सावधान, ड्रिंक आणि ड्राईव्हचा गुन्हा गांभिर्याने घ्या (माझा कटू अनुभव) : उत्तरार्ध भाग २

Submitted by Parichit on 5 January, 2020 - 11:30

(उत्तरार्ध भाग १: https://www.maayboli.com/node/72953)

कोर्टातला पहिला दिवस पूर्ण वाया गेला. ऑफिसला रजा टाकून गेलो होतो. रजा वाया गेली. मन:स्तापच जास्त झाला. मग दोन दिवस थांबलो आणि वकिलाची चाचपणी केली. नशिबाने एका मित्राच्या ओळखीचा वकील भेटला. हा मात्र खरेच वकील आहे असे त्याच्याशी बोलताना जाणवत होते. त्या म्याडम सारखा नव्हता. त्याला मी माझी केस सांगितली. त्याने मला डेबिट कार्ड आणि आयडी प्रुफ घेऊन ठराविक तारखेला कोर्टात यायला सांगितले.

झाले. पुन्हा एकदा कोर्टाची वारी. यावेळी अर्थातच सराईतपणे थेट वाहतूक न्यायालयाची बिल्डींग गाठली. व त्या वकिलांची वाट पाहत उभा राहिलो. सहज पहिले तर त्या परवाच्या म्याडम आजही तिथे घुटमळत होत्याच. ओळखीचे हास्य दाखवत माझ्यापाशी आल्या.

"काय ठरले मग तुमचे?", त्यांनी विचारले.

मी म्हणालो, "सॉरी, मी माझा वेगळा वकील घेऊन आलोय"

"कोण वकील? काय नाव त्यांचे? कुठे आहेत?"

"आहेत एकजण येतील इतक्यात"

"अहो मग मी केले असते ना तुमचे काम? मला का नाही म्हणालात?"

मी त्यांचा पिच्छा सोडवण्यासाठी काहीतरी थातूरमातूर बोलून दूरवर उभा राहिलो. मी टाळतोय त्यांना लक्षात आले. "गेलास उडत" अशा अर्थाचे हातवारे करून त्या निघून गेल्या. मी रेंगाळत तिथे उभा राहिलो. वकील येण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

या काळात मला काही दृश्ये दिसली. तशा प्रकारचे दृश्य परवा कोर्टात आलो होतो तेंव्हा पण एकदा दिसले होते. तेंव्हा मी स्तंभित होऊन बघत राहिलो होतो. एक जाडजूड अशा दोरखंडाला काही बेड्या बांधल्या होत्या आणि त्या दोरखंडाच्या दोन्ही बाजूला त्या बेड्यांमध्ये हात अडकवून आरोपी न्यायालयात आणले जात होते. त्या सर्व आरोपींना पोलिसांचा गराडा होता. पहिल्या दिवशी जे दृश्य पाहिले त्यात बेडी अडकवलेलल्यांमध्ये एक म्हातारा खेडूत मनुष्य दिसत होता. त्याच्या मागे बेड्यांमध्ये काही मध्यमवयीन आरोपी होते. त्यात बायका आणि पुरुष पण होते. सहा सात जण असतील. सगळे खेडूत दिसत होते. केस विस्कटलेले. दाढी वाढलेली. अंगावर सुमार दर्जाचे कपडे. तो म्हातारा तरातरा पुढे चालला होता. चेहऱ्यावरून तापट स्वभावाचा आणि वैतागलेला दिसत होता. ते सगळेच निबर गुन्हेगार वाटत होते. मी याआधी असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. म्हणून खूप कुतुहलाने पाहत राहिलो. गांगरून गेलो. "काय केले असेल यांनी? शेतात खून केला असेल कुणाचा? कि घरात सुनेला जाळून मारले असेल?" त्यांच्याकडे पहात मी मनातल्या मनात विचार करत होतो. आज जेंव्हा पुन्हा कोर्टात येऊन इथे वकिलाची वाट पाहत उभा राहिलो तेंव्हा अशा प्रकारची दृश्ये अनेकदा दिसली. यावेळी मात्र मला हे ग्रुप्स अधिक निरखून पाहता आले. एका ग्रुप मध्ये सगळे तरुण होते. स्वच्छ अंघोळ वगैरे केलेले. केस नीटनेटके विंचरलेले. एकजण तर रुबाबात चालत होता. हातातल्या बेडीची त्याला जाणीवच नव्हती जणू. बाकीचे पण बरे दिसत होते. पण सगळे ऐन तारुण्यातले. "यांनी काय केलं असेल? पोरीवरून भांडण होऊन मारहाण? कि पैशासाठी हाणामारी करणारे भाडोत्री मारेकरी असतील? कि पेपरला बातमी येते उसन्या पैशावरून मित्राला दारू पाजून मारहाण, त्यातले हे असतील?" माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. थोड्या वेळाने अजून एक ग्रुप आला. यात दोघेच होते. पण सुसंस्कृत वाटत होते. पांढरपेशे होते. डोळ्याला चष्मा. केस पांढरे झालेले. ऑफिसर सारखी शर्ट प्यांट घातली होती. त्यांना बेड्या शोभत नव्हत्या. "यांनी काय केले असेल? कंपनीत आर्थिक फसवणूक? कि अफरातफर? कि कर्मचारी महिलेची छेडछाड वगैरे?"

