “आमचे लग्न झाले, हे माहितीसाठी कळवत आहोत”, असे लिहून त्याच्या प्रती ओळखीच्यांना पाठवल्या होत्या.
नंतर त्या दोघांनी सहा आकडी रक्कम सामाजिक संस्थेस दान केली.
हल्लीच्या 4-5 दिवसाच्या लग्न
हल्लीच्या 4-5 दिवसाच्या लग्न सोहळ्यात ज्यात मेहेंदी, संगीत, लग्न, रिसेप्शन अशी कार्यक्रमाची गर्दी असते त्यात असे साधेपणाने लग्न करणारेही आहेत हे वाचून आश्चर्य वाटले.
@साद
@साद
>>>>नंतर एका कागदावर “आमचे लग्न झाले, हे माहितीसाठी कळवत आहोत”, असे लिहून त्याच्या प्रती ओळखीच्यांना पाठवल्या होत्या.>>> सुंदर!!
>>>>नंतर त्या दोघांनी सहा आकडी रक्कम सामाजिक संस्थेस दान केली.>>> कौतुकास्पद.
राम मराठे यांच्या नातीनेही
राम मराठे यांच्या नातीनेही (स्वरांगी?) साधे लग्न करून सामाजिक संस्थेस देणगी दिली होती काही लाखांची असे वर्तमानपत्रात वाचले होते. एका जोडप्याने लग्नाला आलेल्या लोकांना रोपटे दिले होते भेट म्हणून.
छोटेखानी लग्न दुर्मिळ होत
छोटेखानी लग्न दुर्मिळ होत चाललीयेत म्हणुन असा सोहळा पार पडला कि कौतुक वाटत..
खूप सुंदर कल्पना आहे.
खूप सुंदर कल्पना आहे.
'फक्त मिनिटभर टाळ्या' वगैरे वाचून कोणीतरी घड्याळात बघून वेळ मोजून टाळ्या वाजवल्या असा समज होतो आणि त्यामुळे पूर्ण प्रसंग कृत्रिम वाटायला लागतो. दोन रोबो प्रसंग साजरा करताहेत असे वाटते. शीर्षकात लिहिलेला साधेपणा व गोडवा प्रत्यक्ष लेखात तितकासा उतरला नाही.
माझी खात्री आहे की प्रत्यक्ष तिथे जे घडले ते खूप सुंदर, अकृत्रिम, कुठलाही आव न आणता घडले असणार. एकमेकांना घड्याळ द्यायची कल्पना आवडली. आजच्या जगात वेळ ही गोष्ट कोणाकडेही राहिलेली नाही त्यामुळे ती अतिशय दुर्मिळ झालेली आहे आणि इथे वधुवर ती एकमेकांना द्यायचे वचन देताहेत. गळ्यात मंगळसूत्र बांधण्यामागे किंवा बोटात अंगठी घालन्यामागेही अश्याच काहीतरी भावना असतात, नंतर त्या कितपत पाळल्या जातात हे वेगळे.
लग्नाआधी एकत्र राहून एकमेकांसोबत कितपत जमते याचा शोध घ्यायला हवा हे मत माबोवर बरेचदा मांडले गेलेय. पण भारतीय समाजात स्त्रीपुरुष एकत्र आले की त्यांच्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी फक्त एकच गोष्टीचा संशय लोकांना यायला लागतो, लिव्ह इन म्हटले की लोकांना फक्त तेच वाटते. पण एकत्र राहून अंदाज घेणे ही आजच्या काळाची गरज आहे, या जोडप्याला लग्नानंतर एकत्र राहणे फारसे तडजोडीची वाटणार नाही, काय तडजोडी कराव्या लागणार हे आधीच कळलंय.
नवदाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा!!!
सर्वांचे आभार !
सर्वांचे आभार !
साधना, तुमचा मुद्दा बरोबर आहे, धन्यवाद .
