दहावीपर्यंत मला...
दहावीपर्यंत मला एकूण चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणातली काही वर्षं मी माझ्या गावी माझ्या आजीजवळ होतो. आणि त्या गावातली प्राथमिक शाळा ही त्यातली सगळ्यात पहिली. आमचा गाव म्हणजे बत्तीस शिराळ्यातलं एक अगदी छोटं खेडं. पाण्याचं दुर्भिक्ष वगैरे वगैरे अनेक समस्यांना तोंड देणार्या अनेक खेड्यांसारखंच एक. गावात सहावीपर्यंतच शाळा. सहावीनंतर पुढे शिकायचे असेल तर शेजारच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी जावे लागायचे. तेथे दहावीपर्यंतचे हायस्कूल होते. त्या शाळेत येण्याजाण्याकरता एस. टी. ची सोय नसल्यामुळे ये-जा पायी करावी लागायची.
गावातल्या आमच्या शाळेची अधिकृत इमारत म्हणजे दोन प्रशस्त वर्ग असलेली एक कौलारू इमारत. त्यातल्या पहिल्या वर्गात पहिलीचा वर्ग बसायचा आणि पार्टीशन करून तेथेच हेडमास्तरांचं छोटंसं ऑफिस थाटलेलं. तेच स्टाफ रूम पण. शाळेची कागदपत्रे, हजेरी, टाचणवही हे ठेवण्यासाठी शाळेत लाकडाच्या काही भल्यामोठ्या मजबूत पेट्या होत्या, त्या एकीवर एक रचून या पार्टीशनची भिंत तयार केली होती... शाळेतल्या दुसर्या वर्गात दोन वर्ग भरायचे, दुसरी आणि तिसरी. चौथीचा वर्ग आमच्या घरी माडीवर भरायचा. गावात तालमीची इमारत होती तिच्या माडीवर पाचवी भरायची आणि गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सहावी!
मुख्याध्यापकांना धरून या शाळेत एकूण चार शिक्षक होते. पैकी मुख्याध्यापक म्हणजे यवतकर गुरूजी पहिलीला शिकवायचे. त्यांना सगळे आबा म्हणत. गोटखिंडीचे सावंत गुरूजी दुसरी आणि तिसरीला शिकवायचे. पाटील गुरूजी चौथीला आणि मुळीक गुरूजी आणि सावंत गुरूजी मिळून पाचवी आणि सहावी सांभाळत. आमचे सगळे गुरूजी दुसर्या गावाहून यायचे आणि आमच्या गावात शाळेच्या वेळेत येणारी एस. टी. नसल्यामुळे आजूबाजूच्या गावात आणून सोडणार्या एस. टी. ने तेथपर्यंत येऊन मग पुढे चालत आमच्या गावात शाळेला यायचे. हे सगळे शिक्षक म्हणजे शिक्षणकार्याला वाहून घेतलेले, शिकवणे म्हणजे केवळ नोकरी म्हणून नव्हे तर जगण्याचा एक भाग म्हणून आवडीने करणारे असे हाडाचे शिक्षक होते. आणि गावात, 'एकदा पोरगं साळंत टाकलंय न्हवं का, मग घोर मिटला!' एवढा विश्वास त्यांनी माझ्या गावात कमावला होता.
... छडी हा शाळेचा अविभाज्य असा घटक होता. पाटील गुरूजी गमतीने तिला मावशीबाय म्हणायचे. आणि शिस्तभंग किंवा इतर कुठलाही गुन्हा - शाळेत असेपर्यंतच नाही तर शाळा सुटल्यावरही - करणार्यावर या मावशीबायची पघळ कृपा व्हायची. यामुळेच शाळेतल्या शिक्षकांविषयी पालकांच्या मनात अतिशय आदर असायचा. एकतर चार बुकं शिकलेली सज्जन माणसं आणि त्यात आपल्या पाल्याला घडवणारे. आणि हा आदर त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचा. कधी गुरुजी घरी आले (जन गणना वगैरेच्या कारणाने) तर फडताळाच्या अगदी तळाशी ठेवलेली ठेवणीतली शाल काढून त्यांच्यासाठी बसायला अंथरली जायची... परिणामी विद्यार्थ्यांवर शाळेच्या शिस्तीची जशी एक जरब होती, त्याचबरोबर गुरुजींविषयी अत्यंत आदरही वाटायचा.
शाळेत सरकारी शिपाई नव्हता आणि त्यामुळे शाळेतली कामे म्हणजे पाणी भरणे, शाळेची आणि शाळेच्या अंगणाची झाडलोट करणे इथपासून ते शाळेच्या वेळांनुसार घंटा वाजवणे इथपर्यंत, आम्हा विद्यार्थ्यांनाच करावी लागत. शनिवारची शाळा सकाळी सातला भरायची आणि अकरा वाजता सुटायची. मग प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यावर शाळेचे सगळे वर्ग शेणाने स्वच्छ सारवून घेण्यात येत आणि वर्षातून एकदा संपूर्ण शाळेला रंग देण्यात येई... शाळा रंगवणे हा प्रकार आम्हाला खूप आनंद देई. त्यासाठी गावातून अनेक शिड्या गोळा केल्या जात आणि दोन तीन शिड्या एकीला एक जोडून एक मोठ्ठी शिडी, अशा चारपाच मोठ्या शिड्या तयार करण्यात येत. गुरूजी रंग कालवून पत्र्याच्या डब्यात, बादलीत ओतून शिडीवर हव्या त्या उंचीवर बांधायचे आणि केरसूनी हातात देऊन आम्हाला शिडीवर चढवायचे. खाली चारपाच जणांनी शिडी घट्ट धरून ठेवायची. आणि ती केरसूनी रंगात बुडवून आम्ही शाळेच्या भिंतींवर सपासप वार करायचो. शाळा रंगवून झाल्यावर शाळेच्या भिंतींवर चिकटवण्यासाठी आम्ही कागदाचे तक्ते तयार करायचो. आपापल्या अभ्यासक्रमातल्या गणिताची सूत्रे, भाषांमधील व्याकरणातील अव्यये, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रयोग, इतिहासातल्या सनावळ्या, वंशवृक्ष, भूगोलातील प्रादेशिक माहिती हे सगळं रंगीत स्केचपेन वापरून लिहायचो आणि त्यांनी आपापले वर्ग सजवायचो. सावंत गुरूजी इतिहासातील प्रसंग, विज्ञानातील प्रयोग, आणि शाळेच्या प्रथमदर्शनी भिंतीवर भारताचा, महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा आणि तालुक्याचा असे चार नकाशे रेखाटायचे. चांगला वर्ग सजवणार्या वर्गाला बक्षीस मिळे. खूप मजा यायची.