सावधान, ड्रिंक आणि ड्राईव्हचा गुन्हा गांभिर्याने घ्या (माझा कटू अनुभव) : उत्तरार्ध भाग १

Submitted by Parichit on 5 January, 2020 - 11:29

(पूर्वार्ध: https://www.maayboli.com/node/72822)

त्या रात्री मी नेटवर ड्रिंक आणि ड्राईव्ह गुन्ह्याविषयी बरेच वाचले. हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे व आर्थिक दंड शिवाय कैद पण होऊ शकते अशी माहिती मिळाली. मुंबईत काही रिक्षावाल्यांना कैद झाली आहे अशा बातम्या पण वाचल्या. मी हादरलो. एका फोरममध्ये या गुन्ह्यामध्ये आधी शिक्षा झालेल्या लोकांनी आपापले अनुभव लिहिले होते.बरेच जण फक्त आर्थिक दंडची शिक्षा होऊन यातून बाहेर पडले होते. ते वाचून जीव थोडा भांड्यात पडला व पुढे कशी वाटचाल असणार आहे त्याचे बरेचसे चित्र स्पष्ट झाले. त्या फोरममध्ये एकाने तर खूप डिटेलमध्ये आपला अनुभव लिहिला होता. सुरवातीलाच त्याने लिहिले होते,

"पकडल्यानंतर पोलीस लायसन्स जप्त करतात व समजपत्र देतात. ते घेऊन आपण रात्री घरी येतो आणि नेटवर या गुन्ह्याविषयी वाचायला सुरवात करतो. तेंव्हापासूनच आपल्याला टेन्शन यायला सुरवात होते" हे त्याचे वाक्य वाचून खूपच मौज वाटली. कारण माझ्याबाबत खरेच तसे घडले होते. त्यात त्याने पुढे जे लिहिले अगदी तसाच अनुभव मला पुढे येत गेला. अगदी या पहिल्या वाक्यापासूनच मला ते जाणवले. अनेक गोष्टी आपल्याला पोलीस नीट सांगत नाहीत. विचारले तर त्याची समाधानकारक उत्तरे देत नाहीत. ती सर्व उत्तरे गुगलवर अशा फोरममधूनच मिळतात. (गुगल ला शतश: नमन व साष्टांग दंडवत. गुगल मुळे खूप खूप माहिती मिळाली). असो. तर त्या फोरमवर या व्यक्तीने पुढे लिहिले होते कि, "कोर्टात जायच्या आधी पुन्हा एकदा त्या पोलीस स्टेशनमध्ये जा व तेथून सीआर नंबर घेऊन या. हा नंबर असल्याशिवाय कोर्टात वकिलांना ती केस शोधता येत नाही." आता हि माहिती वास्तविक पोलिसांनीच मला सांगायला हवी होती. पण नाही. ते आपल्यालाच शोधावे लागते. ओके. तर मग त्याने पुढे लिहिले होते कि, "कोर्टात गेल्यावर तिथेच एखादा वकील घ्या. तो वकीलपत्र व अजून एक दोन डॉक्युमेंट तयार करेल. त्यावर सह्या करा. मग कोर्टात तुमचे नाव पुकारल्यावर न्यायाधीशासमोर तुम्हाला उभे राहायचे असते. न्यायाधीश तुम्हाला गुन्हा कबूल आहे का विचारेल. तुम्ही अत्यंत विनम्र शब्दात कबुली द्या. अजिबात उद्धट बोलू नका. कारण शिक्षा न्यायाधीशाच्या मर्जीवर असते. न्यायाधीशने ठरवले तर तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. अन्यथा फक्त आर्थिक दंड" यापुढे त्याने दंड भरल्यावर त्याला लायसन कसे मिळाले ते सुद्धा लिहिले होते जे मी पुढे तुम्हाला सांगेनच.