ते प्रत्येक दृश्य अंतर्मुख करणारे असते. ते पाहत असताना आपल्याला थोडीफार वैचारिक परिपक्वता येते असे मला उगीचच वाटून गेले. जर कुणाला इच्छा असेल तर एकदा नक्की एखाद्या मोठ्या न्यायालयात गुन्हेगारी कोर्टाच्या आवारात फक्त काही काळ उभे राहा. तुम्हाला अशी दृश्ये नक्की दिसतील जी तुम्हाला विचार करायला भाग पाडतील.

ओके. थोड्या वेळांत माझा वकील आला. त्याने माझ्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतली. थोड्याच वेळात कोर्ट (न्यायाधीश) येईल मग कामकाज सुरु होईल. असे सांगून मला अजून काही मिनिटे वाट पाहायला सांगून तो आत निघून गेला.. एव्हाना माझ्यासारखाच गुन्हा केलेले अजून बरेचसे आरोपी तिथे जमा झाले होते. त्यानिमित्ताने मला एक गोष्ट आठवली. कोर्टात न्यायाधीश येण्याची एक पद्धत असते हे माझ्या एका मित्राने मला सांगितले होते. कोर्टात न्यायाधीश हा कसा साहेबी तोऱ्यात असतो आणि तिथे जमलेल्या आरोपिना कसे गुलामासारखी वागणूक मिळते याचे त्याने रसभरीत वर्णन केले होते. तो म्हणाला होता कि आपल्या भारतीय कोर्टात न्यायाधीश स्थानापन्न होण्याची सध्याची पद्धती आहे ती ब्रिटिशांनी सुरु केली आहे. पण अजूनही ती तशीच अस्तित्वात आहे. न्यायाधीश येताच तिथला पट्टेवाला "पधार रहे" ची आरोळी ठोकतो. मग न्यायाच्या प्रतीक्षेत जमलेल्या आरोपींच्या गर्दीला अक्षरशः धक्काबुक्की करत बाजूला सारले जाते. न्यायाधीश साहेबाना वाट करून दिली जाते. मग न्यायाधीश साहेब त्या गर्दीला कस्पटासमान लेखत त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता कमालीची माणूसघाणी वृत्ती दाखवत स्थानापन्न होतात, असे वर्णन माझ्या मित्राने केले होते. ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीश इथल्या जनतेला गुलामासारखी वागणूक देत. त्यामुळे न्याय मागायला येणाऱ्या देशी पब्लिकला ब्रिटीश न्यायव्यवस्थे कडून अशी वागणूक मिळणे एकवेळ समजण्यासारखे होते. पण आजच्या काळात इथे आमच्याच कराच्या पैशावर पोसलेले हे "सरकारी कर्मचारी" मायबाप करदात्यांना ते केवळ न्यायासाठी आलेले आरोपी म्हणून तुच्छ वागणूक देतात हे अनाकलनीय आहे. सुदैवाने माझ्या बाबत असे काही घडले नाही. कारण आम्ही सगळे आरोपी एकीकडे ताटकळत वाट पाहत असताना न्यायाधीश मात्र दुसऱ्याच दरवाजाने येऊन स्थानापन्न झाले.

