तो गंध शोधतो मी

Submitted by निशिकांत on 10 January, 2020 - 01:26

तो गंध शोधतो मी

प्राजक्त अंगणीचा नुसताच पाहतो मी
श्वासात जो हरवला तो गंध शोधतो मी

खेळून डाव अर्धा गेलीस तू निघोनी
अन् एकटेपणाचे आयुष्य रेटतो मी

त्या पोरक्या पिलांना मी माय बाप दोन्ही
हास्यात गोड त्यांच्या तुजलाच पाहतो मी

मन शिंपल्यात माझ्या असतेस साठलेली
मोत्यांस आठवांच्या माळेत ओवतो मी

स्वप्नी तुला पहाटे होते कधी बघितले
जागेपणी अताशा ते स्वप्न पाहतो मी

या रिक्त मैफिलीचे हरवून सूर गेले
लय ताल शोधण्याचा संकल्प सोडतो मी

शेंदूर फासलेल्या दगडास पूजले तू
श्रध्दा नसे तरीही हातास जोडतो मी

तुळशीस प्रार्थिले तू सौभाग्य प्राप्त करण्या
वॄंदावनी निरांजन दररोज लावतो मी

"निशिकांत" शोध घेण्या अंधूकसा कवडसा
अंधार या जगीचा बाहूत बांधतो मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users