अशा प्रकारचे छोटेखानी समारंभ खूप कमी असतात म्हणून हा लघुलेख लिहावासा वाटला.
हे फार आवडले, नवदाम्पत्यास
हे फार आवडले, नवदाम्पत्यास शुभेच्छा!
<< मला काही फारसं कौतुक
<< मला काही फारसं कौतुक करण्यासारखं वाटलं नसतं हे, २२ पैकी कोणीही असते तर >>
काय केलं असतं तर कौतुकास्पद वाटलं असतं?
<< दोन रोबो प्रसंग साजरा करताहेत असे वाटते. शीर्षकात लिहिलेला साधेपणा व गोडवा प्रत्यक्ष लेखात तितकासा उतरला नाही. >>
ही कदाचित लेखकाच्या लेखनाची मर्यादा असेल. व्यक्तीशः मला असे वाटले की प्रसंग डोळ्यासमोर होतोय.
<< आजच्या जगात वेळ ही गोष्ट कोणाकडेही राहिलेली नाही >>
विषयांतर होईल पण थोडा असहमत. वेळ सगळ्यांकडे असतो पण तो कुठे आणि कसा घालवायचा ही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि वेळेचे महत्व बऱ्याचदा उशीरा कळते, खूपदा जेव्हा वेळ थोडा उरलेला असतो.
पुन्हा बागेतला समारंभ कशाला?
पुन्हा बागेतला समारंभ कशाला? म्हणजे लग्न सोहळा तर हवा, मग असे असेल तर तो असा यांत्रिक आणि बोरिंग असायला का हवा? >>>>>+१.
व्यक्तिशः मला हा प्रकार आवडला नाही.एक औपचरिकता पार पाडली असं वाटले.
असो.त्या जोडप्याच्या वेगळ्या भावना,विचार असतीलच.त्यांचा आदर राखूनजोडप्याला शुभेच्छा!
व्यक्तिशः मला हा प्रकार आवडला
व्यक्तिशः मला हा प्रकार आवडला नाही.एक औपचरिकता पार पाडली असं वाटले.>>> ते लेखकाच्या शैलीमुळे वाटले असेल. स्थळ, वेळ, हवामान, आलेल्यांची संख्या, आणलेल्या चटयांची संख्या, किती बसले, किती उभे राहीले, किती मिनिट टाळ्या वाजवल्या वगैरे वगैरे. प्रत्यक्षात तो आटोपशीर कार्यक्रम फार छान झाला असावा.
साद, आलंकारिक वर्णन नको हे
साद, आलंकारिक वर्णन नको हे ठीक आहे पण छान सुरुवात झालेल्या लिखाणाचा पोत 'एवढ्यात एका बाजूने काही लोक शिस्तीने आत प्रवेश करतात. हे एकूण २४ जण आहेत' ह्या वाक्याने एकदम बद्लून गेलाय.
(हे जर का तेच लग्न असेल तर) लग्नाचे असेही वर्णन वाचनात आले आहे.
"सर्वांसमक्ष दोघांनी एकमेकांना काही आश्वासनं दिली जी त्यांनी स्वतः लिहिलेली असल्याने मनापासून आली होती. त्यात मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा होता. त्यांनीच लिहिलेली शपथ घेण्याचा एक छोटा विधीही केला. नातेवाईक मित्रमंडळी यांनी आपापल्या भावना दिलखुलासपणे मांडल्या. भरपूर हास्यविनोद झाले, त्याबरोबर मनापासून व्यक्त होणाऱ्या शब्दांनी अनेकांचे डोळे पाणावलेही.
लग्नसोहळा म्हणजे शेवटी काय असतं? "आम्ही आता एकत्र असणार आहोत" याची घोषणा आणि "यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छा आणि साथ हवी आहे" अशी जवळच्या लोकांना केलेली एक विनंती एवढाच तर लग्नाच्या सोहळ्याचा अर्थ . आणि अगदी हेच या कार्यक्रमात पुरेपूर होतं. डामडौल नाही, भपका नाही, खोटं मिरवणं नाही. जे होतं ते अतिशय निखळ, नितळ आणि प्रसन्न!"