कोर्ट सुरु झालेय समजताच सर्व आरोपींनी एकत्र गर्दी केली. या गर्दीत आरोपी मुख्यत्वे दोनच प्रकारचे दिसत होते. विदेशी ड्रिंक घेऊन गाडी चालवणारे उच्चभ्रू कारचालक किंवा देशी दारू ढोसून गाडी चालवणारे रिक्षाचालक वगैरे. एक "हुच्चभ्रू" आपल्या वकिलाशी तावातावाने इंग्लिशमध्ये हुज्जत घालत होता. आयटी मधला वाटत होता. त्यांच्या संभाषणाच्या ओघात तो कोणत्या भागात राहत होता त्याचा उल्लेख झाला. तो भाग उच्चभ्रूंसाठीच प्रसिद्ध होता. त्याची वकीलसाहेबा सुद्धा उच्चभ्रूंच्या केस चालवणारी असावी असे दिसत होते. "गुन्हा कबूल न करता केस चालवायची" याबाबत तिने आपल्या अशिलाला पटवले होते असे मला लक्षात आले. व तिच्या फी वरून त्यांच्यात वाद रंगला होता. तिला त्याने पैसे आधी किती द्यायचे व केसचा निकाल लागल्यानंतर (जिंकली अथवा हरली) तर किती द्यायचे यावर त्यांचे एकमत होत नव्हते. इकडे माझा वकील मात्र अद्याप गायबच होता. माझे टेन्शन वाढत चालले होते. अचानक मला तुरुंगाची शिक्षा दिली गेली तर मी काय करायचे? माझी बाजू मांडणार कोण? कुठे गायब झालाय हा? असे विचार मनात येऊन मी इकडे तिकडे पाहत होतो. तेवढ्यात हा समोरून येताना दिसला. "आहे मी इथे. अजिबात टेन्शन घेऊ नका. कोर्ट सुरु झाले आहे. थोड्या वेळात तुमचे नाव पुकारतील. मग आत या" असे सांगून तो पुन्हा आत गेला. मला थोडे हायसे वाटले.

एकेका आरोपीला बोलवून घेतले जात होते. पंधरा-वीस मिनिटात माझे नाव पुकारले गेले. माझ्या वकिलाने सुद्धा आतून मला येण्याची पुढे खून केली. गर्दीला सारत मी आत शिरलो. एक मध्यम आकाराचा हॉल होता. सिनेमात दाखवतात तसे "दोन्ही बाजूला कटघरे आणि बसण्याची व्यवस्था" वगैरे काहीही नव्हते. ते बहुतेक मोठ्या व क्लिष्ट गुन्ह्यांसाठी असावे. मल्टीप्लेक्सला जसे एक मोठा स्क्रीन असतो आणि बाकीचे छोटे तसे इथेही असावे अशी माझी समजूत झाली. सिनेमात दाखवले जाणारे कोर्ट म्हणजे मोठा स्क्रीन. मोठ्या गुन्ह्यांसाठी. आणि हा हॉल म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे वगैरे किरकोळसाठी असावा. इथे कटघरे वगैरे काही नव्हते. सगळे लोक उभेच होते. आरोपीला मध्ये उभे केले जात होते. समोर मात्र सिनेमात दाखवतात तसे न्यायासन होते. मध्ये न्यायाधीश बसले होते. पण ते खाली मान घालून काहीतरी लिहित होते. माझ्या नावाचा पुकारा होताच मी मध्ये जाऊन उभा राहिलो. न्यायाधीशांनी क्षणभरही वर बघितले नाही. ते अद्यापही खाली मान घालून आपल्या कामात मग्न होते. मी मध्ये उभारल्या उभारल्या त्यांच्या बाजूला असलेल्या पोरसवदा तरुणानेच मला विचारले "गुन्हा कबूल आहे का?" मी ठरल्याप्रमाणे चेहऱ्यावर विनम्र भाव आणून (वजा ओशट हसून) "हो" म्हणालो. मला बाजूला जायला सांगितले. झाले. ज्या गुन्ह्याच्या नोंदीला पोलिसांनी दोन अडीच तास लावले ती केस निकालात निघायला दोन सेकंद पण लागले नाहीत. कोण म्हणते आपली न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते?

