ती,मी आणि बरंच काही : ७
कॉलेजला जायचं म्हणून जात होतो, तिचं कॉलेज संपल्यापासून आम्ही बसायचो त्या जागी मी एकटाच तिच्या आठवणी आठवत बसून राहायला लागलो.
हालत अतिशय भयंकर झाली होती, जेवायची इच्छा होत नव्हती, जगावंसं वाटत नव्हतं. आमचं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं.
तिची काय स्थिती झाली असेल ह्या विचाराने तर मी कासावीस व्हायचो.
तरीही मी घरी सगळ्यांना समजवायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतोच पण हाती केवळ निराशा येत होती.
जवळ जवळ दोन महिने व्हायला आले तिचा चेहरा देखील मला दिसला नव्हता.
एक दिवस तिच्या नंबर वरून कॉल आला, मी काही क्षण वेड्यासारखा पाहतच राहिलो, तिचा आवाज ऐकायला मिळेल ह्या आशेने अधाशासारखा तो कॉल घेतला.
फोन तिच्या बहिणीने केला होता कळलं ती खूप आजारी पडलीये, आणि दोन दिवस झाले ऍडमिट आहे, खात नाही पाणी घेत नाही आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये.
तुम्ही या ना तिला समजवा ना म्हणून ती मला रिक्वेस्ट करत होती.
स्पेसिअल रूममध्ये एका कॉटवर ती निश्चल झोपलेली होती, एका हाताला सलाईन लावलेली, विस्कटलेली केसं, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, दोन महिन्यात अतिशय अशक्त झाली होती ती, तिची ती स्थिती पाहून मी कितीतरी वेळ त्या रूमच्या कोपऱ्यात रडलो. मम्मा तिचे वडील बहीण भाऊ सगळे समोरच होते पण मला स्वतःला आवरता येत नव्हतं.
त्यांची देखील काही वेगळी स्थिती नव्हती, मम्मानेच मला धीर दिला.
कळलं कि आजार काही खास नाहीये पण डॉक्टर म्हणाले मानसिक धसका घेतला आहे तिने, अतिशय तणावाखाली आहे ती.
हे सगळं माझ्या मुळे झालं होतं, मला तर तिच्या घरच्यांसमोर मान वर करायची देखील हिम्मत होतं नव्हती.
मला तिच्यासोबत बोलायचं होतं, पण ती उठत नव्हती, शुद्धीवर होती पण डोळे उघडत नव्हती.
तिला मी आल्याचं कळलं होतं, ती जागीच होती,
सगळे बाहेर गेले मी तिचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहत बसलो होतो, वाईट वाटून मी पुन्हा रडायला लागलो. काहीच क्षणांत जाणवलं तिने माझा हात घट्ट पकडला होता, हळू हळू डोळे उघडले.
तेव्हाही मी तिला समजावत होतो, म्हणालो तुझ्यासाठी मी घरच्यांना सोडेन पण ती म्हणाली,
आधी आई वडील मग मी, ते नसते तर तू नसता, मी नसले तरी तू असणार आहेस.
ती ऐकायलाच तयार नव्हती, ना तिला तिच्या आई वडिलांना दुखवायचं होतं ना माझ्या आई वडिलांना, मग त्यासाठी ती स्वतःला दुखावत होती, सगळं सहन करत होती.
मी तिच्या आई वडिलांच्या हात पाय जोडले, म्हणालो माझ्या आई वडिलांशी बोला, कदाचित तुमचं ऐकतील.
एव्हाना त्यांना कळलं होतं कि माझ्याशिवाय तिचं काय होईल त्यामुळे तिच्यासाठी ते तेही करायला तयार झाले.
मी रोज जाऊन तिची खूप काळजी घ्यायचो, ती बारा दिवसांनी घरी आली. एव्हाना सगळ्या लोकांना आमच्यात काय चाललंय, घरी काय स्थिती आहे सगळं कळलं होतं.
खूप लोकं नावं ठेवत होती, नको नको बोलत होते, नको त्या चर्चांना उधाण आले होते.
पण तिच्या मम्मानेच कणखर बनून सगळ्यांचे तोंड बंद केले म्हणाल्या माझी पोरगी दिलीये त्याला, लग्न ठरलं आहे त्यांचं, त्यामुळे माझ्या मुलीविषयी एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही.
गावात राहणाऱ्या मुलीच्या आई वडिलांनी ह्या पातळीवर येऊन सपोर्ट करणे हि एक अविश्वसनीय गोष्ट होती, ज्यासाठी मी त्यांचे आयुष्यभर आभार मानीन, ह्या गोष्टी साठी माझ्या मनात त्यांच्या विषयी जो आदर निर्माण झाला आहे तो कधीच कमी होणार नाही.
माझ्या घरी तिच्या आई वडिलांनी येऊन माझ्या आई वडिलांशी बोलायचं ह्या गोष्टीला तिने तीव्र नकार दिला, कारण जर त्यांचा त्यांनी अपमान केला तर ती गोष्ट तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट असेल आणि त्यासाठी ती माझा आयुष्यभर तिरस्कार करील.
तरीही तिला न सांगता माझ्या आई वडिलांना ते भेटले, आई तरीही नकार देतंच राहिली, त्यांचा काहीही अपमान न करता त्यांना तिने समजावून नकार दिला. त्यांनीदेखील त्यांना खूप समजावलं, पण निष्फळ.
तिला जेव्हा कळलं तेव्हा माझ्या कानाखाली वाजवून मला घरातून हाकललं तिने म्हणाली,
" तू असमर्थ आहेस तुझं प्रेम मिळवायला, तुझे घरचे ऐकत नाहीयेत, त्यासाठी माझ्या आई वडिलांना मी अपमान सहन करू देणार नाही, तुझ्यात हिम्मत असेल तर तुझ्या घरच्यांना समजावं, आणि जर नाहीच ऐकले तर ह्या पायरीवर पुन्हा मी मेल्यावरच ये तो पर्यंत तोंड दाखवू नकोस"
तिचा एक एक शब्द बाण बनून घुसले होते आत, ते ऐकण्यापेक्षा मेलेलं बरं होतं वाटून गेलं.
मी घरी चार दिवस अन्नाचा एकही कण न घेता राहिलो, कोणाशी एकही शब्द बोललो नाही, खूप समजावलं सगळ्यांनी पण मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नव्हतं.
आई वडिलांनी नकार देण्याचं कारण तेच " लोकं काय म्हणतील?"
आम्ही तिच्यापेक्षा थोड्या खाली जातीचे, त्यात आमचे सगळे नातेवाईक कट्टर जातीवादी, सगळे नाराज होऊन आमच्यासोबत कुणीच बोलले नसते, जवळची लोकं दुरावली असती. बरीच कारणं होती.
मी काही महिन्यांनी माघार घेईल असं समजून ते त्यांच्या शब्दावर कायम राहिले आणि मी माझ्या हट्टावर. . .
चार दिवस काहीच न खाल्ल्याने अतिशय अशक्त जाणवत होतं, खिडकीत जायला उभा राहिलो ते अंधारी येऊन खाली कोसळलो आणि एकच गलका उठला. . .
अशा वळणावर आजचा भाग संपला की
अशा वळणावर आजचा भाग संपला की पुढील भागाच्या प्रतिक्षेत सारखं मायबोली वर यावं लागेल.....
छान झाला आहे पण छोटासा झाला आजचा भाग......