मायबोलीवर पूर्वार्ध लिहिल्यानंतर मी काही दिवस मुद्दाम थांबलो. लिहून काही दिवसच झाले आहेत. पुढचा भाग कधी लिहिणार अशा प्रतिक्रिया येणे साहजिक आहे. पण विचार करा हे सगळे प्रत्यक्ष घडत असताना हा "पुढचा भाग कधी घडणार व त्याचा निर्णय काय असणार?" ह्या टेन्शनखाली दोन महिन्याहून अधिक काळ मी कसा काढला असेल? तो खरोखरच अतिशय खराब असा कालावधी होता. रोज सकाळी उठले कि डोक्यावर टांगती तलवार दिसायची. आयुष्यात आधीच एकेक ताणतणाव कमी का काय म्हणून हा नसता उद्योग मागे लागलेला. कोर्टाचा कसलाच अनुभव मला आजवर नव्हता. म्हणून या कालावधीत मी जमेल तिथे विविध लोकांना कोर्टाच्या प्रोसेस विषयी विचारत होतो. मित्रमंडळी काही मदत करतील म्हणून त्यांना सांगून बघितले. त्यातल्या फक्त एकाने फ्यामिली कोर्टचा त्याचा अनुभव सांगितला. पण बाकीच्यांनी मात्र मला आधार द्यायच्या ऐवजी अजून जास्त टेन्शनच दिले. एकजण म्हणाला "तू आता संपलास. नको ते करून बसला आहेस" असे म्हणून डोक्यावर हात मारून माझ्याकडे बघत बसला. तर अजून एकाने त्याच्या कुठल्या नातेवाईकला ह्या गुन्ह्यासाठी कसे पकडले होते व लायसन परत मिळवण्यासाठी पोलिसानी त्याच्याकडून तब्बल चाळीस हजार रुपये कसे उकळले ह्याची भली मोठी कथा मला सुनवली. मग ते सगळे बाकीच्या मित्रांना फोन करून मी केलेल्या गुन्ह्याविषयी सांगू लागले. भिक नको पण कुत्रे अवर अशी अवस्था झाली. हे सगळे पाहून अखेर मी त्यांना पोलिसातल्या एका बड्या साहेबाच्या ओळखीने माझे लायसन परत मिळवले आहे असे खोटीच कथा पसरवून त्यांची तोंडे बंद केली.

समजपत्र मध्ये दिलेल्या तारखेनंतर चार दिवसांनी कोर्टात जा असे मला त्या रात्री त्या साहेबाने सांगितले खरे, पण सीआर नंबर आणायला पुन्हा तिथे गेलो होतो तेंव्हा तिथला ट्राफिक पोलीस म्हणाला, "जा निवांत पंधरा दिवसांनी. कोर्ट एकच आहे आणि अशा खूप केसेस पेंडिंग आहेत". ते ऐकून मी जरा सुस्तावलोच. समज पत्रात दिलेली तारीख उलटून पंधरा का पंचवीस दिवस झाले तरी आज जाऊ उद्या जाऊ म्हणत इतर कामाच्या रगाड्यात जायचे राहूनच जात होते. ह्या कालावधीत मी विना-लायसनची गाडी चालवत होतो हा भाग अजून निराळाच. कोर्टाकडूनसुद्धा (किंवा इतर कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून) इतके दिवस झाले तरी मला कसलीच नोटीस किंवा मेसेज आला नाही. समजपत्र बनवताना मी त्यांना माझा फोन नंबर व पत्ता दिला होता. पण नसती ब्याद नको म्हणून अखेर एक दिवस मी चक्क ऑफिसला रजा टाकली आणि कोर्टात गेलो.