मग मला बाहेर जायला सांगितले. थोड्या वेळाने माझा वकील आला. त्याने मला सांगितले, "तुम्हाला तीन हजार रुपये दंड झालाय. कोर्ट संपल्यावर एक काउंटर सुरु करतील. तिथे तो भरा आणि ती पावती खूप जपून ठेवा. जिथे तुमचे लायसन जप्त केले आहे तिथे ती पावती दाखवा. तुम्हाला लायसन मिळून जाईल. आता माझे काम संपले आहे". मी त्याचे मनोमन आभार मानले. खिशातून पैसे काढून त्याची फी दिली. त्यावर माझे आभार मानून तो निघून गेला. गर्दीत नाहीसा झाला. आता मला हि पावती घेऊन पुन्हा त्या वाहतूक पोलीस चौकीत जायचे होते.

आतापर्यंत जे जे काय घडले ते अगदी मी त्या रात्री इंटरनेटवर ज्याचा अनुभव वाचला होता त्याने लिहिल्यानुसारच अगदी तसेच घडत आले होते. त्यामुळे पोलीस चौकीत काय होणार आहे याची मला कल्पना होतीच. फक्त वकिलांनी ते तसे सांगितले नव्हते इतकेच. कारण कायद्यानुसार ड्रिंक आणि ड्राईव्ह केस मध्ये तुम्ही गुन्हा कबूल केलात तर तुमचे लायसन्स हे पोलीस चौकीतून मुख्य वाहतूक कार्यालयात पाठवले जाते. त्यांच्याकडून ते सहा महिन्यांसाठी रद्द होते. मग सहा महिन्यांनी तुम्ही लेखी माफी मागितल्यावर व पुन्हा असा गुन्हा करणार नाही असे लिहून दिल्यावर ते तुम्हाला तुमचे लायसन्स परत करतात. कायद्याच्या मार्गाने तंतोतंत गेल्यास असा सगळा द्रविडी प्राणायाम आहे. पण नेटीझनने सांगितलेल्या अनुभवामुळे पोलीस चौकीत गेल्यावर काय करायचे याचे ज्ञान मला मिळाले होते त्यामुळे मी निर्धास्त होतो.

मी ती पावती घेऊन चौकीत गेलो. तिथल्या पोलिसाला पावती दाखवली व मी लायसन्स न्यायला आलोय म्हणून सांगितले. ड्रिंक ड्राईव्ह ची केस आहे म्हटल्यावर त्याने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. यावेळी मी अंगात खूपच फॉर्मल कपडे घातल्यामुळे जरुरीपेक्षा जास्तच जंटलमन दिसत होतो. मी सरकारी नोकरीत आहे असा त्याचा समज झाला होता (हे मला नंतर कळले).