हे फार आवडले.
हे फार आवडले.
वधूवरांना शुभेच्छा!
घड्याळ कल्पना छानच .
या कार्यक्रमाच्या बद्दल
या कार्यक्रमाच्या बद्दल दोन्ही बाजूने मते व्यक्त झालीत. बरे वाटले.
सर्वांचे आभार.
एखाद्या तुलनेने कमी घडणाऱ्या प्रकाराबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो याची कल्पना आहे.
काहीतरी वेगळे करायचं हा
काहीतरी वेगळे करायचं हा माझाही विचार होता. पण माझ्या वकील मित्राला याबद्दल विचारले आणि सल्ला घेतला.
त्याने सांगितले -
लग्नाची नोंद होऊन प्रमाणपत्र मिळणे सर्वात महत्त्वाचे.
त्यासाठी अपेक्षित कागदोपत्री सोपस्कार करणे गरजेचे आहे. मग तुला हवा तसा लग्नप्रकार करणे गौण आहे.
तेच केले.
"सर्वांसमक्ष दोघांनी
"सर्वांसमक्ष दोघांनी एकमेकांना काही आश्वासनं दिली जी त्यांनी स्वतः लिहिलेली असल्याने मनापासून आली होती. त्यात मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा होता. त्यांनीच लिहिलेली शपथ घेण्याचा एक छोटा विधीही केला. नातेवाईक मित्रमंडळी यांनी आपापल्या भावना दिलखुलासपणे मांडल्या. भरपूर हास्यविनोद झाले, त्याबरोबर मनापासून व्यक्त होणाऱ्या शब्दांनी अनेकांचे डोळे पाणावलेही.
लग्नसोहळा म्हणजे शेवटी काय असतं? "आम्ही आता एकत्र असणार आहोत" याची घोषणा आणि "यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छा आणि साथ हवी आहे" अशी जवळच्या लोकांना केलेली एक विनंती एवढाच तर लग्नाच्या सोहळ्याचा अर्थ . आणि अगदी हेच या कार्यक्रमात पुरेपूर होतं. डामडौल नाही, भपका नाही, खोटं मिरवणं नाही. जे होतं ते अतिशय निखळ, नितळ आणि प्रसन्न!">>>>>>> हेच हेच हवं होतं. हेच तेथे झाले असणार.
> काय केलं असतं तर कौतुकास्पद
> काय केलं असतं तर कौतुकास्पद वाटलं असतं? > का? तुम्ही लग्न करताय का? आणि मला बोलवणारे का?
===
बरं या पुरोगामी जोडप्याने डामडौल, भपका, खोटं मिरवणं, हिंदू विधी वगैरेंना फाटा दिला. ख्रिश्चन लग्नप्रमाणे वेडिंग वावज, बेस्ट मॅन टोस्ट, कोणा नातेवाईकला काही बोलायचे असेल तर ते, टाळ्या वगैरे केले. छान!
पण लग्न आंतरजातीय/धर्मीय होतं का?
ॲमी, वर जो प्रसंग आहे तो
ॲमी, वर जो प्रसंग आहे तो लेखकाने जसा पाहीला तसा सांगीतला. विषय आहे की तो कसा सांगीतला. जरा रसभरीत करुन सांगीतला असता तर वाचायला अजुन छान वाटले असते. पण लग्न आंतरजातीय/धर्मीय होतं का? हे काय मधेच?
नवरा-बायको दोघेही फक्त भारतीय
नवरा-बायको दोघेही फक्त भारतीय आहेत .
खूप सुंदर . माझ्या दादाचा
खूप सुंदर . माझ्या दादाचा विवाहसुद्धा याच रीतीने पार पडण्याचा विचार आहे .
Pages