आयुष्यात मी कोर्ट आजवर फक्त सिनेमामध्ये बघितले आहे. प्रत्यक्ष तिथे जाण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता. दबकतच मी कोर्टाच्या आवारात प्रवेश केला. भले मोठेच्या मोठे आवार. तिथे वकिलांचा सुळसुळाट होता. अधूनमधून पोलीस सुद्धा दिसत होते. प्रत्येक इमारत म्हणजे विविध गुन्ह्यांची वेगवेगळी न्यायालये असावीत असे मला वाटले. सगळीकडे बार असोसियेशनचे बोर्ड लावलेले दिसत होते. माझ्यासारख्या नवीन लोकांना त्याचा काडीचा उपयोग नव्हता. कुठेही दिशादर्शक फलक किंवा कुठली इमारत कशाची आहे ह्याची माहिती देणारे फलक कुठेच दिसत नव्हते. लोकांना विचारत विचारत एका बिल्डींगपाशी आलो. जरासा गोंधळूनच उभा राहिलो, तर एक म्याडम माझ्यापाशी लगबगीने आली. काय शोधत आहात असे तिने मला विचारले. मी ट्राफिक कोर्ट शोधत आहे असे सांगताच, "हेच ट्राफिक कोर्ट आहे. आणि मी इथली वकील आहे. इथेच काम करते", असे बोलून, "सांगा मला काय काम आहे तुमचे?" असे मला तिने विचारले. तिने वकीलीचा पेहराव केला होता खरा पण ती वकील आहे असे तिच्या एकंदर वागण्या बोलण्यावरून अजिबातच जाणवत नव्हते. एखादी कॉलेजची जुनी मैत्रीण बोलावी तसे एकदम व्यक्तिगत व घरगुती पद्धतीचे बोलणे होते. मी जास्तच बावचळून गेलो. वकीलाचा ड्रेस घालून हि कोण इथे उभी आहे मला कळेना. मी जरासा घाबरलोच. कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत कळणार तरी कसे? "अहो बोला ना लवकर. कसली केस आहे तुमच्यावर?" तिच्या प्रश्नाने मी भानावर आलो. तेवढ्यात अजून एक दोन वकील तिकडून आले. त्यांनी पण तेच प्रश्न केले. मी माझी केस सांगितली. त्यासरशी त्या म्याडमने मला "डीडीची केस आहे तर. समजपत्र आणले आहे का?" असे विचारले. मी हो म्हणून बॅगेतून समजपत्र काढले तसे त्या म्याडम व तिथे आलेल्या अजून दोन वकिलांनी मिळून त्या समजपत्रावर अक्षरशः झडप घातली. माझ्या हातून म्याडमने ते आधी हिसकवून घेतले आणि त्यानंतर तिच्या हातून ते हिसकवून घेण्यासाठी बाकीचे दोन वकील धडपडू लागले. ह्या प्रकाराने मी चक्रावलोच. "अरे बापरे बाप. काय रे हे? कोण आहेत हे लोक? कुणाच्या हातात मी समजपत्र दिले?" असा विचार करत मी घडला प्रकार थिजल्यासारखा होऊन पाहत होतो. त्यांच्या झटापटीत ते समजपत्र फाटतेय कि काय असे मला वाटू लागले. मी ते परत घ्यावे असा विचार करतोय तोच त्या तिघांपैकी म्याडम आणि एक वकील यांच्यात नजरेनेच समझोता झाला असावा. त्या दोघांनी ते समजपत्र एकत्रितपणे ताब्यात घेतले. त्यासरशी तिसरा वकील निघून गेला.

त्या दोघांनी मग मला आपल्या पाठोपाठ यायला सांगितले. ती म्याडम वकील आहे यावर अजूनही माझा विश्वास बसायला तयार नव्हता. मला ते दोघे कुठे घेऊन जाणार आहेत हे माहित नव्हते तरी मी मुकाट्याने त्यांच्या मागोमाग गेलो. मग ते मला जवळच्या एका छोट्या इमारतीत घेऊन गेले. तिथे जाताच एका खोलीत बाक टाकले होते. त्यातल्या एक बाकावर आम्ही बसलो. अन्य बाकांवर इतर वकील आपापल्या अशिलांना घेऊन बसले होते. मला तिथे बसायला सांगून ते दोघे माझे आधारकार्ड घेऊन गेले व जवळच्या काउंटरवरून काही फॉर्म्स घेऊन आले. आधारकार्ड व समजपत्रात बघून माझे सारे डिटेल्स त्यातल्या एकावर त्यांनी भराभर लिहून काढले.

"इथे सही करा", माझ्यासमोर फॉर्म्स ठेवत ती म्याडम म्हणाली. "तुम्हाला गुन्हा कबूल करायचा आहे कि केस चालवायची आहे? तुमच्या भविष्याच्या दृष्टीने गुन्हा कबूल करण्यापेक्षा केस चालवणे जास्त योग्य राहील", एका दमात ती बोलून गेली.

मला कळेना हि काय विचारत आहे? मला तर फक्त गुन्हा कबूल करायचे इतकाच पर्याय माहित होता. आणि ते दोघेही फॉर्म्सवर मी सही करण्यासाठी घाई करत होते. मला एकंदर सगळे संशयास्पद वाटू लागले. मी सावध झालो व सही केली नाही.

मी म्हणालो, "जरा थांबा. घाई करू नका. आधी सांगा केस चालवायची म्हणजे काय?"

"अहो केस चालवायची म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत होतात हे कोर्टासमोर कबूलच नाही करायचे", ती लाघवी आवाजात बोलली.

