अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ५६ ते ६०
*******************************************************************
॥ कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण ।
हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥
५६
शिवल्या वाचून
परंतु द्वैताला
गुरू शिष्या खेळा
मांडियेले ॥१२५॥
आहे नाही सोस
नच दोन भाव
ऐसा हा स्वभाव
विलक्षण ॥१२६ ॥
जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये ।
तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥
57
होवून अफाट
जग घेई पोटी
गणना एवढी
व्याप्ती ज्याची ॥१२७ ॥
परि तोची असे
नाही निशे मध्ये
नसणे अवघे
पांघरून॥१२८॥
कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु ।
तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥
५८
पूर्ण अपूर्णता
जैसी सिंधू पोटी
भरती ओहोटी
होऊनिया॥१२९॥
तैसे तया ठायी
विरुद्ध पाहुणे
असणे नसणे
दिसू येते॥१३०॥
तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥
५९
तेज आणि तम
यांचे नाही नाते
एक नाही तिथे
दुजे असे॥१३१॥
सूर्य नच जाणे
तोही भेदभाव
संपूर्ण अभाव
प्रकाशाची॥१३२॥
येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ? ।
विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥
६०
एक म्हणताच
भेद जन्मा येतो
एक पणा होतो
व्यर्थ तिथे ॥१३३॥
म्हणून गुरूला
एक विशेषण
निरर्थ दिसून
येत असे ॥१३४॥
आपणा वेगळे
कैसे हो आपण
अवघे बोलणं
अर्थशून्य॥१३५॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
__/\__ __/\__
__/\__ __/\__
कोहंसोहं१०__/\__ __/\__
कोहंसोहं१०__/\__ __/\__
छान ! एवढ्या दुर्बोध कृतीचा
छान ! एवढ्या दुर्बोध कृतीचा भावानुवादाचा प्रयत्न स्तुत्य आहे. मी आजपर्यंत अमृतानुभवाच्या अधिकारीक टीका शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण स्वरूपानंदांची "अभंग अमृतानुभव" आणी निरंजनबुवा रघुनाथांची " अनुभवामृत-पदबोधिनी" यांचा अपवाद सोडला तर निराशाच झाली. तरी या दोन कृतींची थोडी मदत झालीच.
निरंजनबुवांसारखा दत्तसम्प्रदायातील तपस्वीही त्यांच्या टीकेच्या शेवटी लिहतो -
" ग्रन्थ परम दुर्बोध.त्याचे व्याख्यान करावयाचे माझे सामर्थ्य नाही. परंतु मनास फार हौस की या ग्रंथाचा आपणास अर्थ कळावा. याकरिता श्री अलंकापुरी जाऊन(आळंदी) लेकरासारखे रडून श्री ज्ञानेश्वरपदी प्रार्थना केली. त्यानंतरच या टीकेविषयी कृपाप्रसाद झाला."
अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण यावर जास्त लिहिण्याएवढी माझी पात्रता नाही. बाकीचे भागही पूर्ण करा आता. आजनउद्या माउली नक्की तुम्हाला अमृतानुभव देतील _/\_ _/\_ _/\_
__/\__ __/\__
__/\__ __/\__
हा धागा धार्मिक ग्रूपमधे
हा धागा धार्मिक ग्रूपमधे हलवला आहे