डीडीएलजे : भूगोलाचा अभ्यास

Submitted by आशूडी on 22 January, 2020 - 00:47

आमच्या आठवीच्या भूगोलाच्या बाईंनी आम्हाला सांगितले होते की युरोपचा भूगोल शिकायचा असेल तर आधी डीडी एल जे बघा आणि मग हे पुस्तक वाचा. बाईंचं तेव्हा लग्न व्हायचे होते त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आम्हाला वेगळीच चमक तेव्हा दिसली होती त्याला हल्लीच शब्दप्रयोग सापडलाय 'डोळ्यात बदाम टाईप्स'. तर, ते होते कुरूप वेडे सारखे सर्व पुस्तकात एकच आडदांड मोठे भूगोलाचे पुस्तक कायम उपेक्षित असायचेच, त्याला या हुकुमामुळे आणखीच पुष्टी मिळाली. आम्ही आलो बघून डी डी एल जे. आणि आमची निरीक्षणे बाईंना दाखवली. त्यात आम्ही युरोपपेक्षा जास्त पंजाबची माहिती लिहील्याने बाईंच्या डोळ्यातले बदाम जाऊन तिथे पाणी आले. ते आम्हाला आनंदाश्रू वाटले. त्यांनंतर बाईंनी कुठल्याही वर्गाला असा हुकूम केल्याची वार्ता ऐकिवात नाही. आमचीच बॅच लकी म्हणून आयुष्यभर आम्ही कॉलर उडवायला मोकळे. तर ती निरीक्षणे अशी :