"अहो पण ते कसे शक्य आहे? पोलिसांनी मशीनवर रीडिंग घेतले आहे. ते थोडेच कोर्ट खोटे ठरवेल?"

"ते करता येते सगळे हो. त्यासाठीच आम्ही आहे इथे. त्याचे टेन्शन नका घेऊ तुम्ही. हे बघा आतापर्यंत किती ड्रिंक आणि ड्राईव्हच्या केसेस आम्ही क्लीअर केल्या आहेत. हे निकाल वाचा. तुम्ही स्वत: वाचून बघा. मी खोटे सांगत नाही. या केसेस आजच सकाळी कोर्टाने क्लीअर केल्या आहेत बघा", असे म्हणून तिने आपल्या पर्समधून काही कागद काढून माझ्या पुढ्यात टाकले. मी सहज बघितले. कोर्टाने दिलेले निकाल वाटत तरी होते ते. त्यात निर्दोष मुक्तता केली असल्याचा उल्लेख होता.

"ओ पण माझ्या माहितीनुसार गुन्हा कबूल करणे हा एकच योग्य पर्याय आहे"

"ठीक आहे तुम्हाला तसे हवे असेल तर तसे करून देऊ"

"पण दोन्हीमध्ये फरक काय आहे सांगू शकाल का? मी नवीन आहे इथे"

"गुन्हा कबूल न करता केस चालवली तर ती एक महिना चालेल. त्यासाठी आमचे चार्जेस जास्त आहेत. पण ते तुमच्यासाठीच जास्त फायद्याचे राहील. निर्दोष सुटलात तर सरकारी रेकॉर्डवर कुठेच तुम्ही ड्रिंक व ड्राईव्ह केलात अशी नोंद राहणार नाही. पण जर गुन्हा कबूल करणार असाल तर आमचे चार्जेस कमी आहेत. त्यामुळे तुमचे पैसे थोडे वाचतील व आजच्या आज दंड भरून सुटाल. पण त्यात तुमचे नुकसान हे आहे कि सरकार दप्तरी ते रेकॉर्डला कायमचे राहील व पुन्हा जर कधी चुकून ड्रिंक व ड्राईव्ह केलेत तर थेट तुरुंगातच जाल. सेकंड टाईम डीडी साठी वकील सुद्धा वाचवू शकणार नाही तुम्हाला"

"अच्छा. असा मामला आहे तर", असे म्हणून विचार करू लागलो

"अहो लवकर निर्णय घ्या. कोर्टाची वेळ संपून जाईल", ती घाई करत म्हणाली

"थांबा मला सल्लामसलत करायला वेळ हवाय. कारण कबूल न करण्याचा पर्याय मला माहित नव्हता. माझ्या एका वकील मित्राने मला गुन्हा कबूल करणे हा एकच पर्याय सांगितला होता", इंटरनेट वर वाचून आलो आहे असे सांगण्या ऐवजी वकील मित्र असे मी मुद्दामच खोटे बोललो.

"बर आधी सह्या तर करा. कोर्टात काय सांगायचे, गुन्हा कबूल करायचा कि नाही ते आपण नंतर बघू. तुम्ही आधी फॉर्म्सवर सह्या करा बघू पट्कन", ते दोघे माझ्यावर सही करण्यासाठी दबाव टाकू लागले.

मग मात्र मी चांगलाच गोंधळलो व सावध झालो. सही करण्यासाठी दडपण का आणत आहेत हे मला कळेना. मी त्यांना म्हणालो, "सही करण्यासाठी प्लीज माझ्यावर प्रेशर टाकू नका. मला वेळ लागणार आहे. पण त्या आधी मला तुमचे आयडीकार्ड वगैरे काही मिळेल का?"

यावर त्यांनी चमकून व नाराजीनेच माझ्याकडे बघितले आणि दोघांनीही आपापली व्हिजिटिंग कार्ड काढून मला दिली. तशी नाखुषीनेच. मी बघितले, त्यावर त्यांचे नाव पत्ता नि वकिलीचा सिम्बॉल छापला होता. तरीही मला त्यांची खात्री वाटेना. कारण तशा प्रकारची व्हिजिटिंग कार्ड्स काय मी स्वत: सुद्धा बनवून घेऊ शकत होतो.