"तुमचे लायसन्स मुख्य आरटीओ ऑफिसमध्ये पाठवले जाईल. तिथून ते तुम्हाला घ्यावे लागेल", तो माझ्याकडे बघत म्हणाला

"अहो पण माझ्या वकिलांनी तर सांगितलेय कि पावती दाखवली कि लायसन्स मिळेल म्हणून?", त्याने सांगितलेले कायद्यानुसार आहे हे माहित असूनही मी साळसूदपणे त्याला विचारले

"मग तुम्ही त्या वकिलांनाच विचारा. कारण आम्हाला असे लायसन देता येत नाही"

हे सगळे नेटवर सांगितले तसेच घडत होते. मग मी इकडे तिकडे बघून अंदाज घेतला व त्याला आत्मविश्वासात घेऊन म्हणालो.

"तुमचे बरोबर आहे पण काही सेटलमेंट होते का बघा प्लीज. आधीच मी इतका त्रास सहन केलाय ह्या सगळ्यात. जन्मभरची अद्दल घडली आहे. अजून सहा महिने कशाला तंगवता?"

मी अंगात खूपच फॉर्मल कपडे घातल्यामुळे जरुरीपेक्षा जास्तच जंटलमन दिसत होतो. त्याने माझ्याकडे निरखून पाहिले. व मला विचारले, "काय करता तुम्ही? सरकारी नोकरीत आहात काय?"

काय करतो याचे उत्तर सफाईदारपणे टाळून मी त्याला मी कोणीही सरकारी अधिकारी नाही याचा विश्वास दिला. त्याला खात्री पटल्यावर तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला व म्हणाला

"लक्षात ठेवा शिक्षा अजून कडक झाली आहे आता ह्या गुन्ह्यासाठी. तुमच्याबरोबर कोर्टात आलेल्या कुणाला तुरुंगवास झाला का आज?"

"माहित नाही. नशिबाने मला तरी नाही झाला"

"बर. नियमानुसार आम्हाला तुमचे मुख्य ऑफिसात पाठवावे लागते. तिकडे सुद्धा ते सोडवायला तुम्हाला खर्च हा येतोच..."

त्याला काय म्हणायचे आहे मला लक्षात आले. मी म्हणालो, "त्याची काळजी नको. तुम्ही सांगा तुमचा इथला खर्च..."

"ते तुमच्या अंदाजाने तुम्ही ठरवा. पण वरच्या ऑफिसात खूप खर्च येईल एवढे लक्षात ठेवा"

मी पैसे काढताच त्याने ते थेटपणे न स्विकारता लांबूनच हाताने इशारा करत तिथेच टेबलवर ठेवायला मला सांगितले. पैसे ठेवताच तो मला पुन्हा बाहेर घेऊन आला. आणि ड्रावरमधून लायसन्सचे एकेक गठ्ठे काढून त्यातले माझे लायसन्स शोधून माझ्या हातात परत दिले. लायसन्स हातात पडताच मी एकदाचा मोठा सुस्कारा सोडला. तब्बल अडीच तीन महिन्यांनी परत मिळालेले लायन्सन घेऊन त्याचे आभार मानून मी तिथून बाहेर पडलो.

अशा रीतीने एक अतिमाईल्ड बीअर घेऊन शंभर दोनशे फुट कार चालवल्याची मला झालेली शिक्षा:
तीन हजार रुपये कोर्टाकडून दंड + वकिलाची फी + पोलिसांना चिरमिरी + अनेक महिने मनस्ताप

नशीब कि मी तुरुंगात गेलो नाही. थोडक्यातच बचावलो. यावरून योग्य तो बोध घेऊन इतरांनी खबरदारी घ्यावी म्हणून हा लेखनप्रपंच.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे इतकं सगळं होत drunk driving करताना सापडलं तर :o
कथेचे सार वो बुलाती है मगर जाने का नै, जाते तो जाओ मगर पिने का नै, पितो हो तो पीओ मगर पोलीस के साथ हुज्जत करने का नै Lol

Pages