१. युरोप फिरायला जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा पेक्षा महत्वाचे बावजी ची परवानगी.
2. बावजींनी परवानगी दिली की रातोरात व्हिसा वगैरे येऊन तिकिटे कन्फर्म होऊन बॅगा भरून आपण निघू शकतो.
3. बावजींनी परवानगी दिली की आपल्याला आई आणि बहीण बॅग भरताना 174 सूचना करू शकत नाहीत. बावजी एकदम पॉवरफुल असतात.
4. आपल्या इथं प्रवासात परक्या माणसाशी बोलू नये असं सगळे सांगतात पण युरोपमध्ये गेलं की चालतं. विशेषतः समवयस्क मुलांशी बोललेलं.
5. युरोपच्या ट्रेनची दारं उघडी करून कुणी पाय बाहेर सोडून बसत नाही. पण दार लावून खाली पेपर न टाकता पाय पसरून बसू शकतो पुस्तक वाचत.
6. युरोपच्या हॉटेल मध्ये जाताना आपल्याला नाच गाणे बजावणे सर्व आले तरच एन्ट्री मिळते.
7. तिथे हिंदी गाणी गायली तरी लोक टाळ्या वाजवतात आणि ठेका धरतात. संगीताला भौगोलिक सीमा नाही (भूगोलाच्या बाईंना दाखवायचे असल्याने भूगोल शब्द आला पाहिजे)
8. गोव्याच्या चर्च मध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचे ते कळत नाही पण युरोपच्या चर्च मध्ये गेल्यावर मेणबत्ती लावून प्रार्थना करायची डोळे मिटून. तिथे mseb नाही त्यामुळे मेणबत्ती उद्योगाला वाईट दिवस आले आहेत म्हणून सरकारने ही योजना राबवली आहे. तेथील महिला बचत गट मेणबत्या बनवत असावेत.
9. ट्रिपमधले फोटो घाईने न बघता कुणाशीही शेअर करू नयेत नंतर जन्माचे वांदे होतात.
10. युरोपात पण आपली गाडी चुकू शकते आणि तसे झाल्यास जवळच एखादा तबेला किंवा गोठा असतो रात्री अंग टाकायला.
11. बावजींनी परवानगी दिली म्हणून लगेच दारू प्यायची हिम्मत करू नये. दरवेळी राज मल्होत्राला हिंदुस्तानी संस्कार आठवतील असे नाही. विदेश जाकर भी अपने संस्कार भूली नहीं असं आलोकनाथने म्हटलं पाहिजे परतल्यावर.
12. पंजाबात शेतातून रेल्वे जाते.
13. पंजाबी कष्टकरी बायकांची दृष्टी इतकी शक्तिशाली आहे की धावत्या रेल्वेत आपला दूरदेशी गेलेला साजन त्या स्कॅन करून शोधू शकतात हातातले काम टाकून.
14. पंजाब अगदी सधन आणि संपन्न प्रदेश आहे. तेथील वयस्कर पुरुष लांब कुर्ता आणि सलवार घालतात आणि तरुण मुले जीन्स आणि टी शर्ट. बायका मुली झगमगीत पंजाबी ड्रेस आणि साड्या. पंजाब मुळे आपल्याकडे पंजाबी ड्रेस प्रसिद्ध झाले आहेत.
15. आधीच सधन संपन्न प्रदेश असल्याने करायला काम नाही त्यामुळे कुणीही कुठल्याही वयात कुणीही कुणावरही टप्पे टाकत बसू शकतं.
16. आधीच सधन संपन्न प्रदेश असल्याने करायला काम नाही त्यामुळे तरुणाई बिघडत चालली आहे. शिकार करणे, दारू पिणे, मुलींना छेडणे आणि मारामाऱ्या करणे यात ही मुले तरबेज आहेत. मुली मात्र अजूनही नम्र आणि आज्ञेत आहेत. स्त्री पुरुष समानता अजून इथे यायची आहे.
17.पंजाबातली घरे धाब्याची असतात. एकमेकांकडे धाब्यावरुन जाणे हा चलनवलनाचा एक नवा मार्ग त्यांनी विकसित केला आहे. त्यामुळे व्यायाम होतो, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते.
18. मुबलक साधन सामग्री, शुद्ध हवा, उच्च प्रतीचे अन्नधान्य यामुळे येथील आयुष्यमान वाढले आहे. घरटी एक 90+ म्हातारं माणूस बघायला मिळते. महाराष्ट्रातली अशी माणसं फार बोलत असतात म्हणून त्यांचं कुणी ऐकत नाही पण इथली म्हातारी माणसं कमी बोलतात त्यामुळे जे बोलतात ते ऐकायला सगळे जण जातात. पॉवरफुल बावजीना पण ते कंट्रोल करू शकतात.
19. पंजाबात पांढरी कबुतरे फार असतात. त्यांना दाणे टाकणे हे नित्यकर्म आहे. आपल्याकडे चिमणीला कुणी कुत्रं विचारत नाही. पंजाबात भूतदया फार सोकावलेली दिसते.
20. कुठलीही रेल्वे बावजीना बघून भीत भीत स्टेशन सोडते. त्यामुळे बावजी सोबत असतील तर आपण पळत पळत जवळचे सोडून लांबच्या दारातून पण रेल्वेत चढू शकतो. पंजाबने आपल्या देशाला असे लाखो पॉवरफुल बावजी देऊ दे हीच प्रार्थना.
जयहिंद. जय भारत. जय पंजाब. जय युरोप.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूडी छान!! लेख आवडला.
विनोदी लेखन या सदरात असून सुद्धा लोक विसा , स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे सारखे खडे का टाकत असावेत बरे?. Happy

फारेण्डा : मस्त. पण आता लक्ष्मी रोडला शूटींगची परवानगी मिळाली नाही तर शनिवारवाड्याहून डायरेक्ट मंडईच दिसणार की. आणि मंगला ला चुकुन बायको राहिली असेल म्हणून न्यायला परत. Happy

स्टारटिंगला अंबरीश पुरीच्या दुकानातून सोमरसाच्या बाटल्या ढापतात, त्यानुसार असे समजते की युरोपियन दुकाने सायंकाळी 8 वाजेनंतर सोमरस व तत्सम पदार्थ विकत नाहीत.
लिस्ट वाढतेच आहे Happy

आधी डीडीएलजे पाहिला पाहिजे.. नाम बहुत सुना है..>>>

मी देखिल नाही पाहिला! Happy

पण इथे समजले हा विनोदी सिनेमा आहे! Proud

Pages