"माफ करा मला निर्णय घ्यायला उशीर लागेल, मला आता सही करता येणार नाही", असे म्हणून मी माझे आधारकार्ड आणि समजपत्र पट्कन तिथून उचलले आणि उठलो आणि जाऊ लागलो.

"अहो तुम्ही असे काय घाबरलात? असे नका हो करू. तुम्हाला गुन्हा कबूल करून आजच्या आज मोकळे व्हायचे तर असेल तो पर्याय सुद्धा आपल्याकडे आहे म्हणून संगितले ना मी? जाऊ नका तुम्ही. सही करा बघू आधी इथे पट्कन", ती जवळजवळ मला आडवी येतच बोलली.

"थांबा प्लीज. मी माझ्या वकील मित्राला फोन करतो व सल्ला घेतो व येतो पुन्हा इथे तुमच्याकडेच. मी पळून नाही जात", मी सावध पवित्रा घेत बोललो व निघून जाऊ लागलो

यावर ती मला आडवे येत काही म्हणणार तोच त्या वकीलाने नजरेनेच तिला इशारा करत तिला गप्प बसवले व मला जाऊ दिले.

आता मात्र मी जरा घाबरलोच. हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे असे वाटू लागले व थोडे लांबवर आडोशाला जाऊन मी फोनवर बोलायचे नाटक केले. असे करत हळूच तिथून निघून जायचा माझा प्लान होता. तर या म्याडम माझ्या मागोमाग तिथे हजर. माझे फोनवर बोलणे संपण्याची वाट पाहत ती तिथेच उभी राहिली. मग थोड्या वेळाने मी फोन बंद करताच माझ्या जवळ येऊन, "घेतला का सल्ला तुमच्या वकिलांचा? मग काय ठरलेय शेवटी तुमचे?" अशी सुरवात करत माझ्या नजरेस नजर लावून अत्यंत मैत्रीपूर्ण आवाजात माझ्याशी बोलू लागली. थोडे पैसे जास्त घालून गुन्हा कबूल करण्याचा व एक महिन्यात निर्दोष सुटण्याचा तिचा पर्याय मला लुभावत होता. तसे मी तिला सांगितले सुद्धा. पण हिच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आता एक महिना म्हणते आहे. पण एक महिन्याने अजून थोडे दिवस लागतील, अजून थोडे पैसे लागतील म्हणाली तर काय? कोर्टाच्या चकरा काटणारी माणसे ऐकून होतो.

आम्ही बोलत उभे होतो. दहा एक मिनिटे ती मला कन्व्हिन्स करत होती. खरे सांगायचे तर तेवढ्या काळात माझा विश्वास तिने सम्पादन केला. मला ती जवळच्या विश्वासू मैत्रिणीसारखीच वाटू लागली. काय हरकत आहे विश्वास ठेवायला हिच्यावर? हि फसवेल असे वाटत नाही. असे विचार माझ्या मनात येऊ लागले. तशी ती मला एव्हाना आवडू पण लागली होती. थोडेफार पैसे गेले तर जाऊ देत पण यानिमित्ताने एक नवीन मैत्रीण तर मिळेल, असे मला वाटू लागले होते. पण खूपच प्रयासाने मी स्वत:ला कंट्रोल केले व तो विचार डोक्यातून काढून टाकला. यापेक्षा, ओळखीतूनच एखादा खात्रीचा वकील गाठून निर्दोष सुटण्याविषयीचे व अन्य काही पर्याय चाचपून पहावे व जे काय करायचे ते त्यांच्या मार्फतच करायचे असा विचार केला. आणि कुठेही सही वगैरे न करता तिथून घरी निघून आलो.

(उत्तरार्ध भाग २: https://www.maayboli.com/node/72954)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<
ह्या कालावधीत मी विना-लायसनची गाडी चालवत होतो हा भाग अजून निराळाच.
>>>
जहाँपना, तुस्सी ग्रेट हो. तोहफा कबूल करो.

जहाँपना, तुस्सी ग्रेट हो. तोहफा कबूल करो.>>
जहाँपनाच आहेत ते. नाहीतर इतक्या मनस्तापातही म्याडमशी मैत्री करण्याचा विचार डोक्यात आला असता का?

थोडेफार पैसे गेले तर जाऊ देत पण यानिमित्ताने एक नवीन मैत्रीण तर मिळेल, असे मला वाटू लागले होते.
>>
नमस्कार! धन्य आहात. पण वाचायला मजा आली.